प्रकल्पासाठी योग्य विषय निवडण्यासाठी, प्रकल्पाची कार्यपद्धती ठरवण्यासाठी, प्रकल्पाला लागणारी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी तसंच निरीक्षणं घेण्याकरिता विद्यार्थ्यांना ठरावीक ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांची किंवा पालकांची मदत लागते. प्रकल्पाचा विषय निवडल्यावर त्या विषयाची अधिक माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं, वैज्ञानिक नियतकालिकं, गॅझेटस्, नकाशे, शासनातर्फे वेळोवेळी प्रकाशित झालेली माहिती व अहवाल, इंटरनेट वेब दालनं असे वेगवेगळे संदर्भ पाहणं आवश्यक ठरतं. हे संदर्भ विद्यार्थ्यांला उपलब्ध करून देण्यात पालक, शिक्षक आणि तज्ज्ञ मार्गदर्शकाची भूमिका महत्त्वाची ठरते.
प्रकल्पाचा विषय निवडल्यावर वैज्ञानिक कार्यपद्धती समजावून देणे, निरीक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती करून देणे आणि प्रकल्पाची एकंदर दिशा काय असावी, यासंदर्भात मार्गदर्शन करणे हे तज्ज्ञ मार्गदर्शकाचं काम असतं. मार्गदर्शक हा त्याच्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असतो. त्याचप्रमाणे अनेक तज्ज्ञांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक संशोधनदेखील केलेलं असतं. पण अशा वेळी एक मोठा धोका संभवतो. तो म्हणजे, विद्यार्थ्यांचा आवाका आणि त्यांचा पाठय़क्रम लक्षात न घेता प्रकल्पासाठी मार्गदर्शन केलं जातं. काही वेळा तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा असतात, ज्या विद्यार्थी पूर्ण करू शकत नाहीत.
विद्यार्थ्यांचा प्रकल्प उत्तम दर्जाचा व्हावा आणि प्रकल्प केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी, यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांचा आवाका, त्यांचा पाठय़क्रम, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, प्रकल्प करताना येणाऱ्या अडचणी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार मार्गदर्शन करणं आवश्यक आहे.
आपल्या मुलाला एखादा वैज्ञानिक प्रकल्प करायचा आहे, हे ऐकून काही वेळा पालकांमध्येच इतका उत्साह संचारतो की, त्या उत्साहाच्या जोशात ते स्वत:च प्रकल्प करायला घेतात. प्रकल्प मुलाला करायला सांगितलेला असतो, पण संपूर्ण प्रकल्प पालकच पूर्ण करून देतात. आपल्या मुलाला हे सगळं जमणार नाही किंवा त्याच्या हातून चुका होतील अशी भीती या पालकांना वाटत असते. प्रत्येक मूल हे धडपडत, चुका करतच शिकत असतं, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेळी आपली मतं विद्यार्थ्यांवर लादली जाण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे प्रकल्प करताना काही चुका होणं, काही गोष्टी करायच्या राहून जाणं, या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण जे काम तो विद्यार्थी करेल, मग भलेही ते तोडकंमोडकं असेल, कदाचित अपूर्णही असेल, पण ते काम त्याने स्वत: केलेलं असेल. या गोष्टीचं समाधान आपल्या मुलाला मिळू देण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलाला सांगितलेला प्रकल्प आपणच करून दिला तर आपण त्याला मिळणारा स्वनिर्मितीचा आनंद हिरावून घेत आहोत, ही जाणीव पालकांनी ठेवायला हवी. आता याचं दुसरं टोक म्हणजे, ‘घरात बसून सरळ अभ्यास करता येत नाही का?’, ‘हे काय नवीन खूळ काढलंय अभ्यासक्रमात?’, ‘प्रकल्प केल्यामुळे आमच्या मुलाला काय मिळणार?’, ‘प्रकल्प करण्यासाठी इतकी सगळी उठाठेव करावी लागत असेल तर प्रकल्प न केलेलाच बरा!’, ‘आमच्या वेळी हे असलं काही नव्हतं, कशाला हव्यात या नसत्या उठाठेवी?’ अशाही प्रतिक्रिया काही पालक व्यक्त करतात.
प्रकल्प करण्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे अनेक लाभ आहेत. पहिलं म्हणजे, जेव्हा प्रकल्पासाठी एखादा विषय निवडला जातो, तेव्हा आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या, हे शोधायला विद्यार्थी शिकतो. समस्या ओळखून त्या समस्येचा शास्त्रीय पद्धतीने वेध घेण्याची सवय विद्यार्थ्यांला लागते. त्याचप्रमाणे जेव्हा या संदर्भातली प्राथमिक माहिती विद्यार्थी मिळवतो, निरीक्षणं घेतो, निरीक्षणांच्या विश्लेषणातून निष्कर्ष काढतो आणि या निष्कर्षांच्या आधारे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींबद्दल ज्ञान मिळतं.
पाठय़पुस्तकात उल्लेख असलेल्या अनेक संकल्पनासुद्धा प्रत्यक्ष निरीक्षण, क्षेत्र अभ्यास किंवा सर्वेक्षणामुळे चांगल्या प्रकारे समजण्यासाठी प्रकल्पाचा उपयोग होऊ शकतो.
प्रकल्पाचा आराखडा आणि कार्यपद्धती ठरवताना एखाद्या गोष्टीचं नियोजन कसं करावं, वेळापत्रक कसं करावं, आयत्या वेळी आलेल्या समस्यांमुळे वेळापत्रकातील काही गोष्टी करता आल्या नाहीत तर काय तोडगा काढायचा, अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात.
प्रकल्पासाठी समाजातल्या वेगवेगळया स्तरातील व्यक्तींना भेटावं लागतं, त्यांच्याशी संवाद साधून माहिती मिळवावी लागते. यामधून दुसऱ्याशी कसं बोलावं, याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळतो. प्रकल्पाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देता येतात. या ठिकाणी मिळालेल्या अनुभवाचा लाभ पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी जास्त होतो आणि त्याचा परिणाम मनावर कायमचा राहतो. प्रकल्पामध्ये कराव्या लागणाऱ्या निरीक्षणांमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती वाढते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धती वापरून अचूक निरीक्षणं कशी घ्यावीत, हे प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजतं. प्रकल्पाचं अहवाल लेखन आणि सादरीकरण यातून एखादा विषय आपण नेमक्या शब्दात पण प्रभावीपणे कसा मांडायचा, हे विद्यार्थी शिकतो.
थोडक्यात, प्रकल्प म्हणजे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला, विचारांना, सर्जनशीलतेला प्रचंड वाव देणारी आणि एखाद्या विषयाकडे साकल्याने पाहण्याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारी ही एक पद्धती आहे. त्यामुळे आपल्या पाल्याला विचारांचं आणि कृतीचं पूर्ण स्वातंत्र देऊन प्रकल्प करण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
अनेकदा शिक्षकदेखील प्रकल्पाचा बाऊ करतात. प्रकल्प करायचा म्हणजे आपला जास्तीत जास्त वेळ प्रकल्पासाठीच द्यावा लागेल आणि त्यामुळे अभ्यासक्रम शिकवायला पुरेसा वेळ मिळणार नाही, अशी काही शिक्षकांची भावना असते. विद्यार्थ्यांला एखादा प्रकल्प करायला सांगायचा म्हणजे आपणच आपलं काम वाढवून घ्यायचं, असंही काही शिक्षकांचं मत असतं. त्यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांला अतिशय सोपा किंवा अगोदरच्या विद्यार्थ्यांनी केलेलाच एखादा प्रकल्प सुचवतात आणि आपली सुटका (?) करून घेतात, असंही आढळतं. पण शिक्षकांनी आणि पालकांनी या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कोणताही प्रकल्प पूर्णपणे विद्यार्थ्यांने करणं अपेक्षित असतं, आपण फक्त योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचं काम करणं अपेक्षित आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा