खिशातला स्मार्टफोन असो किंवा किचनमधला मायक्रोवेव्ह ओव्हन असो, आपलं दैनंदिन जीवन सोपं करणाऱ्या या वस्तूंची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, अशा वस्तूंची आपल्याला नवलाई वाटत नाही. या वस्तूंच्या माध्यमातून तंत्रज्ञान हे आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. वेगवेगळ्या वस्तू आपण अगदी सराईतपणे वापरत असलो तरी आपल्याला या वस्तूंमागचं विज्ञान माहिती नसतं. कदाचित यामुळेच 2जी, 3जी स्पेक्ट्रम म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून न घेता बातमीतल्या केवळ राजकीय बाजूवर जास्त चर्चा होताना आढळते किंवा भारतात अनेक प्रश्न असताना चांद्रयान, मंगळयान अवकाशात सोडण्याची गरज काय, असे प्रश्न विचारले जातात. मुळात अवतीभवती घडणाऱ्या वैज्ञानिक घटनांच्या केवळ दृश्य परिणामांचा विचार न करता या घटनांमागे असलेल्या विज्ञानाचा आणि या विज्ञानामुळे भविष्यात काय साधता येईल याचा अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. रूढ अर्थाने विज्ञानाशी संबंध नसलेल्या लोकांना असा विचार करणं जमत नाही किंवा अवघड जातं; आणि इथेच विज्ञान प्रसारकांची भूमिका महत्त्वाची ठरते.
अवतीभवती घडणाऱ्या घटनांमागचं विज्ञान सर्वसामान्य लोकांना रंजकतेने उलगडून त्यांच्या विज्ञानाविषयीच्या जाणिवा कशा प्रगल्भ करता येतील आणि यामध्ये विज्ञान प्रसारकांची काय भूमिका असली पाहिजे, याविषयी विचारमंथन करण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स, मुंबई आणि पंजाब राज्य शासनाचे पंजाब स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये नुकतंच दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अ. पां. देशपांडे यांनी देशातल्या विज्ञान प्रसारकांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी, त्याचप्रमाणे विज्ञान प्रसारासाठी संस्थेने वेगवेगळ्या स्तरांवर केलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर परिषदेचे दुसरे आयोजक असलेल्या पंजाब स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीतर्फे विज्ञान प्रसारासाठी कोणकोणते कार्यक्रम पंजाबमध्ये राबवण्यात येतात, याची ओळख पंजाब स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीच्या संचालिका डॉ. नीलम गुलाटी शर्मा यांनी करून दिली. रासायनिक खतं, कीटकनाशकं यांचा अर्निबध वापर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेलं अज्ञान; तसंच अमली पदार्थाचे दुष्परिणाम अशा पंजाबमध्ये भेडसावणाऱ्या स्थानिक प्रश्नांची उकल करण्यासाठी स्टेट कौन्सिलतर्फे कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत, यासंबंधी डॉ. नीलम गुलाटी शर्मा यांनी सादरीकरण केलं.
या परिषदेचं उद्घाटन भाभा अणू संशोधन केंद्राच्या रेण्वीय जीवशास्त्र आणि शेती विभागाचे माजी प्रमुख डॉ. एस. के. महाजन यांनी केलं. देशाच्या संदर्भात काही निर्णय घेतानासुद्धा विज्ञान समजून घेण्याची आवश्यकता असते. जर एखाद्या घटनेचा वैज्ञानिक दृष्टीने सखोल विचार न करता निर्णय घेतले तर त्याचे गंभीर परिणाम देशातल्या जनतेला भोगावे लागू शकतात. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय नेत्यांना या घटनेमागचं विज्ञान सोप्या रीतीने समजावून देणं अत्यंत गरजेचं असतं; असा विचार वेगवेगळी उदाहरणं देत डॉ. महाजन यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात मांडला. नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सचे कार्यवाह सुहास नाईक-साटम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या परिषदेमध्ये एकूण चार सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. पहिलं सत्र होतं वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यासारख्या मुद्रित आणि रेडियो, टी.व्ही.सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून विज्ञान प्रसार.
या सत्रामध्ये जेष्ठ विज्ञान लेखक बिमान बसू यांनी मासिकांच्या माध्यमातून देशभरात विज्ञान प्रसार कसा केला जात आहे, याचा आढावा घेतला. तब्बल ३० वर्षे विज्ञानाला वाहिलेल्या ‘सायन्स रिपोर्टर’ या प्रथितयश मासिकाचे संपादक म्हणून काम केल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात काम करताना आपल्याला आलेले अनुभव विशद केले. त्यांच्या मते, मासिकांच्या माध्यमातून जास्त सविस्तरपणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने विज्ञानविषयक लेखन करता येतं. मात्र विज्ञान प्रसार करण्याच्या हेतूने लिहिलेल्या या लेखांचा प्रमुख उद्देश लोकजागृती करणे हा असल्याने त्यामध्ये तांत्रिक भाषा टाळणे आवश्यक ठरते.
याच सत्रात बोलताना पत्रकार मृत्युंजय बोस म्हणाले की, विज्ञान प्रसाराच्या कार्यात सायन्स रिपोर्टरसारखी वेगवेगळी मासिकं, दूरदर्शन आणि रेडिओ चांगली कामगिरी बजावत आहेत. पण वृत्तपत्रे मात्र या क्षेत्रात काहीशी मागे पडल्याचं आढळत आहे. यामागची कारणमीमांसा स्पष्ट करताना ते म्हणाले की, १०-१२ वर्षांपूर्वी अनेक वृत्तपत्रांमध्ये विज्ञानातले वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी विशिष्ट व्यक्ती असायच्या; पण आता ती परिस्थिती राहिली नाही. इतर प्रकारच्या बातम्या देणाऱ्या व्यक्ती जेव्हा विज्ञानातल्या विषयांवर बातम्या किंवा लेख देतात तेव्हा निश्चितच त्याला योग्य न्याय दिला जात नाही. काही वेळा विज्ञानातल्या तज्ज्ञ व्यक्तींकडून लेख मागवले जातात. पण हे लेख अनेकदा तांत्रिक भाषेत लिहिले गेल्यामुळे त्यातलं विज्ञान आणि या विज्ञानाचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही. एखाद्या युद्धनौकेवर जेव्हा विमान उतरवलं जातं, तेव्हा अनेक वैज्ञानिक बाबींचा विचार केला जातो. पण हे जर सोप्या भाषेत चपखलपणे मांडता आलं नाही तर या घटनेतला थरार काय असतो, हे समजणार नाही.
वृत्तपत्र हे समाज प्रबोधनाचं सर्वात स्वस्त आणि सर्वदूर सहजपणे उपलब्ध असलेलं माध्यम आहे. मात्र हे माध्यम योग्य प्रकारे वापरण्याची गरज बोस यांनी व्यक्त केली. या सत्रात पंजाब स्टेट कौन्सिल फॉर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीतर्फे सहभागी झालेल्या डॉ. ए. एस. िढडसा यांनी रेडियोसाठी विज्ञानविषयक नभोनाटय़ लिहिताना कोणकोणत्या गोष्टी लेखकाने लक्षात घ्याव्यात आणि केवळ शब्दांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या डोळ्यांसमोर दृश्य कसं तयार करावं, हे उदाहरणांसह उलगडून दाखवलं. त्यानंतर झी क्यू या टी.व्ही. चॅनलचे प्रमुख कार्यकारी अधिकारी के. व्ही. एस. सेशसाई यांनी झी टीव्हीच्या माध्यमातून मुलांसाठी विज्ञानविषयक कार्यक्रमांची निर्मिती कशी केली जाते हे काही कार्यक्रम प्रत्यक्ष दाखवून स्पष्ट केलं.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात लुधियानाच्या सेंटर फॉर कम्युनिकेशन अ‍ॅण्ड इंटरनॅशनल िलकेजेस या संस्थेचे सहसंचालक डॉ. अनिल शर्मा यांनी नाटिका, लोकसंगीत यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मनोरंजक पद्धतीने मांडून त्यांना सोप्या भाषेत विज्ञान असं समजावून सांगता येतं, हे दाखवून दिलं. केवळ विज्ञानविषयक लेखन करतानाच नव्हे तर ‘टेलीमेडिसिन’च्या माध्यमातून रोगनिदान करणं, औषधोपचार करणं यामध्येसुद्धा विज्ञान संप्रेषणाचा वाटा महत्त्वाचा असतो, हे बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. रोहिणी चौगुले यांनी विशद केलं. मुळात ‘टेलीमेडिसिन’ म्हणजे काय, ही प्रणाली कशी कार्यरत असते, या पद्धतीचे फायदे-तोटे काय आहेत यासंबंधी त्यांनी विवेचन केलं.
त्यानंतर पतियाळा येथून आलेल्या डॉ. बलिवदरसिंग सूच यांनी सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण कार्याचे स्वामित्व हक्क का आणि कसे घ्यावेत हे विशद केलं. विज्ञान प्रसारकांनी केलेलं कार्य हे जरी लोकांसाठी असलं तरी त्यांनी आपल्या कामाची कुठेही कॉपी होऊ नये, यासाठी सतर्क राहिलं पाहिजे, असं सांगितलं. जर एखाद्याला आपल्या कामाचा फायदा सर्वाना मोफत मिळावा असं वाटत असेल तरी केलेल्या कामाचे स्वामित्व हक्क घेऊन ते काम सर्वासाठी मोफत खुलं करता येऊ शकतं, असंही त्यांनी सांगितलं.
यानंतर अलोक ठाकूर यांनी विज्ञान प्रसारकाने विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान पोहोचवताना कोणकोणत्या बाबींचा विचार करण्याची गरज आहे, हे स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विज्ञान सांगताना आपण वैज्ञानिक भाषेच्या संदर्भात अधिक जागरूक असलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात वेगवेगळ्या पद्धतींनी विज्ञान शिक्षण कसं समृद्ध करता येईल, यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सुरुवातीला अमर चित्रकथा, टिंकल, पार्थ अशा चित्ररूप साहित्यातून मुलांपर्यंत रंजकतेने विज्ञान पोहोचवणाऱ्या लेखिका मार्गी मुजुमदार सास्त्री यांनी विज्ञान शिक्षण देताना मुलांच्या भावनांचाही गांभीर्याने विचार करायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. चित्रकथांच्या माध्यमातून विज्ञान मांडणं हे खरोखरच खूप आव्हानात्मक असतं आणि ज्या काळात संगणकाचा वापर केला जात नव्हता, तेव्हा असं साहित्य निर्माण करणं म्हणजे खरोखरच कठीण होतं, असं त्या म्हणाल्या. पण जर चांगलं साहित्य आपण मुलांसमोर ठेवलं तर त्यांना निश्चितच ते आवडतं आणि या साहित्याला ते चांगला प्रतिसादही देतात, हे सांगताना त्यांनी आपल्याला आलेले अनेक अनुभव मांडले.
त्यानंतर केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या विज्ञान प्रसार या विभागात कार्य करणारे वरिष्ठ संशोधक प्रा. टी. व्ही. वेंकटेस्वरन यांनी एज्युसॅट या उपग्रहाचा वापर विज्ञान शिक्षणासाठी कशा प्रकारे केला जातो, याविषयी सादरीकरण केलं.
विज्ञान शिक्षण हे केवळ पाठय़पुस्तकातून किंवा एखाद्या वर्गाच्या चार िभतींमधून होत नाही, असा मतप्रवाह तयार होतो आहे. पण यासाठी विज्ञान शिक्षणाचे अभिनव पर्याय निर्माण होण्याची गरज आहे. विज्ञान केंद्रांमध्ये विज्ञान शिक्षणाची ही गरज पूर्ण करण्याचं सामथ्र्य नक्की आहे. विज्ञान शिक्षणाला पोषक वातावरण निर्माण करणं, विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणं आणि त्यांना मूलभूत विज्ञान शिक्षणाकडे प्रेरित करणं या दृष्टीने ‘गुजरात सायन्स सिटी’ची निर्मिती करण्यात आली आहे, असं गुजरात सरकारच्या गुजरात कौन्सिल ऑन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजीचे सल्लागार आणि सचिव डॉ. नरोत्तम साहू यांनी सांगितलं. गुजरात सायन्स सिटीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, तसेच विज्ञान प्रसारासाठी आखण्यात आलेल्या गुजरात कौन्सिलच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली.
त्यानंतर जवाहर विज्ञान केंद्राच्या माजी संचालिका सरस्वती अय्यर यांनी प्रत्यक्ष वर्ग अध्यापनामध्ये शिक्षकाने वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून रंजकेतेने विज्ञान कसं पोहोचवलं जातं, याचं वेगवेगळ्या साहित्याच्या आणि प्रतिकृतींच्या आधारे प्रत्यक्ष दाखवलं. वर्गात या साहित्याचा वापर केल्यास मुलं त्यात कशी रंगून जातात, याचं प्रात्यक्षिकच थेट उपस्थितांवर करून अय्यर यांनी विज्ञानातल्या अनेक संकल्पना सोप्या प्रकारे आणि रंजकतेने कशा स्पष्ट केल्या जाऊ शकतात, हे सादर केलं.
या परिषदेच्या चौथ्या सत्रात विज्ञानविषयक उपक्रमांचं मूल्यमापन कसं केलं जावं, या कार्यक्रमांची परिणामकारकता कशी तपासली जावी याविषयी मंथन करण्यात आलं. या सत्राच्या सुरुवातीला डॉ. मानसी राजाध्यक्ष यांनी मराठी विज्ञान परिषदेतर्फे विविध विज्ञान कार्यक्रमांच्या यशस्वितेचं मूल्यमापन कसं केलं गेलं हे उदाहरणासह स्पष्ट केलं. अर्थात, अशा प्रकारे अभ्यास करताना केवळ गणितीय किंवा सांख्यिकीय माहितीवर अवलंबून निष्कर्ष न काढता इतरही बाबींचा विचार केला जावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हाच धागा पकडून प्रा. टी. व्ही. वेंकटेस्वरन यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की, आपण प्रत्येक घटनेचा कार्यकारण भाव बघतो. पण प्रत्येक घटना घडण्यामागे केवळ एकच कारण असेल असं नाही; इतर अनेक कारणं असू शकतात की जी अभ्यासातून व्यक्त झाली नाहीत. म्हणूनच कोणत्याही वैज्ञानिक उपक्रमाचं मूल्यमापन करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. असं मूल्यमापन अत्यंत काळजीपूर्वक केलं गेलं पाहिजे, असं ते म्हणाले.
यानंतर टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्समधून निवृत्त झालेल्या प्रा. छाया दातार यांनी महाराष्ट्र शासनाच्या जलस्वराज्य योजनेचा लेखाजोखा सादर केला. शेवटी प्रा. अर्णब भट्टाचार्य यांनी टाटा मूलभूत संशोधन केंद्रातर्फे गेली सहा र्वष सातत्याने सुरू असलेल्या ‘चाय अ‍ॅण्ड व्हाय’ या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमागचं गमक स्पष्ट केलं. या कार्यक्रमासाठी अतिशय विचारपूर्वक विषय निवडले जातात, त्या विषयांवरील कार्यक्रमांना औत्स्युक्यपूर्ण शीर्षकं दिली जातात आणि या विषयासंदर्भात नेमकं काय मांडायचं आहे हे ठरवलं जातं, असं प्रा. भट्टाचार्य म्हणाले. कोणताही खंड न पडता सुरू असलेला हा कार्यक्रम पाहण्यासाठी पृथ्वी थिएटर आणि रुपारेल महाविद्यालयात वेगवेगळ्या वयोगटातले लोक मोठय़ा संख्येने येतात, असं ते म्हणाले.             
दोनदिवसीय परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सचे उपाध्यक्ष आणि जेष्ठ विज्ञान प्रसारक डॉ. ए. पी. जयरामन यांनी परिषदेत झालेल्या सत्रांचा आपल्या ओघवत्या शैलीत धावता आढावा घेतला. केवळ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांतूनच नव्हे तर इतरही राज्यांतून विविध माध्यमांतून विज्ञान प्रसाराचं कार्य करणारे विज्ञान प्रसारक आणि विज्ञानप्रेमी असे सुमारे शंभर जण या परिषदेला उपस्थित होते. नेटकं आयोजन आणि चार सत्रांमधून देशभरातून आलेल्या तब्बल सोळा तज्ज्ञांचे वेगवेगळ्या विषयांवरचे विचार, अनुभव ऐकायला मिळणं ही या परिषदेची वैशिष्टय़ं सांगता येतील.
विज्ञान हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं, हे खरंच; पण त्यासाठी ते वैज्ञानिक परिभाषेतून बाहेर काढून सोप्या शब्दांमध्ये मांडणं आवश्यक आहे आणि हीच विज्ञान प्रसारकांची जबाबदारी आहे, असाच सूर या दोनदिवसीय परिषदेत उमटला.