केंद्रीय लोकसेवा आयोगाने अलीकडेच जाहीर केलेल्या  यूपीएससी परीक्षेच्या निकालात राज्यातील विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश आणि ते वाढावे, यासाठीचे आवश्यक ठरणारे प्रयत्न, यासंबंधीचे विश्लेषण-
केंद्र लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेच्या नुकत्याच जाहीर केलेल्या (३ मे, २०१३) अंतिम निकालात महाराष्ट्रातील सुमारे ८० विद्यार्थी विविध गुणानुक्रमाने पात्र ठरले आहेत, ही बाब निशंकपणे गौरवास्पद आहे. आयोगाने यावर्षी भरती केलेल्या ९९८ जागांपकी सुमारे ८० विद्यार्थी हे महाराष्ट्रीय आहेत. देशात १५ वा आलेला कौस्तुभ दिवेगावकर ते ९९८ वी आलेली स्नेहल भापकर अशा विविध गुणानुक्रमे सुमारे ८० विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रशासकीय सेवा परीक्षेच्या अंतिम निकालावर मोहोर उठवली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांतील महाराष्ट्राचा निकाल पाहिल्यास आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या एकूण जागांपकी सुमारे आठ ते १० टक्के जागांवर महाराष्ट्रीय मुले पात्र होत आहेत हे लक्षात येते. अभ्यासाचे काटेकोर नियोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी, अभ्यासातील सातत्य, सराव चाचण्यांद्वारे नियमितपणे केलेले स्वयंमूल्यमापन आणि धीरोदात्त वृत्ती, जिद्द व मेहनत या गुणवैशिष्टय़ांच्या आधारेच या विद्यार्थ्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. अर्थात महाराष्ट्राला लाभलेला शैक्षणिक वारसा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची क्षमता यांचा विचार करता हे प्रमाण आणखी वाढले पाहिजे, यात शंका नाही. त्यासाठी विद्यार्थी-पालक, शिक्षण संस्था-विद्यापीठे, प्रकाशन संस्था, प्रसार माध्यमे आणि मार्गदर्शन संस्था अशा सर्व स्तरावर आणखी जोरदार प्रयत्न हाती घेणे गरजेचे आहे. तथापि, यावर्षी अंतिम यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचे यश साक्षेपी वृतीने लक्षात घेऊन त्याचे योग्य विश्लेषण केल्यास भारतीय प्रशासनातील मराठी टक्का वाढण्यास हातभार लागेल, हे नक्की!
गेल्या आठ-दहा वर्षांतील यूपीएससी परीक्षेच्या यशातील महाराष्ट्राचा आलेख हा आशादायी आहे, यात शंका नाही. विशेषत: या क्षेत्राची करिअर म्हणून निवड केलेल्या व याकडे नव्याने वळू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बाब सकारात्मक मानावी लागते. या परीक्षेसंबंधी उपलब्ध झालेले मार्गदर्शन; वरिष्ठ, यशवंतांच्या मार्गदर्शनाची परंपरा; पुरेशा संदर्भ साहित्याची उपलब्धता; त्यातही मराठी भाषेतून दर्जेदार मार्गदर्शन व संदर्भ साहित्याचा पुरवठा; परीक्षेत यशाचा वाढणारा आलेख; विशेषत बहुजन, ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश आणि या सर्व बाबींमुळे समाजात प्रशासकीय सेवेतील करिअरविषयी निर्माण होणारी जागृती इ. घटकांमुळे विद्यार्थी या क्षेत्राचा विचार करत आहेत. यासंदर्भात आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे २००५ नंतर वाढलेली पदांची संख्या. खाजगी क्षेत्रात २००९ पासून चालू असलेल्या मंदीच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक नोकऱ्यांचे वाढलेले हे प्रमाण नक्कीच महत्त्वाचे आहे.
केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील महाराष्ट्राचा यावर्षीचा निकाल पाहिल्यास पुढील ठळक आशादायी बाबी नव्या उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. पहिली बाब म्हणजे मराठी माध्यमातून परीक्षा देऊन पहिल्या शंभर आणि विशेषत: ५० क्रमांकात येणे अशक्य आहे, असा एक समज महाराष्ट्रात बऱ्याच काळापासून आहे. खरेतर भूषण गगराणी यांच्यानंतर अगदी अलीकडील उदाहरण घ्यायचे तर अजित जोशी (रँक २७), शीतल उगले (रँक ३७) आणि बालाजी मंजुळे (रँक ५६) यांनी मराठी माध्यमातून परीक्षा लिहून पहिल्या पन्नासात येण्याचा मान मिळवला. यावर्षी कौस्तुभ दिवेगावकर याने मराठी माध्यमातून परीक्षा लिहून देशात १५ वा क्रमांक प्राप्त केला. त्याशिवाय योगेश निरगुडे , प्रतिक ठुबे, हरेश्वर स्वामी, वैभव ढेरे, वैशाली पतंगे, वैभव अलदर, सुनिल अगवणे यांनी मराठीतून परीक्षा देऊन यश संपादन केले आहे. ही बाब मराठीतून तयारी करणाऱ्या आणि मराठीतून परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खचितच प्रेरणादायी आहे. वस्तुत: आपण कोणत्या भाषेतून परीक्षा देत आहोत यापेक्षा आपली तयारी कशी आहे? आपण कोणत्या दर्जाचे संदर्भसाहित्य वाचत आहोत? आणि महत्त्वाचे म्हणजे प्रभावी लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी लेखनाचा किती सराव करत आहोत, या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जे संदर्भ साहित्य मराठीतून उपलब्ध आहे, त्याबरोबरच इंग्रजीतील संदर्भ पुस्तके वाचावीत आणि तयारीचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा. असे केल्यास आपल्या तयारीचा एकंदर दर्जा उंचावेल आणि मराठी माध्यमातून लिहून देखील चांगला रँक प्राप्त करता येईल.
निकालासंदर्भातील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षीच्या यशस्वी विद्यार्थ्यांपकी दहापेक्षा अधिक विद्यार्थी पहिल्या प्रयत्नातच यशस्वी झाले आहेत. गेल्या काही वर्षांत पहिल्या प्रयत्नातच यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे. स्पर्धा परीक्षेविषयी पदवीकाळातच उपलब्ध होणारी माहिती, यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, मार्गदर्शन संस्थांचे सहाय्य, पदवी काळापासूनच परीक्षेच्या तयारीची सुरूवात इत्यादी घटकांमुळे गेल्या वर्षी देशात दहावा आलेला अमृतेश औरंगाबादकर असो की या वर्षीचे चिन्मय पंडित, अजिंक्य काळे, प्रसन्न दातार, ओंकार मोघे, तृप्ती शर्मा, पियुषा जगताप इ. विद्यार्थी असो, या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध तयारीच्या आधारे पहिल्या प्रयत्नातच यश मिळवले आहे. नियोजनबद्ध व नेमक्या अभ्यासाच्या आधारे पहिल्या प्रयत्नात आणि २१ व्या वर्षी या परीक्षांत यशस्वी होता येते, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.
पहिल्या प्रयत्नात यश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षित गुणानुक्रम (रँक) आणि पद मिळतेच, असे नाही. त्यामुळे असे विद्यार्थी पुन्हा परीक्षा देतात आणि दुसऱ्या प्रयत्नात अपेक्षित गुणानुक्रम व पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर काही विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात मुलाखतीपर्यंत जाऊन देखील अंतिम यादीत स्थान प्राप्त करू शकत नाहीत. असे विद्यार्थीही दुसऱ्या प्रयत्नात जोमाने तयारीला लागतात. तर असंख्य विद्यार्थी पहिल्या प्रयत्नातील अपयशामुळे दुसऱ्या प्रयत्नावर विशेष लक्ष केंद्रित करतात. यावर्षी देशात १५ वा आलेला कौस्तुभ दिवेगावकर, ९८ वी आलेली मृण्मयी जोशी, प्रतिक ठुबे (२४८) ही अशा उमेदवारांची प्रतिनिधीक उदाहरणे मानता येतात. यामुळे दुसऱ्या प्रयत्नात यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचेही प्रमाण वाढत असताना दिसून येते. थोडक्यात पहिल्या अथवा दुसऱ्या प्रयत्नातच प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करता येते, हा आत्मविश्वास दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत आहे.
