केंद्रीय लोकसेवा आयोगाने ५ मार्च २०१३ रोजी आपल्या संकेतस्थळावर नागरी सेवा परीक्षेच्या नव्या आराखडय़ास प्रसिद्धी देऊन नागरी सेवा भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यात मूलगामी स्वरूपाचे बदल स्वीकारले. तथापी, मुख्य परीक्षेसाठी निवडायचे वैकल्पिक विषय, विद्यार्थ्यांचे वैकल्पिक विषय निवडीचे स्वातंत्र्य, प्रादेशिक भाषेचा पेपर आणि महत्त्वाचे म्हणजे मुख्य परीक्षेचे माध्यम या संदर्भात स्वीकारलेल्या बदलांमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या वैकल्पिक विषय व परीक्षेचे माध्यम याविषयक निवड स्वातंत्र्यावरच निर्णायक मर्यादा आली. परिणामी सर्वच स्तरातून यूपीएससीने स्वीकारलेल्या बदलावर तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया उमटली. त्यामुळे प्रस्तुत बदलांना स्थगिती देऊन त्यातील अन्यायकारक बदल दूर सारण्यासाठी शासनावर दबाव वाढला. शेवटी व्यापक विद्यार्थी हित लक्षात घेऊन २५ मार्च २०१३ रोजी नवा आराखडा जाहीर करण्यात आला.
वस्तुत: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा कस पाहाणारी सर्वसमावेशक आणि आव्हानात्मक परीक्षा मानली जाते. या सेवेचा जगातील फ्रेंच नागरी सेवा परीक्षेपाठोपाठ कठीण परीक्षा म्हणून लौकिक आहे. केंद्र लोक आयोगाने या परीक्षांचे नि:ष्पक्ष, पारदर्शी आणि कार्यक्षमपणे आयोजन करून स्वच्छ कारभाराचा पायंडा रूढ केला आहे. परीक्षांचे आयोजन करताना त्यातील कोणत्याही बाबीमुळे समाजाच्या कोणत्याही स्तरातील परीक्षार्थीवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. म्हणूनच आयोगाने या परीक्षेतील महत्त्वपूर्ण भाग असलेल्या वैकल्पिक विषयांची निवड आणि मुख्य परीक्षा व मुलाखत या दोन्हीं परीक्षांचे माध्यम याबाबतीत विद्यार्थ्यांना पूर्ण व व्यापक निवड स्वातंत्र्य बहाल केले होते. त्यामुळे कोणत्याही शाखेतील व माध्यमातील पदवीधर कोणताही वैकल्पिक विषय (काही ताíकक अपवाद वळगता) निवडू शकायचा आणि आपल्या पसंतीनुसार परीक्षेचे माध्यम निवडू शकायचा. त्यामुळेच आपापल्या मातृभाषेतून परीक्षा देऊन अनेक विद्यार्थी नागरी सेवापदी विराजमान होऊ शकले आणि ग्रामीण, निमशहरी, बहुजन पाश्र्वभूमी असणारे आणि प्रादेशिक भाषेतून पदवी संपादित केलेले शेकडो उमेदवार यूपीएससीच्या अंतिम यादीत झळकू लागले. स्वाभाविकच भारतीय सनदी सेवेचा चेहरा १९८० नंतर मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे दिसते. आयोगाने ५ मार्च रोजी स्वीकारलेल्या बदलामुळे मात्र या प्रक्रियेस खीळ बसली असती यात शंका नाही. अर्थात सर्व स्तरातून झालेल्या टीकेमुळे शासनाला नवा आराखडा स्वीकारावा लागला. प्रस्तुत लेखात या नव्या आराखडय़ाची आणि त्यासाठी आवश्यक अभ्यास पद्धतीची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
आयोगाने स्वीकारलेल्या नव्या बदलानुसार आता यूपीएससी मुख्य परीक्षा २००० गुणांऐवजी १७५० गुणांची असेल. मुलाखतीस ३०० गुणांऐवजी २७५ गुण निर्धारित करण्यात आले आहेत. जुन्या पद्धतीप्रमाणेच भारतीय भाषेचा (३०० गुण) आणि अनिर्वाय इंग्रजी (३०० गुण) हे भाषेचे दोन पात्रता पेपर नव्या पद्धतीत कायम ठेवण्यात आले आहेत. याचाच अर्थ, विद्यार्थ्यांना या दोन्हीही भाषा विषयांत पात्र व्हावे लागणार आहे. अन्यथा त्यांच्या मुख्य परीक्षेतील इतर विषयांच्या पेपरचे मूल्यांकन केले जाणार नाही. या संदर्भातील दुसरी बाब म्हणजे या भाषा विषयात प्राप्त झालेले गुण मुख्य परीक्षेच्या गुणांकनात मोजले जाणार नाहीत.
