संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून दाखल होता यावे म्हणून निवडपूर्व मार्गदर्शन करण्यासाठी खास महाराष्ट्रातील तरुणांना पुढीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.
संधींविषयक पाश्र्वभूमी – भारतीय संरक्षण सेवेत अधिकारी म्हणून राज्यातील युवकांना अधिकाधिक संख्येने जाता यावे आणि त्या दृष्टीने एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षेस बसण्याची तयारी करवून घेण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकरता औरंगाबाद येथे राज्यस्तरीय खास सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना राज्य सरकारने केली असून संस्थेद्वारा निवडक पात्रताधारक युवकांना मार्गदर्शन करण्यात येते.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचे निवासी असावेत.
त्यांची जन्मतारीख एक जानेवारी १९९७ ते ३१ डिसेंबर १९९८ च्या दरम्यान असावी आणि त्यांनी सातवी ते नवव्या इयत्तेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळवून ते यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेले असावेत.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची किंमान उंची १५७ सें.मी., वजन ४३ किलो आणि छाती- न फुगवता ७४ सें.मी. तर फुगवून ७९ सें.मी. असावी. दृष्टी निकोप असायला हवी.
निवडपद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक अर्जदारांना एप्रिल २०१३ मध्ये लेखी परीक्षेसाठी राज्यातील नागपूर, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या केंद्रांवर बोलावले जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या परीक्षा केंद्रावर दुसऱ्या दिवशी मुलाखत घेण्यात येईल आणि त्या आधारे आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना संस्थेत प्रवेश देण्यात येईल.
अर्ज आणि माहितीपत्रक – अर्ज आणि माहितीपत्रकासाठी इच्छुक उमेदवारांनी ४३० रु. रोखीने राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरावेत आणि भरलेल्या चलनाची प्रत संस्थेच्या कार्यालयात पाठवावी, अथवा ४०० रु.चा संचालक – एसपीआय, औरंगाबाद यांच्या नावे असणारा आणि औरंगाबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहितीसाठी संपर्क – यासंदर्भात अधिक माहिती आणि तपशिलासाठी सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद, दूरध्वनी क्र. ०२४०-२३८१३७० या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या http://www.spiaurangabad.com/in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि शेवटची तारीख – संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, सेक्टर – एन १२, सिडको, औरंगाबाद ४३१००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१३.
राज्यातील शालान्त परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना संरक्षण सेवा निवड पद्धतीविषयक मार्गदर्शनासह एनडीएमध्ये प्रवेश घेऊन आपले भवितव्य घडवायचे असेल अशांना या मार्गदर्शनपर संधीचा लाभ घेता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा