औषधनिर्माणशास्त्र किंवा फार्मसी अभ्यासक्रमाला गेल्या दशकात अभियांत्रिकी आणि वैद्यकशास्त्र यांच्या तोडीस तोड व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून मान्यता मिळाली आहे. या क्षेत्राला उपलब्ध झालेल्या नवनवीन संधी व या क्षेत्राबद्दल सुज्ञ व सुजाण पालकांची ओढ पाहता फार्मसी अभ्यासक्रम आणि व्यवसायाच्या संधी याची माहिती देण्याचा हा प्रयत्न-
पुराणकाळापासून आयुर्वेदात उल्लेख असणाऱ्या अनेक औषधी वनस्पती आजही सर्रास वापरल्या जातात. ‘चरक संहिता’सारखे ग्रंथ औषधनिर्माणशास्त्राचे मानवी जीवनातील स्थान आणि महत्त्व निक्षून सांगतात. युरोप आणि अमेरिका खंडातील प्रगत देशांनी या क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या संशोधनाला व पर्यायाने नवीन औषधे विकसित करण्यात फार मोठा हातभार लावला आहे. म्हणूनच या देशांत फार्मसी व्यवसायाला अत्यंत मानाचे स्थान आहे. फार्मासिस्टच्या अनुमतीशिवाय कोणतेही औषध रोग्याला दिले जात नाही. औषधांबद्दल सर्वात जास्त माहिती असणारा तज्ज्ञ म्हणून फार्मासिस्टकडे पाहिले जाते. थोडक्यात फार्मासिस्ट व फार्मसी व्यवसाय हा रोगी आणि वैद्यकशास्त्र यातील दुवा आहे.
आजच्या काळातील बहुचíचत अशा जागतिक, आíथक मंदीच्या लाटेचा फटका फार्मास्युटिकल कंपन्यांना फारसा जाणवत नाही, कारण अन्न, वस्त्र व निवारा याप्रमाणेच औषधेदेखील एक मूलभूत गरज आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच या अवघड काळातही फार्मसी क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी फार मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत आहेत. भारतीय औषध उद्योगातील उलाढाल पाहता आपला देशात जगात १०व्या क्रमांकावर आहे. तसेच औषधज्या प्रमाणात विकत घेतली जातात, त्याचे आकारमान पाहता भारताचा जगभरात तिसरा क्रमांक लागतो. एस बँक आणि ऑर्गनायझेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडय़ुसर्स ऑफ इंडिया (ओ.पी.पी.आय.)यांच्या नवीन अहवालानुसार भारतीय औषध उद्योगाच्या वाढीचा दर हा साधारण १४ ते २० टक्के असून देशातील  औषध उद्योगाची उलाढाल ही सुमारे ३० अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. ही उलाढाल २०१५पर्यंत ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोचेल, असे भाकितही केले जात आहे.
संशोधन हा फार्मसी व्यवसायाचा जणू प्राण आहे! एक नवीन औषध बाजारात आणण्यासाठी सुमारे १०-१२ वष्रे लागतात तर त्यावर सुमारे दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षाही जास्त खर्च संशोधनावर होतो. यावरून फार्मसी संशोधनाची खíचकता व क्लिष्टता स्पष्ट होते. या अत्यंत आव्हानात्मक संशोधनाला अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. उदा. रसायनशास्त्र, जीवशास्त्र इ. हे झाले नवीन औषधांच्या शोधाबद्दल, पण औषधे कारखान्यातून तयार होऊन रोग्याच्या हातात जाण्यासाठी नानाविध व्यावसायिकांचे योगदान लागते. प्रॉडक्शन, पॅकेजिंग, ट्रान्सपोर्टेशन, सप्लायचेन मॅनेजमेंट, मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह, मेडिकल स्टोअर्स आणि खूप सारे लोक या संपूर्ण प्रक्रियेत गुंतलेले असतात, यावरून या व्यवसायात उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधींची पुरेशी कल्पना येईल.
बारावीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार्मसी क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या संधी हल्लीच्या काळात उपलब्ध झालेल्या दिसून येतात. पुढील पाच ते १० वर्षांच्या कालखंडात या क्षेत्रात मानवी संसाधनाची खूपच गरज भासणार आहे.
संशोधन आणि व्यवसाय संधी
बी.फार्म. ही पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी जाता येते. यात एम.फार्म. अभ्यासक्रमात आवडीनुसार विद्याशाखाही निवडता येते. संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना पुढे पीएच.डी. साठीही जाता येते. त्यासाठी केंद्र सरकारकडून विविध शिष्यवृत्त्याही मिळवता येतात. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले औषधनिर्माणशास्त्राचे पदवीधर मोठमोठय़ा औषधी कंपनीतील संशोधन विभागात संशोधक किंवा सल्लागार (कन्सल्टंट)म्हणून काम करू शकतात. यानंतर संशोधक म्हणून करिअर करता येणे शक्य होते. एम.फार्म. किंवा पीएच.डी.नंतर कोणत्याही फार्मसी महाविद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी व त्याबरोबर संशोधनही करता येते. याशिवाय राज्याच्या अन्न व औषधी प्रशासन विभागात औषध निरीक्षक किंवा औषधविषयक विश्लेषक(अ‍ॅनालिटिकल केमिस्ट) म्हणूनही काम करता येते. याशिवाय कंत्राटी पद्धतीने संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स, वैद्यकीय विषयावर लिखाण, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, डायग्नोस्टिक्स व डिवायसेस, फार्माकोविजीलन्स यांसारख्या क्षेत्रांतही मुबलक संधी उपलब्ध आहेत.
आजच्या या स्पर्धात्मक युगात शिक्षणक्षेत्राला अद्वितीय महत्त्व आले आहे. यासंदर्भातील शिक्षण घेताना संस्थेतील शिक्षणाचा उच्च स्तर व दर्जा या बरोबरच चांगले शैक्षणिक वातावरण, आधुनिक प्रयोगशाळा, नवनवीन तंत्राचा वापर (व्हच्र्युअल क्लासरूम, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन्स इ.), वैचारिक प्रगल्भता उंचविण्यासाठी संशोधन व त्यावर आधारित उपक्रम व याशिवाय अनेक साधनांद्वारे मानव संसाधन विकास यावर दिला जाणारा भर या गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते. या क्षेत्रात देशात अनेक नामवंत शैक्षणिक संस्था आपले स्थान उंचावण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचा विद्यार्थीवर्गाने निश्चितच उपयोग करून घ्यायला हवा.
 डॉ. प्रशांत खारकर
प्रमुख, औषधनिर्माणशास्त्र विभाग,
 एसपीपी स्कूल ऑफ फार्मसी अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी मॅनेजमेन्ट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity in reserch of medicine making
Show comments