जग अधिकाधिक जवळ येत असताना माहितीच्या आदानप्रदानादरम्यान भाषिक अडसर दूर व्हावा, यासाठी अनुवादकाची गरज वाढत आहे. अनुवाद क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करणाऱ्यांसाठी यातील आवश्यक कौशल्ये, संधी यासंबंधीची सविस्तर माहिती

अलीकडच्या काळात इंटरनेटच्या वाढत्या प्रभावामुळे जग अधिकाधिक जवळ येत आहे. संपर्कासाठी इंग्रजी भाषेचा वापरही मोठय़ा प्रमाणावर होत असल्यामुळे, विविध स्वरूपांच्या माहितीचे भाषांतर करून लोकांना हव्या त्या भाषेत ते उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळेच सध्याच्या काळात दुभाषी (इंटरप्रिटर) अथवा भाषांतरकारांना उत्तम संधी चालून येत आहे. परिणामी, आज जगाच्या अनेक कानाकोपऱ्यांत विविध स्वरूपाची भाषा केंद्रे उघडण्यात आलेली आहेत. त्यापकी बहुतांश केंद्रांचे असे मत आहे की, सध्याच्या काळात जपानी, चिनी, अरेबिक, रशियन यांसारख्या भाषांच्या वाढत्या प्रभावामुळे जर कुणाला पूर्ण वेळ भाषांतरकार म्हणून करिअरचा पर्याय निवडायचा असेल तर त्या दृष्टीने अनेक उत्तमोत्तम संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत.  
या क्षेत्रात पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ यांपकी कोणताही करिअर पर्याय निवडता येतो. त्यासाठी महत्त्वाची गरज असते ती लेखन शैलीवर प्रभुत्व असण्याची. दुसऱ्या भाषेतील लेखकाने आपल्या लेखनातून नेमके काय मांडले आहे, त्याला काय सांगावयाचे आहे, हे लक्षात घेऊन भाषांतर करणे अधिक योग्य ठरते.
अनुवाद किंवा भाषांतर ही एक कला आहे. शब्दाला शब्द मांडून लिहिले म्हणजे झाले भाषांतर, इतके ते काम सोपे नसते. अगदी सोप्या शब्दात सांगावयाचे झाले तर एका भाषेचा आत्मा दुसऱ्या भाषेत तितक्याच उत्कटतेने आणणे. जेणेकरून वाचकाला ते लिखाण वाचताना ते लिखाण इतर भाषेतील नसून त्या भाषेतीलच लिखाण आहे, असे वाटायला हवे. तेव्हा जर भाषांतरकार म्हणून तुम्ही या क्षेत्रात पाऊल रोवत असाल, तर उत्तमरित्या भाषांतर करणाऱ्या इतर मंडळींच्या कामाचे विश्लेषण करावे. मूळ लेखनाचा अर्थ न बदलता ते आपल्या भाषांतराच्या कामात कशारीतीने नवनिर्मिती करतात ते पाहावे.
या क्षेत्रात करिअर करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, अन्य क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातदेखील जम बसावा, यासाठी अथक मेहनतीची नि कामाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघण्याची गरज असते. त्यामुळे सुरुवातीची काही वष्रे ही तंत्रे विकसित करण्यात खर्ची घालावी लागतात, हे लक्षात घ्यावे.
आजकाल बहुतांश व्यावसायिक क्षेत्रात इंटरनेटचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे विविध स्वरूपाच्या व्यावसायिक गरजादेखील वाढल्या आहेत. परिणामी, भाषांतराचे काम छोटय़ा स्तरावर मर्यादित न राहता त्याला व्यावसायिक पातळीवर थेट परदेशी बाजारपेठ मिळण्याइतके ते व्यापक झाले आहे. या क्षेत्रात यश मिळवणे हे सर्वस्वी तुमच्या हातात असते. ग्राहकाची गरज ओळखून त्यानुसार काम पार पाडल्यास आपोआपच कामाचा ओघ तुमच्याकडे येत राहतो. भाषांतराच्या कामाला चांगलीच मागणी असून, येत्या काही वर्षांत लक्षावधी डॉलर कमावून देणारे क्षेत्र म्हणून हे क्षेत्र आकारास आल्यास नवल वाटायला नको. त्यामुळेच आजकाल केवळ निवृत्तच लोक नाही तर तरुण मंडळीदेखील या व्यवसायात उत्साहाने प्रवेश करताना दिसतात .  
या क्षेत्रात प्रवेश करताना सुरुवातीलाच आपल्याला एकदम छान, भव्यदिव्य, नावाजलेले असे काही भाषांतर करावयास मिळेल, या भ्रमात राहू नका. मुळातच तशी अपेक्षा ठेवणेदेखील चुकीचे आहे. सुरुवात नेहमी छोटय़ा छोटय़ा व सोप्या गोष्टींपासून करावयाची. कारण या लहानसहान गोष्टींचा अनुवाद करणे सहज सोपे वाटत असले तरीही त्यातून स्वतला जोखता येते. आपल्याला नेमकी कुठे अडचण येऊ शकते, याचा अंदाज येतो. आणि एकदा का भाषांतर करण्याची कला अवगत झाली की, मग कितीही अवघड स्वरूपाचे भाषांतर असले तरीही, ते करताना फारसे अडचणींचे वाटत नाही. शिवाय, या क्षेत्रात तुम्ही जेव्हा नवखे असतात, तेव्हा तुमच्यासमोर तऱ्हेतऱ्हेचे विषय भाषांतरासाठी येतात. या वेगवेगळ्या विषयांच्या हाताळणीमुळे तुमच्या करिअर प्रोफाइलचा आलेख उंचावलेला राहतो. अशा योग्य उमेदवारांना आयात-निर्यात एजन्सीकडून चांगलीच मागणी असते. त्यातच या स्वरूपाच्या एजन्सीसाठी काम केल्यानंतर लवकरच तुम्ही स्वतला व्यावसायिक भाषांतरकार म्हणून प्रस्थापित करू शकाल. एकदा का भाषांतरकार म्हणून स्वतला प्रस्थापित केले की, तुमच्यासमोर फ्री लान्सर म्हणून काम करण्याचा उत्तम पर्याय तयार होतो. यामुळे एकाच वेळी तुम्हाला विविध संस्थांबरोबर काम करण्याची संधी मिळते. याचे दोन लाभ असतात. एकतर तुम्हाला सातत्याने काम मिळत राहते नि दुसरे म्हणजे दरमहा नियमितपणे कमाईदेखील करता येते. पुरेसा अनुभव गाठीशी जमा झाल्यानंतर तुम्ही स्वतच्या कामाची योग्य ती किंमत ठरवून त्यानुसार दर आकारू शकता.
जर तुम्हाला फ्री लान्सिंगच्या कामात विशेष रस नसेल तरीदेखील तुमच्यासमोर इतर अनेक पर्याय उपलब्ध असतात. जसे, सरकारी किंवा खासगी संस्थांसाठी, विद्यापीठांसाठी, विविध स्वरूपांच्या प्रशिक्षण संस्थांसाठी अथवा बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी अनुवादक किंवा भाषांतरकार म्हणून काम करण्याच्या अनेक संधी.
तुम्हाला येत असलेल्या भाषांपकी नेमके कोणत्या भाषेवर तुमचे प्रभुत्व आहे, ते ध्यानात घ्या. आणि त्यानुसार अनुवाद करण्याचा सराव करा. यामुळे आपल्याला ती भाषा कितपत अवगत आहे, याचा अंदाज येतो. त्यातूनही आपण कुठे कमी पडतोय, असे वाटत असल्यास त्या दृष्टीने सुधारणा करता येते. शिकता शिकता या गोष्टी करता आल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना तुम्ही एकदम तयार असता.
