‘मला चांगले लिहिता येते, एखाद्या चित्रपटासाठी संवाद लेखनाची संधी मिळेल का?’
‘माझ्याकडे तीन-चार चांगल्या कथा आहेत, एखाद्या नामवंत निर्माता-दिग्दर्शकाला मी त्या ऐकवू इच्छितो.’
‘मला चांगला पटकथाकार व्हायचे आहे, त्या संदर्भात मराठीत काही पुस्तके वाचायला मिळतील का?’
अशा प्रकारच्या प्रश्नांची आणि प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यांच्या प्रश्नात प्रामाणिकपणा असतो, हे पटकन लक्षात येते, पण या संदर्भात त्यांनी मार्ग कसा काढावा, त्यांना नेमकी संधी कुठे आहे हे पटकन सांगता येत नाही. याचे कारण, चित्रपटसृष्टीची प्रत्यक्ष कार्यशैली नेमकी कशी आहे, याचे सरळपणे स्पष्टीकरण करता येत नाही. विशेषत: मराठीतील चित्रपटविषयक पुस्तकांत फार पूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती व चरित्रे-आत्मचरित्रे यांचा मोठा वाटा आहे. अथवा आपल्याकडे बाह्य़-दृष्टिकोनातून चित्रपटसृष्टीवर भरपूर लेखन होते, पण प्रत्यक्षात तेथे कामाची पद्धत, त्यामागची मानसिकता, नवीन पिढीला संधी, त्यातील आव्हाने यावर फारसा प्रकाशझोत टाकला जात नाही.
चांगला पटकथाकार व संवाद लेखक बनण्यासाठी भाषेचे ज्ञान, दृश्य माध्यमाची समज याची गरज असते. पण तेवढय़ाच गुणावर या क्षेत्रात कारकीर्द करता येत नाही. कधी एखाद्या कलाकाराची प्रतिमा विचारात घेऊनच पटकथा रचावी लागते. तर कधी चित्रपटाचा बदलता प्रवाह विचारात घेऊन पटकथेत बदल करावा लागतो. काही वेळा तर पटकथा भक्कम असते, पण एखाद्या हुशार दिग्दर्शकाला चित्रीकरणाच्या विविध टप्प्यावर त्यात काही चांगले बदल सुचतात, नवीन कल्पना समाविष्ट कराव्याशा वाटतात. तात्पर्य, पटकथा-संवादाच्या बाबतीत एकच हुकमी फूटपट्टी लावून, काम करता येत नाही. ‘मी माझ्या पटकथेत एका ओळीचाही बदल करणार नाही,’ असा हट्ट धरणारे गुणी लेखक अशा वृत्तीमुळेच या क्षेत्राबाहेर फेकले गेले. या क्षेत्रात अगदी सर्जनशील कामातही काही तडजोडी कराव्या लागतात. पटकथेत रेल्वेच्या टपावर मारधाड असली तरी त्यासाठी गाडीच मिळाली नाही अथवा गाडी मिळूनही बजेट परवडले नाही तर पटकथेत फेरफार करावेच लागतात. कित्येक छोटय़ा-छोटय़ा संदर्भातील तडजोड करीतच पटकथाकार पुढे सरकत असतो.
तात्पर्य, सिनेमाच्या जगातील कामाची पद्धत विचारात घेऊनच इच्छुक पटकथाकार व संवाद लेखकांनी येथे पाऊल टाकावे.
पण एवढय़ावरच हा विषय संपत नाही. एकदम थेट पटकथाकार होण्यापूर्वी एखाद्या गुणी पटकथाकाराकडे काही काळ सहाय्यक म्हणून उमेदवारी करणे उत्तम! त्यात कसलाही कमीपणाही मानू नये. कारण, त्यातूनच काही गोष्टी शिकता येतात. एक म्हणजे, महामालिकेचे लेखन करताना अगदी आदल्या रात्रीदेखील एक अख्खा भाग नव्याने लिहावा लागतो, यापासून अशाच एखाद्या महामालिकेतून एखाद्या व्यक्तिरेखेला कसे महत्त्व द्यायचे, यानुसार पुढचे बरेच भाग लिहावे लागतात, याची कल्पना येते. चित्रपटाच्या संदर्भात सांगायचे तर अत्यंत हुशार दिग्दर्शकापासून नाठाळ दिग्दर्शकापर्यंत सगळ्यांनाच कसे हाताळायचे हेही या उमेदवारीच्या काळात जाणून घेता येते. प्रत्यक्ष कसदार लेखनापेक्षा या क्षेत्रात हे असे अन्य गुण (अवगुण) बरेच कामाला येतात. तसेच बरेचसे आजचे यशस्वी पटकथा-संवादलेखक हे सुरुवातीला काही काळ असेच कोणाकडे तरी धडे घेत होते, असे लक्षात येते. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी व कसदार पटकथालेखक सलीम-जावेद जोडीपैकी सलीम सुरुवातीला अभिनयाच्या क्षेत्रात होते. तेव्हा त्यांनी या क्षेत्राची कार्यप्रणाली आत्मसात केली. ‘हाथी मेरे साथी’च्या वेळी राजेश खन्नाने सलीमच्या जोडीला जावेदला आणून त्यांना संवादलेखक म्हणून उभे केले. असो.
एक तर एखाद्या नियमित (वा नामांकित) पटकथाकाराकडे उमेदवारी करा अथवा आपल्या प्रचंड निरीक्षण शक्तीच्या गुणावर चित्रपटाचे माध्यम समजावून घेऊन मग पटकथा लेखन करा. अर्थात, कथेचे दृश्य माध्यमात रूपांतर म्हणजे पटकथा व त्यातील व्यक्तिरेखांनुसार संवादलेखन असे हे स्वतंत्र प्रकार आहेत. सध्याच्या वाढत्या निर्मितीच्या पिकात चित्रपट व मालिकांच्या जगात सर्वसाधारण दर्जाचेही लेखक (?) बराच काळ तग धरून असल्याचे दिसते, म्हणून आपलाही निभाव लागेल, असा गैरसमज करून घेणे चुकीचे आहे. विशेषत: मराठीत आशयपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीला प्राधान्य असल्याने तिथे दर्जा महत्त्वाचा ठरतो. पटकथा व संवाद लेखन या दोन स्वतंत्र कामांसाठी येथे येऊ इच्छिणाऱ्यांनी या वस्तुस्थितीची जाणीव ठेवणे उत्तम.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा