नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ, इलिनॉय, अमेरिका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेश आडविलकर

विद्यापीठाची ओळख :

अमेरिकेतील इलिनॉय या राज्यातील इव्हॅनस्टन शहरात असलेले नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ हे एक प्रमुख खासगी संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत या विद्यापीठाचा चौतीसावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १८५० साली जॉन इव्हॅन्स या तत्कालीन राजकारण्याने केली होती.

अमेरिकेमध्ये विद्यापीठाचे दोन कॅम्पस आहेत. मुख्य कॅम्पस इव्हॅनस्टन शहरात तर दुसरा शिकागोमध्ये आहे. तसेच मियामी, फ्लोरिडा, वॉशिंग्टन, कॅलिफोíनया या इतर काही ठिकाणी ठरावीक शैक्षणिक केंद्र आहेत. इव्हॅनस्टनमधील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस जवळपास अडीचशे एकरमध्ये पसरलेला आहे व शिकागोमधील कॅम्पस पंचवीस एकरांमध्ये व्यापलेला आहे. याशिवाय विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय कॅम्पस हा मध्यपूर्वेत दोहा या ठिकाणी आहे. सध्या नॉर्थवेस्टर्नमध्ये साडेतीन हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास एकवीस हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

 अभ्यासक्रम

या विद्यापीठात बारा प्रमुख विभाग (स्कूल्स अ‍ॅण्ड कॉलेजेस)आहेत. यामध्ये वेईनबर्ग कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, स्कूल ऑफ कम्युनिकेशन, बायनेन स्कूल ऑफ म्युझिक, मॅककॉर्मिक स्कूल ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस, मेडील स्कूल ऑफ जर्नलिझम-मीडिया-इंटेग्रेटेड मार्केटिंग, स्कूल ऑफ एज्युकेशन अ‍ॅण्ड सोशल पॉलिसी, स्कूल ऑफ प्रोफेशनल स्टडीज, केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि द ग्रॅज्युएट स्कूल हे विभाग इव्हॅनस्टन येथील कॅम्पसमध्ये आहेत तर फेईनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन, प्रीत्झर स्कूल ऑफ लॉ, प्रोफेशनल स्टडीज, मॅनेजमेंट हे विभाग शिकागो येथील कॅम्पसमध्ये आहेत. विद्यापीठाच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा कालावधी वेगवेगळा आहे. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ या सर्व विभागांच्या माध्यमातून चार हजारांहूनही अधिक अभ्यासक्रम सर्व स्तरांवर चालवते. विद्यापीठाकडे पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाबरोबरच ‘समर सेशन कोस्रेस’सारखे अतिरिक्त अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम पर्यायांची भरपूर उपलब्धता असल्याने अभ्यासक्रम वा विषय निवडीसाठी विद्यापीठाचे स्वतंत्र कार्यालय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सज्ज असते. विद्यापीठातील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आíथक मदतीसाठी पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेल्या जीआरई, टोफेल, सॅट, जीमॅट यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाकडून बहुतांश आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आíथक मदत दिली जाते. विशेष म्हणजे विद्यापीठाचे सर्व विभाग स्वत: यामध्ये पुढाकार घेतात. विभागांकडे उपलब्ध असलेल्या एकूण निधीवर विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्कामध्ये कपात यांसारख्या पर्यायांचा वापर करण्याचे ठरवले जाते. विद्यापीठाने आपल्या परिसरात वसतिगृहांची सुविधा, उपाहारगृह आणि इतर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त विद्यापीठाच्या आवारात चारशेपेक्षाही अधिक क्लब्स आणि तत्सम केंद्रे आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शने, व्याख्याने, कॉन्सर्टस्, परफॉर्मन्सेस आयोजित केले जातात. विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी करिअर मार्गदर्शन, आरोग्य आणि क्रीडा सुविधा दिल्या जातात. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठ हे ‘बिग टेन कॉन्फरन्स’ या अमेरिकेतील क्रीडाविषयक विद्यापीठांच्या संघटनेचा संस्थापक सदस्य असल्याने येथे क्रीडा क्षेत्रासाठी भरपूर पोषण वातावरण आहे. विद्यापीठाचे १९ अ‍ॅथलेटिक्स संघ आहेत.

वैशिष्टय़

नॉर्थवेस्टर्नच्या सध्याच्या आणि माजी प्राध्यापकांमध्ये एकोणीस नोबेल विजेत्यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठाचे कित्येक माजी विद्यार्थी ऑस्कर व पुलित्झर पुरस्कार विजेते, ऱ्होडस पुरस्कार विजेते आहेत. मात्र विद्यापीठाचे विशेषत: तेथील प्राध्यापक-संशोधकांचे संशोधन क्षेत्राला असलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. प्रायोजित संशोधन हा नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाचा प्रमुख उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळेच नॉर्थवेस्टर्न हे अमेरिकेतील सर्वाधिक दहा श्रीमंत विद्यापीठांपकी एक आहे. गेल्या वर्षीपर्यंत या विद्यापीठाची एकूण संपत्ती ११अब्ज डॉलर्सपेक्षाही अधिक होती. यांपकी जवळपास २७०० दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम ही प्रायोजित संशोधनातून विद्यापीठ मिळवते.

 संकेतस्थळ

https://www.northwestern.edu

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Northwestern university illinois usa abn