भाषांचा अभ्यास
अलीकडे विविध भाषांना मागणी असली तरीही जपानी, जर्मन आणि फ्रेंच या तीन परदेशी भाषांना अनुवादाच्या दृष्टीने नेहमीच उत्तम मागणी असल्याचे दिसून आलेले आहे. अनुवादक किंवा भाषांतरकार म्हणून आपल्याला नेमके कोणत्या भाषेसाठी काम करावयाचे आहे हे ठरविल्यानंतर ती भाषा शिकण्याच्या दृष्टीने आवश्यक ते अभ्यासक्रम तुमच्या शहरात किंवा जवळपासच्या विभागात आहेत की नाही, याचा शोध घ्या. जसे, मॅक्स म्युलर भवनमध्ये जर्मन भाषेसंदर्भातील अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत तर अ‍ॅलियन्स फ्रॅन्काइज ही संस्था फ्रेंच भाषेसाठी उत्कृष्ट समजली जाते. शिवाय दिल्ली विद्यापीठामध्ये जर्मन, फ्रेंच, अरेबिक अशा विविध आंतरराष्ट्रीय भाषांचे अभ्यासक्रम चालवले जातात.
याउलट चायनीज किंवा तत्सम भाषा शिकण्यासाठी अगदी अलीकडच्या काळापर्यंत प्रभावी संस्था नव्हत्या. मात्र, अलीकडच्या काळात या भाषांची लोकप्रियता वाढू लागल्यानंतर नवनवीन संस्था ठिकठिकाणी उदयास येताना दिसत आहेत. याबाबत इंटरनेटवर सर्च मारल्यास भरपूर पर्याय उपलब्ध असलेले तुम्हाला दिसून येतील.
काही विद्यापीठांमध्ये परदेशी भाषांसंदर्भात पदवी आणि पदव्युत्तर स्वरूपाचे अभ्यासक्रम चालवले जातात. जसे- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, पुणे विद्यापीठ इत्यादी. बहुतांश कंपन्या अनुवादक किंवा भाषांतरकार म्हणून निवडताना त्या त्या भाषेत पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात. पण तुमच्याजवळ एखाद्या भाषेच्या अर्ध वेळ स्वरूपाच्या अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असेल तरीदेखील हरकत नाही. तुम्ही अनुवादाचे किंवा भाषांतराचे काम सुरू करून, त्या जोडीने त्या भाषेवर प्रभुत्वदेखील मिळवू शकता. याचा एक फायदा असा होतो की, कामाबरोबर आवश्यक ती पदवीदेखील तुमच्या पदरात पडते.
आवश्यक कौशल्ये
सर्वप्रथम अनुवादासाठी तुम्ही ज्या भाषेची निवड केली आहे, ती तुम्हाला उत्तमपणे लिहिता यायला हवी. हे कौशल्य जर तुमच्याजवळ असेल तर पुढच्या गोष्टी बऱ्याच अंशी सोप्या होतात. अनुवाद किंवा भाषांतराचे अनेक प्रकार असतात. काही अनुवाद हे व्यावसायिक तर काही साहित्यिक तर काही तांत्रिक स्वरूपाचे असतात. विशेष म्हणजे या प्रत्येकाची गरज वेगळी असते. म्हणजेच दरवेळेला शब्दश: भाषांतराची गरज नसते. कधी नेमका भावार्थ लक्षात घेऊन, त्यानुसार तो दुसऱ्या भाषेत बसवावा लागतो. जेणेकरून मूळ कृतीत काय सांगितले आहे, त्याचा नेमका अर्थ वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे. अशा स्वरूपाचे भाषांतर करण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गरज नसते तर सराव महत्त्वाचा असतो नि त्यासाठी दोन्ही भाषांचे म्हणजे जिच्यात भाषांतर करावयाचे आहे ती व मूळ भाषा उत्तमरीत्या माहिती असायला हव्यात. कधी कधी असेही लक्षात येते की, आपण भाषांतरासाठी निवडलेल्या भाषेपेक्षा स्वत:च्या मातृभाषेत भाषांतर करणे सहज सोपे वाटते. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या मातृभाषेतदेखील भाषांतर करण्याचा पर्याय तयार ठेवू शकता.  
भाषांतराचे प्रकार
अगोदर सांगितल्याप्रमाणे भाषांतराचे अनेक प्रकार असतात. त्यानुसार या क्षेत्रात शिरकाव करताना नेहमी व्यावसायिक किंवा ज्याला कॉर्पोरेट स्वरूपाचे भाषांतर म्हणता येईल, त्यापासून सुरुवात करावी. भाषांतराचा कोणत्याही प्रकारचा अनुभव अथवा सराव नसताना थेट साहित्यिक स्वरूपाचे भाषांतर करण्यापासून सुरुवात करू नये. जेवढा तुम्ही साधा सोपा विषय निवडाल तितके भाषांतर करणे सहज जाते. जसे बऱ्याच वेळेला कॉर्पोरेट क्षेत्रात मीटिंग्जमधील तपशील अथवा मिनीटस्चे भाषांतर करण्यासाठी भाषांतरकाराची गरज असते नि या प्रकारच्या भाषांतरामधून कमाईदेखील चांगली करता येते.
कामाच्या विविध संधी
अनुवादक किंवा भाषांतरकार म्हणून फ्री लान्सिंग करताना एकाच वेळी तुम्ही अनेक एजन्सीज्च्या संपर्कात राहतात आणि दुसरे म्हणजे काम स्वीकारण्याचे स्वातंत्र्य तुमच्याजवळ राहाते.   एखादा आवडीचा विषय असेल तर त्या स्वरूपाची कामे स्वीकारून त्यामध्ये स्पेशलायजेशनदेखील करता येते.
कामाच्या आणखी एका प्रकारात तुम्ही एजन्सीसोबत, एखाद्या क्लायंटस्सोबत अथवा कंपनीबरोबर कामाचा करार करू शकता. या करारानुसार, ठराविक रकमेचे व आठवडय़ाच्या अथवा महिन्याच्या कामाचे तास निश्चित केले जातात. या प्रकारच्या कामात बहुतांश वेळा तुम्हाला त्या कार्यालयात जाऊन अर्ध वेळ किंवा काही दिवसांसाठी पूर्ण
वेळ स्वरूपाचे दिलेले काम पूर्ण करावे लागते. वृत्तपत्र कार्यालये किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी या प्रकारची कामे करावी लागतात.
कामासंबंधीची तयारी
जेव्हा तुम्ही अनुवादक / भाषांतरकार म्हणून कामाला सुरुवात करतात, तेव्हा तुमच्याजवळ योग्य स्वरूपाच्या डिक्शनरीज् जवळ बाळगणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात अनुवादाचे सॉफ्टवेअर घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण हा वादाचा मुद्दा आहे. जर कामाच्या दृष्टीने खरोखरीच फायदा होणार असेल तरच त्याचा विचार केलेला बरा.
या व्यवसायात आल्यानंतर कामाबाबत तुमचा दृष्टिकोन पूर्णत व्यावसायिक स्वरूपाचा असावा. डेडलाइन पाळणे हे या क्षेत्रात खूप महत्त्वाचे असते. कारण एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन अथवा वर्तमानपत्रातील लेख हा योग्य वेळी प्रसिद्ध होणे आवश्यक असते. अशा वेळी कामाच्या बाबतीत तुम्ही थोडीही चालढकल करणे योग्य ठरत नाही. कामासंदर्भातील योग्य त्या नोंदी करून ठेवाव्यात. माहिती किंवा विविध शब्दांचा स्वतचा असा संग्रह करून ठेवावा. अनुवाद केल्यानंतर तो दोन-तीनदा नीट तपासून बघावा. त्यात काही चुका तर नाही ना किंवा काही शिल्लक राहिले आहे का की, गाळले गेले ते नीट तपासून बघावे. एखादी गोष्ट समजली नसल्यास किंवा काही वादातीत मुद्दे असल्यास ते तज्ज्ञ व्यक्तींकडून अथवा मूळ लेखकाकडून तपासून घ्यावेत. त्याचबरोबर अनुवादाची भाषा आणि मूळ भाषा या दोन्हीमधील नव्याने प्रकाशित होणाऱ्या वाचनाचा सातत्याने सराव ठेवावा. वरवर छोटय़ा वाटणाऱ्या, पण महत्त्वाच्या असणाऱ्या या गोष्टींची काळजी घेतली तर या व्यवसायात तुम्ही उत्तम प्रगती करू शकाल.  
या व्यवसायात प्रामुख्याने दोन प्रकारचे भाषांतरकार पाहायला मिळतात. एक म्हणजे लिखित किंवा प्रकाशित स्वरूपात झालेल्या लेखनाचे भाषांतर; ज्यात पुस्तके, इतर स्वरूपाचे विविध लेखन यांचा समावेश होतो तर दुसरा प्रकार दुभाषी (इंटरप्रिटर) म्हणजेच एखादी कॅसेट अथवा सीडी ऐकून त्यामध्ये जे बोलले गेले आहे, त्याचा अनुवाद करणे. यात श्राव्य स्वरूपातील मुलाखती, भाषणे आदींचा समावेश होतो. यात तऱ्हेतऱ्हेच्या सॉफ्टवेअर कंपन्या, इंटरनेट सबंधातील लिखित स्वरूपातील विविध प्रकारच्या डॉक्युमेण्टस्, ज्यात कायदेविषयक बाबी, व्यावसायिक गोष्टी, तांत्रिक स्वरूपातील गोष्टी किंवा साहित्यिक स्वरूपातील गोष्टींचा समावेश होतो. या स्वरूपाच्या भाषांतरामध्ये प्रामुख्याने शब्दांनुसार दर आकारले जातात. तर दुभाषा म्हणून काम करणाऱ्या भाषांतरकाराला तासानुसार दर आकारले जातात. कारण व्यावसायिक स्वरूपाच्या परिषदा किंवा बठका (मीटिंग्ज), न्यायालये किंवा सरकारी कामकाजाच्या वेळी त्यांची प्रामुख्याने गरज भासत असते.
यावरून एक गोष्ट सहजपणे लक्षात येते की, दुभाषाच्या कामाचे स्वरूप हे थोडेसे क्लिष्ट असते. कारण वक्त्याच्या बोलण्याच्या वेगानुसार त्याला त्याचे भाषांतराचे काम करायचे असते. त्यामुळे वक्त्याला नेमके काय सांगावयाचे आहे हे समजून घेऊन, योग्य व नेमक्या शब्दांची ठराविक वेळात मांडणी करून त्याला त्याचे काम सादर करावे लागत असते. अशा वेळी त्या भाषेवर कमालीचे प्रभुत्व लागते. बहुतेकदा असे होते की, त्या त्या शब्दांना अनेक पर्यायी शब्द असतात. त्यावेळी नेमक्या शब्दाची निवड करणे महत्त्वाचे असते. हा नेमका शब्द कोणता ते त्यास निश्चितपणे निवडता आले पाहिजे. म्हणूनच भाषांतराच्या दृष्टीने हे काम खूपच आव्हानात्मक स्वरूपाचे असते.
शैक्षणिक पाश्र्वभूमी
 मुळातच हे व्यापक क्षेत्र असल्यामुळे इथे भाषांतराच्या स्वरूपानुसार शैक्षणिक पाश्र्वभूमी महत्त्वाची ठरते. उदा. समजा, तुम्ही तांत्रिक (टेक्निकल) स्वरूपाचे भाषांतर करणारे असाल तर तुमच्याजवळ अशा प्रकारचे भाषांतर करण्याचे प्रमाणपत्र असावे किंवा या प्रकारच्या भाषांतर अभ्यासक्रमाची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी. किंवा कायदेविषयक भाषांतर करीत असाल तर न्यायालयाच्या अथवा कायद्याच्या त्या त्या संकल्पना, नेमकी भाषा याचे ज्ञान तुम्हास अवगत असावे. तर एखाद्या परदेशी भाषेतून भाषांतर करीत असाल तर तेथील संस्कृती, तिथल्या संकल्पना, तेथील साहित्य याची जाण असावी.  
तुम्ही शिकत असलेल्या भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रात तुम्हाला अनुवादक किंवा दुभाषा यांपकी नेमक्या कोणत्या क्षेत्रात काम करावयाचे आहे, ते आधी ठरवा. कारण या दोन्ही क्षेत्रात, तुम्हाला अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध झालेल्या दिसतील. जसे वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, हॉटेल्स, हॉलिडे रिसॉर्टस् ,पर्यटन कंपन्या इ.मध्ये अनुवादक किंवा दुभाषांसाठी अनेकदा उत्तम संधी मिळताना दिसतात. जर अनुवादक म्हणून एखाद्या विषयात तुम्हाला स्पेशलायजेशन करावेसे वाटत असेल तर त्यात पूर्णपणे लक्ष केंद्रित करून काम करा. उदा. एखाद्या विषयामध्ये भाषांतर करणे आवडत असेल तर या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवा, त्यामागच्या संकल्पना समजून घ्या किंवा ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी अनुवादक / भाषांतरकार म्हणून काम करीत असाल तर त्यातल्या संकल्पना, त्यामागची तत्त्वे जाणून घ्या.
याव्यतिरिक्त सरकारी क्षेत्रे जसे शेती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, टेक्सटाइल आणि शिक्षण विभाग अशा अनेक ठिकाणी कनिष्ठ भाषांतरकार, वरिष्ठ भाषांतरकार आणि तज्ज्ञ भाषांतरकार तसेच सहाय्यक संचालक अशी भाषा विभागांतील भाषांतरकारांसाठी विविध पदे असतात.
बदलत्या काळानुसार या क्षेत्रातदेखील संगणकाचा वापर अनिवार्य झाला आहे. त्यामुळे अनुवादक / भाषांतरकाराला इतर गोष्टींच्या जोडीने संगणकाचा वापरदेखील कुशलतेने करता आला पाहिजे, हे ध्यानात ठेवा.
कामाचा मोबदला
अनुवादाच्या किंवा भाषांतराच्या कामाचा नेमका काय दर लावायचा, हा बऱ्याचदा अनुवादकाला / भाषांतरकाराला सतावणारा प्रश्न असतो. अर्थात तुम्ही तुमच्या कामात तितकेच अनुभवी आणि कुशल असलात तर तुम्ही तुमचे दर ठरवून त्यानुसार आकारू शकतात. बहुतेकदा हे दर कामाचे स्वरूप, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ लक्षात घेऊन कंपनी व अनुवादकाच्या सहमतीने हे दर ठरतात किंवा जर कंपनीने अगोदरच काही दर निश्चित केले असतील आणि अनुवादकाला देखील ते योग्य वाटत असतील तर त्यानुसार कामाचा मोबदला मिळतो.
ज्याप्रमाणे इतर नोकरींच्या पदासाठी जशी वर्तमानपत्रात अथवा नेटवर जाहिरात दिली जाते, तशीच या क्षेत्रातील विविध पदांसाठीदेखील वर्तमानपत्रे किंवा नेटवर जाहिरात दिली जाते. तेव्हा स्वतमधील गुण ओळखा नि त्या दृष्टीने भाषांतराच्या नेमक्या संधीचा शोध घेण्यास सुरुवात करा.
geetacastelino@yahoo.co.in
अनुवाद – सुचित्रा प्रभुणे   

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
positive artificial intelligence
कुतूहल : भारताला गरज सकारात्मक कृत्रिम बुद्धिमत्तेची!
Chandrakant Patil appeal to Pune residents regarding the book festival Pune news
नागपूरचा की पुण्याचा पुस्तक महोत्सव मोठा करायचा हे तुम्ही ठरवा- चंद्रकांत पाटील यांचे पुणेकरांना आवाहन
land records department will provide online property title change notices to postal department
मालमत्तेसबंधीत टपाल विभागाला ऑनलाईन नोटीस… काय होणार परिणाम ?
Story img Loader