इटलीमधील पिसा विद्यापीठाकडून रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. रिस्क मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश आणि एक वर्षांच्या कालावधीकरिता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे स्वरूप आहे.
एक वर्षांचा कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाकडून दरवर्षी शिष्यवृत्तीसहित प्रवेश जून व सप्टेंबर अशा दोन टप्प्यांत देण्यात येतो. यावर्षीच्या सप्टेंबरमधील दुसऱ्या टप्प्यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून २५ सप्टेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल
इटलीमधील पिसा विद्यापीठाचे नाव गॅलेलिओमुळे सर्वश्रुत झाले. याशिवाय, इटलीतील अव्वल विद्यापीठ आणि जगातील प्राचीन अशा २० विद्यापीठांपकी एक म्हणून पिसा विद्यापीठाचा नावलौकिक सर्वत्र आहे.
आजही हे विद्यापीठ विज्ञानासहित इतर विषयांतील उत्तम अध्ययनासाठी असलेली ओळख टिकवून आहे. पिसा विद्यापीठातील प्रमुख विभागांपकी एक म्हणजे वित्त विभाग. या वित्त विभागाने सध्या जगातला विमा क्षेत्रातील वाढता उद्योग लक्षात घेऊन त्यात शास्त्रीय व व्यावसायिक पद्धती कशा वापरता येतील या अनुषंगाने एका अभ्यासक्रमाची रचना केली. हा अभ्यासक्रम म्हणजेच ‘मास्टर्स इन रिस्क मॅनेजमेंट’.
गेल्या दोन वर्षांपासून पिसा विद्यापीठाच्या वित्त विभागातर्फे हा अभ्यासक्रम इटलीतील ठरावीक शासकीय आíथक संस्था, बँका व पेन्शन फंड यांच्या सहकार्याने सुरू आहे. पहिल्या वर्षी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट दर सुमारे ७७ टक्के एवढा होता.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत दरवर्षी ठरावीक युरोपीय व आंतरराष्ट्रीय अर्जदारांना रिस्क मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षांचा असल्याने शिष्यवृत्तीचा एकूण कालावधीदेखील वर्षभराचाच आहे.
‘मास्टर्स इन रिस्क मॅनेजमेंट’ या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे एकूण शुल्क आठ हजार युरो एवढे आहे तर विद्यापीठाकडून दिली जाणारी शिष्यवृत्तीची एकूण रक्कमदेखील आठ हजार युरो एवढीच आहे. अर्थात, अर्जदाराला अतिरिक्त आíथक भार उचलावा लागणार आहे. ही शिष्यवृत्ती मर्यादित अर्जदारांनाच बहाल करण्यात येते.
आवश्यक अर्हता
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा विद्यार्थी कोणत्याही विषयातील पदवीधर असावा. अर्जदाराची पदवीस्तरीय शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. अर्जदाराने टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अत्युत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त अर्जदाराचे इंग्रजी बोलणे व लिहिणे यांवर प्रभुत्व असावे. कारण, अर्जदाराच्या मुलाखतीमध्ये विद्यापीठीय समितीकडून त्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व तपासले जाते. तसेच अर्जदाराने टोफेल व आयईएलटीएस स्तरीय पिसा विद्यापीठाची इंग्रजी विषयाची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज पिसा विद्यापीठाने दिलेल्या पीडीएफ स्वरूपातील अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून वेबसाइटवर नमूद केलेल्या संबंधित कार्यालयाला ई- मेल करावा. अर्जासोबत अर्जदाराने त्याच्या पदवी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्, त्याच्या शैक्षणिक व शिक्षणेतर पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., अर्जदाराचा सी.व्ही., त्याने पदवी अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, त्याचे टोफेल किंवा आयईएलटीएसचे गुणांकन, कामाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी ही सर्व अर्जप्रक्रिया ईमेलद्वारे पूर्ण केल्यावर त्यांच्या देशातील इटालियन दूतावासात आपल्या पदवी अभ्यासक्रमाचे व एसओपीचे इटालियन भाषेत रूपांतर करून घ्यावे. यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास अर्जदाराला विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयाशी संपर्क साधता येईल.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २५ सप्टेंबर २०१५ आहे.
महत्त्वाचा दुवा
ttp://masterriskmanagement.ec.unipi.it/
tsprathamesh@gmail.com