यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विज्ञान – तंत्रज्ञान विद्याशाखेने सुरू केलेल्या पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणक्रमांचा हा थोडक्यात परिचय..
सर्वासाठी करिअरची संधी असणारे विज्ञान, तंत्रज्ञान हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या क्षेत्रात आपले करिअरचे स्वप्न पूर्ण करू शकतो. अशा विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विज्ञानाच्या वाटा खुल्या केल्या आहेत. या सर्व शिक्षणक्रमांचे माध्यम इंग्रजी असून त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता आहे.
एम. एस्सी. (जैवतंत्रज्ञान)
विज्ञानाचा कुठलाही विषय घेऊन पदवी प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणक्रम अत्यंत उपयुक्त आहे.
या शिक्षणक्रमात बायोकेमिस्ट्री, सेल बायोलॉजी, जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, इम्युनोलॉजी या विषयांचा समावेश आहे. तसेच अप्लाइड बायोटेक्नोलॉजीचीही माहिती मिळेल. प्रत्येक विषयासाठी १०० गुणांची अंतिम परीक्षा असेल.
कालावधी : दोन वष्रे (चार सत्रे). पात्रता : बी.एस्सी. अथवा समकक्ष अभ्यासक्रम. शुल्क : १६ हजार रु. (प्रतिसत्र.)
संधी: हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी जैव उद्योगक्षेत्र किंवा क्लिनिकल लॅबमध्ये प्रशिक्षक पदासाठी पात्र ठरतो. अशा विद्यार्थ्यांना लेक्चरशिप करण्यासाठी किमान पात्रता मिळविण्यास या शिक्षणक्रमाचा लाभ होऊ शकतो. संशोधन क्षेत्रातील प्लान्ट बायोटेक्नोलॉजी, अॅनिमल बायोटेक्नोलॉजी, फार्मास्युटिकल बायोटेक्नोलॉजी या विषयांच्या संशोधनासाठीही हा शिक्षणक्रम उपयुक्त ठरू शकतो.
बी.एस्सी. (जैवतंत्रज्ञान)
या शिक्षणक्रमात जनरल मायक्रोबायोलॉजी, फिजिओलॉजी, मेटाबोलिझम, मॉलिक्युलर बायोलॉजी, जेनेटिक इंजिनीअरिंग, इम्युनोलॉजी या विषयांचा समावेश आहे. या सर्व विषयांतून जैवतंत्रज्ञानामध्ये लागणाऱ्या तंत्रज्ञानाची तसेच अप्लाइड बायोटेक्नोलॉजीचीही माहिती मिळेल. त्यामुळे जैवतंत्रज्ञानामध्ये लागणारे प्रात्यक्षिक ज्ञान मिळू शकते.
कालावधी : तीन वष्रे (सहा सत्रे), पात्रता : बारावी उत्तीर्ण अथवा समकक्ष अभ्यासक्रम, शुल्क : आठ हजार रु. (प्रतिसत्र.)
संधी : हा शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमास देशभरात कुठेही प्रवेश मिळू शकतो. जैव उद्योगक्षेत्रात प्रशिक्षक किंवा प्रयोगशाळा साहाय्यक पदासाठीही पात्र ठरतो.
बी.एस्सी. (अॅक्च्युरियल सायन्स)
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेल्या आणि विमा, गुंतवणूक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हा शिक्षणक्रम उपयुक्त ठरेल.
या शिक्षणक्रमात जनरल मॅथेमॅटिक्स फॉर अॅक्चुअरीज, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, इंटरेस्ट रेटस् अॅण्ड अॅन्युइटीज, बेसिक्स ऑफ अकाऊंटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स, अॅडव्हान्स्ड अॅप्लिकेशन्स ऑफ अॅन्युइटीज, कॉर्पोरेट फायनान्स, एस्टिमेशन अॅण्ड हायपोथेसिस टेस्टिंग हे विषय आहेत.
