उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संशोधन करणाऱ्या युवा सशोधकांना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे ‘स्वर्णजयंती पाठय़वृत्ती’ दिली जाते. त्याविषयी..
कुठल्याही क्षेत्रातील ज्ञाननिर्मितीसाठी आणि त्या क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी  मूलभूत संशोधन आवश्यक असते, याबाबत जगाच्या पाठीवर सर्वत्र सजगता असून संशोधनाच्या विकासासाठी मोठय़ा स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. भारतासारखा महासत्तेचं स्वप्न बघणारा देश या मूलभूत संशोधनावर व्यापक प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे. संशोधनाचे आगामी काळातील महत्त्व लक्षात घेते मूलभूत संशोधन विषयक उपक्रमांना चालना देण्यासाठी केंद्र सरकार आणि सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अशा अनेक उपक्रमांपकी एक म्हणजे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संशोधन करणाऱ्या युवा शास्त्रज्ञांना दिली जाणारी स्वर्णजयंती पाठय़वृत्ती. २०१२-१३च्या या पाठय़वृत्तीसाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून १५ मे २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाठय़वृत्तीबद्दल :  १९९७ साली भारताला स्वतंत्र होऊन ५० वष्रे पूर्ण झाली. स्वातंत्र्याची ही सुवर्णजयंती साजरी करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology) त्या वर्षांपासून म्हणजे १९९७ पासून ‘स्वर्णजयंती पाठय़वृत्ती’ योजना राबवण्यास सुरुवात केली. या योजनेअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध ज्ञानशाखांमध्ये ठराविक युवा शास्त्रज्ञांना त्यांचे मूलभूत संशोधन चालू ठेवण्यासाठी त्यांच्या नियमित वेतनाव्यतिरिक्त विशेष आíथक सहाय्य पुरवले जाते. भारतात किंवा भारताबाहेर राहणाऱ्या हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान शाखेतील भारतीय विद्यार्थ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून स्वर्णजयंती पाठय़वृत्ती प्रदान केली जाते. फक्त विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रमुख ज्ञानशाखांमध्ये मूलभूत संशोधन करण्यासाठी ही पाठय़वृत्ती दिली जाते. स्वर्णजयंती पाठय़वृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला पाच वर्षांसाठी दरमहा २५ हजार रुपयांची पाठय़वृत्ती (तसेच या संपूर्ण कालावधीत त्याचे नियमित वेतनही सुरू राहते) व त्याच्या संशोधन प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांची रक्कम त्याला दिली जाते. या पाठय़वृत्तीसाठी निवड झालेल्या शास्त्रज्ञास भारतातील कोणत्याही संशोधन संस्थेमध्ये त्याचे पुढील संशोधन सुरू ठेवता येईल.
आवश्यक अर्हता :  विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांना (भारतात किंवा भारताबाहेर राहणाऱ्या) खुली आहे. या पाठय़वृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे विज्ञान, अभियांत्रिकी किंवा वैद्यकशास्त्र या शाखांमधल्या कोणत्याही एका शाखेशी संबंधित विषयामधील पीएच.डी. पदवी असावी. त्याचप्रमाणे, ३१ डिसेंबर २००९ रोजी अर्जदाराचे वय ३० ते ४०च्या दरम्यान असावे. तसेच अर्जदाराचे त्याच्या स्वत:च्या संशोधन विषयाला त्याचं उत्कृष्ट योगदान असावं, म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. याबरोबरच अर्जदाराला, जर त्याची पाठय़वृत्तीसाठी निवड झाली तर त्याचे पुढील संशोधन चालू ठेवण्यासाठी त्याच्या संस्थेकडून आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य दिले जाईल, अशा स्वरूपाचे त्याच्या संबंधित संस्थेच्या / विद्यापीठाच्या/ विभागाच्या विभागप्रमुखाचे एक पत्र त्याला पाठवावे लागेल.
अर्ज प्रक्रिया : विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वेबसाइटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. त्यात दिलेल्या नमुन्यामध्येच अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सोबत स्वत:च्या आतापर्यंतच्या सर्व संशोधन प्रकल्पांबद्दल लघुनिबंध स्वरूपात माहिती त्याने पाठवावी. अंतिम निवडीपूर्वी स्वत:च्या प्रकल्पांविषयी व स्वत:विषयीची इतर माहिती अर्जदाराला विभागाकडे सुपूर्द करावी लागेल. अर्जदाराने त्याच्या अर्ज व संशोधन प्रकल्पासहित इतर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट व हार्ड प्रती विभागाच्या नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात. आवश्यक कागदपत्रांच्या व प्रकल्पविषयक हार्ड प्रती पोस्टाने पाठवाव्यात. अर्ज प्रक्रियेशी संबंधित याव्यतिरिक्त कोणतीही शंका असल्यास अर्जदार खालील पत्त्यावर संपर्क साधू शकतो.
संपर्क : प्रमुख, एसइआरसी, डिपार्टमेन्ट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी भवन, न्यु मेहरौली रोड, नवी दिल्ली- ११००१६, दूरध्वनी – ०११ – २६५९०३७०
ईमेल : bghari@nic.in
अंतिम मुदत : अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ मे २०१३ आहे.
महत्त्वाचे दुवे :  http://www.dst.gov.in    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा