मानसशास्त्र विषयाचे पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रम, हे अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या शिक्षणसंस्था आणि त्यातील करिअर संधींचा सविस्तर परिचय-
एखादी तरल भावकविता लिहिणाऱ्या कवींपासून थेट विज्ञानाच्या संशोधकांपर्यंत, प्रत्येकासाठी, अदृश्य मानवी मन हा कायमच कुतूहलाचा विषय राहिला आहे. मानवी मनाचा आणि मानवी वर्तणुकीचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून केलेला शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र (सायकॉलॉजी).
खरे पाहता मानसशास्त्राच्या अभ्यासाचा उगम ग्रीक संस्कृतीत सापडतो. साधारण एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मानसशास्त्र हा तत्त्वज्ञान शास्त्राचाच एक भाग मानला जात असे. भारतात १९१६ साली सर्वप्रथम कोलकाता विद्यापीठात ‘एक्स्पिरिमेंटल सायकॉलॉजी’ या अभ्यासविषयाचा अंतर्भाव करण्यात आला.
जागतिकीकरण, झपाटय़ाने होणारे शहरीकरण, आरोग्य सेवा उद्योगात होत असलेली जागतिक वाढ, मानवी आरोग्याबद्दलची वाढती जागरूकता, वाढते वैयक्तिक आणि सामाजिक ताणतणाव, वाढती गुन्हेगारी या सर्व घटकांचा
विचार केल्यास मानसशास्त्राच्या अभ्यासकांना काम करायला मोठा वाव आहे, हे सुस्पष्ट आहे.
मानसशास्त्राच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मानवी भावनांचा आणि त्यांच्या वर्तणुकीचा अर्थ लावण्याची मनापासून आवड, संवेदनशीलता, तारतम्य, सतत निरीक्षणे घेण्याची आणि त्यातून निष्कर्षांप्रत पोहोचण्याची चिकाटी आणि संयम, मेहनत या गोष्टी खूप आवश्यक ठरतात. बहुतेकदा या कार्यक्षेत्रातील व्यक्ती, आरोग्य क्षेत्रातील अथवा समाजातील अन्य व्यावसायिकांच्या सहकार्याने काम करत असल्याने संघभावना आणि सामंजस्य हेही स्वभावात िबबवणे गरजेचे ठरते.
अनेक महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठ स्तरावर मानसशास्त्रातील विविध पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रम उपलब्ध असलेले दिसतात. सामान्यत: कोणत्याही अभ्यासशाखेतून १०+२ शिक्षण पूर्ण केल्यानंतर मानसशास्त्रातील पदवी शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. मानसशास्त्राचे उपयोजन व्यवसाय-उद्योगाच्या अनेक शाखांतून आणि विविध स्तरांतील समाज घटकांसाठी होताना दिसते. याचाच परिणाम म्हणून मानसशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षणात अनेक अभ्यासशाखा समाविष्ट झालेल्या दिसून येतात.
क्लिनिकल सायकॉलॉजी- या प्रकारातील तज्ज्ञ रुग्णालये, आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी काम करतात. भावनिकदृष्टय़ा दुर्बल, मनोरुग्ण किंवा प्रदीर्घ आजारामुळे त्रस्त रुग्णांवर उपचार करून त्यांच्या मनाला उभारी देण्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट करतात. रुग्णाच्या मानसिक समस्यांच्या मुळापर्यंत जाऊन त्यावर ते उपाय सुचवतात.
क्लिनिकल न्यूरो सायकॉलॉजी- मेंदूच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या मनोवस्था सांभाळणे किंवा तत्संबंधी अडचणी सोडवणे.
समुपदेशन मानसशास्त्र (कौन्सेिलग सायकॉलॉजी) – या विषयाचे तज्ज्ञ समाजातील सर्व घटकांच्या (स्त्री, पुरुष, वृद्ध) कौटुंबिक किंवा नातेसंबंधांतील अडचणींवर समुपदेशन करतात.
शैक्षणिक मानसशास्त्र – शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना भेडसावणाऱ्या मानसिक समस्या तसेच पालक, पाल्य, शिक्षक यांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांचा अभ्यास करून मुलांच्या सक्षम, निकोप वाढीसाठी योग्य समुपदेशन करतात.
औद्योगिक मानसशास्त्र (इंडस्ट्रियल सायकॉलॉजी) – या शाखेतील तज्ज्ञ सरकारी, खासगी तसेच अन्य व्यवसायातील निगडित समस्यांचा अभ्यास करून कामगारांच्या कार्यपद्धतीत, मानसिकतेत सुधारणा घडवून आणत उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमतेत सुधार घडवतात.
क्रीडा मानसशास्त्र (स्पोर्ट्स सायकॉलॉजी) – या विषयातील तज्ज्ञ खेळाडूंच्या मनोवस्थेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी योग्य ती उपाययोजना करतात.
गुन्हे तपासासाठी मानसशास्त्र (क्रिमिनल सायकॉलॉजी) – गुन्हेगार, कैदी, आरोपी शोधण्यासाठी गुन्हा कोणत्या मानसिकतेतून घडला असेल हे शोधून काढत या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती गुन्हेतपासात योगदान देतात. गुन्हेगार किंवा गुन्ह्य़ाने पीडित व्यक्तींचे समुपदेशनही या अंतर्गत केले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा