लग्नकार्याचा मोसम सुरू झालाय.. नि भेटवस्तूंच्या लयलुटीचाही. आताच पार पडलेल्या दिवाळीत आपण भेटवस्तूंची फिरवाफिरवी अनुभवली असेल. दिवाळीत मिळालेल्या आणि त्यातल्या नको असलेल्या वस्तूंचे काय करावे, असा प्रश्न आपल्या साऱ्यांनाच भेडसावत असतो आणि मग मिळालेल्या वस्तूंची नुसती एकीकडून दुसरीकडे भ्रमंती सुरू होते. अशा वेळी मुळात आपण भेट का देतो, याचा विचार व्हायला हवा.
*    सण अथवा मंगल कार्याच्या निमित्ताने एक आठवण म्हणून..
*    यशस्वी कामगिरीची शाबासकी म्हणून..
*    कोणाचेही आभार मानण्यासाठी..
*    एखाद्याची आवड लक्षात ठेवून ती वस्तू दिसली तर त्या व्यक्तीसाठी सहज खरेदी केलेली अशी एखादी वस्तू.
कोणाला कोणती भेट द्यावी याचा विचार करायला ती वस्तू विकत घेण्यापेक्षा अधिक वेळ लागतो! हे सोपे करण्यासाठी प्रत्येक प्रसंगानुसार आपल्याला ठरवता येतं.
लग्न कार्य – जवळच्या नातेवाइकांपैकी वा मित्रमंडळींचे लग्न असल्यास अहेर थोडा जास्त असतो. संसार नवा असल्यास डबे, भांडी आणि इतर संसारातले साहित्य देता येते. अगदी चमच्यांपासून फ्रीजपर्यंत जे आपल्या खिशाला परवडेल ते भेट देता येतं. मात्र, नवदाम्पत्याला विचारून भेट देणं इष्ट राहील. नाहीतर एकाच प्रकारच्या अनेक वस्तू त्यांना भेट म्हणून येऊ शकतात. पाश्चात्त्य देशात ‘वेडिंग गिफ्ट रेजिस्ट्री’ हा प्रकार आपले काम खूपच सोपे करतो. विवाहाच्या आधी ते जोडपे एका नामांकित मोठय़ा डिपार्टमेन्टल स्टोअरमध्ये आपले नाव नोंदवतात आणि त्यांना हव्या असणाऱ्या वस्तूंची नोंद करतात. भेट देणारे त्या दुकानात जाऊन आपल्या बजेटमधली वस्तू निवडून, त्याचे पसे भरून यादीतल्या वस्तूसमोर आपले नाव नोंदवतात. रोख पसे भेट देणे हा व्यावहारिक आणि सोपा मार्गही अनेकांना पसंत आहे. ‘पसे उडवले जातील, काहीच घेतले जाणार नाही’ अशी भीती असेल, तेव्हा ‘गिफ्ट कूपन’ कामी येते.
वाढदिवस – जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला भेट करताना खूप विचार करून भेट द्यावी. त्या व्यक्तीची आवडनिवड आणि वय ध्यानात घेणे जरुरी आहे. ज्यांच्याकडे सर्व काही आहे, ‘मला काहीही वस्तू देऊ नका,’ असा ज्यांचा आग्रह असेल त्यांना एक ‘अनुभव’ भेट देता येईल. म्हणजे काय तर असा अनुभव, ज्याच्यावर ती व्यक्ती स्वत:हून कधीही खर्च करणार नाही- उदा. स्पामध्ये मसाज, एखाद्या नामांकित हॉटेलमध्ये जेवण, जास्त पैसे खर्च करण्याची तयारी असल्यास परगावी/ परदेशी सहल इत्यादी. कलेची आवड असणाऱ्यांना कॅलिग्राफी, पॉटरी, ओरिगामी अशा कार्यशाळांचे वा नाटक, संगीताच्या कार्यक्रमांचे पासेस भेट देता येतील. तरुण मुला-मुलींमध्ये कॉफी शॉप, फास्ट फूड, गिफ्ट कूपनची भेट अगदी सोयीची भेट समजली जाते.
वास्तुशान्त – नवीन घराला आवश्यक ठरणाऱ्या वस्तू द्याव्यात. मात्र त्या विचारून द्याव्यात. घरातल्यांना जर फुलझाडांची आवड असेल तर थोडी रोपे आकर्षक कुंडय़ांमध्ये द्यावीत.
उत्तम / यशस्वी कामगिरीबद्दल बक्षीस – अशा प्रसंगी शक्यतो पेन आणि घडय़ाळासारख्या वस्तू दिल्या जातात. याच भेटींना खास टच द्यायचा असेल तर उत्तम प्रतीचे पेन तसेच घडय़ाळ्यांवर नाव कोरून मिळते.
जिथे औपचारिक भेट वस्तू द्यावी लागते, तिथे थोडे विचारपूर्वक ‘गिफ्टिंग’ करावे. अशा वेळी कोणते शिष्टाचार पाळावेत, ते बघूयात-
*    वस्तू ज्या व्यक्तीला द्यायच्या आहेत, त्या व्यक्तीच्या वयाचा, पदाचा आणि आवडीचा विचार करावा.
*    समोरच्या व्यक्तीच्या सांस्कृतिक पाश्र्वभूमीचीही जाण असावी. काही धर्मामध्ये विशिष्ट वस्तूंच्या सेवन/वापराला मज्जाव असतो, हे ध्यानात घेऊनच भेट निवडावी.
*    परफ्यूम, सौंदर्यप्रसाधने, दारू यांसारख्या वस्तू देऊ नयेत.
*    परदेशी पाहुण्यांना आपल्या देशाबद्दल / संस्कृतीबद्दल एखादे छानसे ‘कॉफी टेबल’ पुस्तक अथवा हस्तकारी कलाकुसरीची वस्तू भेट म्हणून योग्य राहील.
आपण जेव्हा भेट देतो, तेव्हा ती देण्यामागची भावना समोरच्याच्या मनात उतरावी ही आपली इच्छा असते. खिशापलीकडे पसे खर्च करून मोठय़ा वस्तू भेट करण्यापेक्षा एखादी छोटी वस्तू विचार करून दिली तरी चालते. तुम्ही त्या व्यक्तीवर किती खर्च केला हे महत्त्वाचे नसते, तर तुम्ही त्या व्यक्तीच्या आवडीचा वा भावनांचा किती विचार केला, हे महत्त्वाचे ठरते.