स्वित्र्झलडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिटय़ूट फॉर बायोमेडिकल रिसर्चमध्ये ‘जैववैद्यक’ विषयात पीएच.डी. करण्याची संधी देशोदेशींच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याविषयी..
स्वित्र्झलडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिटय़ूट फॉर बायोमेडिकल रिसर्च ही संशोधन संस्था तिथल्याच बेसल विद्यापीठाच्या सहकार्याने जैववैद्यक (बायोमेडिकल) विषयातील आंतरराष्ट्रीय पीएच.डी. कार्यक्रम राबवत आहे. पीएच.डी.साठी प्रवेश व एकूण चार वर्षांच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे. संबंधित विषयामध्ये पदव्युत्तर पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या दोन्ही संस्थांनी १ मे २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल..
जैवविज्ञान या मूलभूत विज्ञानाच्या शाखेतील जागतिक दर्जाची जी काही प्रमुख संशोधन केंद्रे आहेत, त्यातील एक म्हणजे स्वित्र्झलडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिटय़ूट फॉर बायोमेडिकल रिसर्च. स्टेम सेल्स, न्युरोबायोलॉजी व कॅन्सर या विषयांमधील जागतिक स्तरावरच्या प्रगत संशोधनासाठी मायशर इन्स्टिटय़ूट प्रसिद्ध आहे.
अलीकडेच म्हणजे १९७० साली स्थापन झालेल्या या संशोधन संस्थेतील संशोधन स्वतंत्र मात्र, परस्परांशी समन्वय असलेल्या विविध २२ विभागांमध्ये चालते. याव्यतिरिक्त आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे सात तांत्रिक विभाग या २२ विभागांच्या सर्व संशोधन कार्यक्रमांना अद्ययावत बनवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. म्हणूनच या संस्थेची आज जैवविज्ञानातील मूलभूत व नावीन्यपूर्ण संशोधनासाठीचे सर्वोत्कृष्ट केंद्रांपैकी एक अशी आंतरराष्ट्रीय ओळख तयार झाली आहे.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी १०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएच.डी.च्या संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पीएच.डी. कार्यक्रमासह शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी चार वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीअंतर्गत या चार वर्षांदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला सद्धांतिक व उपयोजित संशोधनातील नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाते. चौथ्या वर्षांच्या अंतिम सत्रादरम्यान संशोधन प्रकल्पाचे मायशर इन्स्टिटय़ूट व बेसल विद्यापीठातील एका स्वतंत्र तज्ज्ञ प्रबंध समितीकडून परीक्षण केले जाते व संशोधन प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला बेसल विद्यापीठाची पीएच.डी. पदवी बहाल करण्यात येते. दरम्यान, मायशर इन्स्टिटय़ूटकडून चार वर्षांच्या या कालावधीकरता विद्यार्थ्यांला त्याच्या मासिक भत्त्याच्या स्वरूपात आíथक मदत दिली जाते. मासिक भत्त्याची ही रक्कम स्विस राष्ट्रीय विज्ञान फाऊंडेशनच्या निकषांनुसार असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्चितच घसघशीत अशीच असते. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे करून लेखाच्या अंती नमूद केलेल्या मायशर इन्स्टिटय़ूटच्या वेबसाइटवर दाखल करावा. अर्जाबरोबर शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे अर्जदाराचे एसओपी, सीव्ही, अर्जदाराने पदवी अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, त्याचे आयईएलटीएसचे गुणांकन, आरोग्य तपासणी अर्ज, संशोधन अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. अर्जदारांचे अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
निवड प्रक्रिया
अर्जदाराची जैवविज्ञानातील किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधनातील आवड लक्षात घेऊन मुलाखतीसाठी त्याची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची २-३ जुलच्या दरम्यान मुलाखत घेतली जाईल आणि त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल.
अंतिम मुदत
संस्थेतर्फे या अभ्यासक्रमासाठी वर्षांतून दोनदा प्रवेश दिला जात असल्यामुळे मे आणि नोव्हेंबर असे दोन अंतिम मुदतीचे महिने आहेत . प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ मे २०१५ आहे.
महत्त्वाचा संदर्भ
http://www.fmi.ch
आवश्यक अर्हता
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित विषयशाखांमधील पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराची पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. अर्जदारांनी आयईएलटीएस या इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे पदवी स्तरावर प्रयोगशाळेतील किंवा तत्सम एखाद्या संस्थेतील संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र असावे.
itsprathamesh@gmail.com
स्वित्झर्लंडमध्ये ‘जैववैद्यक’ विषयात पीएच.डी
स्वित्र्झलडमधील फ्रेडरिक मायशर इन्स्टिटय़ूट फॉर बायोमेडिकल रिसर्चमध्ये ‘जैववैद्यक’ विषयात पीएच.डी. करण्याची संधी देशोदेशींच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
First published on: 13-04-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarship