अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जाणारा ‘थँक्स गिव्हिंग डे’ यंदा २२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. ‘अमेरिकन फॅड’ किंवा तत्सम काहीतरी कॉमेंटचा फटकारा मारून एखादी गोष्ट बाद करण्यापूर्वी, एकदा मोकळ्या मनानं तिच्याकडे नीट पाहायला हवं. यानिमित्ताने ज्यांच्यामुळे तुम्हाला आयुष्यात काही चांगल्या गोष्टी मिळाल्या, त्यांची आठवण करीत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल..
शाळेपासूनचा एक मित्र एकदा बऱ्याच दिवसांनी भेटला. अनेक वर्षांत त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि बोलण्यातला तक्रारीचा सूर कधी मिटलाच नव्हता. हाय-हॅलो झालं की, कुठल्यातरी कमतरतेबद्दलचा रागराग- बॉसला कसं कळत नाही, सहकाऱ्यांना त्याच्या कामाची कशी पर्वा नाही, टॅलंट कसं वाया जातं, पत्नी झाल्यावर प्रेयसी पुरती गृहिणी कशी झालीय अशा तक्रारी सांगणं सुरू व्हायचं. सातवीच्या परीक्षेत म्हणे मी त्याला एक गाळलेली जागा सांगितली नव्हती; तेसुद्धा त्याच्या अजूनही लक्षात होतं. जुन्या मत्रीचा फायदा घेऊन मी त्याला कधी मजेनं, कधी गांभीर्यानं म्हणायचे, ‘मित्रा, चांगली गोष्ट माणूस तीन लोकांना सांगतो आणि वाईट गोष्ट ११ लोकांपर्यंत पसरवतो, असं एक संशोधन आहे. मी नेहमी तुझ्या अकरामधली का असते? कधीतरी त्या आनंदवाल्या तीनमध्ये पण मला घे ना.’ यावर तोही जुन्या मित्रासारखाच वागायचा. माझ्या म्हणण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्याच्या दु:खात सहभागी व्हायला मला भाग पाडायचा.
या वेळी मात्र वेगळं घडलं. अतिशय आनंदी चेहऱ्यानं तो भरभरून काहीतरी चांगलं सांगत होता. बॉसचा चांगुलपणा, नव्या प्रोजेक्टच्या कामाचं समाधान, पत्नीचे घरासाठी होणारे कष्ट असं बरंच काही. या आमूलाग्र बदलाचं कारण विचारण्यापूर्वीच त्यानं माझ्या हातात एक पुस्तक दिलं आणि म्हणाला, ‘हे पुस्तक वाच. आपल्याला आपल्या परिवारातली माणसं, ऑफिसमधले सहकारी, निसर्ग, परमेश्वर, चंद्र-सूर्य, एवढंच कशाला एकेक वास्तूसुद्धा किती भरभरून देत असतात, ते आपण लक्षातच घेत नाही. मिळणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींना आपला हक्क समजून गृहीत धरतो आणि मला अमुकतमुक न दिल्याबद्दल कुणालातरी दोषी धरतो. किती नकारात्मक घेत होतो मी सगळया गोष्टी. या पुस्तकानं मला कृतज्ञतेची शक्ती दाखवली. मिळालेल्या प्रत्येक गोष्टीनं कळत नकळत आपल्याला कसं समृद्ध केलेलं असतं, ते शिकवलं. मला आभार मानायला शिकवलं. आता मी हे फक्त तीन किंवा ११ जणांपर्यंत पोहोचवून थांबणार नाही. मला ज्यांच्याकडून जाणते-अजाणतेपणी काही ना काही मिळालंय, त्या प्रत्येकाला मी हे सांगणार आहे. एवढी वर्षे मी तुझ्याजवळ कायम तक्रारींचं गाऱ्हाणं गायचो, तुला आवडत नसताना; पण तू ते ऐकून घेतलंस, त्याबद्दल थँक्स. तुझ्याशी बोलून झाल्यानंतर मला नेहमीच खूप हलकं वाटायचं.’
मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर समंजस भाव आणि मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता मला खोलवर जाणवली. ‘तो फारच तक्रारखोर आहे, त्याला सगळं वाईटच दिसतं, सातवीच्या पेपरातली गाळलेली जागासुद्धा तो वर्षांनुवर्षे विसरत नाही,’ असं माझं आत्तापर्यंत त्याच्याबद्दलचं मत होतं. पण या मताच्या दुसऱ्या बाजूला असलेलं ‘मी नाही बाई याच्यासारखी तक्रारखोर, मी जगाबद्दल कृतज्ञ असतेच,’ असं माझं स्वगत होतं, ते जाणवून एकदम टोचलं.
त्या पुस्तकाबद्दल अर्थातच उत्सुकता वाटली. वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या जवळच्यांबद्दल, सूर्य, चंद्र, तारे.. या सर्व गोष्टींबद्दल रोज रात्री आणि दिवसभर कृतज्ञता व्यक्त करण्याचा ते पुस्तक म्हणजे २७ दिवसांचा एक प्रोग्रामच होता. ‘असली पुस्तकं हे एक नवीन अमेरिकन फॅड. आम्हाला नाही कृतज्ञता व्यक्त करायला प्रोग्राम लागत,’ अशी खवचट कॉमेंट माझ्या मनात उमटलीच. तरीही मित्रात घडलेला बदल पाहता त्यावर फुलीही मारता येईना. एखादी गोष्ट माहीत असणं आणि प्रत्यक्ष करणं यात फरक असतो, हे अखेरीस मी स्वत:पाशी मान्य केलं. २७ दिवस जरा जास्तच होते, शिवाय एखादा दिवस हुकला तर पुन्हा तीन दिवस मागे जायचं होतं. त्यामुळे दिवसांचं दडपण न घेता जमेल तेवढं करून अनुभव घेण्याचा मध्यममार्ग मी निवडला.
‘तुम्हाला आयुष्यात मिळालेल्या १० चांगल्या गोष्टींची कृतज्ञतापूर्वक यादी करा,’ अशी पहिल्या दिवशीची कृती होती, ही यादी वहीत लिहायची होती आणि लिहिण्याची विशिष्ट पद्धतही दिलेली होती.
‘मी …. चा आभारी आहे, कारण…..’ असा तो लिहिण्याचा फॉरमॅट होता. थोडक्यात, ‘अमकतमुकनं मला खूप दिलंय, माझ्यासाठी खूप केलंय,’ असं नेहमीचं गोलगोल नको होतं, नेमकं हवं होतं. विचार सुरू केल्याकेल्या पहिली आठवण आई-वडिलांची आली. जन्म दिल्याबद्दल आभार मानले. पण फक्त जन्म दिल्याबद्दल आभार फार ठोकळेबाज आणि अपुरे वाटत होते. त्यांनी अनेक गोष्टी दिल्या होत्या, चांगलं पालनपोषण, शिक्षण, वातावरण, तरीही समाधान होईना. या सगळ्याबद्दल आभार आहेतच. पण ‘हेच’ आईवडील मिळाल्यामुळे मला माझ्या परिचयातल्या इतरांपेक्षा नेमकं काय वेगळं मिळालं, ते अस्वस्थपणे शोधायला लागले आणि ‘ते’ एकदम समोर आलं. ‘भावना आणि विचारांचा समतोल मिळाला, स्वतंत्र विचाराला वाव मिळाला, माझ्या अवघड परिस्थितीत माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवल्यामुळे मला शक्ती मिळाली.’
इथपर्यंत नेमकं पोहोचल्यावर मला खूप बरं वाटलं. खूप आतून आनंद वाटला. फक्त एका आई-वडिलांमुळे केवढय़ा तरी गोष्टी माझ्याजवळ आहेत, अशी कित्येक माणसं आणि कित्येक गोष्टी.. किती श्रीमंत आहे मी..’ ग्रेटच वाटलं एकदम.
आता रस्ता स्पष्ट झाला होता. भावंडं, मित्रमत्रिणी, कुटुंबीय, घराची वास्तू, शाळा, शिक्षक, सहकारी.. १० गोष्टी तर अगदीच पटकन झाल्या आणि एक-दोन वाक्यांत कारण लिहिण्यासाठी विचार करताना खूप नेमकेपणानं मला ते ते नातं उलगडत गेलं. कुणाचे आभार होते ते ‘अमुक अवघड प्रसंगात कुठलाही प्रश्न न विचारता आणि कुठलाही सल्ला न देता नि:शब्दपणे सोबत दिल्याबद्दल’, तर कुणाचे आभार होते, ‘माझ्या कसल्याही मूडी वागण्याला समजून घेत, रिअॅक्ट न होता नेहमीच सोबत असल्याबद्दल..’. नेमक्या शब्दांमुळे त्या त्या व्यक्तीसोबतचं नातं मनात आणखी घट्ट होतंय, परिपक्व होतंय हेही जाणवत होतं.
यादी लिहून संपल्यावर मनात किंवा मोठय़ांदा वाचायची होती आणि प्रत्येक वाक्यानंतर मनापासून ‘थँक यू, थँक यू, थँक यू’ हे शब्द उच्चारायचे होते. एरवी बावळटपणा म्हणून असली कृती मी निकालात काढली असती, पण आज मी तेही करून पाहिलं. या सगळ्या प्रोसेसनंतर आलेलं ‘थँक यू’ एवढं आतून होतं की, ते बावळटासारखं वाटलंच नाही. उलट एकदम छान वाटलं.
पुस्तकात २७ दिवसांच्या रोजच्या वेगळ्या कृती होत्या. पण त्यामध्ये कालपर्यंतच्या गोष्टींचं वाचन आणि आज पुन्हा नव्या दहा गोष्टी हे दररोजचं काम होतं. एखाद्या वेळी तुम्हाला दहा गोष्टी आठवल्या नाहीत तर ‘आरोग्य, शरीरसौष्ठव, काम, यश, पसा, नाती, पॅशन, प्रेम, निसर्ग, ऐहिक गोष्टी आणि त्याबाबतची उद्दिष्टं’ इ. अनेक क्लू दिले होते. मी ही यादी बरेच दिवस मनापासून केली. वही भरत आली तरी माझ्याजवळच्या चांगल्या गोष्टी संपत नव्हत्या.
पुस्तकात दिलेली आणखी एक कृती मला आवडली, ती नावडत्या किंवा बिघडलेल्या गोष्टींबद्दलची. जी व्यक्ती, नातं, परिस्थिती तुम्हाला आवडत नाही तिच्याबद्दलच्या तीन ‘चांगल्या’ गोष्टी लिहायच्या होत्या. अशा व्यक्तींबद्दलचं चांगलं आठवून आठवून लिहावं लागायचं, तेव्हा त्या व्यक्तींबद्दलचा मनातला कडवटपणाही कमी होत जायचा. हे मस्तच होतं. आता
कशावरही चिडचिड झाली की त्या व्यक्ती-परिस्थितीबाबत हा उपाय करायला मी सुरुवात केली. बॉस, सहकारी, सहचर, नातलग, अगदी घरातली कामवालीसुद्धा. त्यातून त्यांच्याबद्दलची मनात साठलेली जळमटं दूर होत गेली. स्वच्छ स्वच्छ
वाटत गेलं.
त्या पुस्तकात आणखी एक वेगळा विचार होता. ‘कुणालाही पसे, पगार, मोबदला देताना आनंदानं द्या. एवढी बिलं देण्याची तुमची ऐपत आहे याबद्दल देवाचे, कंपनीचे, ती क्षमता तुमच्यात निर्माण करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा,’ हे शब्दश: पटलं नाही, कारण ‘बिलांचे आभार माना’ म्हणजे अप्रत्यक्षपणे उधळपट्टी करा. तरीही एका मर्यादेपर्यंत हे वेगळेपण स्वीकारार्ह होतं. देणी देतानाची चिडचिड यातून कमी नक्की होऊ शकत होती. घेणाऱ्याचा सन्मान राहत होता.
पुस्तकातल्या इतर कृतींत फारसं गुंतायला झालं नाही. एखादी गोष्ट करताना मनातली श्रद्धा कमी पडतेय, असं वाटलं तेव्हा स्वत:वर बळजबरीही केली नाही. रोजच्या १० चांगल्या गोष्टी आणि नावडत्यांबद्दलच्या तीन चांगल्या गोष्टींतच मला खूप रमायला झालं. चांगल्याच गोष्टी आठवण्यावर शक्ती फोकस करण्यातली मजा एक वेगळा ‘अनुभव’ होता.
मला आवडला, तो आयुष्यातल्या चांगलेपणाची स्वत:ला सातत्यानं जाणीव करून देण्याचा लेखिकेनं दाखवलेला मार्ग. या पद्धतीचा अनुभव आणि सराव झाल्यानंतर २७ दिवसांचं बंधन पाळायची किंवा रोज १० गोष्टींची यादी लिहायचीच अशी गरज नव्हती. आपली श्रीमंती आपल्याला दाखवून देण्याचं काम पुस्तकानं केलं होतं. रोज वाढणाऱ्या संपत्तीचं भान दिलं होतं आणि त्याकडे पाहण्याची नजर परिपक्व करून दिली होती. आनंदी राहण्याचं तंत्र हातात दिलं होतं.
या सगळया याद्यांमधून प्रकर्षांनं जाणवलं ते म्हणजे, ज्या चांगल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहावंसं वाटलं होतं त्या देणाऱ्यांची देताना कुठलीही अपेक्षा नव्हती. त्यांच्या निरपेक्ष प्रेमानं मला समृद्ध केलं होतं. नावडत्या व्यक्ती-परिस्थितीतल्या चांगल्या गोष्टी शोधण्यातून माझी नजर नीरक्षीरविवेकाची बनत गेली. कधीकधी त्या बिघडलेल्या संबंधांमधली स्वत:ची पूर्वी न दिसलेली एखादी चूकही दिसली होती, गरसमज झालेला आपोआप लक्षात आला होता. संपूर्ण काळं किंवा पांढरं कुठेच नसतं, हे तत्त्वत: माहीत होतं. त्या रोज १०+३ च्या लिखाणामुळे ते उमजत आणि रुजत गेलं होतं.
आणखी एक महत्त्वाचं लìनग होतं. ‘अमेरिकन फॅड’ किंवा तत्सम काहीतरी कॉमेंटचा फटकारा मारून एखादी गोष्ट बाद करण्यापूर्वी, एकदा मोकळ्या मनानं तिच्याकडे नीट पाहायला हवं. अशा प्रकारच्या अनेक पुस्तकांप्रमाणे यातही अमेरिकन मार्केटिंगचे फंडे वापरलेला भरपूर फापटपसारासुद्धा होता. तरीही माझ्यापुरतं मला जे मिळालं ते खूप महत्त्वाचं नक्कीच होतं.
मात्र इतकं सगळं छान वाटूनही एक अपुरेपण जाणवत होतं, ते म्हणजे, आपण चराचराकडून फक्त घेतोच आहोत. देण्याचं काय? त्या विचारात मी एकदा आईला म्हटलं, ‘आई, तुम्ही आम्हाला एवढं दिलंय, आमच्याकडून काही घेण्याची तुम्हाला कधी गरजच नाही पडली. मग परतफेड कशी होणार?’ ती म्हणाली, ‘कृतज्ञतेचं असं हिशेबी काहीच नसतं. परतफेड तेवढीच आणि त्याच माणसाला केली पाहिजे, असं तर नसतंच. तुम्हा मुलांना आमच्याकडून जे काही मिळालं असेल त्यात भर घालून पुढे जाऊ द्या. जेवढय़ा जास्त जणांची मूर्त-अमूर्त गरज वेळेवर भागवाल तेवढी परतफेड होत राहील..’
कृतज्ञ राहणं आणि तरीही मुक्त असणं किती छान असतं!
कृतज्ञता अर्थात थँक्स गिव्हिंग!
अमेरिकेत दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी साजरा केला जाणारा ‘थँक्स गिव्हिंग डे’ यंदा २२ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे
आणखी वाचा
First published on: 18-11-2012 at 10:57 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanks giving