‘तंत्रज्ञान व्यवस्थापन’ या स्पेशलायझेशनमध्ये दिवसेंदिवस प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे यासंबंधीचे विषय शिकवले जातात.  एमबीए अभ्यासक्रमातील या वैशिष्टय़पूर्ण ज्ञानशाखेबद्दल..
वे गवेगळ्या विषयांच्या बाबतीत, तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन काही विद्यापीठांनी ‘तंत्रज्ञान व्यवस्थापन’ हे स्पेशलायझेशन सुरू केले आहे. या स्पेशलायझेशनमध्ये दिवसेंदिवस प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे यासंबंधीचे विषय शिकवले जातात. विज्ञान आणि तंत्र विषयक विविध संस्था आहेत. या सर्वाना प्रशिक्षित व्यवस्थापकांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासते. त्यासाठी तंत्रज्ञान व्यवस्थापनात एमबीए केलेले प्रशिक्षित व्यवस्थापक उपयुक्त ठरतात. या दृष्टीने या ज्ञानशाखेचा उपयोग करून घेतला पाहिजे. यामध्ये लक्षात ठेवायला हवे की तंत्रज्ञान विकसित करणे असा हा या ज्ञानशाखेचा हेतू नसून तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन करणे हा याचा उद्देश आहे. या दृष्टीने या ज्ञानशाखेमधील वेगवेगळ्या विषयांची ओळख करून घेऊयात.
‘तंत्रज्ञान व्यवस्थापनाची मूलभूत तत्त्वे’ या विषयापासून स्पेशलायझेशनची सुरुवात होते. हे स्पेशलायझेशन घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मुख्यत: सुरुवातीला तंत्रज्ञान म्हणजे काय, हे समजायला हवे. तंत्रज्ञानाची वैशिष्टय़े तसेच तंत्रज्ञान विकासातील विविध टप्पे, ज्ञान-तंत्रज्ञान यांतील परस्परसंबंध या सर्व महत्त्वांच्या विषयांचा अंतर्भाव या विषयात होतो. तंत्रज्ञान म्हणजे काय, हे समजून घेतल्यानंतर तंत्रज्ञान व्यवस्थापन म्हणजे काय, याचा अभ्यास करता येतो. तंत्रज्ञान व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञानाची गरज ओळखून ते विकसित करण्यासाठी योग्य ते वातावरण कसे निर्माण करावे तसेच तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर त्याचा संस्थेच्या मूल्य साखळीमध्ये (व्हॅल्यू चेन) उपयोग करून घेऊन ग्राहकांना आणि संपूर्ण समाजाला लाभ कसा करून घ्यावा याचा समावेश होतो. यासाठी मूल्यवृद्धी (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) करण्यामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका ही समजून घ्यायला हवी. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस प्रगत होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर आपण निर्माण करीत असलेल्या वस्तू आणि देत असणाऱ्या सेवांमध्ये कसा करून घेता येईल यासंबंधीचाही विचार करणे आवश्यक ठरते.
व्यवस्थापनाची जी मूलभूत तत्त्वे आहेत ती म्हणजे नियोजन, नियंत्रण, सुसूत्रीकरण, निर्णय घेणे, योग्य कर्मचाऱ्यांची निवड या तत्त्वांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाते. याशिवाय तंत्रज्ञानामध्ये करावी लागणारी आर्थिक गुंतवणूक, या गुंतवणुकीवर मिळणारा किंवा अपेक्षित परतावा (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) आणि तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर त्याचा किमतीवर होणारा परिणाम या सर्वाचा विचार तंत्रज्ञान व्यवस्थापनामध्ये  केला जातो.
योग्य कर्मचाऱ्यांच्या निवडीच्या कामामध्ये आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तसेच ते वापरण्यासाठी लागणारे मनुष्यबळ कसे विकसित करावे याचाही विचार केला जातो. याव्यतिरिक्त तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाह, त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम, व्यवसायाच्या संघटनेवर होणारा परिणाम आदी महत्त्वाच्या घटकांची माहिती या विषयामधून होते. या सैद्धान्तिक अभ्यासासोबत प्रगत देशातील तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा अभ्यास केल्यास (केस स्टडी) विषयाची पूर्ण कल्पना येऊ शक ते. आपला देश आणि जगातील इतर देश यांची तुलना केल्यास आपले काय स्थान आहे, हेही समजते.
तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नवीन संशोधन किंवा नवीन शोध. हे संशोधन आणि नवीन शोध यांचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन. ‘शोध व्यवस्थापन’ (इनोव्हेशन मॅनेजमेंट) या विषयाची सुरुवात इनोव्हेशन म्हणजे नेमके काय यापासून होते. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की, नवीन शोध हे फक्त विज्ञानामध्येच नसून इतर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. उदा. उत्पादकता वाढवण्यासाठी काम करण्याचा नवीन मार्ग शोधून काढला तर तेसुद्धा एक प्रकारचे संशोधन व नवा शोधच आहे. तसेच भांडवल उभारणीसाठी नवीन पद्धत वापरली तर तेसुद्धा एक संशोधन आहे. एखादी आकर्षक जाहिरात किंवा वस्तूचे मार्केटिंग करण्याची एखादी अभिनव पद्धत हेसुद्धा नवीन शोधच आहेत. कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावण्यासाठी सर्जनशीलतेची गरज असते. अशा सर्जनशीलतेचा वापर संस्थेसाठी योग्य प्रकारे करून घेणे हे व्यवस्थापकाचे काम आहे. त्यादृष्टीने ‘शोध व्यवस्थापन’ या विषयाकडे बघितले पाहिजे. या विषयामध्ये नवीन शोधांविषयी असलेली वेगवेगळी मॉडेल्स तसेच मूल्यसाखळी (व्हॅल्यूचेन), स्पर्धात्मक फायदे तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता इ. गोष्टींचाही समावेश होतो. नवीन संशोधनासाठी पुरेशी वित्तीय तरतूद करणे तसेच खर्चाचा विचार करणे इ. बाबींचासुद्धा अभ्यास करता येतो. या दृष्टीने ‘नवीन संशोधनाचे व्यवस्थापन’ हा विषय महत्त्वाचा ठरतो.
‘टेक्नॉलॉजी कॉम्पिटिशन आणि स्ट्रॅटेजी’ या विषयामध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असलेल्या स्पर्धेचा विचार केला जातो. यामध्ये तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये तसेच त्याचा वापर करण्यामध्ये असलेल्या स्पर्धेला तोंड देण्याची कोणती स्ट्रॅटेजी वापरावी यासबंधीची माहिती आहे. यामध्ये सध्या वापरात असलेले तंत्रज्ञान हे माहिती करून घ्यायला हवे. तसेच आपले स्पर्धक कोणते तंत्रज्ञान वापरीत आहेत व भविष्यकाळात कोणते तंत्रज्ञान वापरण्याची शक्यता आहे याचाही अंदाज बांधता यायला हवा.
स्पर्धकांवर मात करण्यासाठी आपली शक्तिस्थाने, कमकुवत बाजू, त्याचबरोबर आपल्यापुढील आव्हाने आणि संधी या सर्वाचा अभ्यास गरजेचा आहे. आपली स्वत:ची शक्तिस्थाने वापरून व कुमकुवत बाजूवर मात करून स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी मदत होईल. याव्यतिरिक्त संशोधन क्षेत्र व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आवश्यक असणारे कायदे याचाही अभ्यास या स्पेशलायझेशनमध्ये होतो.
 विशेषत: इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीविषयक कायदे म्हटले जाते, असे ट्रेडमार्क, पेटंट कॉपीराइट्स आणि ड्रॉइंग्ज आणि डिझाइन्स विषयक कायदे यांचा अभ्यास आवश्यक असतो. या कायद्यान्वये नवीन संशोधन, नवीन शोध यांना कायद्याप्रमाणे संरक्षण दिलेले असते, ज्यायोगे आपले संशोधन अनधिकृत व्यक्ती आणि संस्थांना वापरता येणार नाही. नवीन शोधांना संरक्षण देण्यासाठी पेटंट कायदा आहे. तर ट्रेडमार्क साठी  ट्रेडमार्क कायदा आहे. एखादे पुस्तक, फोटोग्राफ फिल्म, इ. विषयी संरक्षणासाठी कॉपीराइट्स कायदा आहे. तर डिझाइन व ड्रॉइंगच्या संरक्षणासाठी ड्रॉइंग व डिझाइन्स कायदा आहे. या कायद्यांचा अभ्यास सर्वानीच करणे आवश्यक आहे.
सारांश, टेक्नॉलॉजी व्यवस्थापन हे स्पेशलायझेशन अतिशय उपयुक्त आहे. मात्र यासाठी थिअरीबरोबरच प्रत्यक्ष केस स्टडीवर भर देणे हे गरजेचे आहे.      
nmvechalekar@yahoo.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा