स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठीची तयारी विद्यार्थ्यांनी दहावीपासून करायला हवी. स्पर्धा परीक्षांमध्ये विविध प्रवर्गातील सुमारे ६४ प्रकारच्या परीक्षा असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणती परीक्षा द्यायची आहे हे ठरविल्यास अभ्यासाची दिशा निवडणे सोपे जाईल. या परीक्षा देण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामान्य ज्ञानात वाढ करावी. याकरिता विद्यार्थ्यांनी दररोज विविध भाषेतील वर्तमानपत्र वाचायला हवीत. यातून जगभरात घडणाऱ्या घडामोडींची माहिती मिळण्यास मोठी मदत होते. तसेच आपला शब्दसंग्रह वाढविण्यासाठी आणि वाक्यरचना समजावून घेण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये छापून येणारे अग्रलेख विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचायला हवे. वर्तमानपत्राबरोबरच विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील वाचन वाढवायला हवे. सर्वव्यापी वाचनामुळे सामान्य ज्ञानात आपोआप भर पडते.
यामुळे स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी वाचनात सातत्य ठेवावे. वाचनाबरोबर विद्यार्थ्यांनी चौकसपणा अंगी बाळगायला हवा. देश आणि राज्य पातळीवर तसेच स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमागची कारणे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कायम प्रयत्नशील असावे. यामुळे एकाच विषयाचे विविध पैलू समोर येतात. त्यातून ज्ञानात भर पडत जाते. यामुळे केवळ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौकसपणा अंगी बाळगणे महत्त्वाचे आहे. वाचनाबरोबरच दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे लिखाण. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या लिखाणाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नियमितपणे लिखाणाची सवय ठेवावी. त्याचबरोबर दहावीपर्यंत शिकविल्या जाणाऱ्या गणित, समाजशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास पक्का करून ठेवावा. यातील बहुतांश गोष्टींचा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात समावेश असल्याचे डॉ. गीत यांनी सांगितले. सद्यस्थितीत अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे ध्येय उराशी बाळगून केवळ त्याच दिशेने अभ्यास करताना दिसून येतात.
परंतु या परीक्षांमध्ये अपयश आल्यास ते खचून जातात. त्यामुळे या स्पर्धामध्ये अपयश आल्यास करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी दुसरा पर्याय किंवा प्लॅन बी ठेवायला हवा. यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या पदवी अभ्यासक्रमावर अवलंबून राहण्याऐवजी पदव्युत्तर अभ्यासक्रमदेखील पूर्ण करण्यावर भर द्यावा. यामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आल्यास एका विषयातील पदवी पूर्ण असल्याने नोकरी मिळविताना कोणतीही अडचण येणार नाही. असे मत डॉ. गीत यांनी व्यक्त केले. तसेच या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी, भरपूर आणि सातत्यपूर्ण अभ्यास हाच पर्याय आहे, असे स्पष्ट मत डॉ. गीत यांनी व्यक्त केले.