आज भारतातील बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिका, ब्रिटन आणि अन्य युरोपीय राष्ट्रांचा पर्याय निवडत असतात, पण त्यांना इस्राएलमध्ये शिकण्याच्या संधी आहेत याबद्दल फारशी माहिती नसते. भारत-इस्राएल संबंधांचे हे २२ वे वर्ष. यानिमित्ताने भारत भेटीसाठी आलेल्या इस्राएलच्या औद्योगिक मंत्र्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले- ‘बौद्धिक संपदेने समृद्ध असलेल्या या दोन देशांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व्हिसा-पारपत्र यांसारख्या अडथळ्यांचीही गरज नसावी. उलट मनात आलं तर शिकण्याच्या जिज्ञासू तीव्रतेने शक्य असलेलं पुढचंच विमान पकडून विद्यापीठात प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.’ उभय देशांमध्ये बौद्धिक संपदेची मुक्त देवाणघेवाण व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आणि याच पाश्र्वभूमीवर ‘टेक्निऑन विद्यापीठाच्या’ जेसील रोतम या विपणन विभागाच्या पदाधिकारी भारतभेटीवर आल्या होत्या. विविध देशांच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रायलमध्ये ‘टेक्निऑन इंटरनॅशनल स्कूल’ आहे. यामध्ये अभियांत्रिकी, नैसर्गिक विज्ञान, औषधी, स्थापत्यकला, विज्ञान-तंत्रज्ञान, मानव्य, वर्तनशास्त्र यांसह एकूण १८ विभाग आहेत. ५२ संशोधन केंद्रे आहेत. ६१६ प्राध्यापक आहेत, ज्यांच्यात तीन नोबेल पारितोषिक विजेत्यांचा समावेश आहे. पदवीसाठी ५३ विविध अभ्यासक्रम आहेत. ६७ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आहेत. या विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांसाठी, शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी आणि पीएच.डी. तसेच ‘पोस्ट डॉक्टरल’ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी विशेष शिष्यवृत्त्या आणि पाठय़वृत्त्या उपलब्ध आहेत. विशेषत: भारतीय शैक्षणिक पद्धतीतील सुट्टय़ांना अनुसरून अल्प कालावधीचे विशेष अभ्यासक्रम आहेत.
इथे परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक पाठय़वृत्त्या आणि शिष्यवृत्त्याही देण्यात येतात. ज्यानुसार, संपूर्ण शुल्कमाफीपासून ते दर महिन्याला येणाऱ्या खर्चासाठी ‘पाठय़वेतन’(स्टायपेंड) ची सुविधा आहे. गुणवत्ता हा यासाठी प्रमुख निकष आहे. प्रामुख्याने मोठय़ा रकमेच्या शिष्यवृत्त्या या पीएच.डी. आणि पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये काही अभ्यासक्रम तर असे आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमची पीएच.डी. पदवी पूर्ण केली आहे, पण अद्याप शिक्षक म्हणून काम करण्यास तुम्ही सुरुवात केलेली नाही, मात्र अध्यापन करण्याची तुमची अनिवार इच्छा आहे, तर अशांसाठी अगदी वार्षिक ४० हजार डॉलर्सपर्यंत शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. तसेच एम.एस्सी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक साडेबारा हजार डॉलरपासून तर पीएच.डी.साठी १६ हजार डॉलरपासून विशेष पाठय़वृत्त्यांची सुविधा विद्यापीठ देतं.
इस्राएलच्या औद्योगिक मंत्र्यांनी केलेलं विधान वर नमूद केलं आहेच, पण इस्राएलला भारतात रस असण्याचं कारण काय, तर जेसील रोतम यांच्याशी बोलताना लक्षात आलं की चिनी विद्यार्थी इस्राएली शिष्यवृत्त्यांचा लाभ मोठय़ा संख्येने घेऊ लागले आहेत. मग असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या आणि ऐतिहासिक नाते असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मागे का, म्हणून जगभरात नावीन्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना इस्राएल शिकण्याची संधी देऊ पाहात आहे.
समर प्रोग्राम किंवा बारावी स्तरासाठी दोन ते तीन आठवडय़ांचे अभ्यासक्रम आहेत. तर त्यापुढे सहा महिन्यांपासून एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. महाराष्ट्रात शेतीचे शिक्षण घ्यायचे असेल तर सध्याही तुम्ही किंवा तुमचे पूर्वज शेतकरी असल्याचे दाखले लागतात. इथे मात्र शेतकी संशोधन करण्याची इच्छा असणाऱ्यांना असल्या दाखल्यांची गरज भासत नाही. शेतकऱ्यांची शेते आणि तुमची शेतीत संशोधन करण्याची मनस्वी इच्छा यांचा संगम इथे ज्ञानार्जनासाठी पुरेसा असतो. तात्पर्य, तुमचा कल आणि तुम्हाला एखाद्या विषयात असणारी गती हे इथे ज्ञानसंपादनासाठीच्या पूर्वनिवडीचे निकष आहेत.
भारतीय मनांना आजही उत्तुंग राष्ट्रभावना म्हटली की इस्राएल या देशाचीच आठवण होते. एका जिद्दीने आणि निव्वळ जगात आपल्या देशाचे नाव सदैव सन्मानाने घेतले जावे, यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणाऱ्या नागरिकांचा हा समूह. आज शेती, तंत्रज्ञान, शस्त्रनिर्मिती, त्यातही टेहळणीच्या साधनांची निर्मिती, गुणसूत्रांचा अभ्यास अशा अनेक क्षेत्रांमध्ये इस्राएल हा देश आघाडीवर आहे. आणि हाच देश भारतातील बुद्धिवान विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम संधी मिळाव्यात यासाठी उत्सुक आहे.
टेक्निऑन विद्यापीठ हे या देशात स्थापन करण्यात आलेले पहिले विद्यापीठ. संपूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी स्थापन करण्यात आलेले. इस्राएल राष्ट्राला आणि त्याचबरोबर समग्र मानवजातीला जगात अग्रेसर राखता यावे, ज्ञानाची नवनिर्मिती व्हावी आणि सशक्त मनुष्यबळ व नेतृत्व घडावे या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पण त्याची पाश्र्वभूमी या शब्दांतून कळणार नाही. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यू धर्मीयांवर अनेक ठिकाणी अन्याय होत होता, त्यांना सापत्न वागणूक दिली जात होती. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात पसरलेल्या ज्यू धर्मीयांना तंत्रशिक्षण घेण्यासही मनाई केली जात होती. अशा वेळी ज्यूंसाठी जर राष्ट्र हवे असेल तर त्यासाठी तंत्रशिक्षण देणाऱ्या शाळेची-संस्थेची स्थापना करणे अनिवार्य असल्याचा मतप्रवाह होता.
थोडक्यात, आधी स्वतंत्र देश आणि मग त्या देशाच्या शैक्षणिक संस्था असा प्रवास न करता आधी राष्ट्रासाठी कुशल, ज्ञानी मनुष्यबळ आणि त्यातून सुसंस्कृत राष्ट्र असा प्रवास करण्याचे आव्हान या देशाने स्वीकारले. त्यातून टेक्निऑन विद्यापीठाच्या स्थापनेची बीजे रोवली गेली. १९१२ साली धर्माने ज्यू असलेले विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी या विद्यापीठाच्या कोनशिलेची स्थापना एक लहानसे रोपटे लावून केली. आज त्या रोपटय़ाचा आणि विद्यापीठाचाही डेरेदार वृक्ष झाला आहे. गेल्या तीन वर्षांत या विद्यापीठाने इस्राएलला तीन नोबेल पारितोषिकेही मिळवून दिली आहेत. रसायनशास्त्र, स्टेम सेल्स, नॅनोतंत्रज्ञान, ऊर्जा, संगणक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, अवकाशशास्त्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये या विद्यापीठाने भरीव कामगिरी केली आहे. हे विद्यापीठ उपग्रहांची बांधणी, निर्मिती आणि प्रक्षेपण यांबद्दल विशेष अभ्यासक्रम असलेल्या जगातील पाच विद्यापीठांपैकी एक आहे. मानवी केसाच्या एकसहस्रांश इतक्या जाडीच्या वायरची निर्मिती ‘डीएनए स्ट्रँड्स’ वापरून करणारे पहिले विद्यापीठ आहे. अत्यंत दुर्धर मानल्या जाणाऱ्या पार्किन्सन्स या आजारावरील पहिल्या औषधाचा शोध या विद्यापीठात लागला. ‘स्टेम सेल्स’चा वापर वैद्यकीय उपचारार्थ करता येऊ शकतो, हा विचार मांडणाऱ्या पहिल्या शोधनिबंधाचे सहलेखक या विद्यापीठातील आहेत. इस्राएलच्या ‘हाय टेक’ उद्योगविश्वातील ७० टक्क्यांहून अधिक संस्थापक आणि व्यवस्थापक हे टेक्निऑन विद्यापीठातील आहेत.
टेक्निऑन हे केवळ एक विद्यापीठ नसून ‘विद्याभ्यासासाठी वसविण्यात आलेले नियोजनबद्ध शहर’ आहे. सुमारे ३०० एकर परिसरावर हे पसरलेले आहे. यात ९० इमारती आहेत. ४४४२ निवासी संकुले आहेत. या परिसरात नव्याने दाखल होणाऱ्या प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या दिमतीला स्थानिक इस्राएली विद्यार्थी दिला जातो. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष पुरविण्यासाठी एक समुपदेशक उपलब्ध असतो. उत्कृष्ट कॅम्पस, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, टेनिस कोर्ट, अभ्यासिका, संगणक केंद्रे, निवासस्थान, उद्याने, ग्रंथालये (ग्रंथालय नव्हे!), प्रयोगशाळा, अद्ययावत तंत्रज्ञानाने समृद्ध अभ्यासकेंद्रे, ऑडिटोरियम, वस्तुसंग्रहालये, साहसी खेळ अशा सगळ्या बाबींनी समृद्ध असे हे अत्याधुनिक शहर आहे. जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये ७७ व्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वोत्तम अभियांत्रिकी विद्यापीठांमध्ये जगात ४६ व्या क्रमांकावर आहे. सर्वोत्तम वैज्ञानिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये जगात ३८ व्या क्रमांकावर आहे. एक अब्ज डॉलरहून अधिक मूल्य असलेल्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे शिक्षण झालेल्या विद्यापीठांच्या यादीत जगात सातवे स्थान पटकावले आहे. उद्योजकता आणि कल्पकता व नावीन्य यांच्या निर्मितीस चालना देणाऱ्या विद्यापीठांमध्ये जगात सहाव्या स्थानावर आहे.
विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम – बी.एस्स्सी. इन सिव्हिल अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग, नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘पेरशमन इयर ऑफ इंजिनीअरिंग अँड सायन्स, स्टार्ट अप एमबीए (एक वर्षांचा अभ्यासक्रम), एम.एस्सी. आणि पीएच.डी. अभ्यासक्रम (रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र), पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रम, कृषी तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रम, स्टार्ट अप कँप (उद्योजकतेला चालना देणारा प्रशिक्षण कार्यक्रम), मॅथ्स कॅम्प (गणिताबद्दल औत्सुक्य निर्माण करणारा अल्प कालावधीचा अभ्यासक्रम), सायटेक (विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल विशेष ओळख करून देणारा आणि नवनवीन क्षेत्रांचा परिचय करून देणारा अभ्यासक्रम), उद्योजकता आणि नावीन्य व कल्पकता (समर प्रोग्राम), विकसनशील समाजासाठी उपयुक्त अभियांत्रिकी अभ्यासक्रम, अभियांत्रिकी आणि विज्ञान समर स्कूल प्रोग्राम.
अगदी चार वर्षांपूर्वीपर्यंत या विद्यापीठात हिब्रू या एकाच भाषेच्या माध्यमातून सगळे अभ्यासक्रम शिकवले जात असत. मात्र आता इंग्रजी माध्यमातूनही हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमात ‘इस्राएलची संस्कृती आणि इतिहासाची ओळख’ हा अविभाज्य भाग आहे. आव्हानात्मक अभ्यासक्रम, समस्यांची उकल करण्याची ‘प्रॅक्टिकल असाइनमेंट’, विख्यात उद्योजकांच्या भेटी, अनेक उद्योगांना-प्रकल्पांना स्थळभेटी, अद्ययावत तंत्रज्ञानाचा विद्यार्थिदशेतच वापर करण्याची संधी आणि आव्हान, पुस्तकी अभ्यासापेक्षा प्रत्यक्ष अभ्यासाला असलेले महत्त्व ही येथील अभ्यासक्रमाची वैशिष्टय़े आहेत. शिवाय बी.एस्सी.सारखे अभ्यासक्रम वगळता बरेचसे अभ्यासक्रम हे अवघ्या दोन आठवडय़ांपासून ते एक वर्षांपर्यंतच्या कालमर्यादेत पूर्ण करता येतात.
अधिक माहितीसाठी :
संकेतस्थळ http://int.technion.ac.il
परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांसाठी http://www.youtube.com/Watch?V=3RilYgCC7GW यू टय़ूब ध्वनिचित्रफीत http://www.youtube.com/Watch?V=3RilYgCC7GW
‘टेक्निऑन’च्या गुणवत्तेवर आधारीत शिष्यवृत्त्या!
आज भारतातील बुद्धिमान विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिका, ब्रिटन आणि अन्य युरोपीय राष्ट्रांचा पर्याय निवडत असतात, पण त्यांना इस्राएलमध्ये शिकण्याच्या संधी आहेत याबद्दल फारशी माहिती नसते.
First published on: 17-02-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarship on a basis of technion quality