महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी राज्य सरकारच्या सेवतील सुमारे २१ संवर्गातील प्रवर्ग-२, प्रवर्ग-१, तसेच पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक, साहाय्यक भरतीसाठी परीक्षा घेतली जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या स्पर्धापरीक्षेला दरवर्षी सुमारे तीन-चार लाख विद्यार्थी बसतात. यातील अनेक विद्यार्थी जाणीवपूर्वक तयारी करून परीक्षेला बसतात. परीक्षार्थींच्या मोठय़ा संख्येमुळे स्पर्धा ही अटीतटीची असते. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीला जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकी यश मिळण्याची शक्यता अधिक असते. जर आपण पदवी परीक्षेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षांला असताना परीक्षेची तयारी सुरू केली तर अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो आणि यश मिळण्याची शक्यता वाढते. मात्र, काही कारणाने पदवीच्या प्रथम किंवा दुसऱ्या वर्षांला असताना तयारी करणे शक्य झाले नाही तर परीक्षेला बसण्याआधी किमान वर्षभर तरी या परीक्षांची तयारी करणे योग्य ठरते.
सर्वप्रथम राज्य पाठय़पुस्तक मंडळाची इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतची सर्व पुस्तके दोन ते तीन वेळा वाचावीत. मागच्या काही वर्षांत आयोगाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण केल्यास असे जाणवते की, साधारणत: २५ ते ३० टक्के प्रश्न हे या अभ्यासक्रमावर बेतलेले असतात.
राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी संदर्भ ग्रंथ
० चालू घडामोडी- या उपघटकाच्या तयारीसाठी दररोज काही अग्रगण्य दैनिकांचे वाचन करून त्यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांचे टिपण काढल्यास त्याचा नक्कीच उपयोग होतो.
० इतिहास- इतिहासाचा अभ्यास करताना सुरुवातीला क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे.
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तकांचा आधार घ्यावा. संदर्भपुस्तके: आधुनिक भारताचा इतिहास – बिपीनचंद्रा (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.) आधुनिक भारताचा इतिहास – ग्रोवर अॅण्ड ग्रोवर (हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे.)
० भूगोल – सर्वप्रथम इ. पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. संदर्भपुस्तके: भारताचा भूगोल- प्रा. ए. बी. सवदी, महाराष्ट्राचा समग्र भूगोल-
प्रा. ए. बी. सवदी
० पर्यावरण व परिस्थितिकी या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा वापरही करता येईल.
संदर्भपुस्तक: पर्यावरण व परिस्थितिकी – आपले पर्यावरण- (प्रकाशक- नॅशनल बुक ट्रस्ट)
० भारतीय राज्यघटना – इ. अकरावी आणि बारावीची क्रमिक पुस्तके वाचावीत. संदर्भपुस्तके: भारतीय राज्यघटना – एम. लक्ष्मीकांत (इंग्रजी).
आपली संसद – डॉ. सुभाष कश्यप (मराठीत भाषांतरित).
० आíथक व सामाजिक विकास- अकरावी-बारावीची क्रमिक पुस्तके. संदर्भपुस्तके: भारतीय अर्थव्यवस्था – प्रतियोगिता दर्पण (हे िहदीत तसेच इंग्रजीत उपलब्ध आहे. या पुस्तकातील अखेरीस नमूद केलेले प्रश्न अवश्य वाचावेत.) महाराष्ट्राची आíथक पाहणी.
० विज्ञान आणि तंत्रज्ञान- इ. सहावी ते इ. दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तके वाचावीत. संदर्भपुस्तके: स्पेक्ट्रम पब्लिकेशनची इंग्रजी पुस्तके. पुस्तकांव्यतिरिक्त योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकांमधील अभ्यासक्रमासंदर्भातील लेख अवश्य वाचावेत.
सी सॅट पेपर २ ची तयारी कशी करावी?
