मार्केटिंगचे क्षेत्र हे खरे तर व्यापाराइतकेच जुने!  हे क्षेत्र आता कात टाकत असून मार्केटिंग क्षेत्रातील कामाचे स्वरूप आणि संधी यांत मोठे बदल होत आहेत. त्याविषयी..
मार्केटिंग हे कुठल्याही व्यवसायातील महत्त्वाचे कार्यक्षेत्र आहे. व्यापाराइतकेच जुने असलेल्या मार्केटिंगचे तंत्र आणि स्वरूप आता विस्तारत आहे. विविध सवलत योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादनाची विक्री करण्यापासून अनेक सुनियोजित पद्धतींचा वापर करून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची मार्केटिंगची कला आज पूर्वीपेक्षा जास्त वेगाने उत्क्रांत होत आहे.
तंत्रज्ञानात झालेले बदल मार्केटिंग क्षेत्राच्या वाढीसाठी पूरक ठरत आहेत. यामुळे बाजारपेठेतील सर्व उमेदवारांना स्पध्रेची समान संधी मिळत आहे. आपल्या उत्पादनाच्या विक्रीकरता अलीकडे लहान-मोठा प्रत्येक उत्पादक मार्केटिंगचे तत्त्व अवलंबू लागल्याने या क्षेत्रातील स्पर्धा अधिक चुरशीची होत आहे.
क्षेत्राचे स्वरूप
गेल्या काही वर्षांत मार्केटिंग क्षेत्राचे महत्त्व उत्पादकांना जाणवू लागले आणि म्हणूनच व्यवसायातील सर्वाधिक गुंतवणूक या सर्वाधिक जोखमीच्या क्षेत्रात करण्याचे धाडस अनेकजण दाखवू लागले. वित्तपुरवठा, उत्पादन, खरेदी आदी क्षेत्रांप्रमाणेच मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची अंत:प्रेरणा आणि अनुभव यांची कसोटी लागते. विकसित होणारे मार्केटिंगचे क्षेत्र अद्यापही एक शास्त्र नव्हे तर कला आहे.
मार्केटिंगकडे वळू इच्छिणाऱ्यांना हा एक प्रकारचा जोखमीचा खेळ आहे, असे वाटण्याआधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, आजचे मार्केटिंग क्षेत्र उत्तमरीत्या विकसित झाले आहे. मार्केटिंगचा प्रत्येक विभाग तंत्रज्ञानाच्या मदतीने  विकसित होत असून त्यामुळे या क्षेत्रात करिअर करताना यश मिळण्याच्या शक्यता आपोआपच वाढतात. मार्केटिंग क्षेत्रातील कुठल्याही विभागात काम करणारा प्रत्येकजण या प्रक्रियेचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असतो.
मार्केटिंग रिसर्च
 मार्केटिंगच्या विविध योजना तयार करताना ग्राहकांची सतत बदलणारी जीवनशैली, त्यांच्या गरजा, प्रेरणा, आकांक्षा आणि पाश्र्वभूमी समजून घेणे अत्यंत गरजेचे असते. विविध उत्पादकांना आपले उत्पादन विकण्यासाठी मार्केटिंग करणे अपरिहार्य वाटू लागले आहे. मार्केटिंगच्या योजना आखण्याआधी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना प्रत्यक्ष ग्राहकांशी संवाद साधणे गरजेचे वाटू लागले आहे. त्याद्वारे ग्राहकांची पाश्र्वभूमी,  सवयी आणि त्यांच्या प्रेरणांचा प्रत्येक टप्प्यावर आढावा घेता येतो. मार्केटिंगची रणनीती  राबवण्याआधी या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक असते तसेच मार्केटिंगची योजना राबविल्यानंतरही त्याचे यशापयश पडताळावे लागते. कोणती योजना यशस्वी होईल, कोणती यशस्वी झाली, कोणती अयशस्वी झाली आणि का याची उत्तरे सतत शोधावी लागतात.
मार्केटिंग रिसर्च हे एक सुविकसित साधन मार्केटिंग क्षेत्रासाठी उपलब्ध असून या क्षेत्रात  उमेदवारी करणाऱ्यांसाठी ते एक चांगले करिअर ठरू शकते. यात प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार आवश्यक तो अभ्यास अहवाल बनवणे, अहवालाची गुणात्मक आणि संख्यात्मक मांडणी करणे, आकडेवारीचे विश्लेषण करणे आणि मार्केटिंगची रणनीती बनवणे अशा वेगवेगळ्या कामांचा समावेश असतो. या कामांद्वारे बहुराष्ट्रीय आणि विविध संस्थांमध्ये करिअरचे पर्याय खुले होतात. या क्षेत्रात उद्योजकतेच्याही विविध संधी उपलब्ध आहेत.
मार्केटिंग कम्युनिकेशन
मार्केटिंग कम्युनिकेशन या क्षेत्राला आज महत्त्व प्राप्त झाले असून करिअरच्या अमाप संधी या क्षेत्रातही उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या दर्जेदार उत्पादनाची किंवा सेवेची निर्मिती करता, तेव्हा तुमच्या ग्राहकांना त्याविषयी माहिती होणे गरजेचे असते. परंतु, त्यांच्यापर्यंत पोहोचणे हे एक गुंतागुंतीचे काम आहे. ग्राहक हे कधीच एकसारखा विचार करत नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांपर्यंत व्यक्तिश: पोहोचण्यासाठी, सुनियोजित माध्यमांचा वापर करून सामायिक विचारांच्या ग्राहकांसाठी योजना बनवणे आवश्यक असते. त्यांच्यापर्यंत पोहोचून  उत्पादन विकत घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करण्यासाठी या प्रक्रियेची पूर्ण माहिती असणे, प्रसारमाध्यमांचा वापर करणे, ग्राहकांच्या माध्यम वापराच्या सवयी जाणून घेणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
यामुळे जाहिरातींची रणनीती, कल्पकता, ग्राहक व्यवस्थापन, माध्यमांसाठी रणनीती आणि वाटाघाटी, खरेदी आणि संशोधन, जनसंपर्क, डिजिटल कम्युनिकेशन, घराबाहेरील मार्केटिंग, रचना, ग्रामीण भागातील मार्केटिंग आदी क्षेत्रांत  आज मोठय़ा प्रमाणात आश्वासक संधी खुल्या झाल्या आहेत.
ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे डिजिटल हे एक नवे आणि वेगाने विकसित होत असलेले माध्यम आहे. जाहिरातींच्या क्षेत्रात डिजिटल प्रकाराचा वापर अमेरिकेसारख्या परिपक्व बाजारपेठेत सुमारे ३० टक्के होतो. कॉम्प्युटर, इंटरनेट आणि मोबाइल या माध्यमांच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचता येते. यामुळे विक्रेत्यांना त्यांची सेवासुविधा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचीही संधी उपलब्ध होते.
मार्केटिंगच्या क्षेत्रात आणखी एक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे, ते म्हणजे घराबाहेरील मार्केटिंग (आउट ऑफ होम मीडिया). यांत बिलबोर्ड्स्मध्ये आलेले नवे तंत्रज्ञान, दुकानांमधील व्हिडीओज, र्मचडायिझग, पॅकेजिंगमधील नवी रचना याचा समावेश होतो.
मार्केटिंग क्षेत्राकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील बदलांची नोंद घेऊन त्याकरता सज्ज राहायला हवे आणि निर्माण होणाऱ्या या नवनव्या करिअर संधींचा उपयोग करून घ्यायला हवा.
 प्रेम मेहता, अध्यक्ष, दी नॉर्थपॉइंट सेंटर ऑफ लर्निग.
prem.mehta@northpointindia.com  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा