मागच्या लेखात आपण यूपीएससीतील पेपर ३च्या अनुषंगाने पारंपरिक नीतिशास्त्राचे काय महत्त्व आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पारंपरिक नीतिशास्त्रातील संज्ञा किवा संकल्पना यांच्यावर प्रत्यक्ष प्रश्न जरी विचारले गेले नसले, तरीदेखील त्यांचा वापर करून काही प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. नीतिशास्त्रातील संकल्पना व वैचारिक चौकटी समजून घेणे, त्या आत्मसात करणे अशा प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यामुळे या संकल्पनांचा वास्तव जीवनाशी काय संबंध आहे हे जाणून घेता येते. आयुष्यातील अनेक लहान-मोठय़ा प्रसंगांमध्ये कोणता निर्णय घेतला जावा, कसे वर्तन केले जावे हे निश्चित करण्यासाठी नीतिशास्त्रातील वैचारिक चौकटींचा वापर केला जाऊ शकतो. ‘एथिक्स, इंटिग्रिटी अँड अॅप्टिटय़ूड’ या पेपरमध्ये उमेदवाराने स्वत:च्या आयुष्यातील प्रसंग विशद करून उत्तरांची मांडणी करावी अशी अपेक्षा असणारे प्रश्न विचारले आहेत. यूपीएससी २०१३ च्या मुख्य परीक्षेत विचारला गेलेला असाच एक प्रश्न आपण पाहूयात-
‘विवेकाचे संकट’ (crisis of conscience) म्हणजे काय? तुमच्या आयुष्यातील असा एक प्रसंग विशद करा जेथे तुम्हाला विवेकाच्या संकटाचा सामना करावा लागला व त्या प्रसंगात तुम्ही काय तोडगा काढलात हे स्पष्ट करा. (१५० शब्द – १० गुण)
What is meant by kcrisis of conscience?l Narrate one incident in your life when you were faced with such a crisis and how you resolved the same (150 words – 10 marks)
या प्रश्नाचा प्रतिसाद लिहीत असताना विवेक म्हणजे काय? या विचाराने सुरुवात करता येऊ शकते व पुढे जाऊन विवेकाचे संकट, सदसद्विवेकबुद्धीचे महत्त्व यावर लिखाण करता येऊ शकते. या स्पष्टीकरणाला योग्य अशा प्रकारचा वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग नमूद करून उत्तर पूर्ण करणे शक्य आहे. अशा प्रकारचा प्रसंग देत असताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. घडलेल्या घटनेचा वृत्तांत सादर करत असताना, उत्तरासाठी गरजेचे नसलेले तपशील देणे कटाक्षाने टाळावे. प्रसंगाचे वर्णन नेमक्या शब्दात व संक्षिप्तपणे करावे. अशाच प्रकारचा एक प्रतिसाद पुढे दिला आहे –
नमुना प्रतिसाद – प्रत्येक व्यक्तीकडे आपल्या कृती नतिक आहेत अथवा नाही हे जागरूकतेने ठरवण्याची क्षमता असते, यालाच विवेक असे म्हणतात. ज्यावेळेस व्यक्तीला आपण केलेली एखादी कृती नतिक होती का नाही अशा प्रकारच्या द्विधेचा सामना करावा लागतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्यावरील विवेकाच्या संकटाचा सामना करीत असते. ज्यावेळी आपल्यातील विवेकाचा आवाज दडपला जातो, त्यावेळेस व्यक्तीला अशा संकटाचा सामना करावा लागतो.
मी शाळेत असताना, एका परीक्षेत खूप चांगली कामगिरी केली नव्हती. परंतु, पेपर मिळाल्यावर माझ्या असे लक्षात आले की गुणांची बेरीज करताना शिक्षकांकडून गडबड झाली आहे व मला एकूण १५ जास्तीचे गुण देण्यात आले आहेत. गुण चांगले मिळाल्याने मला खूप आनंद झाला व मी ही बाब कुणालाही सांगितली नाही. मात्र घरी आल्यानंतर मला या प्रसंगामुळे अस्वस्थ व बेचैन वाटू लागले. माझ्या हे लक्षात आले की, मी इतरांची व स्वत:ची फसवणूक करत आहे. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या शिक्षकांना खरी गोष्ट सांगितली. शिक्षकांनी माझ्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले व पुन्हा असे न वागण्याचा मी निर्धार केला.
यूपीएससीने दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेमध्ये (sample paper) खालील प्रश्न विचारला होता-
आदर्श व्यक्ती म्हणून तुम्हाला कोणत्या महान भारतीय व्यक्तीकडून प्रेरणा मिळाली आहे आणि या प्रेरणेचा तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात काय फायदा झाला आहे?
Which great Indian personality has inspired you the most as a role model and how have you been able to benefit in your life by such an inspiration?l
या व अशा प्रश्नांची उत्तरे लिहीत असताना राजा अशोकपासून आंबेडकरापर्यंत कोणतीही भारतीय व्यक्ती तुम्ही प्रेरणास्थान म्हणून निवडू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात, तुम्हास अधिक चांगले, नतिक निर्णय घेण्यास कशी प्रेरणा दिली आहे हे अधोरेखित करता येते. जोपर्यंत याबाबतीत तुम्ही आश्वासक प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत हे उत्तर प्रभावी होणार नाही. अशा महान व्यक्तीबद्दल भरपूर माहिती देणे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणे अथवा त्या व्यक्तीची शिकवण स्पष्ट करणे पुरेसे ठरणार नाही.
म्हणूनच विविध नतिक, वैचारिक चौकटी समजून घेत असताना त्यातील कळीचे मुद्दे, गाभा समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने अशा नतिक अंगांचा समावेश असणारे वैयक्तिक प्रसंग मांडण्याची तयारीदेखील उमेदवारांनी ठेवली पाहिजे. अशा प्रकारे उत्तर लिहिण्याची प्रक्रिया किचकट किंवा गुंतागुंतीची वाटू शकते. मात्र काळजीपूर्वक व बारकाईने प्रश्नातील विविध घटकांचा विचार केला तर अर्थपूर्ण उत्तरे तयार करणे शक्य आहे. स्वत:च्या आयुष्याकडे प्रामाणिकपणे पाहिल्यास नतिकतेचे अनेक पदर उलगडण्यास मदत होऊ शकते.
एकूण अभ्यासक्रमातील एकतृतीयांश भाग पारंपरिक नीतिशास्त्रातील तत्त्वे (उपयुक्ततावाद, कर्तव्यवाद, सापेक्षतावाद, मूल्याधारित नीतिशास्त्र) व त्यांचा रोजच्या आयुष्याशी असलेला जवळचा संबंध नमूद करत असताना ते खरंच घडलेलं असणं किंवा तुमच्या आजूबाजूला कायम घडत असणारं असणं कधीही चांगलं ठरतं. असे प्रसंग लिहिताना जास्त कष्ट पडू शकतात. मात्र यामुळे उत्तरामध्ये एक स्वाभाविक ठामपणा व सच्चेपणा येतो. ज्यामुळे उत्तराचा दर्जा आपोआप उंचावतो. अर्थात जो पेपर उमेदवाराचा नतिक कल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यातील लिखाण प्रामाणिक आणि सच्चे असणे महत्त्वाचे आहे. (भाग २)
admin@theuniqueacedemy.com
पारंपरिक नीतिशास्त्राचे आजच्या काळातील महत्त्व
मागच्या लेखात आपण यूपीएससीतील पेपर ३च्या अनुषंगाने पारंपरिक नीतिशास्त्राचे काय महत्त्व आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला.
आणखी वाचा
First published on: 22-09-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The importance of todays traditional ethic