आजच्या लेखात आपण ‘१८ व्या शतकाची सुरुवात ते १८५७ पर्यंतचा कालखंड’ या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०२० मध्ये  एकूण १२ प्रश्न  विचारण्यात आलेले होते. पूर्वपरीक्षेमध्ये १८ व्या शतकाची सुरुवात ते १८५७ पर्यंतचा कालखंड यावर साधारणत: कमी प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचा कल हा संकीर्ण माहितीच्या अनुषंगाने अधिक असतो.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांचे स्वरूप

* २०२० मध्ये १९ व्या शतकाच्या पहिल्या पाच दशकांत औद्योगिक क्रांतीचा भारतावर  कोणता परिणाम झालेला होता? तसेच  गव्हर्नर जनरल वेलस्लीने कलकत्ता येथे फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना कशासाठी केलेली होती असे प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* २०१९ मध्ये १८१३ च्या सनदी कायद्यातील तरतुदीवर प्रश्न  विचारण्यात आलेला होता.

* २०१८ मध्ये खालीलपैकी कोणमुळे भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली? आणि यासाठी १८१३ चा सनदी कायदा, १८२३ ची जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन, व प्राच्य—आंग्ल वादविवाद हे पर्याय देण्यात आलेले होते. तसेच याव्यतिरिक्त  संस्कृत कॉलेज, कलकत्ता मदरसा, फोर्ट विलियम अर्थर कॉलेज यांची स्थापना कोणी केली यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१७ मध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात खालीलपैकी कोण रयतवारी पद्धतीची सुरुवात करण्याशी संबंधित होते व यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस, अलेक्झांडर रीड, थॉमस मुन्रो हे पर्याय देण्यात आलेले होते.

* २०१६ मध्ये सत्यशोधक समजावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.

* २०१४ मध्ये १८५८ च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता?  असा प्रश्न विचारण्यात आलेला होता,  तसेच

* २०१२ मध्ये रयतवारी पद्धतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. ज्यामध्ये ‘शेतकऱ्यामार्फत थेट शेतसारा सरकारला दिला जात असे, रयतेला सरकारने पट्टा दिलेला होता आणि महसूल लावण्याअगोदर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजमाप केले जात असे’, अशा प्रकारची तीन विधाने दिलेली होती, आणि यातील योग्य विधाने निवडायची होती.

* २०११ मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने १७९३ सुरू केलेल्या जमीन समझोता पद्धतीमुळे खटल्यामध्ये अधिक वाढ झालेली होती. याचे महत्त्वाचे कारण काय होते? असा प्रश्न विचारलेला होता आणि यासाठीच रयतेपेक्षा जमीनदार पद अधिक मजबूत झाले, जमीनदारावर ईस्ट इंडिया कंपनीचे स्वामित्व निर्माण झाले, न्यायिक पद्धत अधिक सक्षम झाली आणि यापैकी एकही नाही असे चार पर्याय दिलेले होते.

या घटकाचे स्वरूप आणि अभ्यासाचे नियोजन

या कालखंडाअंतर्गत आपणाला युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशांची  प्रशासकीय रचना आणि धोरणे, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील बंड आणि  उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे व ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती आभ्यासावी लागणार आहे. या कालखंडाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े होती. यातील पहिले वैशिष्टय़ हे १८व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली होती, दुसरे वैशिष्टय़ हे भारताच्या विविध प्रदेशांत प्रादेशिक देशी सत्ता उदयाला आलेल्या  होत्या.( या सत्तांचे  वर्गीकरण साधारणत: तीन प्रकारांत केले जाते –  मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी स्थापन केलेल्या सत्ता (बंगाल, अवध, हैद्राबाद), मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून स्थापन झालेल्या सत्ता -मराठे, शीख, जाठ व अफगाण आणि स्वतंत्ररीत्या स्थापन झालेल्या सत्ता— म्हैसुर, राजपूत आणि केरळ) आणि तिसरे  वैशिष्टय़ हे भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात विविध प्रांतांत अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक सत्तांच्या अंतर्गत तसेच एकमेकात असणाऱ्या संघर्षांचा फायदा घेऊन स्वत:ला एका राजकीय प्रतिस्पध्र्याच्या भूमिकेत स्थापन केलेले होते. तसेच सर्व प्रादेशिक देशी सत्तांचा निर्णायक पराभव करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिराज्य मान्य करण्यास भाग पाडले आणि संपूर्ण भारतभर स्वत:चा राजकीय अंमल प्रस्थापित केला.

१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून आपणाला ब्रिटिश गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल याच्याविषयी त्यांनी केलेली युद्धे याचबरोबर, त्यांच्याद्वारे राबविण्यात आलेले सामाजिक आणि आर्थिक तसेच प्रशासकीय धोरणे आणि या धोरणांचा भारतीयांवर झालेला परिणाम आणि याला भारतीयांनी दिलेले प्रतिसाद ज्यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, प्रबोधनपर्वाला झालेली सुरुवात आणि याच्या परिणामस्वरूप  सुरू झालेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी व या चळवळींचा भारतीयांवर झालेला परिणाम व याच्या जोडीला शिक्षण आणि वर्तमानपत्रे याची जनजागृती निर्माण करण्यामध्ये असलेली निर्णायक भूमिका इत्यादी घडामोडींचा तसेच १७७२ च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे आणि त्यातील तरतुदी, ज्याला आपण ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास म्हणून पाहतो इत्यादीशी संबंधित  मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी लागणार आहे. ज्यामुळे या विषयाचे व्यापक आणि परीक्षाभिमुभ आकलन करणे अधिक सुलभ होऊ शकते.

या घटकावर कमी प्रश्न विचारण्यात आलेले असले तरी हा घटक मुख्य परीक्षेलाही आहे त्यामुळे या घटकाचे सखोल आकलन असणे अपरिहार्य आहे. या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत, पण सर्वप्रथम या विषयाची  मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपिन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने  एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासवे आणि त्यानंतर  या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर  आणि एस. ग्रोवर लिखित आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक वाचावे.