श्रीकांत जाधव
आजच्या लेखामध्ये आपण भारतीय कला आणि संस्कृती या घटकाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. २०११ ते २०२० मध्ये या घटकावर एकूण ५१ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हा घटक परीक्षेचा विचार करता अधिकच महत्त्वपूर्ण होत चालेला आहे. कारण ह्या विषयाची तयारी फक्त पूर्वपरीक्षेसाठी मर्यादित नसून मुख्य परीक्षेलाही करावी लागते, त्यामुळे या विषयाची सर्वंकष तयारी करणे गरजेचे आहे.
गतवर्षीय परीक्षेतील प्रश्न
* २०२० मध्ये बौद्ध धर्मातील महायान संप्रदाय, प्राचीन भारतातील पाणिनी, कालिदास, अमरसिंह हे विद्वान, इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते
* २०१९ मध्ये कल्याण मंडप ही रचना कोणत्या राज्याच्या मंदिर शैलीतील एक महत्त्वाचे वैशिष्टय़ होते याचबरोबर संत निम्बार्क आणि संत कबीर या भक्ती चळवळीसंबंधित व्यक्ती, मुघल कालीन चित्रकला इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
* २०१८ मध्ये मुघल स्थापत्यकला, ईशान्य भारतातील नृत्य, भारतीय हस्तकला, त्यागराज (व्यक्तिविशेष), राजस्थानी चित्रकला इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
* २०१७ मध्ये जैन धर्म, चित्रकला, भारतातील विविध जमातीद्वारे साजरे केले जाणारे उत्सव, सण, तसेच सूर्यमंदिरे यासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
२०१६ मध्ये बौद्ध धर्मातील बोधिसत्त्व या संकल्पनेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१५ मध्ये कलमकारी चित्रकला काय निर्देशित करते असा प्रश्न विचारलेला होता आणि याच वर्षी अलीकडेच खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१४ मध्ये भारताच्या सांस्कृतिक इतिहासासंदर्भात पंचयतन संज्ञा कशाशी संबंधित आहे. याचवर्षी भारताच्या संस्कृती आणि परंपरासंदर्भात कालरीपयत्तू (Kalaripayattu) काय आहे. असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१३ मध्ये बौद्ध धर्माशी संबंधित शैलशिल्प लेणी चीत्या आणि इतर विहारे असे संबोधले जातात, या दोन्हीमध्ये काय फरक आहे.
* २०१२ च्या परीक्षेत भूमिस्पर्श मुद्रा या हस्त मुद्रेतील भगवान बुद्धाची प्रतिमा काय दर्शविते हा प्रश्न विचारण्यात आलेला होता,
* २०११ मध्ये जैन तत्वज्ञानानुसार जगाची निर्मिती व संचालन कशामार्फत होते व यासाठी वैश्विक कायदा, वैश्विक सत्य, वैश्विक श्रद्धा आणि वैश्विक आत्मा हे चार पर्याय दिलेले होते.
या व्यतिरिक्त भारतीय षड्दर्शने, त्रिभंगा आणि सत्तारीया नृत्य, मूर्तिशिल्प, मंदिर शैली, अभिजात भाषा, यावरही प्रश्न विचारण्यात आलेले होते. या विषयावर आलेल्या प्रश्नाचे योग्य आकलन केल्यास असे दिसून येते की प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारात मोडणारे आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास या घटकाच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो असे उपरोक्त प्रश्नाच्या विश्लेषणावरून दिसून येते. बहुतांश प्रश्न हे संकल्पनावर आधारित विचारण्यात आलेले असल्यामुळे या घटकाशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम, व वैशिष्टय़ इत्यादींची माहिती असणे गरजेचे आहे.
या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतातील कला आणि संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते. ज्यामुळे भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतीचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते. स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाटय़ व नृत्य , चित्रकला, साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान या घटकाविषयी अधिक सखोल आणि सर्वागीण माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्येतर कालखंड ,गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड अश्या प्रकारे कालखंड निहाय वर्गीकरण करून संबंधित कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान, यांच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्टय़ तसेच याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे, ती कोणत्या कालखंडात निर्माण करण्यात आली होती, कोणत्या धर्माची होती, कोण्या व्यक्तीने वा कोण्या राजाने ती निर्माण के ली होती; इत्यादी पैलूंविषयी मूलभूत माहितीचा अभ्यास सर्वप्रथम करावा लागतो. या अभ्यासामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी तयारी आपल्याला करता येते. मध्ययुगीन भारतातील कला व संस्कृतीचा अभ्यास करताना उपरोक्त पद्धतीनेच करावा, कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पाहावयास मिळते. उदा. स्थापत्यकला, चित्रकला आणि साहित्य याचबरोबर आपणाला या कालखंडात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो—इस्लामिक स्थापत्यकलेचा उदय झालेला पाहवयास मिळतो. तसेच चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकला सोबतच लघु चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो. याच्या जोडीला आपणाला धर्मनिरपेक्ष साहित्य, स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी सबंधित माहिती असणे गरजेचे आहे.
या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११ वीचे An Introduction to Indian Art Part –I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. याच्या जोडीला १२ वीचे Themes in Indian History part— I आणि II व प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील जुन्या एनसीईआरटीच्या पुस्तकातील भारतीय कला आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. आपल्या नोट्स आपणच तयार कराव्यात, जेणेकरून कमीतकमी वेळामध्ये या विषयाची तयारी आपण करू शकतो.
या पुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारत या घटकाचा आढावा घेणार आहोत.