साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या २०० हून अधिक जागांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्यातील काही जागा महिलांसाठी राखीव आहेत. या प्रवेशभरती संबंधित प्रवेशपरीक्षा आणि इतर चाचण्यांची सविस्तर माहिती –
ल हानपणापासूनच गणवेशधारी अधिकारी  होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्या स्वप्नाची पूर्ती करण्याची एक संधी मोटार वाहन विभागाकडून लवकरच उपलब्ध होईल.
मोटार वाहन विभागात ३०० साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व १५० मोटार वाहन निरीक्षकांची नवीन पदे राज्य शासनाने मंजूर केली असून, त्यापैकी सुमारे २०० हून जास्त साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या पदांसाठी अर्ज मागविण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापैकी काही पदे ही महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही महिलांना संधी उपलब्ध होईल.
मोटार वाहन विभागातील अधिकारी प्रामुख्याने शिकाऊ परवाना देणे, पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी वाहन चालविण्याची चाचणी घेणे, नवीन वाहनांची नोंदणी करणे, व्यावसायिक वाहनांची योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी तपासणी करणे, मोटार वाहन कायद्यातील तरतुदींच पालन न करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यांना मेमो देणे, वाहनांना अटकाव करणे व सीमा तपासणी नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी करणे इ. कामे करतात.
साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदाकरिता वेतनश्रेणी- ९,३००-३४,८०० (ग्रेड पे ४,३००) अधिक भत्ते.
सहा. मोटार वाहन निरीक्षक पदासाठी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत-
सर्वसाधारण पात्रता
* अर्जदार भारतीय नागरिक असावा.
* वय किमान १९ वर्षे असावे व ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवार, पात्र खेळाडू यांच्याबाबत वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत व माजी सैनिकांसाठी सशस्त्र दलात सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षे शिथिलक्षम.)
शैक्षणिक अर्हता
* शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
* राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेली ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील तीन वर्षीय अभ्यासक्रमाची पदविका.
शारीरिक पात्रता
* पुरुष – अर्जदाराची किमान उंची (अनवाणी) १६३ सें.मी. अर्जदाराची फुगवून छाती ८४ सें. मी. (किमान प्रसरण ५ सें.मी आवश्यक)
* महिला – अर्जदाराची किमान उंची (अनवाणी) १५५ सें.मी.
* अर्जदाराचे किमान वजन – ४५ किलो
* अर्जदाराची दृष्टी चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय उत्तम दृष्टी (६/६) असावी. रंगआंधळेपणा व रात आंधळेपणा नसावा.
अनुभव
पदविका प्राप्त केल्यानंतर उद्योग संचालनालयाकडे लघुद्योग म्हणून नोंद असलेल्या किंवा वार्षिक उलाढाल तीन ते पाच लाख असलेल्या मोठय़ा गॅरेज किंवा कार्यशाळेत पेट्रोल व डिझेल इंजिनावर चालणारे हलके वाहन, जड मालवाहतूक वाहन व जड प्रवासी वाहनाच्या दुरुस्तीचे पूर्णवेळ कर्मचारी म्हणून प्रत्यक्ष काम केल्याचा एक वर्षांचा अनुभव आवश्यक.
अतिरिक्त आवश्यक अर्हता
अर्ज सादर करण्याच्या तारखेस मोटार सायकल, हलके वाहन, जड मालवाहतूक आणि प्रवासी वाहन चालविण्याची पक्की अनुज्ञप्ती (वाहन परवाना) आवश्यक.
असे निदर्शनास आले आहे की, अनेक होतकरू अभियांत्रिकी पदविकाधारकांकडे जड वाहन चालविण्याचे वाहनचालक परवाना नसल्यामुळे ते या पदाकरिता अर्ज करू शकत नाहीत. लोकसेवा आयोगाची जाहिरात आल्यानंतर ड्रायव्िंहग लायसन्स काढण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नाही. कारण शिकाऊ परवाना प्राप्त केल्यानंतर किमान ३० दिवस पूर्ण झाल्याशिवाय जड वाहन चालविण्याची चाचणी देता येत नाही. त्यामुळे जे पदविकाधारक या पदासाठी अर्ज करण्यास उत्सुक असतील त्यांनी त्वरित जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेऊन, त्याची चाचणी देऊन परवाना प्राप्त करून घ्यावा.
लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पडताळणीअंती अनेक उमेदवारांनी सादर केलेला अनुभवाचा दाखला निकषांची पूर्तता करणारा नसल्याने त्यांना नियुक्तीपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे अनुभवाचा दाखला सादर करताना सर्व निकषांची पूर्तता होत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
परीक्षा पद्धती
पात्रतेच्या सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाकरिता परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते-
पूर्वपरीक्षा
ही परीक्षा मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यासाठी घेण्यात येते. या परीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. या परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाची १०० प्रश्नांची, १०० गुणांची सामान्य अध्ययन (गुण ५०) व बुद्धिमापन चाचणी (३० गुण), यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी (२० गुण) या विषयाची, एकच प्रश्नपत्रिका असते.
मुख्य परीक्षा
पूर्वपरीक्षेत अर्हता-प्राप्त झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस प्रवेश दिला जातो. ही मुख्य परीक्षा यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित विषयावर वस्तुनिष्ठ स्वरूपाची इंग्रजी माध्यमातून ३०० गुणांची (एकूण १५० प्रश्न) एकच प्रश्नपत्रिका असते.
मौखिक व व्यक्तिमत्त्व चाचणी (५० गुण) :
मुख्य परीक्षेमध्ये अर्हताप्राप्त झालेल्या आणि छाती/ वजन व उंची मोजमापाच्या विहित अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच फक्त ही चाचणी घेण्यात येते.
याबाबतची सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पत्ता- http://www.mpsc.gov.in
पदोन्नतीच्या संधी
आज मोटार वाहन विभागात मोटार वाहन निरीक्षकांच्या अनेक जागा रिक्त आहेत. तसेच नव्याने मोटार वाहन निरीक्षकांच्या १५० पदांना शासनाची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे सहा. मोटार वाहन निरीक्षकांनी परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण करताच व पदावर तीन वर्षे सेवा होताच मोटार वाहन निरीक्षक या पदावर पदोन्नती मिळण्याची संधी आहे. सामान्यत: इतर कोणत्याही विभागात इतक्या कमी कालावधीत पदोन्नती प्राप्त होत नाही. तसेच भविष्यात सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदांपर्यंत पदोन्नतीच्या संधी आहेत.
योगेश बाग
साहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palcement for r t o officer