यूपीएससीच्या अंतिम निकालात मुलींची वाढणारी संख्या हा पुढील महत्त्वाचा घटक ठरतो. महाराष्ट्राचा विचार करता बराच काळ, अनेक कारणांमुळे प्रशासकीय सेवा क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलींचे प्रमाण फारच कमी होते. अजुनही ते पर्याप्त प्रमाणात वाढलेले नाही. तथापि, गेल्या काही वर्षांत एकंदर देश आणि राज्य पातळीवर किमान काही मुली यूपीएससी परीक्षेत यशस्वी होऊ  लागल्यामुळे आता हे क्षेत्र मुलींसाठीही आकर्षण केंद्र ठरू पाहात आहे. त्यादृष्टीने विचार करता यावर्षी देशात २९ वी आलेली क्षिप्रा आग्रे, मृण्मयी जोशी (९८), नेहा देशपांडे (२०४), मोनिका पांडे (३७२), वैशाली पतंगे (४६९), प्रिया जाधव (५१५) तृप्ती शर्मा (६४७) दीपिका तांगडकर (७०८), पियुषा जगताप (७६२), स्नेहल भापकर (९९८) या विद्यार्थ्यांनींचे यश महत्त्वपूर्ण मानावे लागते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अतिशय प्रतिकूल सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक पाश्र्वभूमीतून येऊनसुद्धा काही विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत निभ्रेळ यश प्राप्त केल्याचे दिसून येते. विनोदकुमार गायकवाड (२०६), योगेश निरगुडे (१३०), हरेश्वर स्वामी (३३२), सुनिल आगवणे (८२८), मोतीलाल शेटे (६५१) आणि विश्वास जाधवर (९९५) या विद्यार्थ्यांचे यश  प्रतिकूल सामाजिक-आर्थिक परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरते.
प्रशाससकीय सेवा परीक्षेकडे एक आव्हानात्मक संधी या दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच आपले स्थिर झालेले करिअर सोडून जाणीवपूर्वक प्रशासकीय सेवेकडे वळणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. एका बाजूला अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी शिक्षण घेऊनदेखील त्या क्षेत्रात करिअर न करता सनदी सेवांचा मार्ग निवडणारे अनेक विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रात उच्च पदावर नोकरी करणारे अनेक उमेदवार समांतरपणे या परीक्षांची तयारी करत आहेत. दुसऱ्या बाजूला  बारावीनंतर जाणीवपूर्वक कला शाखेची निवड करून उपलब्ध वेळ यूपीएससीच्या तयारीसाठी वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. इतर शाखेत पदवी शिक्षण घेतानाच यूपीएससीची तयारी करणारेही बरेच विद्यार्थी दिसून येतात. सनदी सेवांच्या भरतीत झालेली वाढ, खासगी क्षेत्रातील मंदी; प्रशासकीय सेवांचे आव्हानात्मक स्वरूप; त्याद्वारे विविध विभाग व पदांवर कार्य करण्याची मिळणारी संधी; शासकीय पदांबरोबर येणारी सत्ता व प्रतिष्ठा; त्याद्वारे समाजात सकारात्मक हस्तक्षेप करण्याची मिळणारी संधी; सद्यस्थितीत प्रभावी व कार्यक्षमपणे कार्य करणाऱ्या अधिकारी व्यक्तींकडून मिळणारी प्रेरणा इ. अनेक घटकांमुळे अनेक उमेदवार नागरी सेवांकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षति होताना दिसत आहेत.
नागरी सेवा परीक्षांच्या यंदाच्या निकालात महाराष्ट्राचे स्थान लक्षात घेता सुधारणेस वाव आहे, यात दुमत होण्याचे कारण नाही. पहिल्या शंभर क्रमांकात किमान दहा विद्यार्थी तरी महाराष्ट्रातील असावेत. प्रशासकीय सेवांत मराठी मुलींचेही प्रमाण आणखी वाढले पाहिजे. मुस्लिम-दलित-आदिवासी समुहातील विद्यार्थ्यांचेही प्रमाण वाढणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे अंतिम यादीतील एकूण मराठी विद्यार्थ्यांची संख्या १०० पेक्षा अधिक झाली पाहिजे. यासाठी उपरोक्त भागात म्हटल्याप्रमाणे अनेक पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. २०११ मध्ये पूर्वपरीक्षेच्या स्वरूपात झालेला बदल आणि आता २०१३ पासून मुख्य परीक्षेत झालेला बदल, या दोन्ही बाबींना लक्षात घेऊन अभ्यासाचे नवे धोरण स्वीकारावे लागेल. त्यातही यावर्षीपासून लागू केलेल्या मुख्य परीक्षेतील आव्हानात्मक बदलांचे व्यवस्थित आकलन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यादृष्टीने या बदलाचे काळजीपूर्वक अवलोकन करून अभ्यासपद्धतीत समर्पक बदल करावा लागेल. तसे झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची दिशा नेमकी व अचूक राहील आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने या परीक्षेत यशस्वी होतील.   

Story img Loader