कालावधी : तीन वष्रे (सहा सत्रे), पात्रता : बारावी उत्तीर्ण अथवा समकक्ष अभ्यासक्रम + बौद्धिक चाचणी, शैक्षणिक शुल्क: प्रतिसत्र ५६ हजार रु.
संधी : हा शिक्षणक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी विमा आणि गुंतवणूक क्षेत्रात देशभरात कुठेही काम करू शकतो. तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट, बँकिंग, हेल्थकेअर, फायनान्शियल मॅनेजमेन्ट आणि कॉर्पोरेट प्लानिंग या क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच अॅक्च्युरियल सायन्स विषयाच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाससुद्धा प्रवेश घेता येऊ शकतो. बऱ्याच उद्योगांमध्ये गुंतवणूक जोखमीचा अंदाज घेण्यासाठी हा शिक्षणक्रम उपयुक्त आहे.
एम. एस्सी. (इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग)
ज्या विद्यार्थ्यांचे कुठल्याही शाखेतून बी.ई. किंवा बी.टेक् पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणक्रम उपयुक्त आहे.
या शिक्षणक्रमात अॅडव्हान्स्ड प्रॉडक्शन प्लानिंग, कंट्रोल प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट, मार्केटिंग, मॅनेजमेन्ट इर्गोनॉमिक्स, रिलॅबिलिटी इंजिनीअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग सिस्टीम्स अॅनालिसिस अॅण्ड सिम्युलेशन, एंटरप्राइज रिसोअर्स प्लानिंग, सिक्युरिटी अॅनालिसिस अॅण्ड पोर्टफोलिओ मॅनेजमेन्ट या विषयांचा समावेश आहे. या सर्व विषयांतून इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंगसाठी लागणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयीची माहिती मिळेल. यामध्ये प्रोजेक्ट वर्क
करताना विद्यार्थ्यांना इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंगमध्ये लागणारे प्रात्यक्षिक ज्ञान मिळू शकते.
कालावधी : दोन वष्रे (चार सत्रे), पात्रता : बी.ई. किंवा बी.टेक्. ही पदवी पूर्ण अथवा समकक्ष पात्रता धारण केलेली व्यक्ती, शैक्षणिक शुल्क : १६ हजार प्रतिसत्र.
संधी : हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर बँक, रुग्णालये, बांधकाम क्षेत्र, सार्वजनिक सेवा, वाहतूक, होलसेल अँड रिटेल ट्रेड यांसारख्या क्षेत्रात इंडस्ट्रियल इंजिनीअर वेगवेगळ्या पदासाठी लागतात. उत्पादन क्षेत्रातही या अभियंत्याची गरज लागते.
बी. एस्सी. (नॉटिकल सायन्स)
जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहेत आणि र्मचट नेव्हीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणक्रम उपयुक्त आहे.
या शिक्षणक्रमात नॉटिकल फिजिक्स अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, नेव्हिगेशन, वोयेज प्लानिंग अॅण्ड कोलिजन प्रिव्हेन्शन, एन्वायरॉन्मेन्ट सायन्स, मरिन इंजिनीअरिंग अॅण्ड कंट्रोल, शिप ऑपरेशन टेक्नोलॉजी, नेव्हल आर्किटेक्चर इत्यादी विषयांचा समावेश आहे. या सर्व विषयांतून मर्चन्ट नेव्हीमध्ये लागणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयीची सखोल माहिती मिळते. तसेच ब्रिज प्रोसिजर अॅण्ड लीगल नॉलेज, मेरिटाइम लॉ यांसारख्या विषयांमुळे मर्चन्ट नेव्हीमध्ये आवश्यक असलेल्या कायदेविषयक बाबींचीही माहिती मिळते.
कालावधी : तीन वष्रे (सहा सत्रे), पात्रता : बारावी किंवा समकक्ष पात्रता (पीसीएममध्ये ६० टक्के) आणि इंग्रजीत ५० टक्के. प्रवेश परीक्षा आणि वैद्यक चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक. शैक्षणिक शुल्क : ९९ हजार रु. प्रतिसत्र.
संधी : या शिक्षणक्रमाला डी. जी. शिपिंग, केंद्र सरकारची मान्यता आहे. त्यामुळे हा शिक्षणक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी देशभरात कुठेही मर्चन्ट नेव्हीत डेक कॅडेट किंवा कॅप्टनसारख्या पदासाठी पात्र ठरतो. हा शिक्षणक्रम निवासी स्वरूपाचा आहे.
पदव्युत्तर पदविका : अॅक्च्युरियल अॅप्लिकेशन
बी.एस्सी. पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना विमा आणि गुंतवणूक क्षेत्रात करिअर करायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी हा शिक्षणक्रम उपयुक्त आहे.
जीवनविमा, वित्त आणि गुंतवणूक, मॉडेलिंग फॉर हेल्थ इन्शुरन्स, अॅसेट अॅण्ड लायबिलिटी मॅनेजमेन्ट, रिटायरमेन्ट बेनिफिटस् मॉडेलिंग या विषयांचा समावेश आहे. या सर्व विषयांतून अॅक्च्युरियलमध्ये लागणाऱ्या कौशल्यांची सखोल माहिती मिळू शकेल.
कालावधी : एक वर्ष (दोन सत्रे), पात्रता : बी. एस्सी. (अॅक्युअरिअल सायन्स) उत्तीर्ण अथवा समकक्ष पात्रता, शैक्षणिक शुल्क : ८० हजार रु. प्रतिसत्र.
संधी : हा शिक्षणक्रम पूर्ण करणारा विद्यार्थी विमा आणि गुंतवणूक क्षेत्रात देशभरात कुठेही काम करू शकतो. जीवनविमा, सर्वसाधारण विमा, कार्य, संशोधन, स्टॅटिस्टिक्स, गुंतवणूक, प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट, बँकिंग, हेल्थकेअर, फायनान्शिअल मॅनेजमेन्ट, कॉर्पोरेट प्लानिंग अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच अॅक्च्युरियल सायन्स विषयाच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाससुद्धा प्रवेश घेता येऊ शकतो.
सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश अर्ज अभ्यासकेंद्रांवर उपलब्ध आहेत. अर्जासोबत दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेच्या निकालाची सत्य प्रमाणित फोटोप्रत आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्य प्रमाणित फोटोप्रत जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी डॉ. मनोज किल्लेदार, संचालक, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा;ast@ycmou.com,, (०२५३) २२३१४७३ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यापीठाच्या http//:ycmou.digitaluniversity.ac संकेतस्थळाला भेट द्यावी.
पदव्युत्तर पदविका (बायोइन्फॉर्मेटिक्स)
ज्यांनी बी.एस्सी. पदवी घेतली आहे किंवा एमबीबीएस, बी.फार्म, बीएएमएस, बीडीएस, बीएचएमएस, बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स) शिक्षणक्रम पूर्ण केला आहे, त्या विद्यार्थ्यांना हा शिक्षणक्रम उपयुक्त ठरेल.
या शिक्षणक्रमात बेसिक्स ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स, कॉम्प्युटिंगच्या संकल्पना, स्टॅटिस्टिक्स फॉर बायोइन्फॉर्मेटिक्स, बेसिक स्ट्रक्चरल बायोलॉजी, कॉम्प्युटेशनल बायोलॉजी, जेनॉमिक्स अॅण्ड प्रोटिओमिक्स या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. बायोइन्फॉर्मेटिक्स आवश्यक ठरणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाची माहिती मिळू शकेल.
कालावधी : एक वर्ष (दोन सत्रे), पात्रता : बी. एस्सी. उत्तीर्ण अथवा समकक्ष अभ्यासक्रम, शुल्क : १६ हजार प्रतिसत्र.
संधी : मुळातच बायोइन्फॉर्मेटिक्स हा संशोधनाचा विषय असल्याने ज्या विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड आहे ते गुणसूत्रांचा शोध, औषधांचा शोध, प्रोटिन बांधणी, उत्क्रांतीचे मॉडेलिंग या संबंधित विषयांत संशोधन करू शकतात.