व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच एम.बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची खरी परीक्षा सुरू होते. या अभ्यासक्रमाची  तयारी कशी कराल, याविषयीचा लेख –
एम.बी.ए.ची प्रवेशपरीक्षा, गटचर्चा व वैयक्तिक मुलाखत या सर्वांतून पार पडल्यावर आणि योग्य तो पसंतीक्रम दिल्यानंतर प्रत्यक्ष अभ्यासक्रमास सुरुवात होते. याबाबत असे म्हणता येईल, की एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यानंतरच खरे तर परीक्षेला सुरुवात होते.
एम.बी.ए. अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थीजगतामध्ये आजही बरेच गैरसमज आहेत. अनेकांचा असा समज असतो की, अभ्यासक्रम पूर्ण केल्याबरोबर एखाद्या मोठय़ा कंपनीत, मोठय़ा पगाराची नोकरी ताबडतोब लागेल. तसेच, कित्येक विद्यार्थी- विद्यार्थिनींना असे वाटत असते की, एम.बी.ए.ला  प्रवेश घेतल्यानंतर फारसा अभ्यास वगैरे न करता फक्त आपला मुद्दा उत्तमरीत्या मांडण्याची कला अवगत केल्यास सर्व प्रश्न सुटतील. या आणि इतर अनेक गैरसमजांमुळे एम.बी.ए.ची दोन वर्षे अक्षरश: वाया घालवली जातात आणि त्यामुळे चांगली करिअरची संधीसुद्धा घालवली जाते. यामुळे एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण करताना काही पथ्ये पाळणे हे अतिशय आवश्यक ठरते.
सर्वप्रथम हे लक्षात ठेवायला हवे की, एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अनेक उत्तम करिअर संधी उपलब्ध आहेत. सध्या हा अभ्यासक्रम चालवणाऱ्या अनेक संस्थांमध्ये पुरेसे विद्यार्थी नसल्यामुळे कित्येकदा विद्यार्थी – पालकांना असा प्रश्न पडतो की, खरोखरच एम.बी.ए. करणे इष्ट ठरते का? त्यानंतर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत का? वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये एम.बी.ए. अभ्यासक्रमाच्या प्रवेशजागा मोठय़ा प्रमाणावर वाढल्या. हा अभ्यासक्रम चालविण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. यामुळे अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि उपलब्ध जागा यांचा मेळ राहिला नाही आणि उपलब्ध जागा अधिक आणि प्रवेश घेणारे कमी, असे चित्र निर्माण झाले. याचा परिणाम म्हणजे अनेक संस्थांमध्ये एम.बी.ए.च्या जागा रिकाम्या राहिल्या. परंतु, याचा अर्थ एम.बी.ए.ची मागणी कमी झाली किंवा हा अभ्यासक्रम निरुपयोगी आहे, असे मुळीच नाही. उलट वाढत्या जागतिकीकरणामुळे प्रशिक्षित व्यवस्थापकांची  गरजही वाढलीच आहे. मात्र, योग्य प्रकारचे व्यवस्थापक उपलब्ध होत नाहीत, हेही तितकेच खरे आहे. प्रशिक्षित व तज्ज्ञ व्यवस्थापकांची गरज ही फक्त बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा इतर मोठय़ा कंपन्यांनाच नसून प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. मात्र या संधी घेण्यासाठी एम.बी.ए.च्या दोन वर्षांचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.
यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी वेगवेगळ्या विषयातील विविध संकल्पनांची स्पष्ट समज, चांगले संभाषण कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता, सतत नवीन  कल्पना शिकून त्या अमलात आणण्याची क्षमता, निर्णय क्षमता,  नेतृत्वगुण आदी गुणांची  नितांत आवश्यकता असते. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये हे गुण विकसित करण्याची संधी प्रत्येकालाच मिळते, असे नाही. त्यामुळे एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यानंतर स्वतची  क्षमता  विकसित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक  करावा लागतो.
एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षांमध्ये सर्वसाधारणपणे मूलभूत विषय शिकवले जातात. यामध्ये व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, मॅनेजमेंट अकौंटिंग, मॅनेजरियल इकॉनॉमिक्स, ऑर्गनायझेशन बिहेव्हियर, कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस लॉज आदी विषयांचा समावेश होतो. या सर्व विषयातील मूलभूत संकल्पना, पुढील करिअरमध्ये अतिशय उपयुक्त ठरतात. उदा. विविध कायद्यांचा अभ्यास हा व्यवस्थापक म्हणून काम करताना निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरतो. मॅनेजमेंट अकौंटिंगचा उपयोग स्वतची आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी तर होतोच, पण महत्त्वाचे निर्णय घेताना विविध पैलूंचा विचार कसा करावा या दृष्टीनेही होतो. कंपनीमध्ये काम करताना किंवा स्वतचा व्यवसाय सुरु केल्यास एकमेकांतील परस्परसंबंध कसे हाताळावेत, याचे ज्ञान ऑर्गनायझेशन बिहेव्हियर या विषयाच्या अभ्यासातून होते. तसेच अर्थशास्त्र, व्यवस्थापनाची मूलतत्त्वे या विषयांचा अभ्याससुद्धा पुढील करिअरची यशस्वी वाटचाल करण्यामध्ये होतो.
याबाबतीत सर्वसाधारणपणे येणारा अनुभव असा की, अनेक विद्यार्थी- विद्यार्थिनी वेगवेगळ्या विषयांच्या मूलभूत संकल्पना समजून घेत नाहीत. केवळ परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे हा हेतू मनात ठेवून या विषयांकडे पाहिले जाते. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे हा हेतू जरी योग्य असला तरी केवळ हाच दृष्टिकोन ठेवणे हे चुकीचे ठरते. यामुळे प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे हे आवश्यक असते. यासाठी जास्तीतजास्त वाचन करणे ही सवय जाणीवपूर्वक लावावी लागते. विविध विषयांच्या संदर्भग्रंथांचे वाचन करणे हे सर्वात उत्तम  ठरते. इंटरनेटचा योग्य वापर करून वेगवेगळ्या विषयांसंबंधित चांगल्या लेखांचे वाचन करून स्वत:चे आकलन व ज्ञान वाढवणे ही सतत चालू राहणारी प्रक्रियासुद्धा उपयोगी ठरते. प्रथम वर्षांत शिकण्यासाठी असलेले अनेक विषय म्हणजे आपल्याला तो विषय अभ्यासण्याची संधी आहे, हे समजून त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे हे आज अत्यंत आवश्यक आहे. मात्र व्यवस्थापन संस्थांतून येणारा अनुभव याच्या उलट आहे. एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून नोकरीच्या शोधात असणारे अनेकजण आढळतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपल्याला नोकरी मिळेल किंवा नाही, या विवंचनेत अनेकजण असतात. नोकरी मिळवणे हा उद्देश जरी योग्य असला तरी नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता आपल्यात यावी, म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे आवश्यक असते, हे समजून घ्यायला हवे. म्हणून केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे, तर विषयांच्या गाभ्यामध्ये जाऊन तयारी करणे हे उद्दिष्ट ठेवले पाहिजे.
या बरोबरच अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षांपासूनच सादरीकरणाची  कला तसेच संभाषण कौशल्य याहीकडे लक्ष दिले पाहिजे. कित्येकवेळा असे दिसते की, एखाद्या विद्यार्थी- विद्यार्थिनीला विषयाचे उत्तम ज्ञान आहे, परंतु, ते सादरीकरणात कमी पडतात आणि त्यामुळे करिअरमध्ये मागे पडतात. त्यासाठी सादरीकरणाचा जास्तीतजास्त सराव करणे हा एक मार्ग आहे.  जास्तीतजास्त अवांतर वाचन करणे याचाही उपयोग होऊ शकतो. संधी मिळेल तेव्हा म्हणजे मित्रमंडळींमध्ये, वर्गामध्ये, एखाद्या  कार्यक्रमामध्ये सादरीकरण करून आत्मविश्वास वाढवता येतो. आज बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच इतरही कंपन्यांमध्ये संपर्काची भाषा ही इंग्लिश असल्यामुळे या भाषेवरील आपले प्रभुत्व वाढवले पाहिजे. आपल्याला इतरांसारखे इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, म्हणून न्यूनगंड बाळगण्याचे काही कारण नाही.  नियमित सराव व जास्तीतजास्त वाचन या बळावर इंग्लिश बोलण्यात प्रावीण्य मिळवता येते.
आपल्या भोवतालच्या परिस्थितीची माहिती असणे हा एक अतिशय आवश्यक घटक आहे. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर म्हणजे काय, ढोबळ राष्ट्रीय वस्तुमान (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) म्हणजे काय आणि ते कसे काढले जाते, वित्तिय तूट किती आहे, जागतिक अर्थव्यवस्थेची आजची स्थिती व तिचा आपल्यावर काय परिणाम होईल या सर्वाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याचबरोबर सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, देशाची आर्थिक बाबतीतील व राजकीय बाबतीतीतल धोरणे ही माहिती पाहिजेत. करिअरमध्ये एखाद्या जबाबदार पदावर काम करताना किंवा स्वतचा व्यवसाय सुरू केल्यानंतर या सर्व बाबींचा व्यवसायावर काय परिणाम होतो, हे कळते.
एम.बी.ए.च्या करिअरमध्ये हमखास उपयोगी पडणारा आणखी एक गुण म्हणजे विश्लेषणात्मक क्षमता. उदा. मॅनेजमेंट अकौंटिंगमध्ये शिकवला जाणारा ताळेबंद पाहून त्याचे विश्लेषण कसे करावे, हे शिकता येते. तसेच मार्केटिंग रिसर्चमधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय कसा घ्यावा, हे समजते. हीच गोष्ट इतर विषयांबाबतही आहे.
सारांशाने असे म्हणता येईल, की एम.बी.ए.चे प्रथम वर्ष हे पुढील करिअरचा पाया आहे. हे वर्ष गंभीरपणे घेतल्यास आणि उपलब्ध वेळेचा पुरेपूर वापर केल्यास यशस्वी करिअर करता येणे हे शक्य आहे. मात्र यासाठी केवळ वरवरचा दृष्टिकोन सोडणे आवश्यक आहे. एम.बी.ए.चे प्रथम वर्ष खऱ्या अर्थाने कारणी लावायचे असेल तर कठोर मेहनत करणे हे क्रमप्राप्त आहे.
यानंतरच्या लेखात एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षांत कशी तयारी करावी व नंतर उपलब्ध असणाऱ्या संधी याचा विचार करू.

cbse board exam 2025 question bank pdf subject wise for class 10 12 students download from cbse gov in
Question Bank For CBSE 10th 12th Exam 2025 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट! १० दिवसांमध्ये ‘असा’ करा सराव
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
How To Prepare for UPSC Prelims 2025
UPSC Prelims 2025 : यूपीएससी प्रिलिम्सची तयारी करताय? मग अभ्यासाच्या ‘या’ टिप्स एकदा नक्की वाचा
response , students , Atal, initiative , CET cell ,
सीईटी कक्षाच्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
How to Practice Mock Tests For Exams
SBI PO & Clerk Exam Tips : परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत? मग मॉक टेस्टचा ‘असा’ करा सराव
MPSC Mantra Group B Services Prelims Exam General Science career news
एमपीएससी मंत्र: गट ब सेवा पूर्व परीक्षा: सामान्य विज्ञान
Story img Loader