‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा..’ असं म्हणत पूर्वी लहानग्यांना घास भरवले जायचे, काऊचिऊच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. यामागचं कारण म्हणजे, हे पक्षी मोठय़ा संख्येने आजूबाजूला दिसायचे, लहानग्यांच्या ते सहज दृष्टीस पडायचे. पण आता काळ बदलला.. काऊचिऊची जागा टीव्हीवर दिसणाऱ्या कार्टून्समधल्या पात्रांनी घेतली. आपल्या गोष्टींमधून काऊचिऊ जसे हळूहळू हद्दपार झाले तसे ते आपल्या परिसरातूनही हद्दपार होऊ लागले. सध्या शहरांमधून चिमण्या फारशा दिसत नाहीत आणि साहजिकच ‘एक घास चिऊचा..’ असं म्हणताना कोणाकडे बोट दाखवायचं, असा प्रश्न निर्माण होतो.
मुंबईसारख्या शहरांमधून जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन दिसायला लागले. साहजिकच मोबाइल फोनमार्फत होणारं संदेशवहन सुलभ होण्यासाठी ठिकठिकाणी मोबाइल फोनचे टॉवर्स किंवा अँटेना उभारल्या जाऊ लागल्या. या अँटेनामार्फत प्रसारित होणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींना कुणी चिमण्यांच्या घटत्या संख्येसाठी जबाबदार धरलं. कुणाच्या मते, चिमण्यांची घटती संख्या हा ग्लोबल वॉर्मिगचा परिणाम आहे. कुणाच्या मते, वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांचे अधिवास धोक्यात आले, त्यांना घरटी बांधण्यासाठी योग्य अशा जागाच उरल्या नाहीत; तर कुणाच्या मते चिमण्या कमी होण्यामागे शहरांमधून वाढत असलेली ध्वनिप्रदूषणाची पातळी हेसुद्धा एक कारण आहे.
कारणं काहीही असोत, प्रश्न असा आहे की, आपल्याला चिमण्या हव्या आहेत का नकोत? जर आपल्याला चिमण्या हव्या असतील तर त्यासाठी आपण जाणीवपूर्वक काही प्रयत्न करणार आहोत की नुसत्याच चर्चा करत राहणार आहोत? चिमण्यांचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी जे एकांडे शिलेदार रचनात्मक कार्य करत आहेत, त्यापैकी एक आहेत डॉ. परेश रावल. पेशाने शिक्षक असलेले डॉ. रावल हे अहमदाबादचे रहिवासी आहेत. इंजिनीअरिंग पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या परेशभाईंना एका चर्चासत्राच्या निमित्ताने अहमदाबादमध्ये भेटण्याचा योग आला.
अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे परेशभाई तितकेच संवेदनशील आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या धाकटय़ा भावाच्या पत्नीचे निधन झाले. वयाने लहान असलेल्या दोन मुलांचं मातृछत्र हरवल्यामुळे परेशभाई अस्वस्थ झाले. त्याच काळात घरात अडगळीच्या जागी पडलेल्या फाटक्या बुटामध्ये चिमणीने घातलेली अंडी त्यांच्या दृष्टीला पडली. अंडी घालण्यासाठी, पिल्लांना वाढविण्यासाठी सुरक्षित जागाही मिळू नये, याचे परेशभाईंना वाईट वाटले. मातृछत्र हरवलेल्या आपल्या कोवळ्या पुतण्यांची अवस्था आणि वाढीसाठी सुरक्षित जागा न मिळालेल्या या पक्ष्यांच्या पिल्लांची अवस्था फारशी वेगळी नसल्याचं त्यांना जाणवलं. ‘‘या दोन घटनांमुळे चिमण्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळवून देण्याचा निश्चय पक्का झाला,’’ परेशभाई सांगत होते. ‘‘चिमण्यांकडे मुळातच उत्तम प्रतीची घरटी बांधण्याचं कौशल्य नाही. त्यातच घरटी बांधण्यासाठी सुरक्षित आणि योग्य जागा उपलब्ध न झाल्याने चिमण्या कुठेही घरटी बांधतात आणि आपल्या पिल्लांची सुरक्षितता पणाला लावतात. चिमण्यांना घरटं बांधण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे.’’
चिमण्यांना घरटं बांधण्यासाठी योग्य होतील अशी मातीची विशिष्ट आकाराची पाच हजार भांडी परेशभाईंनी कुंभाराकडून खास बनवून घेतली आणि आजूबाजूच्या लोकांना विनामूल्य दिली. या लोकांना त्यांच्या परिसरात ही भांडी बसवायला सांगितली आणि व्यक्तिश: स्वत: याचा पाठपुरावा करून चिमण्या या भांडय़ांमधून घरटी तयार करून अंडी घालतात का, ही अंडी उबवतात का, पिल्लांना वाढवतात का, ही भांडी सुरक्षित आहेत का अशा वेगवेगळ्या बाबींचे सर्वेक्षण केले.
जिथे परेशभाई जातात तिथे आपल्याबरोबर ते मातीची ही घरटीसदृश भांडी घेऊन जातात आणि इच्छुक व्यक्तीला विनामूल्य देतात. चिमण्यांना सुरक्षित आसरा मिळण्याच्या जास्तीत जास्त जागा निर्माण करणं हे एकच ध्येय परेशभाईंनी ठेवलं आहे. त्यांच्या गाडीतसुद्धा मातीची घरटी बसवण्यासाठी लागणारी तार, खिळे, हातोडा अशी सगळी साधनं असतात. ते म्हणतात, ‘‘काही जण आपल्या परिसरात मातीची ही घरटी बसवण्याची इच्छा व्यक्त करतात. मग त्यांच्याकडे गेल्यावर लक्षात येतं की, घरटं बसवण्यासाठी मजबूत अशी तार, खिळे हे साहित्य त्यांच्याकडे नाही. मग या क्षुल्लक कारणामुळे घरटी बसवण्याचं काम होत नाही. याकरिता माझ्या गाडीत हे सगळं सामान मी ठेवलेलं असतं.’’
आजपर्यंत परेशभाईंनी तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त मातीची घरटी करून घेऊन त्यांचं वाटप केलं आहे. या कामात त्यांना वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांनी मदत केली आहे. पण, परेशभाई या मदतीसाठी थांबून राहत नाहीत. स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून तेही घरटी तयार करून घेतात आणि इच्छुक लोकांना वाटतात. परेशभाईंच्या मते, त्यांनी निसर्गाला दिलेली ही ‘रिटर्न गिफ्ट’ आहे आणि प्रत्येकानेच आपापल्या परीने अशा प्रकारची ‘रिटर्न गिफ्ट’ निसर्गाला दिली तर पर्यावरणाचं संवर्धन आपोआपच होईल. ठिकठिकाणी व्याख्याने देऊन ते आपला हा विचार लोकांना पटवून देतात.
परेशभाईंनी केवळ ही मातीची भांडी तयार करून घेऊन त्यांचं वाटप केलं नाही तर आपल्याला आलेल्या अनुभवांमधून या भांडय़ांच्या आकारात आणि रचनेत वेळोवेळी बदलही केले आहेत. त्यासाठी त्यांनी चिमण्यांचं आणि त्यांच्या पिल्लांचं बारकाईने निरीक्षण केलं आहे. चिमण्या आणि त्यांच्या पिल्लांना जास्तीत जास्त सोयीची आणि सुरक्षित वाटतील अशी या मातीच्या भांडय़ांची रचना परेशभाईंनी केली आहे. काही वेळा त्यांना असंही आढळलं की, साळुंकीसारखे पक्षी मातीच्या भांडय़ातल्या चिमणीला हुसकून लावून ती जागा बळकावतात. मग परेशभाईंनी या भांडय़ांच्या रचनेत आणि त्याच्या उघडय़ा असलेल्या तोंडाच्या आकारात योग्य ते बदल केले. काही वेळा पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी कार्डबोर्डची किंवा पातळ लाकडापासून तयार केलेली खोकी वापरली जातात, पण परेशभाईंच्या मते, ही खोकी पावसात, जोरदार वाऱ्यात टिकाव धरू शकत नाहीत. वजनाला हलकी असल्यामुळे सोसाटय़ाच्या वाऱ्यात ती हेलकावे खातात. म्हणूनच, परेशभाईंनी मातीच्या घरटय़ांचा पर्याय स्वीकारला आहे. चिमण्यासुद्धा कार्डबोर्ड किंवा लाकडी खोक्यांपेक्षा मातीच्या भांडय़ात घरटी करणं जास्त पसंत करतात, असं परेशभाईंचं निरीक्षण आहे. थोडक्यात, विज्ञानाची पाश्र्वभूमी नसतानाही परेशभाईंनी निसर्गाचं बारकाईनं अवलोकन केलं आहे.
हे कार्य करत असताना परेशभाईंनी कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा ठेवली नाही, पण त्यांनी केलेल्या कार्यासाठी प्रा. अनिल गुप्ता यांच्या ‘सृष्टी’ या संस्थेतर्फे त्यांना गौरवण्यात आले आहे. परेशभाईंची अपेक्षा एकच आहे, जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत सहभागी व्हावे आणि ‘चकीरानी चकीरानी तमे रमवा आवसो के नाही, आवसो के नाही..’ हे गुजरातीतलं पारंपरिक बडबडगीत पुढच्या पिढीतल्या लहान मुलांच्या ओठांवर पुन्हा एकवार यावं.
चिमण्यांना हक्काचं घर देणारा शिक्षक
‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा..’ असं म्हणत पूर्वी लहानग्यांना घास भरवले जायचे, काऊचिऊच्या गोष्टी सांगितल्या जायच्या. यामागचं कारण म्हणजे, हे पक्षी मोठय़ा संख्येने आजूबाजूला दिसायचे, लहानग्यांच्या ते सहज दृष्टीस पडायचे. पण आता काळ बदलला.. काऊचिऊची जागा टीव्हीवर दिसणाऱ्या कार्टून्समधल्या पात्रांनी घेतली.
First published on: 14-11-2012 at 01:44 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher who gives home to squirrels