विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, आपण जाणताच की, केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१३पासून आपल्या नागरी सेवा परीक्षेच्या नव्या आराखडय़ास अंतिम स्वरूप देऊन नागरी सेवा भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यात मूलगामी स्वरूपाचे बदल स्वीकारले आहेत. आयोगाने स्वीकारलेल्या नव्या बदलानुसार आता यूपीएससी मुख्य परीक्षा २००० गुणांऐवजी १७५० गुणांची असेल आणि मुलाखतीस ३०० गुणांऐवजी २७५ गुण निर्धारित करण्यात आले आहेत. जुन्या पद्धतीप्रमाणेच भारतीय भाषेचा (३०० गुण) आणि अनिवार्य इंग्रजी (३०० गुण) हे भाषेचे दोन पात्रता पेपर नव्या पद्धतीत कायम ठेवण्यात आले आहेत. स्वाभाविकच या बदलांचा सर्वागीणपणे विचार करून आपली अभ्यासपद्धती निर्धारित करणे अत्यावश्यक आहे. या लेखमालेत नवा अभ्यासक्रम, त्यासाठी वाचावयाचे संदर्भ ग्रंथ, अभ्यासाची पद्धत या महत्त्वपूर्ण बाबींविषयी चर्चा करणार आहोत.
आयोगाने जाहीर केलेला नवा आराखडा जाणून घेऊयात. मुख्य परीक्षेतील पहिला पेपर अर्थात विषय म्हणजे निबंधाचा पेपर होय. आयोगाने यास २५० गुण निर्धारित केले आहेत. एका बाजूला वैकल्पिक विषयाचे कमी झालेले महत्त्व आणि दुसरीकडे सामान्य अध्ययनाची वाढलेली व्याप्ती या पाश्र्वभूमीवर निबंधाचा पेपर कळीचा ठरतो. या विषयाची सातत्यपूर्ण तयारी करताना मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे अवलोकन करून आयोगाने आतापर्यंत विचारलेले निबंधाचे विविध विषय लक्षात घ्यावेत. त्यानंतर अभ्यासाच्या सोयीसाठी प्रस्तुत विषयाचे चार ते पाच प्रमुख शीर्षकाखाली व्यापक वर्गीकरण करावे. उदा. लोकशाही, जागतिकीकरण, स्त्रियांचे समाजातील स्थान, आंतरराष्ट्रीय राजकारण, पर्यावरण इ. व्यापक वर्गीकरण केल्यानंतर संबंधित मुद्दय़ांविषयी विविध मतमतांतरे, वैचारिक भूमिका, उपाययोजना आणि भवितव्य या धर्तीवर विविधांगी माहितीचे संकलन करावे. त्यानंतर स्वत:च विषय तयार करून निबंध लिहून तपासून घ्यावा.
नव्या बदलातील दुसरा मध्यवर्ती घटक म्हणजे सामान्य अध्ययनाचे वाढलेले महत्त्व होय. त्यानुसार पेपर २ ते पेपर ५ हे सामान्य अध्ययनाचे नवे, सुधारित आणि विस्तारित विषय आहेत. म्हणजेच आता सामान्य अध्ययनाचे महत्त्व वाढले आहे. पूर्वी ६०० गुणांसाठी असलेला सामान्य अध्ययन हा विषय आता १००० गुणांचा करण्यात आला आहे. पेपर क्र. २ (सा.अ.१), ३ (सा.अ.२) आणि ४ (सा.अ.३) मध्ये अभ्यासक्रमाचा विस्तार करून आयोगाने चांगले पाऊल टाकले आहे, यात शंका नाही. आयोगाने पेपर क्र. ५ (सा.अ.४) हा एक नवा विषय मुख्य परीक्षेच्या रचनेत समाविष्ट केला आहे. केस स्टडीजच्या आधारे या विषयातील अभ्यास घटकांविषयींचे आकलन तपासले जाणार आहे. भारतीय राज्यघटना, राज्यघटनेतील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, न्याय, बंधु-भगिनीभाव, विविधता या मूल्यांचे भान, भारतीय समाजाची आकलन आणि लोकशाही व्यवस्थेत अपेक्षित लोकाभिमुखता या चौकटीच्या आधारेच विद्यार्थ्यांची नतिकता, सचोटी आणि कल तपासला जाणार आहे.
नव्या मुख्य परीक्षेसाठी आता दोनऐवजी एकच वैकल्पिक विषय निवडायचा आहे. आयोगाने दिलेल्या यादीपकी कोणत्याही शाखेतील पदवीधर कोणताही विषय वैकल्पिक विषय म्हणून निवडू शकतो. मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयाचे प्रत्येकी २५० गुणांचे दोन पेपर असतील. म्हणजेच, आता केवळ ५०० गुणांइतकेच वैकल्पिक विषयाचे महत्त्व शिल्लकराहिले आहे.  
बदललेल्या अभ्यासाची व्याप्ती लक्षात यावी यासाठी सामान्य अध्ययन १, २, ३ आणि ४ या प्रत्येक पेपरमधील अभ्यासक्रमाचे बारकाईने आकलन करणे अत्यावश्यक आहे. या आकलनाद्वारे संबंधित विषयात जुना पारंपरिक भाग कोणता? आणि नव्याने समाविष्ट केलेला भाग कोणता? हे लक्षात घ्यावे लागेल. सामान्य अध्ययनच्या प्रत्येक पेपरमध्ये समाविष्ट केलेला नवा अभ्यासक्रम अतिशय समकालीन स्वरूपाचा आहे. उदा. सा. अ. १ मधील स्त्री संघटनाची भूमिका, लोकसंख्या व संबंधित कळीचे मुद्दे; विकासात्मक मुद्दे; नागरीकरण, त्यासंबंधी समस्या आणि उपाययोजना हे घटक समकालीन संदर्भात अभ्यासायचे आहेत. सामान्य अध्ययन २मध्ये भारतातील घटनात्मक यंत्रणेची इतर देशातील घटनात्मक यंत्रणेशी करावयाची तुलना; विविध घटकांसाठी शासनाने राबवलेली धोरणे, केलेला विकासात्मक हस्तक्षेप, या दोन्हींची प्रारूपे आणि अंमलबजावणीतून निर्माण झालेले प्रश्न वा कळीचे मुद्दे; कारभारप्रक्रियेचे विविध आयाम, पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई- शासनाची उपयोजने, प्रारूपे, यशापयश, मर्यादा आणि संभाव्य क्षमता; नागरिकांची सनद, पारदर्शकता व उत्तरदायित्वाची हमी देण्यासाठी केलेल्या संस्थात्मक व इतर उपाययोजना; सनदी सेवकांची लोकशाहीतील भूमिका हे घटक स्पष्टपणे नमूद केले आहेत. त्याचप्रमाणे सामान्य अध्ययन ३मध्ये देखील विविध प्रकारच्या सिंचनप्रणाली व प्रकार; शेतमालाचे उत्पादन, साठवणूक, वहन व विपणन यातून निर्माण होणारे कळीचे मुद्दे; शेतीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या दिल्या जाणाऱ्या सवलतीतून निर्माण होणारे कळीचे मुद्दे, अन्नधान्याचा साठा आणि अन्नसुरक्षा इ. मुद्दे ठळकपणे नमूद केले आहेत. वस्तुत: उपरोक्त अभ्यास घटक त्या त्या विषयाच्या चालू घडामोडीत समाविष्ट होतातच, परंतु आयोगाने नव्या अभ्यासक्रमात या घटकांची ठळक व सविस्तर नोंद केल्यामुळे त्याचा पद्धतशीर अभ्यास करणे गरजेचे आहे.
एकंदर विचार करता, सामान्य अध्ययनाच्या उपरोक्त अभ्यासक्रमातून व त्यात समाविष्ट केलेल्या नव्या अभ्यासघटकातून आयोगाची सनदी सेवक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून असलेली अपेक्षा समजून घेता येते. यातून कायदे, धोरणांची चौकट; त्यासाठी निर्माण केलेल्या संस्था व यंत्रणा; त्यांच्याद्वारे झालेली अंमलबजावणी, अंमलबजावणीचे समाजावर झालेले परिणाम, त्यातून उद्भवलेल्या समस्या, ऐरणीवर आलेले कळीचे मुद्दे आणि संभाव्य उपाययोजना या सर्व बाबींचे विद्यार्थ्यांना भान असले पाहिजे हेच जणू आयोगाला सांगायचे आहे. म्हणून परीक्षार्थीनी सामान्य अध्ययनातील कोणत्याही घटकांचा अभ्यास करताना संबंधित समस्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम याबरोबरच त्यासाठी शासकीय, बिगरशासकीय यंत्रणांनी केलेले कायद्यात्मक-धोरणात्मक उपाय, त्यांची अंमलबजावणी, त्यातून निर्माण झालेले प्रश्न आणि संभाव्य उपाययोजना अशी व्यापक चौकट करून सविस्तर अभ्यास करावा. जागतिकीकरण, पर्यावरणीय ऱ्हास, अनियंत्रित नागरीकरण, जमातवाद-दहशतवाद यासारख्या घटकांचा एकंदर भारतीय समाजावर आणि त्यांतील भिन्न घटकांवरील परिणाम अभ्यासक्रमात अंतर्भूत केला आहे.                            

मुख्य परीक्षेचा नवा आराखडा
पात्रता पेपर  
पेपर अ – भारतीय भाषा  – ३०० गुण
पेपर ब –     अनिवार्य इंग्रजी – ३०० गुण
गुणानुक्रमासाठी ग्राह्य़ धरले जाणारे अनिवार्य विषय
पेपर १ –     निबंध (२५० गुण)
पेपर २ –    भारतीय वारसा, संस्कृती इतिहास आणि भारत
व जगाचा भूगोल (२५० गुण)
पेपर ३ –    कारभार प्रक्रिया, राज्यघटना, राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध (२५० गुण)
पेपर ४ –    अर्थव्यवस्था, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान
(२५० गुण)
पेपर ५ –    नतिकता, निष्ठा व कल/ दृष्टिकोन (२५० गुण)
पेपर ६ –    वैकल्पिक विषय पेपर क्रमांक १
पेपर ७ –    वैकल्पिक विषय पेपर क्रमांक २

Story img Loader