‘द इंटरनॅशनल मॅक्स प्लँक रिसर्च स्कूल’ (कटढफर) ही संशोधन संस्था आणि तेथील कोन्स्तान्त्झ विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवशास्त्रातील पीएचडीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. त्याविषयी..
जर्मनीतील मॅक्स प्लँक सोसायटीच्या ‘द इंटरनॅशनल मॅक्स प्लँक रिसर्च स्कूल’ (IMPRS) या संशोधन संस्थेतर्फे तिथल्याच कोन्स्तान्त्झ विद्यापीठाच्या सहकार्याने जीवशास्त्रातील पीएचडीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेने या शिष्यवृत्तीसाठी पात्र पदव्युत्तर अर्जदारांकडून १५ जानेवारी २०१४ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल :
जर्मनीतील मॅक्स प्लँक सोसायटीच्या ‘द इंटरनॅशनल मॅक्स प्लँक रिसर्च स्कूल’ (IMPRS) फॉर ऑर्गनायझमल बायोलॉजी ही संशोधन संस्था म्हणजे मॅक्स प्लँक सोसायटीच्या मॅक्स प्लँक इन्स्टिटय़ूट फॉर ओíनथोलोजी आणि कोन्स्तान्त्झ विद्यापीठाने एकत्र येऊन जीवशास्त्रातील संशोधनासाठी स्थापन केलेला एक छोटासा गट. मानवी उत्क्रांतीपासून ते मेंदूशी संबंधित शाखांप्रमाणे जीवशास्त्रातील इतरही अनेक शाखांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधन व्हावे यासाठी ही संस्था २५हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन गटांबरोबर आव्हानात्मक आणि उच्च दर्जाचे संशोधनकार्य करते. ही शिष्यवृत्ती सप्टेंबर २०१४ मध्ये सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांसाठी आहे. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीधारकाला त्याचे पीएचडीचे संशोधन तीन वर्षांमध्येच पूर्ण करावे लागेल. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला या संपूर्ण कालावधीसाठी दरमहा ठराविक वेतनभत्ता व निवासीभत्ता दिला जाईल, तसेच संशोधनाच्या एकूण कालावधीमध्ये संस्थेकडून प्रवासासाठीही भत्ता दिला जाईल.
आवश्यक अर्हता :
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराकडे संबंधित क्षेत्रातील म्हणजे जीवशास्त्रातील पदव्युत्तर पदवी असावी किंवा चार वर्षांच्या समकक्ष पदवी व त्यासहित प्रकाशित झालेला एखादा शोधनिबंध असावा. अर्ज करतेवेळी अर्जदाराकडे उपरोक्त पदवी असावीच, असे काही नाही. मात्र, पीएचडी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी म्हणजेच सप्टेंबर २०१४ अगोदर त्याच्याकडे संबंधित पदवी असायला हवी. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराचे जर्मन भाषेवर प्रभुत्व असले तर उत्तम, अन्यथा त्याला जर्मन भाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. अर्जदाराचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच त्याने TOEFL परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया :
या शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेली अर्जप्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची आहे. ही संपूर्ण अर्जप्रक्रिया तीन टप्प्यांमधील इलेक्ट्रॉनिक प्रक्रिया असून ती वेबसाइटवर दिलेल्या ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करायची आहे. इतर कोणत्याही पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे जर अर्ज पाठवला गेला तर तो बाद ठरवला जाईल. अर्जदाराला ही अर्जप्रक्रिया इंग्रजीमध्ये पूर्ण करायची आहे. या प्रक्रियेत अर्जामध्येच त्याला त्याचा सी.व्ही. अपलोड करायचा आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतर अर्जप्रक्रियांसारखे नंतर स्वतंत्र सी.व्ही. पाठवण्याची गरज नाही. अर्जदाराला त्याच्या अर्जाबरोबरच इतर सर्व कागदपत्रे म्हणजे त्याच्या संशोधनाची थोडक्यात मांडणी व त्याबरोबरच भविष्यातील त्याची स्वत:च्या संशोधनाची रूपरेषा सांगणारे एस.ओ.पी., त्याच्या प्रकाशित झालेल्या आतापर्यंतच्या सर्व शोधनिबंधांच्या प्रती आणि त्याच्या संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असणाऱ्या दोन किंवा तीन तज्ज्ञ प्राध्यापकांची शिफारसपत्रे इत्यादी एकाच पीडीएफच्या स्वरूपात अपलोड करायची आहेत. अर्जप्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची असल्याने अर्जदाराने स्वत:ला भरपूर वेळ देऊन ती पूर्ण करावी. मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवेपर्यंत थांबू नये. अर्ज व्यवस्थितपणे पूर्ण झाला असल्यास लगेच जमा करावा.
निवड प्रक्रिया :
दाखल झालेल्या एकूण अर्जामधून शैक्षणिक व संशोधन गुणवत्तेवर निवड झालेल्या अर्जदारांना मुलाखत व पुढील निवड प्रक्रियेसाठी मार्चमध्ये बोलावले जाईल. मुलाखतीनंतर लगेचच अंतिम अर्जदारांना निवडण्यात येईल. यशस्वी अर्जदारांचा पीएचडी कार्यक्रम सप्टेंबर २०१४ मध्ये सुरू होईल.
अंतिम मुदत :
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा :
http://www.orn.mpg.de
itsprathamesh@gmail.com
जीवशास्त्रामध्ये पीएचडी: जर्मनीतील शिष्यवृत्ती
‘द इंटरनॅशनल मॅक्स प्लँक रिसर्च स्कूल’ (कटढफर) ही संशोधन संस्था आणि तेथील कोन्स्तान्त्झ विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवशास्त्रातील पीएचडीचे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.
First published on: 16-12-2013 at 07:33 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phd in biologically germany scholarships