स्पर्धा परीक्षा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दोन परीक्षा प्रामुख्याने उभ्या राहतात. त्या म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी. पण या परीक्षांचे स्वरूप असे आहे की, प्रत्येक इच्छुक उमेदवार या परीक्षांमध्ये यशस्वी होईलच, असे नाही. या परीक्षा देताना सरकारी नोकरी सोडून दुसरी नोकरी करायची इच्छाही नसते. काही जणांनी या परीक्षांसाठी आधीची नोकरी सोडलेली असते. काही जणांनी वयाची पंचविशी ओलांडलेली असते. अशा वेळेला स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी नुकतीच सुरू केलेल्या विद्यार्थ्यांनाही सरावासाठी ही परीक्षा हा एक उत्तम मार्ग आहे.
SSC-CGL २०१४ ची जाहिरात ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१४ आहे . यातील पहिल्या टप्प्याची परीक्षा (Tier -I) २४ एप्रिल २०१४ रोजी आहे.
या परीक्षेद्वारे केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘ब’ प्रवर्गातील (ग्रूप बी) पदांसाठी निवड होते. यामध्ये आयकर निरीक्षक, अबकारी कर (एक्साइज) निरीक्षक, सीमा शुल्क अधिकारी (कस्टम्स), सीबीआय उपनिरीक्षक तसेच केंद्र सरकारच्या रेल्वे, पोस्ट आणि इतर खात्यांमध्ये किंवा केंद्रीय सचिवालयातील विविध पदे यांचा समावेश होतो. येथे बढतीच्या चांगल्या संधी असून केडर रिस्ट्रक्चरिंगचा लाभ अनेक पदांना होऊ शकतो. सहाव्या वेतन आयोगामुळे या पदांना मिळणारे वेतनही चांगले आहे. मुख्य म्हणजे यूपीएससी वगळता केंद्रातील नोकरीकरता अन्य चांगले पर्याय उपलब्ध नाहीत.
या पदांसाठी वयोमर्यादा सर्वसामान्य प्रवर्गासाठी २७, ओबीसीसाठी ३० तर एससी/एसटीसाठी ३२ अशी आहे. त्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेचा विचार लवकर करणे आवश्यक ठरते. यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा देत असतानाच ही परीक्षा द्यावी, याचे कारण या परीक्षांच्या तयारीसाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही.
ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. पूर्व परीक्षा (Tier-1), मुख्य परीक्षा (Tier-2) आणि मुलाखत. या परीक्षेचे एक वैशिष्टय़ म्हणजे पूर्वपरीक्षेचे गुण हे अंतिम निवडीसाठी गृहीत धरले जातात. त्यामुळे पूर्वपरीक्षेत जर चांगली आघाडी मिळवता आली तर पद मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित असते. पूर्व परीक्षेत आकलन, सामान्य ज्ञान, क्वान्टिटेटिव्ह अॅप्टिटय़ूड आणि इंग्रजी उतारे या चार विषयांवर (प्रत्येकी ५० गुण ) वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. एकूण २०० गुणांची ही पायरी असते. यापकी सामान्य ज्ञान आणि इंग्रजी उतारे या भागात यूपीएससी आणि एमपीएससी देणाऱ्या मुलांना चांगले मार्क मिळू शकतात. कारण या भागाचे CSAT साधम्र्य असते.
मुख्य परीक्षा गणित आणि इंग्रजी (प्रत्येकी २०० असे ४०० गुण) यावर आधारित असते.
मुलाखतीला १०० गुण असतात. निवड होताना मुलाखतसुद्धा महत्त्वाची ठरते. काठावर असणारा एखादा उमेदवार मुलाखतीमधील चांगल्या मार्काच्या आधारे अंतिम यादीत चमकू शकतो. मुलाखतीत उमेदवाराच्या ज्ञानापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्त्वाकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे देहबोली, प्रामाणिकपणा, नम्रपणा, विचारातील स्पष्टता याकडे लक्ष दिले जाते.
त्याचप्रमाणे इथल्या मुलाखतीचा अनुभव यूपीएससी आणि एमपीएससीसाठीच्या मुलाखतीला उपयोगी पडतो. अशी एकूण ७०० गुणांची परीक्षा आहे.
या परीक्षेचा अर्ज भरताना विशेष काळजी घ्यायला हवी. कारण आपण ज्या पदांसाठी अर्ज भरणार असू त्यांची विभागणी खाली दिली आहे. त्या समोर नोटिफिकेशनमधील जॉब कोड समोर दिलेले आहेत. वृत्ती, आवड आणि सुविधा पाहून पदांना प्राधान्य द्यावे. आपण याआधी अर्ज भरलेला असल्यास नव्याने अर्ज भरू शकता आणि आपला अद्ययावत अर्ज स्वीकारला जातो, असे काही माहितीस्रोतांकडून कळते .
० एसएससी-सीजीएल २०१४ करिता दोन प्रकारची पदे आहेत :
* फिल्ड जॉब्स (इन्स्पेक्टर- इन्कम टॅक्स, एक्साइज, प्रीव्हेन्टिव्ह ऑफिसर्स, एक्झामिनर्स), सीबीआय, नारकोटिक्स.
* डेस्क जॉब्स (असिस्टंटस्, ऑडिटर्स, अकाऊंटंटस् आणि अपर डिव्हिजन क्लार्क (यूडीसी)
० मुलाखत अनिवार्य असलेली पदे आणि मुलाखत नसलेली पदे T,V,Z,U,W,X,Y,@,#,$)
० अ) दिल्ली कार्यालयातील पदे (D, A, H, G)
ब) परदेशी कार्यालयात काम करण्याची संधी असलेली पदे (F आणि E )
० स्टॅटिस्टिक्सशी निगडित पदे. (R आणि $)
० जॉब कोड B ,C ,O ना प्रतिष्ठेसह प्रामाणिकपणे काम करण्याची संधी आणि बढती मिळते. मुंबई-पुणे-नागपूर शहरात काम करू इच्छिणाऱ्यांना M,J,L आणि K हे जॉब कोड उत्तम आहेत.
परीक्षेची तयारी
० उत्तम गणिती कौशल्य, इंग्रजीवर प्रभुत्व, कमीत कमी वेळात प्रश्न सोडवण्याची कला यश मिळवून देतात. तथापि, इंग्रजी कच्चे असल्यास इतर घटक (आकलन, सामान्य ज्ञान, गणन क्षमता) कमीत कमी वेळेत सोडविता आले पाहिजे. तसेच गणित कच्चे असल्यास इतर भागातील प्रश्न उत्तमरीत्या सोडविता आले पाहिजे.
० उत्तम अभ्यास साहित्य, योग्य मार्गदर्शन आणि भरपूर सराव.
० वेळेचे व्यवस्थापन जमण्यासाठी सराव करावा.
० परीक्षार्थीनी उजळणीवर भर द्यायला हवा. जर परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ असेल तर अभ्यासात मनन-चिंतन या टप्प्यांना विशेष महत्त्व असते.
कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षांची तयारी
स्पर्धा परीक्षा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दोन परीक्षा प्रामुख्याने उभ्या राहतात. त्या म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससी.
आणखी वाचा
First published on: 10-02-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Staff selection commission exam preparation