स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

परीक्षेत आपण काय दिवे लावले ते थेट सांगणाऱ्या प्रगतीपुस्तकाची बहुतेक सगळ्यांनाच भीती असते. पण वैशाली गेडाम या प्रयोगशील शिक्षिकेने तयार केलेले प्रगतीपुस्तक मात्र रंगीत आणि हसरे आहे. या बोलक्या प्रगतीपुस्तकाविषयी आणि वैशालीच्या इतर प्रयोगांविषयी.

गेली २१ वर्षे वैशाली गेडाम जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. सध्या त्या चंद्रपूर जिल्ह्य़ांतल्या जिवती तालुक्यातल्या गोडगुंडा (धोंडा) या गावातल्या शाळेत कार्यरत आहेत.

त्यांची पहिली नेमणूक झाली १९९७ साली चंद्रपूर जिल्ह्य़ातील मारडा मोठा या शाळेत. त्यांना पाचवी-सातवीचे वर्ग मिळाले होते. पण त्यातल्या अनेक विद्यार्थ्यांना साधी अंक-अक्षरओळख नव्हती. या समस्येचा शोध घेताना वैशालींना वाटले, यासाठी मुळापासून म्हणजे अगदी पहिलीपासून प्रयत्न करायला हवेत. त्यांनी पहिलीचा वर्ग मागितला. पण त्या उच्चशिक्षित असल्याने त्यांनी वरचे वर्ग घ्यावेत असे सुचवण्यात आले. शेवटी बऱ्याच पाठपुराव्यानंतर वैशालींना २००५ साली पहिलीचा वर्ग मिळाला. याचदरम्यान त्यांच्या शाळेत केंद्रशाळेचे वाचनालय झाले. त्यातील पुस्तक निवडीची जबाबदारीही वैशालींवर आली. त्याचा फायदा करून घेत त्यांनी शिक्षणाशी संबंधित अनेक उत्तम पुस्तके मागवली. त्यातले प्रयोग करून पाहण्याचा निर्धारही केला. वैशालींना २००५ मध्ये पहिलीचा वर्ग मिळाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांनी पहिलीला येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेटी घेतल्या. वर्ग छान सजवला. अभ्यासक्रमाची सुंदर आखणी केली. याचा परिपाक म्हणून जूनमध्ये शाळा उघडल्यावर गावातले पहिलीच्या वयाचे सर्वच्या सर्व विद्यार्थी त्यांच्या शाळेत आले. पहिल्याच दिवशी ही मुले खूप बोलू लागली. हसू लागली. वैशालींना कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. पण हा आनंद थोडेच दिवस टिकला. कारण वैशालींनी केलेले अभ्यासाचे नियोजन मुले उडवून लावायची. पहिलीतली ती मुले त्यांना हव्या त्या वेळी खेळायची, गाणी म्हणायची. कधीकधी तर अजिबात अभ्यास करायची नाही. आपण शिकवलेले यांना कळतच नाही म्हणजे आपलीच काही चूक होतेय की काय, अशी भीती वैशालींना वाटायची. पण म्हणून त्यांनी कधीच आपले म्हणणे मुलांवर लादले नाही. उलट मुलांच्या जास्तीतजास्त कलेने घ्यायला सुरुवात केली. याचा सकारात्मक परिणाम दिसला. मुले हळूहळू स्वत:च अभ्यासक्रमाकडे वळली. पुढे याच विद्यार्थ्यांचा चौथीपर्यंतचा वर्ग वैशालींनी घेतला. या विद्यार्थ्यांसोबत वैशाली रोज नवनवे शैक्षणिक प्रयोग करत होत्या. त्यांच्यासोबत नव्याने शिकत होत्या. त्याच्या नोंदी करत होत्या, त्यांच्या अवलोकनातून, चिंतनातून स्वत:चेच परीक्षण करत होत्या. याच दरम्यानचा एक प्रयोग म्हणजे कलेच्या माध्यमातून शिकणे. वैशाली म्हणतात, ‘‘माझ्या वर्गात विद्यार्थी कधीही मुळाक्षरे गिरवून सुरुवात करत नाही. त्याऐवजी मी चित्रांना, कलेला प्राधान्य देते. वर्गात रंग, कागद, ब्रश कायम उपलब्ध असते व कला, कार्यानुभव, खेळांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांना मी भाषा, गणित, विज्ञान या विषयांकडे नेते.’’

याच विद्यार्थ्यांसोबत वैशालींनी त्यांचा प्रगतीपुस्तकांचा महत्त्वाचा प्रयोग केला. विद्यार्थ्यांचा अभ्यास करताना वैशालींच्या लक्षात आले की, शाळेत बाकीच्या वेळी खूश असणारी मुले परीक्षा आल्यावर मात्र हिरमुसायची. परीक्षा आणि प्रगतीपुस्तक या दोन गोष्टींची जणू काही धास्तीच घेतली होती. यावर उपाय म्हणून वैशालींनी एक नव्या पद्धतीचे प्रगतीपुस्तक तयार केले. हे साल होते साधारण २००९-१०. हल्ली विद्यार्थ्यांची सर्वागीण प्रगती सांगणारी प्रगतीपुस्तके आहेत. पण त्या वेळी चंद्रपूर जिल्ह्य़ातल्या एका खेडेगावातल्या शाळेतले असे प्रगतीपुस्तक ही नक्कीच एक विशेष गोष्ट होती. या प्रगतीपुस्तकात विद्यार्थ्यांचे परीक्षेतले गुण नसत तर त्यांच्या स्वभावातल्या गुणांची नोंद असे. उदा. एखाद्या कृष्णासाठी त्या लिहीत, ‘तुला वर्गात बसायला आवडत नाही पण बाहेरच्या निसर्गाची मात्र छान माहिती आहे तुला.’ एखाद्या साक्षीला त्या म्हणत, ‘शाळेच्या सुरुवातीला तू नुसती रडायचीस आता मात्र माझ्याशी छान गप्पा मारतेस, माझी, शाळेची वाट पाहतेस ते मला फार आवडतं.’ आपल्या बाईंनी आपल्या गुणांबद्दल लिहिलेले हे सकारात्मक बोलके प्रगतीपुस्तक विद्यार्थ्यांनाही खूप आवडले. या प्रयोगाची दखल शिक्षणविभाग, जिल्हा पातळीवरील शिक्षक, अधिकारी यांनी आवर्जून घेतली.

शाळेसोबतच मारडा मोठा या गावातही वैशालींनी खूप काम केले. गावातली अस्वच्छता, वाईट सवयी, व्यसने बदलण्यासाठी त्यांनी गावात अनेक उपक्रम, कार्यक्रम घेतले. त्याचा एक भाग म्हणून संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ‘ग्रामगीता’ वाचायची ठरवली. यासाठी त्या पहाटे तीनला उठायच्या. घरचे स्वयंपाकपाणी आवरून पाच वाजता बाहेर पडायच्या. सहा वाजता गावात पोहोचून एका चौकात ग्रामगीतेच्या ओळी वाचायच्या आणि त्याचे निरूपण सांगायच्या. तब्बल २० महिने त्यांनी सलग हे वाचन केले. सुरुवातीला लोकांनी उत्साह दाखवला पण हळूहळू तो मावळला. काहीवेळा लोक घराच्याच पायऱ्यांवर बसून ऐकत. काहीवेळा बरेच जण ऐकत तर काहीवेळा समोर एखाद-दुसरीच व्यक्ती असे. पण त्या कंटाळल्या नाहीत. वैशाली म्हणतात, ‘‘ग्रामगीता वाचनाचे एक व्रतच मी केले. त्यातून गावालाही बरेच काही मिळाले आणि मला आंतरिक समाधान. या गीतेच्या आकलनातून हळूहळू गावकऱ्यांना आपल्यातल्या उणिवा जाणवत गेल्या. स्वच्छता, सुधारणा, विकास याचे महत्त्व उमगले.’’ ग्रामगीता वाचनानंतर वैशाली ७ ते ८ या वेळात गावात फिरते वाचनालय चालवायच्या. मुलांसाठी योगासनाचे वर्ग घ्यायच्या, नंतर नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी खास वर्ग घ्यायच्या आणि मग १० वाजता शाळा सुरू. शाळा झाल्यावरसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी खास वर्ग घेत असत. त्यामुळे या शाळेतले बरेच विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवडले गेले. वैशाली जिथे ग्रामगीता वाचन करायच्या त्या चौकातली जागा गावकऱ्यांनी नुकतीच खरेदी केली आहे. तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळाचे काम सुरू केले आहे. चांगले उपक्रम हाती घेतले आहेत.

त्यांची पुढची शाळा होती, छोटा नागपूरची. या शाळेत जायच्या वेळी त्यांचे मारडा मोठा गावातील ‘ग्रामगीता’ वाचनाचे काम सुरूच होते. त्यामुळे त्या आधी मारडा गावात जायच्या. तिथे ग्रामगीता वाचून, नवोदयसाठी विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन मग छोटा नागपूरच्या शाळेत जायच्या. या शाळेतही वैशालींनी नेहमीप्रमाणेच अनेक उपक्रम राबवले. त्यानंतर त्यांची मसाळा तुकुम या शाळेत बदली झाली. सध्या त्या जिवती तालुक्यातील गोडगुंडा (धोंडा) या शाळेत कार्यरत आहेत. शाळेच्या अनुभवांवरून, परीक्षा, निकाल, ‘प्रगतीपुस्तकांच्या प्रयोगावरून वैशालींनी माझे प्रगतीपुस्तक-शोध शांतीचा’ हे पुस्तक लिहिले आहे.

केवळ शैक्षणिक वर्षच नव्हे तर संपूर्ण वर्षभर म्हणजे ३६५ दिवस शिकवण्याचा एक प्रयोगही वैशालींनी केला. यादरम्यान वर्गातल्या घडामोडींची, प्रयोगांची, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाची टिपणे काढणे सुरूच होते. त्यातून वैशालींना लक्षात आले की, फक्त शाळेतले ३६५ दिवस शिकणे नव्हे तर विद्यार्थ्यांनी बाकीचेही अनुभवशिक्षण घ्यायला हवे. जत्रेला, कार्यक्रमांना जायला हवे. व्यावहारिक जगाचे शिक्षण घ्यायला हवे. त्यामुळे मग त्यांनी पुन्हा आपल्या अध्यापनाची दिशा बदलली. आता वैशालीचे विद्यार्थी ‘तोत्तोचान’च्या शाळेप्रमाणेच वर्गात शिकता शिकता मध्येच बाहेर फेरफटका मारायला निघतात. शाळेशेजारच्या शेतात बसून झाडांचा अभ्यास करतात. बाजारात जाऊन व्यवहारज्ञानाचे धडे घेतात. प्रत्यक्ष प्रयोग करून गोष्टी शिकतात आणि मॅडमशी संवाद साधून संकल्पना समजून घेतात.

आता वैशालींनी विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक लिहिण्याऐवजी ते स्वत:च या अनुभवातूंन बरेच काही शिकतात. कळत नकळत आपले प्रगतीपुस्तक या जीवनशिक्षणाच्या माध्यमातून लिहीत असतात. वैशालींसाठी हीच खरी कामाची पावती आहे.

Story img Loader