डिजिटल विश्वात अनेक नवनवीन घटना घडत असतात. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थासुद्धा वाढत आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेचा आलेख वाढता आहे. या अर्थव्यवस्थेचे फायदे, तोटे दोन्ही आहेत. मात्र, या सर्वाचा विचार करून धोका पत्करून काम केले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही काळापूर्वी देशात एक मोठा बदल झाला. तो म्हणजे टिकटॉक अ‍ॅप बंद झाले. हे अ‍ॅप बंद झाल्याने येथील प्रसिद्ध असलेले टिकटॉकर्स दुसऱ्या व्यासपीठाच्या शोधात होते. यातच इन्स्टाग्रामने रिल्स तयार करून प्रसारित करण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे टिक टॉकवरील सर्व स्टार इन्स्टाग्रामवर रिल्स बनवायला लागले. यातून मोठी डिजिटल अर्थव्यवस्था तयार झाली.

सुरुवातीच्या काळात खूप रिल्स बनविणाऱ्या मुलांचे पालक मुलांच्या भविष्याबाबत खूप चिंतित होते. समाज माध्यमामुळे मुलाचे भविष्य धूसर आहे. मात्र, इन्स्टाग्रामवरील जाहिरातील, रिल्सद्वारे पैसे येण्यास सुरुवात झाली. पैसे कमविण्याचे एक भरीव माध्यम तयार झाले. तेव्हापासून पालकांनासुद्धा समाधान वाटू लागले. अनेक पालक त्याच्या मुलांना समाजमाध्यमापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सध्याच्या स्थितीत मुलांना समाजमाध्यमापासून लांब ठेवणे शक्य नाही. समाजमाध्यमावर व्यवसाय अवलंबून आहे. त्यामुळे समाजमाध्यम वापरणे आणि त्याचा वापर करून घेणे यात खूप फरक आहे.

मागील सहा वर्षांपासून आम्ही भाडिपा चालवत आहोत. भाडीपा हा पहिला मराठी ‘डिजिटल ब्रॅण्ड’ आहे. मराठी भाषेत याआधीसुद्धा खूप फॉलोअर्स असलेले, खूप आधी सुरू झालेले चॅनेल्स आहेत. मात्र, मराठीतील भाडिपाला आम्ही ‘ब्रॅण्ड’ म्हणून तयार केला आहे. त्यामुळे हा पहिला मराठी ‘डिजिटल ब्रॅण्ड’ आहे. याआधी मराठी भाषेत कोणी ‘ब्रॅण्ड’ म्हणून काम केले नाही. ते बऱ्यापैकी हौशी किंवा तात्पुरत्या तत्त्वावरील काम होते. नुकतेच आम्ही दीड कोटींची तरतूद करून ‘बेरोजगार’ वेब सीरिजचे शूटिंग केले. दीड कोटी रुपयांची तरतूद करणे कसे शक्य झाले? तर सुरुवातीला स्वत:चे पैसे खर्च करून व्हिडीओ तयार करत असायचो. मात्र, एवढी मोठी उलाढाल आम्ही आत्ता कशी करू शकलो, ते जाणून घ्यायला हवे.  कोणत्याही समाजमाध्यमावर खाते सुरू करून लगेच पैसे मिळत नाही. यामागचे कारण काय? समाज माध्यमात करिअर करायचे असेल तर, त्यामध्ये सुसंगतता असणे आवश्यक आहे. सातत्याने काम करण्याची तयारी असणे आवश्यक आहे. यूटय़ूबवर एखादा चॅनेल, व्हिडीओ आवडला तर, त्याला आपण सबस्क्राईब करतो. यामुळे दरवेळेस नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. सातत्याने अद्ययावत असणे आवश्यक आहे. समाजमाध्यमे दिवसेंदिवस बदलत असतात, त्याद्वारे आपणही सतत बदल करणे आवश्यक आहे. यासह ऑनलाइन शिक्षणसुद्धा सुरू झाले आहे. यातून सर्व माहिती घेताही येते आणि इतरांना देताही येते.

सध्याच्या घडीला समाजमाध्यमावर बरेच ट्रेंड सुरू आहेत. त्यांना प्रतिसादही येतो आहे, पण म्हणून आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. कारण जे आधीच करून झाले आहे, त्याला मोठा प्रतिसाद मिळणे कठीण आहे. दुसऱ्या यूटय़ूबर्सचे अनुकरण करून स्वत:ची ओळख तयार करणे कठीण आहे. कारण त्यांनी आपण एकमेव आहेत, अशी ओळख तयार करून ठेवली आहे. तसाच दुसरा जरी तयार झाला, तरी त्याला जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. एकटय़ाने समाज माध्यमावर काम करत असताना फेसबुक, यूटय़ूब तुमचा प्रेक्षक वर्ग किती आहे, किती जण प्रतिसाद देतात यावरून त्याचे उत्पन्न होते. समाज माध्यमावर आपण कोण आहोत, आपले व्यक्तिमत्त्व काय आहे हे सार्वजनिक पद्धतीने मांडू शकत असाल तरच समाजमाध्यमावर जाणे योग्य आहे. आपण आपले खरी जगणे समाज माध्यमावर सादर करू शकत असू तर, एकटय़ाने ब्लॉग करणे उत्तम राहू शकते.

आपण ज्या क्षेत्रात जाणार आहोत, त्या क्षेत्राचे संपूर्ण ज्ञान घेणे अपेक्षित आहे. सुरुवातीला चुका होणार, प्रतिसाद मिळणार नाही. पण निराश होऊ नये. मात्र, चुका सुधारून काम करत राहणे गरजेचे आहे. आपली समाजरचना अशी आहे की, आपल्याला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घ्यायला आवडते. यासह आपल्याला आपल्या आयुष्यात काय सुरू आहे, हे दाखविण्याची हौस असते. त्यासाठी आपण आपल्या समाज माध्यमावर स्टेटस, फोटो ठेवत असतो. याद्वारे लोक आपले व्यक्तिमत्त्व बघण्यासाठी येतात. आपण कोण आहोत, हे बघायला येत नाहीत. आपले खरे रूप, आपण कोण आहोत हे दाखविण्याची आपल्यात क्षमता असेल, आपले दैनंदिन जीवन कोणापासूनही लपवायचे नसेल तर, तुम्ही करत असलेला समाजमाध्यमाचा वापर योग्य आहे.