मंदार देशपांडे हा युवा अभियंता वर्धा जिल्ह्य़ातील आमगाव या गावी गेली अडीच र्वष शेतीआधारित आणि पर्यावरणस्नेही जीवन जगत आहे. शेती आणि ग्रामोद्योग आधारित जीवनशैलीला अंगीकारत स्वावलंबनाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. त्याविषयी..
शेतमालाला भाव नाही, वाढणारी महागाई, शेतकरी आत्महत्या, अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा एक ना अनेक समस्यांना शेतकरीवर्गाला तोंड द्यावे लागते. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही सरकारने कृषीविषयक अनेक योजना जाहीर केल्या आहेत. परंतु शेतमालाचा भाव, महागाई किंवा बजेट यांसारख्या गोष्टींची फारशी तमा न बाळगता एक तरुण आणि त्याचा परिवार वाटचाल करत आहेत शेती आणि ग्रामोद्योग आधारित जीवनशैलीच्या आणि स्वावलंबनाच्या दिशेने. त्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाविषयी..
वय वर्ष ३०. या तरुण इंजिनीअर शेतकऱ्याचे नाव आहे मंदार देशपांडे. वर्धा जिल्ह्य़ातील आमगाव या गावी मंदार आणि त्याचं कुटुंब गेली अडीच र्वष शेतीआधारित आणि पर्यावरणस्नेही जीवन जगत आहेत. मंदार मूळचा बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथचा. वडिलांची नोकरी लातूर येथे असल्याने मंदारचे अभियांत्रिकीपर्यंतचे शिक्षण लातूर येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय, असा प्रश्न मंदारसमोर पडला होता. पण नोकरी करायची नाही, हे बऱ्यापकी ठरले होते. कारण या चक्रात अडकणे मंदारला मान्य नव्हते आणि ते त्याच्या स्वभावालाही न पटणारे होते. शिक्षण पूर्ण होईपर्यंत घरात चालू असणाऱ्या चर्चा आणि विचारांचा प्रभाव मंदारवर पडत होता आणि त्यातूनच शेती करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला आणि मंदारच्या या निर्णयाला त्याच्या कुटुंबाकडून पूर्ण पािठबा होता.
वडिलांच्या पािठब्यामुळेच आपण या दिशेने वाटचाल करत असल्याचे मंदार नमूद करतो. साधारण १९८५-१९९० च्या काळात जेव्हा आपल्या देशात संगणकीकरणाचा विचार सुरू होता, तेव्हा याबाबतीत विचार करताना मंदारच्या वडिलांना असे लक्षात आले की, पुढील काळात सर्वाना नोकरी मिळणे कठीण तर होईलच, पण त्याचबरोबर शहरातील नोकरीचे जीवन अधिक ताणतणावाचे होईल. परंतु एकटय़ाने विचार करण्यापेक्षा अनेकांनी मिळून केलेला विचार अनेक पलूंना समोर आणत असतो आणि या विचारातूनच स्थापना झाली ‘सन्मित्र मित्र मंडळाची’. विचारांना प्रामुख्याने स्थान असल्याने या मंडळात विविध जातीय, धर्म, पंथ, क्षेत्रांतील लोकांचा सहभाग होता. सर्वाना एकत्र मिळून पुढे जाता यावे, याकरता मंडळाच्या बठकीनंतर बठकीत झालेला विचार घरच्यांसमोर मांडणे आवश्यक असायचे. आणि अशातच मंदारच्या वडिलांनी घरात एक क्रांतिकारी विचार मांडला. तो म्हणजे, मंदारने दहावीनंतर प्रचलित शिक्षण सोडून द्यावे आणि उद्योग करावा. परंतु मंदारला हे पटले नाही आणि त्याने पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. बारावीत चांगले मार्क्स मिळाल्याने त्याने अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. परंतु शिक्षण सुरू असताना सन्मित्र आणि आणखी काही व्यक्तींच्या विचारांचा मंदारवर प्रभाव पडत होता.
याचदरम्यान, पर्यावरणीय जीवनशैलीचे अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांचे काही विचार आणि पुस्तके त्याच्या वाचनात आली आणि त्यातूनच सध्याच्या उपभोगवादी जीवनशैलीचे पर्यावरणीय दुष्परिणाम, मानवी आरोग्यावरील शारीरिक-मानसिक परिणाम आणि एकंदरीतच सृष्टीचे बिघडणारे चक्र व त्यातील आपला सहभाग हे समजले. स्वत:च्या गरजा कमी करणे आणि मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे त्याला जाणवले. हे सर्व शुद्ध स्वरूपात कसे मिळवता येईल हा विचार करत असताना शेती हा पर्याय समोर आला आणि त्या दिशेने प्रवास सुरू करायचा असे ठरले. सन्मित्र मंडळातदेखील हा विचार सुरू होता आणि परस्पर सहकार्य, स्वावलंबन व अधिक स्वातंत्र्य या मानवीय जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा विचार करून चार सन्मित्रांनी परभणी जिल्ह्य़ातील गौर या गावी जून २००३ मध्ये प्रत्येकी तीन एकर या हिशोबाने शेती घेतली. जून २००३ मध्येच मंदारचे शिक्षणही पूर्ण झाले. नोकरी करायची नाही हे ठरले होतेच, पण शेतीची कुठलीही पाश्र्वभूमी, अनुभव आणि त्यावेळची शेतीची परिस्थती बघता आपण शेती करू शकू का, या जीवनशैलीत जगू शकू का, हे प्रश्नदेखील मंदारला सतावत होते. मग या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध सुरू झाला. ही उत्तरे शोधत असतानाच योगायोगाने धीरेंद्र व स्मिता सोने या दाम्पत्याबद्दल मंदारला माहिती मिळाली. स्वत: इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर असलेले धीरेंद्रभाई आणि एम.एस्सी. असलेल्या स्मिताताई या दोघांनी आपली अहमदाबाद येथे असलेली नोकरी सोडून खेडेगावात शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आज २६ वष्रे दोन एकर शेती व ग्रामोद्योगावर आधारित स्वावलंबी, आनंदी, उत्तम जीवन ते कुटुंबासहित जगत आहेत. सतत धडपड करण्याचा स्वभाव असणाऱ्या मंदारने धीरेंद्रभाई करत असलेले काम अधिक समजून घेण्याकरता गुजरातला भेट देण्याचा निर्णय घेतला. या भेटीदरम्यान आपणही असे जीवन जगू शकतो, हा आत्मविश्वास मंदारला मिळाला आणि तिथून परत आल्यानंतर मंदारने परभणी येथील शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. परंतु शेती करतानाही अनेक प्रश्न सतावत होते आणि त्यांची उत्तरे आणि विश्वास मिळत नव्हता. त्यामुळे धीरेंद्रभाई यांच्याकडे जाऊन शेती शिकण्याचा निर्णय झाला आणि मंदार त्यांच्याकडे सलग दीड वष्रे त्यांच्या घरातीलच एक सदस्य म्हणून राहून शेती शिकला. गुजरातला काम करत शिकत असताना मंदारचे प्रत्यक्ष जीवन शिक्षणच सुरू होते. कधीही न केलेली पेरणीपूर्व मशागत, िनदण, खुरपणी, कापणी, मळणी करणे सुरुवातीला कठीण जात होते, पण हार न मानता ती कामे मंदार निर्धारपूर्वक करत राहिला. प्रत्येक गोष्टीकडे शिकण्याची संधी म्हणून पाहणे हा त्याचा दृष्टिकोन त्याला मदत करत होता. त्यामुळेच अगदी गावातून शेण गोळा करून आणणे अशी अनेक छोटी-मोठी कामे करताना त्याने कधीच कमीपणा बाळगला नाही. या दीड वर्षांंत शेतीवर आधारित जीवनशैली जगता येऊ शकते, हा आत्मविश्वास घेऊनच मंदार परतला. या दरम्यान गौर प्रकल्प काही कारणांनी बारगळला. परंतु मंदारने आणि त्याच्या कुटुंबाने शेतीवर आधारितच जीवनशैली जगण्याच्या केलेल्या ठाम निश्चयामुळे पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात शेतीचा शोध सुरू झाला. या शोधानंतर आमगाव (मदनी), जिल्हा वर्धा येथील जमीन घेण्याचा निर्णय घेतला गेला. हे संपूर्ण कुटुंब जून २०१० मध्ये आमगाव येथे राहण्यास आले.
शेतीवर आधारित जीवन का जगायचे, यामागील मंदारचा विचार अतिशय स्पष्ट आहे आणि तो त्याच्या बोलण्यातून वारंवार जाणवतो. शेतीतून स्वावलंबन म्हणजेच शेतीला आवश्यक असणारे बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांचे स्वावलंबन. सेंद्रिय शेती करत असल्याने शेणखत व काडीकचरा व्यवस्थापनातून, पीक व्यवस्थापनातून तसेच विविध पिके घेऊन जमिनीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न सध्या मंदार करत आहे. तसेच पावसाच्या पडणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनतूनच पाण्याची पातळी वाढवणे आणि टिकवणे याचा प्रयत्नही करणार आहे. मंदारच्या मते, प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याजवळील पाच टक्के जमीन स्वत:ला लागणाऱ्या पिकांसाठी ठेवून उरलेल्या जमिनीतून आवश्यक आíथक गरजेची पूर्तता करणे गरजेचे आहे. या पद्धतीने आनंदी, समाधानी, समृद्ध जीवन जगणे शक्य आहे असे त्याला वाटते. शेतीतून स्वावलंबन झाल्यानंतर ग्रामोद्योगातून आíथक गरजांची पूर्तता करण्याचा त्याचा विचार आहे. आणि याचीच सुरुवात म्हणून मंदारने गेल्या वर्षी लाल अंबाडी सरबत पावडर, लाल अंबाडी पाचक गोळी, मसाला बोरं, पेरूचे चॉकलेट अशी उत्पादने तयार केली आणि आज पुण्या-मुंबईच्या ग्राहकांपर्यंत ही उत्पादने मंदार पोचवत आहे.
या वाटचालीदरम्यान मंदारचा संपर्क डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी युवकांनी अर्थपूर्ण जीवन जगावे याकरिता सुरू केलेल्या ‘निर्माण’ या युवा चळवळीशी आला. याद्वारे त्याला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचे मार्गदर्शन मिळत आहे. विनोबांनी केलेल्या स्वभाव-स्वधर्म-युगधर्म या मांडणीतून स्वत: अशी जीवनशैली जगत असताना इतर शेतकऱ्यांनाही अशी जीवनशैली जगण्यासाठी विश्वास वाटावा यासाठी वेळोवेळी योग्य ते बदल करणे गरजेचे आहे; जेणेकरून परिवर्तन घडणे सोपे जाईल ही दृष्टी मंदारला मिळाली. तसेच समविचारी मित्रांची साथ मिळाली. याचसोबत गांधीजी-विनोबा यांच्या विचारांचे वाचन आणि गांधीजी-विनोबांनी मांडलेल्या विकेंद्रीतता, साधी राहणी, गाव स्वावलंबन, परस्पर सहकार्य, जगण्यातून मूल्य निर्मिती आणि जगताना तीन एच – (ऌंल्ल-िऌीं१३-ऌीं)ि या विचारांना आपलेसे करत जगण्याचा प्रयत्न मंदार करत आहे.
‘सामाजिक काम मोठय़ा प्रमाणात करण्यापेक्षा आपल्या जीवनातील बदलासाठी सातत्याने प्रयत्न करत राहायचे आहे. चांगल्या पद्धतीने, आनंदाने, सहज पद्धतीने जीवन आपण जगू लागलो तर त्यातून समाज काही घेऊ शकतो. तेही एक सामाजिक काम ठरू शकते. आपण स्वत: बदल करून वागू लागल्यानंतर त्यासंबंधी जरी इतरांना सांगू लागलो तर नक्कीच प्रभाव जास्त पडतो आणि बदलाची शक्यता वाढते. स्थानिक स्तरावर काम करण्याचा गांधीजींचा विचार मला अधिक भावतो. ते जास्त मूलभूत काम आहे आणि सातत्याने तसे प्रयत्न केल्यास बदल निश्चित घडू शकतो,’ असे ठाम मत आणि विश्वास मंदारचा आहे. याचेच प्रत्यंतर असे की, मंदार ज्या गावी राहतो, त्याच गावी पुढील एका वर्षांत त्याचे तीन मित्र येऊन राहण्याचा विचार करत आहेत.
या आत्तापर्यंतच्या प्रवासात मंदारच्या कुटुंबाची अतिशय मोलाची साथ त्याला मिळाली आहे, पुढेही मिळत राहील. गेल्या १०-१२ वर्षांत घरात झालेल्या चर्चा, वातावरण याचा प्रभाव मंदारच्या लहान बहिणीवरही पडला आहे. आणि म्हणूनच आजच्या शेतीसाठी अवघड असणाऱ्या परिस्थितीत आणि शेतकऱ्याला सहसा मुलगी न देण्याची मानसिकता असतानाही शेतीवर आधारितच जीवन जगण्याचा कौतुकास्पद निर्णय मंदारच्या बहिणीने घेतला आहे. चांगल्या आणि संतुलित जीवनाच्या विचारपूर्वक चालू असलेल्या प्रवासात मंदार समाधानी आहे आणि हे समाधान त्याच्याशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर दिसते. अजून अनेक प्रश्न आहेत, अनेक आव्हाने आहेत पण या सर्वाना सामोरं जाण्याची मंदारची तयारी आहे. त्याचा हा निश्चय त्यानेच सांगितलेल्या दोन ओळींतून दिसतो-
‘निश्चय-निष्ठा-नीती यांचे कंकण बांधून हाती
व्रतस्थ होऊनी व्यापून टाकू विश्वाच्याही मिती ’ ल्ल
संपर्क : मंदार देशपांडे- ेंल्लिं१9999@ॠें्र’.ूे
ूं१ी१.५१४३३ंल्ल३@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे
शेती व ग्रामोद्योग आधारित जीवनशैलीच्या दिशेने..
मंदार देशपांडे हा युवा अभियंता वर्धा जिल्ह्य़ातील आमगाव या गावी गेली अडीच र्वष शेतीआधारित आणि पर्यावरणस्नेही जीवन जगत आहे. शेती आणि ग्रामोद्योग आधारित जीवनशैलीला अंगीकारत स्वावलंबनाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. त्याविषयी..
आणखी वाचा
First published on: 11-03-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of mandar deshpande for self employment in farming