एम. बी. ए.च्या प्रथम वर्षांला जे वेगवेगळे अनिवार्य असतात, त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे ‘मॅनेजमेंट अकौंटिंग.’ व्यवस्थापक म्हणून विविध कामे पार पाडताना ज्या विषयांची गरज भासते, त्यापैकी हा एक विषय. या विषयाला ‘अकौंटिंग फॉर बिझनेस डिसिजन्स’ किंवा ‘बिझनेस अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अकौंटिंग’ अशी वेगवेगळी नावे असली तरी साधारणपणे अभ्यासक्रम सारखाच असतो. एम. बी. ए.ला प्रवेश घेणाऱ्यांपैकी कॉमर्स किंवा बी.बी.ए. या दोन अभ्यासक्रमांव्यतिरिक्त म्हणजेच इंजिनीअरिंग, सायन्स, आर्ट्स, अ‍ॅग्रिकल्चरल, फार्मसी, इ. विषयांतील पदवीधर विद्यार्थ्यांना हा विषय अवघड वाटतो. पण विषयाच्या संबंधित मूलभूत संकल्पना समजून घेतल्या आणि योग्य सराव केला तर या विषयामध्ये उत्तम गुण संपादन करता येतात. मात्र या विषयात किंवा इतर कोणत्याही विषयात केवळ चांगले गुण मिळवणे हे उद्दिष्ट न ठेवता, तो विषय मुळापासून समजून घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने या विषयाकडे पाहिले पाहिजे.
कोणत्याही विभागाच्या व्यवस्थापकाला मॅनेजमेंट अकौंटिंगची माहिती असायला हवी. विपणन (मार्केटिंग), मनुष्यबळ विकास (मॅनपॉवर डेव्हलपमेंट), उत्पादन (प्रॉडक्शन) तसेच इतर विभागातील व्यवस्थापकांना अकौंटिंगच्या संकल्पनांची गरज भासते. मॅनेजमेंट अकौंटिंग या अकौंटिंग पद्धतीचा मुख्य उद्देश हा व्यवस्थापनाचे काम अधिक कार्यक्षमतेने चालवण्यासाठी मदत करणे, हा असतो. ही मदत वेगवेगळ्या पद्धतींनी केली जाते. वेगवेगळ्या प्रकारची माहिती जमा करणे, त्या माहितीचे विश्लेषण करणे, या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यासाठी योग्य ती माहिती पुरवणे, धोरणनिश्चिती करण्यासाठी आवश्यक माहिती पुरवणे इ. अनेक मार्गानी व्यवसाय योग्य प्रकारे चालवण्यास मदत होते. मॅनेजमेंट अकौंटिंगमध्ये फायनान्शियल अकौंटिंग आणि कॉस्ट अकौंटिंग या दोन्ही महत्त्वाच्या शाखांचा उपयोग करून वेगवेगळी माहिती गोळा केली जाते.
यापैकी फायनान्शियल अकौंटिंगचा विचार केल्यास, नफा-तोटा पत्रक (प्रॉफिट अ‍ॅण्ड लॉस अकौंट) व ताळेबंद (बॅलन्स शीट) तयार कसा करावा याचा समावेश अभ्यासक्रमात केलेला असतो. ही दोन्ही पत्रके तयार करण्यासाठी फायनान्शियल अकौंटिंगची मूलभूत तत्त्वे समजावून घ्यावी लागतात. त्यासाठी अगदी मूलभूत म्हणजे डेबिट आणि क्रेडिट कसे दिले जाते, यापासून सुरुवात करायला हवी. या पायावरच फायनान्शियल अकौंटिंग आधारलेले आहे. हा पाया अधिकाधिक पक्का केला पाहिजे. बऱ्याच वेळा हा पाया कच्चा राहतो आणि त्यामुळे पुढे विषय समजण्यास अवघड जातो. या बाबतीत अनुभव असा आहे की, अनेक कॉमर्स पदवीधरांचासुद्धा अकौंटिंग विषयाचा पाया कच्चा राहिलेला असतो. म्हणून एम.बी.ए.ला प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षी या विषयाचा अभ्यास करताना पुन्हा एकदा मूलभूत तत्त्वे समजावून घेतली पाहिजेत. नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद यावरून व्यवसायाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येते. आर्थिक परिस्थितीचे अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण करण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे ‘रेशिओ अ‍ॅनलेसिस’. हा भाग काही विद्यापीठांच्या या विषयाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला आहे. ‘रेशिओ अ‍ॅनलेसिस’मध्ये नफा-तोटा पत्रक व ताळेबंद यामधील आकडेवारीवरून वेगवेगळ्या प्रकारचे ‘रेशिओज’ काढले जातात व त्यावरून आर्थिक परिस्थितीसंबंधी निष्कर्ष काढले जातात. मात्र चांगल्या प्रकारे विश्लेषण करण्यासाठी किमान तीन-पाच वर्षांचे नफा-तोटा पत्रक व ताळेबंद अभ्यासायला हवेत. फायनान्शिअल अकौंटिंगचा दैनंदिन व्यवहारामध्ये मोठय़ा प्रमाणावर उपयोग होतो, तसेच व्यवस्थापकाच्या कामामध्ये या विषयाचे खूप महत्त्व आहे. व्यवस्थापकाला नफा-तोटा पत्रक व ताळेबंद हे समजायला हवेत, म्हणजेच ते वाचता यायला हवे आणि त्यांचे विश्लेषण करता यायला हवे. या दृष्टीनेच मॅनेजमेंट अकौंटिंग विषयामध्ये, फायनान्शियल अकौंटिंगच्या काही भागांचा समावेश करण्यात आला आहे.
मॅनेजमेंट अकौंटिंगमधील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे कॉस्ट अकौंटन्सी. कॉस्ट अकौंटन्सीमधील मूळ तत्त्व म्हणजे वस्तू अगर सेवा यांचे उत्पादनमूल्य शास्त्रीय पद्धतीने काढणे, त्यावर नियंत्रण करणे तसेच ते कमी करणे (कॉस्ट रिडक्शन) आणि त्याचप्रमाणे व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी योग्य ती माहिती पुरवणे. कॉस्ट अकौंटन्सीची सुरुवात वस्तू अगर सेवा यांचे उत्पादनमूल्य काढण्यापासून होते. त्यासाठी अभ्यासक्रमामध्ये उत्पादनमूल्य काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉस्ट शीटचा समावेश केलेला असतो. या कॉस्ट शीटद्वारे वस्तूची किंवा सेवेची कॉस्ट काढणे शक्य होते. अर्थात वस्तू आणि सेवा यांची कॉस्ट काढण्याची पद्धत ही सारखीच असली तर त्यामध्ये येणारे कॉस्टचे प्रकार (एलिमेंट्स) हे वेगवेगळे असतात.
कॉस्ट अकौंटन्सीमध्ये येणारा एक प्रमुख भाग म्हणजे उत्पादनखर्चाचे वर्गीकरण. याद्वारे उत्पादनखर्चाचे वर्गीकरण कसे करावे व कसे केले जाते यासंबंधीची माहिती मिळते. तसेच स्थिर खर्च (फिक्स्ड कॉस्ट), बदलता खर्च (व्हेरिअेबल कॉस्ट) व अंशत: स्थिर खर्च (सेमीव्हेरिएबल कॉस्ट) या संकल्पना तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्च यातील फरक, खर्चाचे वेगवेगळ्या घटकांमध्ये (एलिमेंट) वर्गीकरण- उदा. कच्च्या मालावरील खर्च, मजुरीवरील खर्च, तसेच कच्चा माल व मजुरी याव्यतिरिक्त असलेले खर्च यांसारख्या वर्गीकरणाची माहिती होते. असे वर्गीकरण का आवश्यक आहे आणि त्याचा उपयोग व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी कसा होतो याचीही माहिती करून घ्यायला हवी.
यानंतर उत्पादनखर्चाच्या प्रत्येक घटकाचे (एलिमेंट) खुलासेवार स्पष्टीकरण अभ्यासक्रमामध्ये दिसते. कच्च्या मालाचा (मटेरिअल) विचार केल्यास या मालाच्या खरेदीपासून त्याचा प्रत्यक्ष उत्पादनामध्ये वापर या प्रवासातील विविध टप्पे याचा अभ्यास करण्याची संधी मिळते, त्याचप्रमाणे मजुरीवरील खर्च (लेबर कॉस्ट) आणि इतर अप्रत्यक्ष खर्च (ओव्हरहेड्स) या सर्व खर्चाची मोजणी करून (कॅलक्युलेशन्स) त्यांचा समावेश शेवटी वस्तूच्या उत्पादनखर्चात कसा होतो याचीही माहिती मिळते. या तिन्ही घटकांचा अभ्यास करताना लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे उत्पादनखर्च कमीतकमी करण्यासाठी कच्चा माल, मजुरी आणि इतर खर्च यावर नियंत्रण कसे करावे व त्यामध्ये कपात कशी करावी हे समजून घेणे. या दृष्टीने खरेदी करण्याची पद्धत, तसेच मालाची साठवण (स्टोअरेज) योग्य पद्धतीने व्हावी म्हणून वापरली जाणारी वेगवेगळी तंत्रे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वान्टिटी, मजुरीचा खर्च नियंत्रित करण्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठीची तंत्रे या सर्व संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. उदा. अभ्यासक्रमातील कच्च्या मालाची खरेदी करण्याची पद्धत (पर्चेस प्रोसिजर) हे नुसतेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून न वाचता, त्याचा उपयोग खरेदीवरील खर्च कमी करून, खरेदी करण्याच्या मालाची गुणवत्ता कशी वाढवावी या दृष्टीने केला पाहिजे. याचाच अर्थ असा की, केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दृष्टिकोन न ठेवता या वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात कशा पद्धतीने वापरल्या जातात, हे समजून घेणे जरुरीचे आहे.
मॅनेजमेंट अकौंटिंगमधील यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे वेगवेगळी तंत्रे वापरून व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी योग्य ती माहिती पुरवणे. यासाठी प्रामुख्याने मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग आणि बजेट व बजेटरी कंट्रोल या तंत्रांचा वापर केला जातो. व्यवस्थापनापुढे एखादा प्रश्न असेल, उदा. एखाद्या वस्तूचे उत्पादन कमी करायचे की बंदच करायचे याचा निर्णय घ्यायचा असेल तर हा निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवणे हे मार्जिनल कॉस्टिंग टेक्निकद्वारा शक्य होते. याचबरोबर वस्तूंच्या किमतीविषयक निर्णय घेणे, एकापेक्षा अधिक वस्तूंचे उत्पादन करीत असल्यास उत्पादनांचे प्रमाण (प्रत्येक वस्तूचे उत्पादन किती करावे म्हणजेच प्रॉडक्शन मिक्स) ठरवणे, वस्तूला निर्यातीसंबंधीची मागणी आली असल्यास तिची किंमत ठरवणे आणि अनेक प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी योग्य ती महिती मार्जिनल कॉस्टिंग या तंत्राद्वारे पुरवली जाते. याशिवाय ना नफा ना तोटा या संकल्पनेचा (ब्रेक इव्हन पॉइंट) वापर कसा करावा, याचीही माहिती मिळते.
स्टँडर्ड कॉस्टिंग या तंत्रामध्ये खर्चाच्या प्रत्येक घटकासाठी म्हणजे कच्चा माल (मटेरिअल), मजुरी (लेबर) आणि अप्रत्यक्ष खर्च (ओव्हरहेड्स) यासाठी मानके म्हणजेच स्टँडर्ड्स ठरवली जातात. या घटकांवर प्रत्यक्षात झालेल्या खर्चाची तुलना स्टँडर्डशी केली जाते व दोन्हींमधला फरक (डेव्हिएशन) काढला जातो. या फरकाची कारणे शोधली जातात व प्रत्यक्ष खर्च स्टँडर्डपेक्षा अधिक असल्यास त्याचे विश्लेषण करून कारणे शोधली जातात. जर प्रत्यक्ष खर्च हा स्टँडर्डपेक्षा कमी असेल तरीही या फरकाची कारणे शोधली जातात. स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये प्रत्यक्ष आणि स्टँडर्ड यातील फरक शोधण्यासाठी वेगवेगळी सूत्रे (फॉम्र्युले) वापरली जातात व त्यामुळेच कदाचित हा विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. पण मूळ कल्पना समजावून घेतल्यास व तिचा व्यवहारातील उपयोग लक्षात घेतल्यानंतर यामध्ये कठीण काही नाही हे लक्षात येईल. विक्री व नफा यासंबंधीचीही स्टँडर्ड्स ठरवली जातात.
बजेट आणि बजेटरी कंट्रोल या तंत्रामध्ये बजेट म्हणजेच अंदाजपत्रकाचे वेगवेगळे प्रकार व हे अंदाजपत्रक कसे तयार करावे याची माहिती मिळते. अंदाजपत्रकाची कल्पना ही तशी नवीन नाही. अंदाजपत्रकाविषयी ढोबळमानाने माहिती सर्वानाच असते. व्यवसायामध्ये विक्री, खरेदी, उत्पादन, भांडवली खर्च, मनुष्यबळ, वेगवेगळे खर्च आदी अनेक विभागांसाठी अंदाजपत्रक करावे लागते. केलेले अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष परिस्थिती याची तुलना करून दोन्हीमधला फरक काढला जातो. उदा. विक्रीचे अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष विक्री यांची तुलना करून त्यामधील फरक काढला जातो. त्यानंतर योग्य ते निर्णय घेणे शक्य होते. रोख रकमेविषयी अंदाजपत्रक (कॅश बजेट) याच पद्धतीने उपयुक्त ठरते.
मॅनेजमेंट अकौंटिंगमध्ये ढोबळमानाने वरील वेगवेगळ्या घटकांचा समावेश असतो. याचा अभ्यास करताना थिअरीबरोबरच प्रत्यक्ष उदाहरणे सोडवण्याचा सराव करणे गरजेचे आहे. तसेच मॅनेजमेंट अकौंटिंगमधील बदलते प्रश्नही लक्षात घेतले पाहिजेत. या विषयाचा नियमित अभ्यास व सराव यामुळे हा विषय अवघड वाटणार नाही. 
nmvechalekar@yahoo.co.in

Story img Loader