द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख-

ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड या राज्याची राजधानी असलेल्या ब्रिस्बेन या शहरामध्ये स्थित असलेले ‘द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड (यूक्यू)’ हे त्या देशातील राष्ट्रीय शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचा सेंट ल्युसिया येथे मुख्य कॅम्पस आहे. इतर बरेचसे कॅम्पस क्वीन्सलँड राज्यामध्ये ठिकठिकाणी आहेत. याशिवाय परदेशी कॅम्पसमध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन आणि लुइसियाना येथील दोन कॅम्पसचा समावेश होतो. विद्यापीठाचा २०१९च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीत अठ्ठेचाळीसवा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना १९०९ साली झालेली आहे. ‘बाय मीन्स ऑफ नॉलेज अ‍ॅण्ड हार्ड वर्क’ हे क्वीन्सलँड विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. क्वीन्सलँड विद्यापीठाचा कॅम्पस साडेतीन हजार एकरांपेक्षाही अधिक क्षेत्रफळ असलेल्या परिसरामध्ये स्थित आहे. जवळपास तीन हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य या विद्यापीठामध्ये करत असून ५० हजारांहून अधिक पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. यांमध्ये १३४ देशांमधून आलेल्या जवळपास २० हजार आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. क्वीन्सलँड विद्यापीठामध्ये सहा प्रमुख शैक्षणिक विभाग असून आठ संशोधन संस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.

अभ्यासक्रम-

क्वीन्सलँड विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर या दोन्ही स्तरांवरील अभ्यासक्रम हे संशोधन अभ्यासक्रम आहेत. या दोन्ही स्तरांवर विद्यापीठात ‘बिझनेस, इकोनॉमिक्स अ‍ॅण्ड लॉ’, ‘इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर अ‍ॅण्ड इन्फॉम्रेशन टेक्नोलॉजी’, ‘हेल्थ अ‍ॅण्ड बिहेवेअरल सायन्सेस’, ‘ह्य़ुमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस,’ ‘मेडिसिन’ आणि सायन्सेस असे एकूण सहा शैक्षणिक विभाग कार्यरत आहेत. हे सहा विभाग सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. या विद्यापीठातील बहुतांश पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम मात्र वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. याशिवाय विद्यापीठ डॉक्टरल अभ्यासक्रम व प्रोफेशनल ग्रॅज्युएट डिग्रीज यांसारखे पर्यायही उपलब्ध करून देत आहे. क्वीन्सलँडमधील सर्व शैक्षणिक विभागांकडून उपलब्ध केल्या गेलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने नॅचरल सायन्सेस, अ‍ॅग्रीकल्चर अ‍ॅण्ड लाइफ सायन्सेस, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशन, ह्युमन इकॉलॉजी, लिबरल स्टडीज, मेडिसिन, म्युझिक, डान्स, नìसग, फार्मसी आणि व्हेटर्नरी मेडिसिन, बिझनेस, एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, कन्व्‍‌र्हजस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी, डेंटीस्ट्री, इंजिनीअरिंग प्रॅक्टिस, इंटरनॅशनल अ‍ॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, पब्लिक अफेअर्स, लॉ, पब्लिक हेल्थ हे अभ्यासक्रम आहेत.

सुविधा-

क्वीन्सलँड विद्यापीठात ११ निवासी महाविद्यालये आहेत. यांपैकी दहा महाविद्यालये ही विद्यापीठाच्या सेंट ल्युसिया या मुख्य कॅम्पसमध्ये स्थित आहेत. प्रथम वर्षांत प्रवेश घेतलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास सर्व विद्यार्थी हे कॅम्पसमधील वसतिगृहांमध्ये राहतात. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आर्थिक मदत केली जाते. विद्यापीठाचे ग्रंथालय हे देशातील सर्वात मोठे ग्रंथालय असून त्यामध्ये जवळपास तीन दशलक्ष पुस्तके आहेत. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्स आणि नोकरीविषयक मार्गदर्शन विद्यापीठाकडून स्वतंत्र विभागाकडून केले जाते. संशोधनामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पांमध्ये सामावून घेतले जाते. याशिवाय अन्य विद्यापीठांप्रमाणे या विद्यापीठातही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, पाठय़वृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बँक, पोस्ट ऑफिस, रुग्णालय, खरेदीसाठी  सुविधा, वैयक्तिक किंवा गट समुपदेशनासाठी विद्यापीठाचे समुपदेशन केंद्र, कॅफे आणि खाद्यपदार्थाच्या अद्ययावत सोयी उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले २२०क्लब्स आणि सोसायटीज आहेत. विद्यापीठाचा कॅम्पस सुरक्षित असून २४ तास सुरक्षारक्षक कॅम्पसमध्ये सतर्कतेने कार्यरत असतात.

क्वीन्सलँड विद्यापीठ हे जगातल्या पहिल्या पन्नास विद्यापीठांपैकी एक आहे. विद्यापीठातील संशोधनाचा एकूण दर्जा अतिशय उत्तम आहे. पीएचडी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमातील संशोधन करत असताना मार्गदर्शकांची भरपूर मदत मिळते.  पीएचडी हा संशोधन अभ्यासक्रम असल्यामुळे प्रचंड मेहनत घेणे आवश्यक असते. भारतीय विद्यापीठांमध्ये शोधनिबंध प्रकाशित करणे ही अत्यंत वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे. इथे मात्र हे सहज होऊन जाते आणि मुख्य म्हणजे येथील प्राध्यापक-शास्त्रज्ञ किंवा तुमचे मार्गदर्शक यासाठी तुम्हाला प्रेरित करतात.

-अभिजित सुरवसे, पीएचडी, जैवतंत्रज्ञान, क्वीन्सलँड विद्यापीठ.  

वैशिष्टय़

हे विद्यापीठ ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठे संशोधन विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच देशातील आठ प्रमुख संशोधन संस्था आहेत. ‘ऑस्ट्रेलियन रिसर्च कौन्सिल’ या त्या देशातील संशोधन व्यवस्थापन करणाऱ्या सर्वोच्च संस्थेने या विद्यापीठास ‘ऑस्ट्रेलियन लॉरेट फेलोशिप्स’ या प्रतिष्ठेच्या २७ पाठय़वृत्ती बहाल केल्या आहेत. जो आकडा सर्वाधिक आहे.

संकेतस्थळ  https://www.uq.edu.au/

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Programs and courses in university of queensland australia zws