प्रकल्पासाठी आवश्यक असलेली माहिती ही संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिळवता येते. यापूर्वीच्या भागामधून आपण सर्वेक्षण कसं करावं, याविषयी माहिती घेतली. सर्वेक्षण दोन प्रकारे केलं जातं. पहिला प्रकार म्हणजे क्षेत्रअभ्यास तर दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय.
प्रकल्पाच्या विषयाच्या संदर्भात समाजातल्या वेगवेगळ्या थरांतील अनेक व्यक्तींकडून जेव्हा माहिती मिळवायची असते, तेव्हा ती प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळवता येते. विशेषत: पारंपरिक ज्ञान आणि दैनंदिन जीवनात त्याचा केला जाणारा वापर याविषयी माहिती मिळवण्यासाठी ही पद्धत प्रभावीपणे वापरता येते.
आपल्या प्रकल्पाच्या विषयानुसार प्रश्नावली तयार करा. प्रश्नावली तयार करणं हे कौशल्याचं काम आहे. त्यामुळे प्रश्नावली तयार करताना विद्यार्थ्यांना शिक्षकाची किंवा एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची मदत घेणं आवश्यक ठरतं.
प्रश्नावली छापील स्वरूपात तयार केल्यास या प्रश्नावलीच्या छायांकित प्रती काढून त्या वेगवेगळ्या व्यक्तींना देता येतात आणि प्रश्नावलीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून भरून घेता येतात.
जे प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत ते मुलाखतीप्रमाणे त्याची तोंडी उत्तरेसुद्धा मिळवता येतात. ही उत्तरे अचूकपणे नोंदवणं मात्र आवश्यक ठरतं.
प्रश्नावली कशी असावी, प्रश्नावलीमध्ये किती प्रश्न विचारावे, या प्रश्नाचं स्वरूप कसं असावं, प्रश्नावली कोणाकडून आणि किती जणांकडून भरून घ्यायची, इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी ध्यानात घेणं आवश्यक ठरतं.
प्रश्नावली अशी तयार करा –
१. प्रश्नावली जर छापील स्वरूपात असेल तर प्रश्नावलीच्या सुरुवातीला तुमच्या प्रकल्पाचा विषय आणि तुमचे नाव लिहा. त्यानंतर प्रश्नावली भरून देणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, व्यवसाय इत्यादी माहितीसाठी नोंदविण्यासाठी जागा ठेवा. त्यानंतर प्रश्नांना सुरुवात करा. प्रश्नावलीच्या शेवटी ती भरून देणाऱ्या व्यक्तीची सही घ्या. जर प्रश्नावली भरून देणारी व्यक्ती आपली ओळख उघड करू इच्छित नसेल तर त्या व्यक्तीच्या विनंतीचा स्वीकार करा व व्यक्तीचे नाव, पत्ता आणि सही हे रकाने रिकामे ठेवा. ‘उत्तरं देणारी व्यक्ती आपली ओळख उघड करू इच्छित नाही’, असा शेरा प्रश्नावलीमध्ये लिहा.
२. प्रश्नावलीतील प्रश्न नेमक्या शब्दात विचारलेले असावेत.
३. एकाच प्रश्नाचे अनेक अर्थ काढता येतील आणि उत्तर देणारा बुचकळ्यात पडेल, असे प्रश्न प्रश्नावलीमध्ये असू नयेत.
४. प्रश्नावली भरून देणाऱ्या व्यक्तीने तुम्हाला दिलेल्या वेळेची जाणीव ठेवा. त्यामुळे सविस्तर उत्तरांची अपेक्षा ठेवू नका. त्यासाठी मोठय़ा उत्तराच्या प्रश्नांचे वेगवेगळ्या लहान उपप्रश्नांमध्ये विभाजन करा.
५. प्रश्नावलीमध्ये १२ ते १५ प्रश्नांपेक्षा जास्त प्रश्न असू नयेत. प्रश्नांची संख्या जर जास्त असेल तर प्रश्नावली भरून देणारी व्यक्तीला कंटाळा येऊ शकतो व आपल्याला योग्य माहिती मिळू शकत नाही.
६. प्रश्नावलीतले प्रश्न अशा प्रकारे तयार करा की, आपल्याला प्रकल्पासंबंधीची जास्तीतजास्त माहिती मिळू शकेल.
काही वेळा आपल्या प्रश्नाचे उत्तर निरीक्षणाने समजते. अशा वेळी समोरच्या व्यक्तीला तो प्रश्न विचारू नका. उदाहरणार्थ, तुमच्या घरात फ्रीज आहे किंवा नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटीमध्ये निरीक्षणाने समजू शकतं. त्यामुळे असे प्रश्न प्रत्यक्ष विचारण्याची गरज नाही. प्रश्नावली तयार केल्यावर पुढची पायरी म्हणजे, या प्रश्नावल्या भरून घेण्यासाठी नमुना संचाची निवड करणे. प्रकल्पाच्या विषयानुसार नमुना संचातल्या व्यक्तींची संख्या निश्चित करा. सर्वसाधारणपणे, कमीतकमी ५० ते १०० व्यक्तींकडून या प्रश्नावल्या भरून घेणे आवश्यक ठरते. कारण, केवळ १५-२० व्यक्तींकडून या प्रश्नावल्या जर भरून घेतल्या तर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवरून आपण सर्वसाधारण असा ठोस निष्कर्ष काढू शकत नाही. जर कमी व्यक्तींच्या सर्वेक्षणातून आपण निष्कर्ष काढला तर त्यातून मिळालेलं मत हे प्रातिनिधिक मत असेलच, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे प्रश्नावल्या जास्तीत जास्त व्यक्तींकडून भरून घ्या.
प्रश्नावली भरून घेण्यासाठी केवळ एकाच प्रकारच्या किंवा एकाच स्तरातील व्यक्तींची निवड करू नका. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमची प्रश्नावली ५०० विद्यार्थ्यांकडून भरून घेतली तरी त्यामधून आपल्याला कदाचित सर्वसाधारण निष्कर्ष काढता येणार नाहीत. म्हणून ती प्रश्नावली विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांचे पालक, शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार व्यक्ती अशा सर्व स्तरांतल्या आणि वेगवेगळ्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमध्ये राहणाऱ्या, वेगवेगळ्या वयोगटांतील व्यक्तींकडून भरून घ्या. सगळ्या व्यक्तींकडून प्रश्नावली भरून घेतल्यानंतर त्यांचे वेगवेगळ्या वयोगटांनुसार, आर्थिक व सामाजिक परिस्थितीनुसार किंवा पेशानुसार वर्गीकरण करा. वेगवेगळ्या स्तरांतील व्यक्तींकडून प्रश्नावलीमध्ये व्यक्त झालेल्या मतांचे विश्लेषण करून आपल्याला प्रातिनिधिक मत ठरवता येईल.
एखादी माहिती निरीक्षणांमधून मिळण्याची शक्यता नसेल किंवा आपण केलेल्या निरीक्षणांना पूरक माहिती हवी असेल तर मुलाखतीचं तंत्र वापरलं जातं. उदाहरणार्थ, ‘जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट’ या प्रकल्पामध्ये निरीक्षणांबरोबरच डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, दवाखाने आणि हॉस्पिटलमधून सफाई करणाऱ्या व्यक्ती यांच्या मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, पारंपरिक आणि पूर्वी वापरात असलेल्या ज्ञानाविषयी माहिती हवी असल्यास संबंधित क्षेत्रातल्या वयस्कर व्यक्तींची मुलाखत घेतली जाऊ शकते. त्याचप्रमाणे प्रश्नावलीच्या आधारे मिळालेल्या माहितीची अचूकता तपासण्यासाठीसुद्धा तज्ज्ञांचं मत उपयुक्त ठरतं.
मुलाखत घेण्यापूर्वी त्या विषयातली जुजबी माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे संभाषणामधून निर्माण होणारे उपप्रश्न आपण त्या तज्ज्ञ व्यक्तीला विचारू शकतो. त्याचप्रमाणे, ज्या तज्ज्ञ व्यक्तीची मुलाखत आपण घेणार आहोत त्या व्यक्तीने केलेल्या कार्याची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे.
मुलाखत चांगली होण्यासाठी हे करा –
० मुलाखत घेण्याअगोदर विषयाचा नीट अभ्यास करून मुलाखतीचे प्रश्न तयार करा.
० मुलाखत घेण्यापूर्वी स्वत:ची नीट ओळख दुसऱ्याला करून द्या. तसेच त्या व्यक्तीला आपण मुलाखत का घेत आहोत, कोणत्या विषयाशी संबंधित मुलाखत घेणार आहोत, इत्यादी गोष्टींची स्पष्ट कल्पना द्या.
० मुलाखत औपचारिकरीत्या न घेता संवाद साधत घ्या.
० जास्तीत जास्त माहिती मिळू शकेल असे प्रश्न विचारा.
० आपण जास्त बोलण्यापेक्षा दुसऱ्याला बोलण्याची संधी द्या. चांगला श्रोता बनण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे बरीच माहिती मिळू शकेल.
० दुसऱ्याच्या ज्ञानाची कदर करा.
मुलाखत चांगली होण्यासाठी हे टाळा –
० मुलाखत घेतेवेळी उत्तरं देणाऱ्याशी हुज्जत घालू नका.
० उत्तरं देणाऱ्याची मतं खोडून काढू नका.
० समोरच्या व्यक्तीने उत्तर दिल्यावर या उत्तरावर आपली मतं व्यक्त करू नका.
० संवेदनशील आणि धार्मिक बाबींवरून वाद घालू नका.
० ‘होय’ किंवा ‘नाही’ अशी उत्तरे असणारे पश्न शक्यतो टाळा.
० मुलाखत घेतेवेळी शक्यतो वहीमध्ये लिहू नका.