वैयक्तिकरीत्या काम करण्यापेक्षा सांघिकरीत्या काम करणे अधिक उत्तम असते. टीमचा अर्थच मुळी ‘टुगेदर एव्हरीवन अचिव्हस् मोअर’ हा असतो. करिअरमध्ये संघ बनवून त्यांच्याकडून इच्छित काम करवून घेणे व्यवस्थापकाला जमायला हवे. कारण टीमवर्कमुळे काम सर्वामध्ये वाटले जाते आणि त्याचबरोबर ते वेळेत पूर्ण होऊन यशस्वी होण्याची शक्यताही दुणावते. पण हीच संघबांधणी चुकीच्या पद्धतीने झाली तर मात्र परिस्थिती पायावर धोंडा पाडून घेण्यासारखी होते. म्हणूनच बघूया यशस्वी संघबांधणीचे उपाय-
० सर्वप्रथम टीमसाठी सहकारी निवडताना सविस्तर चर्चा करावी. कोणाचे कोणाशी पटते किंवा पटत नाही, कोण उत्तम संघ सदस्य होऊ शकतो, कोणाकडे वादविवाद सोडविण्याचे कौशल्य आहे, याची माहिती घेऊनच संघाची बांधणी करावी.
० प्रत्येक संघ सदस्याचा पत्ता/ दूरध्वनी क्रमांक/ ई-मेल/ त्यांची प्रस्तावित रजा हे सर्व तपशील सर्वाना माहिती असावे. यामुळे अडीअडचणींच्या वेळी पर्याय उपलब्ध होतात. कोणत्याही एकाच्या अनुपस्थितीमुळे सांघिक काम अडकून राहात नाही. तसेच पेचप्रसंगी सल्लामसलत घेणे सोपे जाते.
० आइस ब्रेकर- कोणतेही सांघिक काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक सहकाऱ्याची ओळख एकमेकांना अधिकृतरीत्या करून देणे इष्ट ठरते. यामध्ये त्याचे नाव, तो ज्या क्षेत्रातील विशेषज्ञ आहे त्यासंबंधित तपशील, त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी (खास करून वैयक्तिक आवडीनिवडी) यांचे आदानप्रदान व्हायला हवे. यामुळे संघाची एकसंध कुटुंबामध्ये बांधणी व्हायला मदत होते. गटातील व्यक्ती नावाने एकमेकांना ओळखू लागतात, समान छंद/स्वारस्य असलेले सदस्य भावनिकदृष्टय़ा जवळ येतात.
० प्रत्येक संघ सदस्याला संघाची ध्येये, संघाकडून अपेक्षित असलेली कामगिरी याची कल्पना देणे जसे आवश्यक असते, तसेच प्रत्येक सदस्याला त्याची गटामधील भूमिका, त्याच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या समजावून देणेही गरजेचे असते. यामुळे कामातील समन्वय साधला जातो आणि सांघिक कामगिरीतील वैयक्तिक मूल्यमापन करणेही शक्य होते.
० संघ म्हटले की, भांडय़ाला भांडे लागणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे सहकाऱ्यांमधील कुरबुरी/धुसफूस याकडे वेळीच लक्ष पुरवावे. पेल्यातील वादळे पेल्यातच शमतील, याची खबरदारी घ्यावी.
० एखादा विसंवाद नजरेत आल्यास, चालढकल न करता वेळीच सहकाऱ्यांना समोरासमोर बसवून सर्वसंमत तोडगा काढावा.
० सांघिक बैठकांमध्ये गटातील प्रत्येक कर्मचारी आपले मत व्यक्त करेल, याची दक्षता घ्यावी. प्रत्येकजण आपल्या शंकांचे निरसन करून घेईल व सांघिक कामगिरी उत्तम होण्यासाठी नवीन उपाय सुचवेल, हे पाहावे.
० संघामध्ये फक्त ‘होयबा’च नसतील, असे पाहावे. दरवेळी सहमतीचा पर्यायच न स्वीकारता, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या सांघिक विचारसरणीच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणाऱ्या सहकाऱ्याचीदेखील दखल घ्यावी. यामुळे खऱ्या अर्थाने विचारमंथन होते.
० संघाने काही चांगले ध्येय अपेक्षेनुसार गाठले तर त्याचा आनंद वेळोवेळी साजरा करावा. नुसते अंतिम ध्येयच नाही तर प्रोजेक्टमधील एखादा महत्त्वाचा टप्पा जरी गाठला तरी आनंदोत्सव व्यक्त करावा. त्यामुळे श्रमपरिहारही होतो व पुढील वाटचालीसाठी हुरूपही मिळतो.
० बुद्धय़ांकावर भर न देता भावनांकावर भर द्यावा. इमोशनल कोशंट म्हणजे सहकाऱ्यांमध्ये असलेले सहकार्य करण्याची तयारी, वाद सोडविण्याचे कौशल्य, तणावाखाली शांतचित्ताने काम करण्याचे कसब, संवाद कौशल्य हे सर्व कसे वृद्धिंगत होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्यामुळे संघ दबावाखाली काम करत नाही अथवा मतमतांतरांनी विखुरलाही जात नाही.
० अंतिम ध्येयापर्यंत मजल-दरमजल करताना आवश्यक ते मार्गदर्शन/सूचना करणे किंवा गरज पडल्यास कान उपटून संघाची गाडी रुळावर आणण्याइतका कणखरपणा संघाच्या नेतृत्वात असायला हवा आणि हे त्याने वेळोवेळी करायला हवे.
० सांघिक भावना वृद्धिंगत होण्यासाठी संघांमध्ये खेळ खेळणे हेही आवश्यक आहे. यामुळे मौजही येते आणि संघभावनेचे महत्त्वही प्रत्येकाच्या मनावर बिंबवले जाते. मायकेल जॉर्डनचे प्रसिद्ध वाक्य आहे- वैयक्तिक गुणवत्तेवर एखादी मॅच (सामना) जिंकून जाऊ शकते, पण चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी संघभावना अथवा संघटित प्रयत्न आवश्यक असतात. नेमके हेच संघाच्या खेळांचे मर्म असते, जे सहकाऱ्यांना सांगितले जाते.
सांघिक भावना रुजविण्यासाठी..
वैयक्तिकरीत्या काम करण्यापेक्षा सांघिकरीत्या काम करणे अधिक उत्तम असते. टीमचा अर्थच मुळी ‘टुगेदर एव्हरीवन अचिव्हस् मोअर’ हा असतो. करिअरमध्ये संघ बनवून त्यांच्याकडून इच्छित काम करवून घेणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-06-2013 at 09:41 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team spirit