करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत असतात. तुमच्या प्रातिनिधिक आणि निवडक प्रश्नांची उत्तरे देणारे व्यासपीठ सुरू करीत आहोत-
करिअर मंत्र.  अभ्यासक्रमांसंदर्भातील तुमच्या शंका आम्हांला कळवा. तुमचे प्रश्न, शंका आम्हाला career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर जरूर कळवा अथवा करिअर वृत्तान्त, लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० या पत्त्यावर लिहून पाठवा.
नामांकित खासगी अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेणे योग्य की शासकीय अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश घेणे उचित ठरते?
– प्रज्ञा गायकवाड, नांदेड.
खरे तर हा प्रश्न कुणासही पडू नये. केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा आणि गुणवत्ता बहुतांश खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपेक्षा निर्वविादपणे उत्तम आहे. या महाविद्यालयांमध्ये चांगल्या प्रयोगशाळा आणि अनुभवी प्राध्यापकवर्ग असतो. या महाविद्यालयांना सर्वोत्तम कंपन्या कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी प्राधान्यक्रम देतात. या महाविद्यालयांचे शुल्कसुद्धा खासगी महाविद्यालयांपेक्षा निम्म्याहून कमी असते. त्यामुळे घरापासून अथवा गावापासून अथवा परराज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळत असेल तर तो नक्कीच घ्यायला हवा. असे निदर्शनास येते की, अनेक महाराष्ट्रीय पालक परराज्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या पाल्यास प्रवेश मिळत असूनही त्याऐवजी घराच्या आसपास असणाऱ्या वा पुण्या-मुंबईतल्या किंवा आसपासच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पाल्यासाठी प्रवेश घेतात. आपल्या पाल्याचे हित कशात आहे, हे पालकांना अधिक कळते, यात शंका नाही. मात्र शासकीय अभियांत्रिकी आणि खासगी अभियांत्रिकी संस्थांमधील शिक्षण आणि संबंधित क्षेत्रातील या संस्थांचे स्थान लक्षात घेतले तर शासकीय अभियांत्रिकी संस्था या नेहमीच उजव्या ठरतात.

माझ्या मुलाला खेळणी डिझाइनमध्ये करिअर करायचे आहे. या क्षेत्रात करिअर करता येणे शक्य आहे का? असे प्रशिक्षण देणारी चांगली शिक्षण संस्था कोणती?
– मनोहर कुलकर्णी, नालासोपारा मुंबई.
 खेळणी निर्मितीचा व्यवसाय हा कायम भरभराटीचा राहिला आहे. आधुनिक डिझाइन्समुळे अधिकाधिक मुले आणि त्यांचे पालकही खेळण्यांकडे आकर्षति होताना दिसतात. त्यामुळे सतत नव्या नव्या अफलातून डिझाइन्सची खेळणी बाजारपेठेत येत असतात. हे लक्षात घेतले तर खेळणी डिझाइन्सचे महत्त्व लक्षात यावे. या क्षेत्रात शिक्षण-प्रशिक्षण देणारी आपल्या देशातील आघाडीची संस्था महणजे पालडी – अहमदाबाद स्थित नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन.
या संस्थेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी असे दोन्हीही अभ्यासक्रम करता येतात. पदवी परीक्षेनंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी टॉय डिझाइन या विषयाच्या स्पेशलायझेशनसाठी प्रवेश मिळू शकतो. या संस्थेतील प्रवेशासाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा घेतली जाते. बॅचलर ऑफ डिझाइनचे अभ्यासक्रम काही खासगी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत चालवले जातात. पुणे येथे असणारी एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, मुंबई स्थित इंडियन स्कूल ऑफ डिझाइन अ‍ॅण्ड इनोव्हेशन या संस्थांमध्ये डिझायिनगचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
बँकिग क्षेत्रात करिअर करण्यासाठी वाणिज्य शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे का?
– प्रियंका घोडपागे, नागपूर.
अजिबातच आवश्यकता नाही. बँकिग क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर भरती होते ती लिपिक वर्गीय संवर्गाची आणि प्रोबेशनरी ऑफिसरची. त्यांच्या निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेशपरीक्षेमध्ये मूलभूत अंकगणित, इंग्रजीचे आकलन, शब्दसंग्रह, व्याकरण, उतारे, सामान्यज्ञान, चालू घडमोडी वगरे बाबींबर प्रश्न विचारले जातात. कोणत्याही शाखेतील पदवीधर ही किमान अर्हता या परीक्षेला बसण्याची पात्रता असते.

मला फिल्म एडिटिंगमध्ये करिअर करावयाचे आहे. त्याचे प्रशिक्षण कुठे मिळेल?
– आशुतोष रंगारी,
ब्रह्मपुरी  (जिल्हा चंद्रपूर)
चित्रपटाचे एडिटिंग हा सर्जनशील विषय आहे. अनेकदा चित्रपटाच्या दिग्दर्शकापेक्षा चित्रपटाच्या एडिटरचा त्या चित्रपटाच्या यशात मोठा हातभार लागतो. कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण हे मोठय़ा प्रमाणात केले जाते. चित्रीकरणाच्या प्रक्रियेत चित्रपटाची लांबी वाढत चालली, ही बाब अनेकदा दिग्दर्शकाच्या लक्षात येत नाही. एकदा चित्रीकरण संपले की, तो चित्रपट एडिटरच्या हवाली केला जातो. खऱ्या चित्रपटाची निर्मिती त्याच्या टेबलवर होते, असे बोलले जाते. कारण एडिटरच चित्रटाची लांबी नियंत्रणात आणतो. गती कायम राखतो. अनावश्यक प्रसंगांना कात्री लावतो. दर्शकांना कंटाळा न येता बघण्यासारखी कलाकृती तो आपल्या संपादन कौशल्याने तयार करतो. अनेक थरारपटांचे यश हे त्यांच्या संपानादनामुळेच शक्य होते. एडिटिंगचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊनच बरेच यशस्वी दिग्दर्शक आपल्या चित्रपटांचे दिग्दर्शन स्वत:च करतात. या विषयातील पूर्ण कालीन अभ्यासक्रम पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेत शिकवला जातो.

भूगर्भशास्त्र या विषयामध्ये माझ्या मुलाला रस दिसून येतो. त्यामध्ये खरोखरच करिअर करता येईल का?
– सुजय दरेकर, अमरावती<br />भूगर्भशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा विषय असून पृथ्वीच्या अंतरंगात घडणाऱ्या विविध बाबींचा वेध त्याद्वारे घेतला जातो. पृथ्वीचे भूगर्भ हे अंतराळाइतकेच आश्चर्यचकित करणारे आणि अनाकलनीय असे आहे. तेल आणि नसíगक वायूंचा शोध, त्याचे नियंत्रण, ज्वालामुखीच्या हालचाली, भूकंप, पृथ्वीच्या पोटातील हालचाली, त्यावरचे संशोधन, उपाययोजना, पाण्याच्या स्रोतांचा शोध, विविध प्रकारच्या खाणींमध्ये असणाऱ्या धातूंचा शोध, अशा विविध बाबींचा अभ्यास या विषयात केला जातो. राज्य सरकारमध्ये भूगर्भशास्त्रज्ञांची निवड नियमितरीत्या राज्य लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी जिआलॉजिस्ट एक्झामिनेशन घेतली जाते. त्याद्वारे देशस्तरीय मोठय़ा पदाच्या भूगर्भशास्त्रांची निवड केली जाते. भूगर्भशास्त्र हा विषय पदवी स्तरावर शिकता येतो. बऱ्याच विद्यापीठांमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि गणित या विषयांपकी कोणत्याही दोन विषयांसोबत भूगर्भशास्त्र हा विषय शिकता येतो. या विद्यापीठांमध्ये भूगर्भशास्त्र या विषयात एमएस्सी वा एमटेक करता येते.

माझ्या मुलीस इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नालॉजी या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे. यासंबंधीची प्रवेश प्रक्रिया कशी असते?
– स्वप्नाली खरे, परभणी
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नालॉजी ही महत्त्वाची संस्था असून केंद्र सरकारच्या डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस अंतर्गत थिरुवंनतपुरम या ठिकाणी आहे. या संस्थेत पदवी, पदव्युत्तर पदवी  आणि पीएचडी असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयआयटी आणि एनआयटीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी JEE – MAIN ही परीक्षा द्यावी लागते. पात्र विद्यार्थ्यांना JEE-ADVANCED  परीक्षेद्वारे निवडले जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना या संस्थेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांना संस्थेचा अर्ज स्वतंत्रपणे भरावा लागतो. २०१४ च्या शैक्षणिक वर्षांसाठी JEE- MAIN चा प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख उलटली आहे.    

Story img Loader