राज्यसेवेच्या परीक्षेत जेव्हा अभ्यासक्रम बदलला तेव्हापासून सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. हा पेपर २०० गुणांचा असून ८० प्रश्न दोन तासांत सोडवावे लागतात. गेल्या दोन वर्षांच्या निकालांचा अभ्यास केल्यास असे स्पष्ट होते की, ज्या विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये गती होती, त्यांना हा पेपर सोडवणे सोपे गेले. या पेपरची तयारी करताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक गरसमज आहेत. उदा. सी सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर. या पेपरमध्ये गणित हा एक उपघटक आहे. गणितावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे; मात्र ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये गती नसेल त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते की, साधारणत: ८० प्रश्नांपकी ४० ते ५० प्रश्न आकलन या उपघटकावर होते, तसेच पाच प्रश्न निर्णयक्षमतेवर होते. म्हणजे थोडक्यात गणित या उपघटकाचा संबंध अत्यंत कमी येतो. या पेपरमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी अधिकाधिक सराव करणे आवश्यक ठरते. यात आकलन या महत्त्वाच्या उपघटकाचा अभ्यास करण्यासाठी वाचनवेग वाढवावा. अग्रगण्य दैनिकांतील संपादकीय लेखांचे वाचन करावे. वाचन झाल्यानंतर त्या लेखात विश्लेषणात्मक पद्धतीने मांडलेल्या मतांचा, विचारांचा अभ्यास करावा. असे केल्यास आपली आकलनक्षमता वाढते आणि याचा आपल्याला परीक्षेत उपयोग होतो. या पेपरमधील बुद्धिमत्तेविषयीच्या प्रश्नांची तयारी करताना सामान्य मानसिक क्षमता, आकृत्यांवरील प्रश्न, व्हेन आकृतीवरील प्रश्न, त्रिकोन, चौकोन मोजणे, दिशाबोध, नाते संबंधावरील प्रश्न, दिनदíशका, घडय़ाळ व वयासंबंधित प्रश्न, आरशातील प्रतिमा, जलप्रतिमा, घन व सोंगटय़ांवरील प्रश्न यांची तयारी करावी.
० जनरल मेन्टल एबिलिटी अॅण्ड बेसिक न्युमरसी (गणित)-
या घटकांतर्गत गणिताच्या काही संकल्पना येतात. उदा. काळ, काम, वेग यांवरील उदाहरणे, आगगाडीशी संबंधित उदाहरणे, बोटीशी संबंधित उदाहरणे, मांडणीसंदर्भात काही उदाहरणे, तसेच या घटकाचा अभ्यास केल्यानंतर अभ्यासक्रमात नमूद केलेल्या डाटा इंटरप्रिटेशन या घटकाचीही तयारी होऊन जाते. या घटकाची तयारी करण्यासाठी पाचवी ते दहावीपर्यंतची राज्य पुस्तक मंडळाची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत. ‘सिक्स्टी डेज वंडर इन मॅथ्स’ या पुस्तकाचीही मदत होईल. मात्र या उपघटकाची तयारी करण्यासाठी अधिकाधिक सरावाची आवश्यकता आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेबरोबरच पीएसआय व एसटीआयची तयारी करत असतील त्यांनी या घटकाची तयारी नीट करावी.
इंग्रजीचे महत्त्व
एमपीएससी आणि यूपीएससीमध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत इंग्रजीचा पेपर असतो. मात्र, त्याच्या गुणांचा विचार अंतिम यादीसाठी केला जात नाही. मात्र या प्रश्नपत्रिकेत उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या प्रश्नपत्रिकेत नापास झाल्यास इतर पेपर तपासले जात नाहीत. मात्र, एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी १०० गुणांचा इंग्रजीचा पेपर अनिवार्य असतो. या पेपरचे गुण अंतिम यादीसाठी धरले जातात, म्हणून एमपीएससीच्या दृष्टीने या पेपरचे महत्त्व अधिक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहून मुख्य परीक्षेच्या दृष्टीने या पेपरची तयारी करावी. एखादे इंग्रजी नियतकालिक नियमितपणे वाचणे तसेच दररोज इंग्रजीत लिहिण्याचा सराव करणे उपयुक्त ठरते.
अनिवार्य मराठीची तयारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत मराठी व इंग्रजीचे दोन पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे- १०० गुणांसाठी असतात. यातील गुण अंतिम यादीत धरले जातात, म्हणून चांगले गुण प्राप्त करून अंतिम यादीत निवड होण्यासाठी या पेपरच्या गुणांचे महत्त्व अधिक आहे. मराठी भाषा मातृभाषा असल्याने अनेक विद्यार्थी या पेपरला गृहीत धरतात; मात्र तयारी करताना सर्वप्रथम आयोगाच्या अभ्यासक्रमाचे बारकाईने अवलोकन करावे. आपले हस्ताक्षर सुवाच्च असावे. मराठीच्या पेपरमध्ये निबंधाचा महत्त्वाचा उपघटक आहे. या उपघटकाची तयारी
करताना वेळोवेळी निबंध लिहून ते तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. परीक्षेत विचारले जाणारे निबंध वैचारिक, कल्पनात्मक, आत्मकथनपर किंवा ज्वलंत प्रश्नांवर आधारित असतात. या सर्व घटकांवर लिहिण्याचा सराव करावा. निबंध या घटकाव्यतिरिक्त पत्रव्यवहार, वृत्तांतलेखन यांसारख्या उपघटकांवरदेखील लिहिण्याचा सराव करावा. भाषांतरावरही एक प्रश्न असतो. इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर करायचे असते. यासाठी सर्वप्रथम तो उतारा समजून घेऊन त्याचा आशय लक्षात घेऊन नेमक्या शब्दांमध्ये त्याचे भाषांतर करणे आवश्यक असते.
grpatil2020@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा