६ केस स्टडी अशी विभागणी होती. पेपरचे सखोल विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, अतिशय विचारपूर्वक पद्धतीने प्रश्न प्रकार व एकंदर पेपरची संरचना केलेली आहे. आणि म्हणूनच त्यामध्ये नजिकच्या भविष्यात बदल होण्याची शक्यता नाही. यातून असा निष्कर्ष काढता येतो की, केस स्टडीवर कायमच ठरावीक भर दिला जाईल. केस स्टडी लिखाणाचा पुरेसा सराव तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
एकंदरीत संपूर्ण पेपरमधील विविध प्रश्नांच्या स्वरूपाचे खालीलप्रमाणे वर्णन करता येते. पेपरमधील विषयांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे –
० नीतिशास्त्रातील संकल्पनांवर आधारित (उदा. नैतिक विचारवंत, मानवी मूल्य इ.)
० सामाजिक मानसशास्त्रातील संकल्पनांवर आधारित (उदा. वृत्ती, भावनिक बुद्धिमत्ता, कलचाचणी इ.)
० प्रशासनातील नैतिक द्विधा व नीतिशास्त्र याच्याशी संबंधित प्रश्न (भ्रष्टाचार, प्रामाणिकपणा, नागरिकांचे हक्क व जबाबदाऱ्या इ.)
यामधील पहिला घटक हा सद्धांतिक विषयांवर भर देणारा आहे, आणि त्याकरिता विशिष्ट वाचनाची व तयारीची गरज आहे. एथिक्स म्हणजेच नीतिशास्त्राचे दोन महत्त्वाचे प्रकार म्हणजे आधिनीतिशास्त्र (Meta Ethics) आणि आदर्शात्मक नीतिशास्त्र (Normative Ethics). यापकी आधिनीतिशास्त्रामध्ये नीतिशास्त्राच्या स्वरूपाबद्दल अभ्यास केला जातो. ‘चांगले किंवा सत् म्हणजे काय?’ अशा प्रश्नांची चर्चा यामध्ये होते. यूपीएससीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास नीतिशास्त्राच्या या शाखेशी परीक्षेचा फारसा संबंध येत नाही. मात्र आदर्शात्मक नीतिशास्त्रातील काही प्रमुख घटकांची तयारी असणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने ‘योग्य कृती कोणती?’, ‘कोणता निर्णय नीतिशास्त्रास धरून आहे व का?’ या व अशा प्रश्नांची चर्चा केली जाते. पारंपरिक आदर्शात्मक नीतिशास्त्रामध्ये उपयुक्ततावाद (Utilatirianism), कर्तव्यवाद (Deontology), मूल्याधारित नीतिशास्त्र (Virtue Ethics) यांचा समावेश होतो. आदर्शात्मक नीतिशास्त्राचा अभ्यास करत असताना प्रमुख विचारसरणीची महत्त्वाची तत्त्वे समजून घेणे गरजेचे आहे. मात्र असे करत असताना, प्रत्येक विचारसरणीतील सखोल गुंतागुंत किंवा बारकावे समजून घेण्याची फारशी आवश्यकता नाही. उदा. अॅरिस्टॉटलचे नीतिशास्त्र समजावून घेत असताना निकोमॅकीअन (Nicomachean) नीतिशास्त्र अभ्यासण्याची गरज नाही. उत्कृष्ट नैतिक मूल्य असणारा मनुष्य घडण्यासाठी, मानवाच्या समृद्धीकरिता आवश्यक जो ‘सुवर्णमध्याचा सिद्धांत’ (Golden mean अॅरिस्टॉटलने सांगितला आहे, तो समजून घेणे गरजेचे आहे. तसेच या सिद्धांताचे आजच्या संदर्भातील अर्थ व विवेचनदेखील लक्षात घेणे आवश्यक आहे. उदा. कामकाजात शिस्त ठेवण्याकरिता जर अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा गरवापर अथवा अतिवापर करून अतिशय कठोर धोरण अवलंबले तर ते योग्य ठरणार नाही. याउलट अतिशय नरमाईचे धोरण ठेवून कोणत्याच शिस्तीचा आग्रह न धरणेदेखील चुकीचे आहे. अशा परिस्थितीतील अधिकारी व्यक्तीला असा ‘सुवर्णमध्य’ शोधणे गरजेचे आहे. अशाप्रकारे नैतिक तत्त्वज्ञ व त्यांच्या विचारसरणीचे आकलन आजच्या संदर्भात होणे अत्यंत गरजेचे आहे.
याच संदर्भात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, ‘नैतिक कृती’ कशी ठरवावी अथवा ठरवली जाते हे समजून घेणे. तसेच सामाजिक संदर्भाचे नैतिक कृतीशी कोणते नाते असते हे पाहणे. या गोष्टी समजून घेण्याकरिता खालील बाबींचा विचार करावा लागतो.
० नैतिक कृती म्हणजे काय? कृती नैतिक असणे आवश्यक का आहे?
० नीतिशास्त्रास संमत निर्णयावर कोणत्या गोष्टींचा प्रभाव असतो? नैतिक कृती ठरविण्याचे परिमाण कोणते?
० नैतिक कृतीस बळकटी देणारे अथवा अशा कृतींचा प्रभाव कमी करणारे घटक कोणते?
० नीतिशास्त्रसंमत कृतींवर सामाजिक संकेतांचा व संदर्भाचा किती प्रभाव असतो?
० नैतिक विचारांच्या बदलांचा समाजावर कसा परिणाम होतो?
० शैक्षणिक संस्था- शाळा, महाविद्यालये नैतिक मूल्यांच्या जडणघडणीमध्ये कोणते योगदान देतात? त्यातून व्यवस्थेच्या कोणत्या मर्यादा लक्षात येतात?
या आणि अशा प्रश्नांची उत्तरे देण्याकरता उमेदवारांना ठळक सद्धांतिक मांडण्यांची ओळख असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रमुख वैचारिक चौकटी, त्यांच्यातील सारखेपणा आणि आणि फरक माहीत असणे फायद्याचे ठरू शकते. २०१३ मध्ये विचारलेल्या प्रश्नांमध्ये अशा विषयांबद्दल उमेदवारास माहिती असणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर आयोगाने या सर्व विषयांचे आजच्या सामाजिक संदर्भामध्ये काय महत्त्व आहे, यावरदेखील भर दिला आहे. पहिल्या विभागातील अनेक प्रश्नांच्या उत्तरांमध्ये उमेदवारांनी प्रश्नविषयाच्या संदर्भात वैयक्तिक आयुष्यातील उदाहरणे देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नैतिक विचारसरणींचा उपयोग करून वर्तमानातील घटना कशा प्रकारे समजून घेता येऊ शकतात, याचे उमेदवारास ज्ञान असणे अपेक्षित आहे. सिद्धांत व प्रत्यक्ष जीवन यांच्यातील परस्परसंबंध उमेदवारांनी उलगडून दाखवणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे लिखाण कसे करता येते याची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत. याकरिता २०१३ मध्ये विचारले गेलेले प्रश्न व त्यांची नमुना उत्तरे यातून आपण नैतिक तत्त्वज्ञानावर आधारित हा घटक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो.
admin@theuniqueacademy.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा