एम.बी.ए. अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे पाक्षिक सदर सुरू करत आहोत. एम.बी.ए.च्या प्रवेशपरीक्षा, विविध विद्याशाखा, विषयांचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती यात प्रसिद्ध होईल. सदराच्या प्रारंभीच्या भागात यंदाच्या प्रवेशपरीक्षेचे स्वरूप नेमके कसे असेल, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
एम.बी.ए. अभ्यासक्रमाची प्रवेशपरीक्षा राज्याच्या तंत्रशिक्षण विभागातर्फे १५ – १६ मार्च २०१४ या दोन दिवसांमध्ये होणार असून, या परीक्षेमध्ये संपूर्णपणे वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत. ही परीक्षा २०० गुणांची असून यासाठी अडीच तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. एकूण २०० प्रश्न या परीक्षेत विचारले जाणार आहेत व प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण असणार आहे. या परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी (निगेटिव्ह) मार्कस् वजा केले जाणार नाहीत. या सर्व बाबींचा विचार करून प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने अभ्यासाचे नियोजन करायला हवे. याचा महत्त्वाचा भाग म्हणजे असा की, अडीच तासांत म्हणजेच १५० मिनिटांमध्ये २०० प्रश्न सोडवणे हे परीक्षार्थीपुढील आव्हान आहे. प्रवेशपरीक्षेत संपादन केलेल्या गुणांवर शिक्षणसंस्थांचा प्रवेश अवलंबून असल्यामुळे या परीक्षेत उत्तम गुण मिळवणे अत्यावश्यक ठरते. यादृष्टीने पुढील गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
प्रवेशपरीक्षेचा अभ्यास करताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजावून घ्यायला हवे. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण तीन भाग आहेत- यापैकी पहिला विभाग म्हणजे इंग्रजी भाषेवर आधारित प्रश्न. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी शब्दविषयक क्षमता. व्याकरण, समानार्थी शब्द, वाक्य पूर्ण करणे तसेच परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे इ. बाबींचा समावेश या भागात होतो. या विभागावर किती मार्कासाठी प्रश्न असतील म्हणजेच एकूण गुणांपैकी किती गुण या विभागासाठी असतील याबाबत अद्याप अस्पष्टताच आहे. तरीसुद्धा साधारणपणे ५० ते ७० गुण या विभागाला असतील, असे आपण गृहीत धरू. या विभागासाठी इंग्रजी भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे, हे सांगण्याची गरज नाही. यापैकी वेगवेगळय़ा विभागांचा विचार केल्यास असे लक्षात येईल की, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी इंग्रजी भाषेची शब्दसंपत्ती वाढवणे गरजेचे आहे. ही शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी वाचन वाढवायला हवे. यामध्ये इंग्रजी वर्तमानपत्रे, मासिके तसेच पुस्तके यांचे वाचन वाढण्यासोबतच दूरदर्शनच्या वेगवेगळय़ा वाहिन्यांवरील इंग्रजी बातम्या व वृत्तविषयक कार्यक्रम ऐकणे, पाहणे आणि आपल्या मित्रमंडळीसोबत तसेच कुटुंबीयांसोबत इंग्रजी भाषेत संवाद साधणे याचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग होतो. इंग्रजी शब्दसंपत्ती ही एका दिवसात वाढणार नाही, पण त्यासाठी दररोज नियमितपणे १० नवीन शब्द शिकणे तसेच विरुद्धार्थी शब्द शिकण्याची सवय लावल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो. दररोजचा अभ्यास करताना डिक्शनरीचा उपयोग करण्याची सवय लावून घेतल्यास त्याचाही उपयोग होतो. या विभागामध्ये इंग्रजी व्याकरणावर आधारित प्रश्न विचारले जातात. यासाठी शिकलेल्या व्याकरणाची उजळणी करणे आवश्यक आहे. उताऱ्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे या घटकाचाही समावेश इंग्रजी विभागामध्ये आहे. ही उत्तरे देणे खरे म्हणजे अगदी सोपे असते, मात्र यासाठी परिच्छेद वाचून समजून घ्यावा लागतो. यासाठी लागणारा वेळही विचारात घ्यायला हवा. सारांश, इंग्रजी भाषाविषयक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. जर यासाठी मनापासून प्रयत्न केले आणि इंग्रजी वाचन वाढवले तर हे प्रत्येकाला आवश्यक आहे. एम.बी.ए. पूर्ण केल्यानंतर कंपनीमध्ये जबाबदारीच्या जागेवर काम करताना इंग्रजीचा वापर नेहमीच्या व्यवहारात करावा लागतो. बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा भारतीय कंपन्या यामध्ये इंग्रजी भाषेचा वापर अपरिहार्य ठरतो. व्यवस्थापक म्हणून काम करताना वेगवेगळे अहवाल तयार करणे, वेगवेगळे दस्तावेज तयार करणे, पत्रव्यवहार करणे आणि तोंडी संपर्क साधणे यासाठी संवादाची क्षमता असणे अपरिहार्य आहे. यादृष्टीने इंग्रजीकडे पाहायला हवे.
इंग्रजी भाषेविषयक असलेले प्रश्न हा प्रश्नपत्रिकेचा एक भाग आहे. याशिवाय दुसरा विभाग म्हणजे आकडेवारीसंबंधीच्या क्षमतेसंबंधातील प्रश्न. यामध्ये बेरीज-वजाबाकी, टक्केवारी काढणे, गुणोत्तर प्रमाण, आलेख व तक्ते यांचे विश्लेषण करणे आणि तसेच वेगवेगळय़ा प्रकारच्या तक्तयांमध्ये दिलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढणे याचा समावेश होतो. यामध्ये समजून घेण्याची गोष्ट अशी की, व्यवस्थापक म्हणून काम करताना अनेक पद्धतीचे निर्णय कमीतकमी वेळात घ्यावे लागतात. वेगवेगळी आकडेवारी समोर येत असते. या आकडेवारीचे विश्लेषण करून योग्य ते निष्कर्ष काढणे आवश्यक आहे. यादृष्टीने आकडेवारीचे पृथ:करण करणे तसेच वेगवेगळी आकडेमोड अचूकपणे व कमीतकमी वेळेत करण्याची क्षमता वाढवायला हवी. आजच्या काळामध्ये यासाठी वेगवेगळे कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स उपलब्ध असले तरी शेवटी प्रत्येकालाच ही क्षमता विकसित करावी लागते. या विभागाची तयारी करताना नियमित सरावाची गरज आहे. दररोज वेगवेगळी कॅलक्युलेशन्स म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी काढणे, वेगवेगळय़ा प्रकारच्या आलेखांचे विश्लेषण करणे याचा सराव करायला हवा.
यासाठी कंपन्यांचे वार्षिक अहवाल, वर्तमानपत्रे, इतर मासिके यांमध्ये अनेक प्रकारचे आलेख व जंत्र्या दिलेल्या असतात. त्याचे वाचन आणि त्यासंबंधित कात्रणांचा अभ्यास हा सरावासाठी उपयुक्त ठरतो.
प्रश्नपत्रिकेमधील तिसरा भाग हा ‘टेस्ट ऑफ रिझनिंग’वर आधारित असतो. यावर आधारित प्रश्नांमधून उमेदवाराची विचारक्षमता (थिंकिंग अॅबिलिटी) तपासली जाते. यामधील प्रश्न हे आकडेवारीवर आधारित तसेच वर्णनात्मक माहितीवर आधारित असतात. विविध आकृत्यांवर आधारित प्रश्नसुद्धा या विभागामध्ये विचारले जातात. वेगवेगळय़ा संस्थांमध्ये मोठय़ा पदावर काम करताना, जी अनेक प्रकारची कौशल्ये लागतात, त्यामध्ये तार्किक विचार करणे (लॉजिकल थिंकिंग) हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे. जबाबदारीच्या पदांवर काम करताना एखाद्या अवघड प्रश्नाला तोंड द्यावे लागते. मग तो कामगारविषयक प्रश्न असो, स्पर्धेला जे तोंड द्यावे लागते, त्याविषयीचा प्रश्न असो किंवा कंपनीला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्याचे आव्हान असो. या सर्वासाठी सुसंगतपणे विचार करून मार्ग काढणे आवश्यक असते. यासाठी आपली स्वत:ची विचारक्षमता वाढवणे नितांत गरजेचे आहे. परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहिताना आपण वाचलेले आठवून उत्तरे लिहितो, पण केस स्टडीविषयक प्रश्नांची उत्तरे स्वत: विचार करून लिहावी लागतात. नेमक्या याच प्रश्नांची अचूक उत्तरे विद्यार्थ्यांना देता येत नाहीत, कारण विद्यार्थी विश्लेषण क्षमता व तार्किक पद्धतीने विचार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत नाहीत. यादृष्टीने प्रश्नपत्रिकेच्या या विभागाकडे पाहिले पाहिजे.
प्रवेशपरीक्षेमधील महत्त्वाची बाब म्हणजे वेळेचे नियोजन. यासाठी अक्षरश: दररोज घडय़ाळ लावून केलेल्या सरावाचा उपयोग होतो. प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर ती संपूर्ण न वाचता, लगेच सोडवायला घेणे तसेच एखादा प्रश्न अवघड वाटला तर तो सोडून देऊन पुढच्या प्रश्नाकडे वळणे या लहान बाबींकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.
प्रवेशपरीक्षेला अद्याप साधारणपणे दीड महिना आहे. या वेळेत नियमित सराव केल्यास उत्तम गुण मिळवणे अवघड नाही. उत्तम गुण मिळवून आपल्याला हव्या त्या इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, नियमित सराव व आपल्यातील क्षमता वाढविण्याची प्रखर इच्छा या गोष्टी एकत्र आल्यास यश संपादन करणे सहजशक्य आहे.
nmvechalekar@yahoo.co.in
एमबीए प्रवेशपरीक्षेची तयारी
एम.बी.ए. अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे पाक्षिक सदर सुरू करत आहोत.
First published on: 28-01-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparing for mba entrence exam