आज अनेक विद्यार्थी हे एकल आयुष्य जगताना दिसून येतात. कोणाशीही वैचारिक संवाद साधत नाहीत. समाजात रुळत नाहीत. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य कमकुवत असल्यास त्याचा परिणाम आपोआप शैक्षणिक प्रगतीवर होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य जपण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींशी, मित्र-मैत्रिणींशी सातत्याने संवाद करायला हवा. तसेच एकाग्रता आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी योगासनेदेखील करायला हवी असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मुलांमध्ये अनेकदा अभ्यासाविषयी आणि गुणांविषयी भीती दिसून येते. परंतु, जितकी अधिक भीती तितके कमी गुण हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. अभ्यास करताना एखाद्या विषयाची भीती बाळगल्यास स्मरणशक्ती कमी होते. स्मरणशक्ती कमी झाल्याने गुण कमी मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांनी कायम एकाग्रतेने अभ्यास करायला हवा. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालकांमध्ये जर विसंवाद असेल तर पाल्यांवर त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक वाढीसाठी घरात खेळीमेळीचे वातावरण अत्यंत पोषक असते. अशा चांगल्या वातावरणात विदयार्थी कोणत्याही तणावाशिवाय अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करू शकतात. अनेक पालक आपल्या पाल्याची इतर मुलांसोबत कायम तुलना करताना दिसतात. मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परस्पर तुलना करणे गैर आहे. तुलनेमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास कमी होऊन ते निराश होतात. या सर्व गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसून येतो. यामुळे पालकांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत डॉ. शेट्टी यांनी व्यक्त केले.
मात्र पालक देत असलेल्या स्वातंत्र्याचा मुलांनीही गैरफायदा घेऊ नये, असे मतही डॉक्टर शेट्टी यांनी नोंदवले. करिअर निवडताना पालकांनी आपले मत विद्यार्थ्यांवर थोपवू नये. त्यांना ज्यामध्ये करिअर करण्याची आवड आहे ते समजून घ्यावे. विद्यार्थ्यांची आवड भविष्याच्या दृष्टीने योग्य असेल तर पालकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. परंतु आपले मूल करिअर निवडीबाबत संभ्रमात असेल तर चिडचिड करण्याऐवजी सामंजस्याने संवाद साधावा. यामुळे पालक आणि मुलांमध्ये एक विश्वासाचे नाते तयार होते. यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा करिअर निवडताना कोणताही तणाव राहात नाही असे डॉ. शेट्टी यांनी सांगितले.