जर्मनीमधील प्रख्यात हॅन्नोवर मेडिकल स्कूलमध्ये ‘बायोमेडिकल रिसर्च’ विभागामार्फत मॉलिक्युलर मेडिसिन या विषयात पीएच.डी.साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी जीवशास्त्र वा वैद्यकीय क्षेत्रांतील उच्च पदवीधरांकडून १ एप्रिल २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी : हॅन्नोवर मेडिकल स्कूलकडून दिली जाणारी पीएच.डी. पदवी जर्मनीमधील तीन नामांकित वैद्यकीय संशोधन संस्था अनुक्रमे लेबनित्झ युनिव्हर्सटि ऑफ हॅन्नोवर, द युनिव्हर्सटि ऑफ व्हेटर्नरी मेडिसिन, हॅन्नोवर आणि हेल्मोल्ट्झ सेंटर ऑफ इन्फेक्शन रिसर्च या सर्वाच्या सहकार्याने दिली जाते. या डॉक्टरल अभ्यासक्रमासाठी पूर्वी DAAD अंतर्गत शिष्यवृत्ती दिली जायची. आता मात्र, ‘जर्मन एक्सलन्स इनिशिएटिव्ह’ कार्यक्रमांतर्गत या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. संबंधित पीएच.डी. जरी मॉलिक्युलर मेडिसिनमध्ये असली तरी संशोधनाचे उपविषय बव्हंशी व्यापक आहेत. पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या संशोधनाची पातळी अतिशय उच्च असून हा अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रांतील युरोपियन मानकांनुसार मूल्यांकित केलेला आहे.
शिष्यवृत्तीबद्दल : हॅन्नोवर मेडिकल स्कूलची ही शिष्यवृत्ती ऑक्टोबर २०१३ मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी आहे. या शिष्यवृत्तीचा कालावधी तीन ते चार वर्षांचा आहे. तसेच, शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला या संपूर्ण कालावधीसाठी दरमहा साधारणपणे बाराशे ते १३५० युरो एवढा भत्ता दिला जातो.
विद्यापीठाने जीवशास्त्र या विषयातील उच्च पदवीधरांसाठी ही शिष्यवृत्ती आहे, असे त्यांच्या वेबसाइटमध्ये जरी म्हटले असले तरी आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी हा निकष थोडा वेगळा आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडे वैद्यकीय क्षेत्रामधील एम.बी.बी.एस. किंवा एम.डी. पदवी असेल तर त्यांना या डॉक्टरल कार्यक्रमासाठी सहज प्रवेश मिळू शकतो. म्हणूनच या लेखाचे शीर्षकसुद्धा ही शिष्यवृत्ती वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधरांनाच जास्त उपयुक्त आहे असे दर्शवते.
आवश्यक पात्रता : ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराकडे वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी असावी. आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडे किमान एम.बी.बी.एस. अथवा व्हेटर्नरी मेडिसिन, बायोकेमिस्ट्री किंवा मॉलिक्युलर बायोलॉजी मधील पदव्युत्तर पदवी (M.Sc.) असावी. त्याचबरोबर अर्जदाराकडे किमान ६ महिन्यांचा एखाद्या प्रकल्प संशोधनाचा अनुभव असावा. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदार टोफेल अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय ३२ पेक्षा जास्त असू नये.
अर्जप्रक्रिया : स्कूलच्या वेबसाइटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. ही वेबसाइट जर्मन, डच व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यापकी इंग्रजी भाषा निवडावी.
अर्जदाराला फक्त शिष्यवृत्तीसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज नसून पीएच.डी. प्रवेश व शिष्यवृत्ती दोन्हींसाठी मेडिकल स्कूलकडे एकच अर्ज करायचा आहे. सर्वप्रथम अर्जदाराला स्वत:च्या माहितीसह मेडिकल स्कूलच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर स्कूलकडून अर्जदाराला एक ई-मेल पाठवला जाईल. त्या ई-मेलवर अर्जदाराची ओळख पटल्यानंतर मग अर्जदाराला पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.
अर्जप्रक्रियेचा एक भाग म्हणून अर्जदाराला त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित दोन तज्ज्ञांचा ई-मेल आयडी अर्जात नमूद करावा लागेल. स्कूल नंतर त्यांना स्वतंत्रपणे संपर्क करून अर्जदारासाठी शिफारसपत्र मागवून घेईल.
अंतिम मुदत : अर्जदारांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १ एप्रिल २०१३ आहे.
महत्त्वाचे दुवे :
http://www.mh-hannover.de/    n
itsprathamesh@gmail.com

Story img Loader