मुख्य परीक्षेतील एक महत्त्वाचा विषय म्हणजे निबंधाचा पेपर होय. आयोगाने यास २५० गुण निर्धारित केले आहेत. एका बाजूला वैकल्पिक विषयाचे कमी झालेले महत्त्व आणि दुसरीकडे सामान्य अध्ययनाची वाढलेली व्याप्ती या पाश्र्वभूमीवर निबंधाचा पेपर कळीचा ठरतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच निश्चित वेळ देऊन या विषयाची सातत्यपूर्ण तयारी करणे गरजेचे आहे. त्यासाठी मागील १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे अवलोकन करून आयोगाने आतापर्यंत विचारलेले निबंधाचे विविध विषय लक्षात घ्यावेत. त्यानंतर अभ्यासाच्या सोयीसाठी प्रस्तुत विषयाचे चार ते पाच प्रमुख शीर्षकाखाली व्यापक वर्गीकरण करावे. उदा. लोकशाही, जागतिकीकरण, स्त्रियांचे समाजातील स्थान, आंतरराष्ट्रीय राजकारण, पर्यावरण इ. अशारीतीने व्यापक वर्गीकरण केल्यानंतर संबंधित मुद्दय़ांविषयी विविध मतमतांतरे, वैचारिक भूमिका, उपाययोजना आणि भवितव्य या धर्तीवर विविधांगी माहिती व ज्ञानाचे आकलन करावे.
मुख्य परीक्षेसाठी दोनऐवजी एकच वैकल्पिक विषय निवडायचा आहे. आयोगाने दिलेल्या यादीपकी कोणत्याही शाखेतील पदवीधर कोणताही विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडू शकतो. मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयाचे प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर असतील. म्हणजेच, आता केवळ ५०० गुणांइतकेच वैकल्पिक विषयाचे महत्त्व शिल्लक राहिले आहे.
मुख्य परीक्षेचा नवा आराखडा
नव्या बदलातील मध्यवर्ती घटक म्हणजे सामान्य अध्ययनाचे वाढलेले महत्त्व होय. त्यानुसार पेपर २ ते पेपर ५ हे सामान्य अध्ययनाचे नवे, सुधारित आणि विस्तारित विषय आहेत. म्हणजेच आता सामान्य अध्ययनाचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी ६०० गुणांसाठी असलेला सामान्य अध्ययन हा विषय आता १००० गुणांचा करण्यात आला आहे. पेपर क्र. २ (सा.अ.१), ३ (सा.अ.२) आणि ४ (सा.अ.३) मध्ये अभ्यासक्रमाचा विस्तार करून आयोगाने चांगले पाऊल टाकले आहे, यात शंका नाही.
आयोगाने पेपर क्र. ५ (सा.अ.४) हा एक नवा विषय मुख्य परीक्षेच्या रचनेत समाविष्ट केला आहे. प्रशासनात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सार्वजनिक सेवक म्हणून कार्य करण्यास आवश्यक नतिकता, सचोटी, प्रामाणिकपणा व योग्य दृष्टिकोन असला पाहिजे, त्यादृष्टीनेच आयोगाने हा विषय स्वीकारला आहे. प्रकरण अभ्यासाच्या (उं२ी र३४्िरी२) आधारे या विषयातील अभ्यास घटकांविषयींचे आकलन तपासले जाणार आहे. सामान्य अध्ययन पेपर ४ चा अभ्यासक्रमही नवा वाटत असला तरी त्यामुळे चिंताग्रस्त होण्याचे कारण नाही. भारतीय राज्यघटना, राज्यघटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, न्याय, बंधू-भगिनीभाव, विविधता या मूल्यांचे भान आणि लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित लोकाभिमुखता या चौकटीच्या आधारेच विद्यार्थ्यांची नतिकता, सचोटी आणि कल तपासला जाणार आहे. प्रशासकीय चौकटीत अभिप्रेत असणारी तटस्थता, पारदर्शकता, जबाबदारी व उत्तरदायित्व, प्रामाणिकपणा व सचोटी, लोकाभिमुखता आणि संवेदनशीलता ही मूल्ये या पेपरच्या मूल्यमापनात पायाभूत आहेत. वस्तुत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या विरप्पा मोइली यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने ‘सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा’ या शीर्षकाचा एक स्वतंत्र अहवालच
जाहीर केला आहे. सामान्य अध्ययन ४ मध्ये या बाबीचेच प्रतििबब उमटले आहे.
केंद्र लोकसेवा आयोगाने सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमात केलेले बदल हे स्वागतार्हच मानले पाहिजेत. त्यातील प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात आणखी अद्ययावतता आणली आहे. बदलेल्या अभ्यासाची व्याप्ती लक्षात यावी यासाठी सामान्य अध्ययन १, २, ३ आणि ४ या प्रत्येक पेपरमधील अभ्यासक्रमाचे बारकाईने आकलन करणे अत्यावश्यक आहे. या आकलनाद्वारे संबंधित विषयात जुना-पांरपरिक भाग कोणता? आणि नव्याने समाविष्ट केलेला भाग कोणता, हे लक्षात घ्यावे लागेल. सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक पेपरमध्ये समाविष्ट केलेला नवा अभ्यासक्रमात समकालीन स्वरूपाचा आहे. उदा. सा. अ. १ मधील स्त्री संघटनांची भूमिका, लोकसंख्या व संबंधित कळीचे मुद्दे; विकासात्मक मुद्दे; नागरीकरण, त्यासंबंधी समस्या आणि उपाययोजना हे घटक समकालीन संदर्भात अभ्यासायचे आहेत. सामान्य अध्ययन २ मध्ये भारतातील घटनात्मक यंत्रणेची इतर देशांतील घटनात्मक यंत्रणेशी करावयाची तुलना; विविध घटकांसाठी शासनाने राबवलेली धोरणे, केलेला विकासात्मक हस्तक्षेप या दोन्हींची प्रारूपे आणि अंमलबजावणीतून निर्माण झालेले प्रश्न वा कळीचे मुद्दे; कारभारप्रक्रियेचे विविध आयाम, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई-शासनाची उपयोजने, प्रारूपे, यशापयश, मर्यादा आणि संभाव्य क्षमता; नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्वाची हमी देण्यासाठी केलेल्या संस्थात्मक व इतर उपाययोजना; सनदी सेवकांची लोकशाहीतील भूमिका हे घटक स्पष्टपणे नमूद केले आहेत. त्याचप्रमाणे सामान्य अध्ययन ३ मध्येदेखील विविध प्रकारच्या सिंचनप्रणाली व प्रकार; शेतमालाचे उत्पादन, साठवणूक, वहन व विपणन यांतून निर्माण होणारे कळीचे मुद्दे; शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या दिल्या जाणाऱ्या सवलतीतून निर्माण होणारे कळीचे मुद्दे, अन्नधान्याचा साठा आणि अन्नसुरक्षा इ. मुद्दे ठळकपणे नमूद केले आहेत. वस्तुत: उपरोक्त अभ्यास घटक त्या त्या विषयाच्या चालू घडामोडीत समाविष्ट होतातच, परंतु आयोगाने नव्या अभ्यासक्रमात या घटकांची ठळक व सविस्तर नोंद केल्यामुळे त्याचा पद्धतशीर अभ्यास करणे गरजेचे आहे.
सामान्य अध्ययनाच्या उपरोक्त अभ्यासक्रमातून व त्यात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यास घटकातून आयोगाची सनदी सेवक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून असलेली अपेक्षा समजून घेता येते. यातून कायदे, धोरणांची चौकट; त्यासाठी निर्माण केलेल्या संस्था व यंत्रणा; त्यांच्याद्वारे झालेली अंमलबजावणी, अंमलबजावणीचे समाजावर झालेले परिणाम, त्यातून उद्भवलेल्या समस्या, ऐरणीवर आलेले कळीचे मुद्दे आणि संभाव्य उपाययोजना या सर्व बाबींचे विद्यार्थ्यांना भान असले पाहिजे हेच जणू आयोगाला सांगायचे आहे. म्हणून परीक्षार्थीनी सामान्य अध्ययनातील कोणत्याही घटकांचा अभ्यास करताना संबंधित समस्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम यांबरोबरच त्यासाठी शासकीय, बिगरशासकीय यंत्रणांनी केलेले कायद्यात्मक-धोरणात्मक उपाय, त्यांची अंमलबजावणी, त्यातून निर्माण झालेले प्रश्न आणि संभाव्य उपाययोजना अशी व्यापक चौकट करून सविस्तर अभ्यास करावा. जागतिकीकरण, पर्यावरणीय ऱ्हास, अनियंत्रित नागरीकरण, जमातवाद-दहशतवाद यांसारख्या घटकांचा एकंदर भारतीय समाजावर आणि त्यांतील भिन्न घटकांवरील परिणाम अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे. अशारीतीने बदलत्या काळाच्या आव्हानांस सामोरे जाण्यास समर्थ असणारा प्रशासक घडवण्याच्या दृष्टीनेच हा अभ्यासक्रम स्वीकारल्याचे लक्षात येते.
बदललेल्या सामान्य अध्ययनाचा अभ्यास करताना एका बाजूला अभ्यासाचा व्याप वाढवावा लागणार तर दुसऱ्या बाजूला तयारीत नेमकेपणा आणावा लागेल. कारण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न असतील, किती शब्द मर्यादेत उत्तरे लिहायची आहेत, कोणत्या प्रश्नाला किती गुण या सर्व बाबी सद्य:स्थितीत माहीत नाहीत. यावर एकमेव उपाय म्हणजे नेमकी तयारी होय. त्यासाठी संदर्भाचे वाचन करताना महत्त्वाच्या मुद्दय़ांना अधोरेखित करणे, त्यांची टिपणे काढणे, संबंधित विषयाबाबतची विविध मतमतांतरे व्यवस्थितपणे नोंदवणे या बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
त्यामुळे या नव्या पद्धतीत अभ्यास करताना बदलेल्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म वाचन, आकलन करणे आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे अत्यावश्यक ठरते. नव्या घटकांच्या तयारीसाठी नवे, अधिकृत आणि अद्ययावत संदर्भसाहित्य वापरणे उपयुक्त ठरेल. संदर्भसाहित्याची उपलब्धता हा मुद्दा एक आव्हान ठरणार आहे, यात शंका नाही. त्यातही त्यासाठी वर्तमानपत्रे, नियतकालिके, दरवर्षी अभ्यासक्रमावर प्रसिद्ध केली जाणारे संदर्भ ग्रंथ आणि आवश्यक तिथे इंटरनेटचा वापर करण्यावर भर हवा. म्हणूनच नव्या यूपीएससीचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक, समग्र आणि नेमका अभ्यास हे धोरणच उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही.
मुख्य परीक्षेचा नवा आराखडा
पात्रता पेपर
पेपर ‘अ’ – भारतीय भाषा – ३०० गुण
पेपर ‘ब’ – अनिवार्य इंग्रजी – ३०० गुण
गुणानुक्रमासाठी ग्राह्य धरले जाणारे अनिवार्य विषय
पेपर १ – निबंध (२५० गुण)
पेपर २ – भारतीय वारसा, संस्कृती इतिहास आणि
भारत व जगाचा भूगोल (२५० गुण)
पेपर ३ – कारभार प्रक्रिया, राज्यघटना, राजकारण आणि
आंतरराष्ट्रीय संबंध (२५० गुण)
पेपर ४ – अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान
(२५० गुण) आणि
पेपर ५ – नतिकता, निष्ठा व कल/दृष्टिकोन (२५० गुण)
पेपर ६ – वैकल्पिक विषय (पेपर – १) (२५० गुण)
पेपर ७ – वैकल्पिक विषय (पेपर – २) (२५० गुण)
नवी यूपीएससी, नवे आव्हान
केंद्रीय लोकसेवा आयोगाने ५ मार्च २०१३ रोजी आपल्या संकेतस्थळावर नागरी सेवा परीक्षेच्या नव्या आराखडय़ास प्रसिद्धी देऊन नागरी सेवा भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यात मूलगामी स्वरूपाचे बदल स्वीकारले.
First published on: 15-04-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New upsc new challange