अखिल भारतीय स्पर्धापरीक्षेच्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप २०११ सालापासून बदललेले आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पूर्वपरीक्षेला प्रत्येकी २०० गुणांसाठी दोन पेपर असतात. पूर्वपरीक्षा ही फक्त प्राथमिक फेरी आहे. यातील गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी धरले जात नाहीत. जरी पूर्वपरीक्षेचे मार्क्‍स अंतिम गुणवत्ता यादीसाठी धरले जात नसले तरी पूर्वपरीक्षेचे महत्त्व कमी होत नाही. कारण जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास झाला नाहीत, तर मुख्य परीक्षेचा कितीही अभ्यास झाला असेल तरी तुम्हाला संधी मिळत नाही, म्हणून पूर्वपरीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे.
२०११ पूर्वी जनरल स्टडीजचा एक पेपर व वैकल्पिक विषयांचा एक पेपर असे दोन पेपर असत. त्यातही वैकल्पिक विषयाला जास्त महत्त्व होते. बऱ्याच वेळा घोकंपट्टी करून परीक्षेत पास होणे सोपे होते. मात्र ‘होता समिती आणि अलघ समिती’ व या समित्यांसमोर मांडलेल्या अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार पूर्वपरीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले. कारण फक्त पाठांतरापेक्षा प्रशासनातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आवश्यक गुण, कौशल्य तसेच चारित्र्याची कसोटी लागावी व युवकांची निवड व्हावी असे तज्ज्ञांनी मत मांडले होते. पूर्वपरीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, अशी टीका बऱ्याच वेळा वाचायला येते. मात्र ते चुकीचे आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि प्रत्येकाने काळानुरूप बदलले पाहिजे व या बदलाचे आपण स्वागतही केले पाहिजे.  यामुळे ग्रामीण भारतातील व गरीब विद्यार्थ्यांचा फायदाच झाला आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास सर्वात जास्त फायदा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा झाला आहे. कारण जुन्या अभ्यासक्रमात एक वैकल्पिक विषय निवडायचा असल्याने, त्याचे संदर्भग्रंथ, त्या विषयाच्या नोट्स (घोकंपट्टीसाठी) उपलब्ध व्हायला थोडी अडचण व्हायची. त्यातही महाराष्ट्रातील पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम इतर राज्यांच्या तुलनेत या परीक्षांसाठी अजिबात सुसंगत नव्हता. या वैकल्पिक विषयांच्या जागी आलेल्या नवीन अभ्यासक्रमात सी-सॅट-२ (सिव्हिल सव्‍‌र्हिसेस अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – पेपर २ ) मुळे विद्यार्थ्यांचे काम जास्त सोपे झाले, कारण येथे पाठांतराला कोणतेही स्थान नाही. मूलभूत संकल्पना तुम्हाला समजल्या असतील व तुम्ही मनापासून सराव केला असेल तर एकलव्याप्रमाणे आपणही या पेपरवर प्रभुत्व मिळवू शकता. या पेपरमुळे ज्यांचे गणित चांगले आहे, ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयक शैक्षणिक पाश्र्वभूमी असेल, त्यांनाच याचा जास्त फायदा आहे, अशी टीका केली जाते. मात्र, वस्तुस्थिती त्याहून वेगळी आहे. जर यूपीएससी २०१२ च्या पूर्वपरीक्षेचा पेपर पाहिला तर फक्त ४ ते ५ प्रश्न गणिताशी, त्यातही प्राथमिक स्वरूपातील म्हणजे जे गणित दहावीपर्यंत शिकलो त्याशी संबंधित होते. यामुळेच, विनाकारण गणित व इंग्रजीचा बागोलबुवा करून घेऊ नये.
मागच्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेदेखील आपल्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बदलला. त्यामुळे आता यूपीएससी व एमपीएससी या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम आता सारखाच झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना एकाच अभ्यासक्रमाच्या जोरावर दोन्ही परीक्षा देणे सोपे होणार आहे.
सर्वप्रथम आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊ या-
सी-सॅट पेपर १, वेळ २ तास व २०० गुण
१)    राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी
२)     भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
३)     भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल
४)     भारतीय राज्यसंस्था व प्रशासन, संविधान व राजकीय व्यवस्था इ.
५)     आíथक आणि सामाजिक विकास – निरंतर विकास, दारिद्रय़, लोकसंख्या शास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इ.
६)     वातावरणीय परिस्थितिकी, जैवविविधता हवामान बदल यासंबंधी सामान्य मुद्दे, ज्याला विषयाच्या विशेष ज्ञानाची आवश्यकता नाही.
७)     सामान्य विज्ञान
सी-सॅट – पेपर २, वेळ २ तास व २०० गुण
१)    आकलन (Comprehension)
२)    संप्रेशन कौशल्यासह आंतरवैयक्तिक कौशल्य (Interpersonal Skills including communication Skills)
३)    तर्कशुद्ध युक्तिवाद आणि विश्लेषण क्षमता (Logical Reasoning & Analytical Ability)
४)    निर्णय घेणे आणि समस्या निराकरण (Decision Making & Problem Solving)
५)    सामान्य मानसिक क्षमता (General Mental Ability)
६)    मूलभूत अंकगणित (इयत्ता दहावी स्तर) माहितीचा अर्थ लावणे तक्ते, आलेख, टेबल माहितीची पूरकता इ. ((Basic Numeracy ( rq level), Data Inturpetation ( rq Level)
७)        मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन इयत्ता दहावी स्तर पातळी (English Language, Comprehension Skills 10 level)
वरील सर्वासाठी निगेटिव्ह माìकग एकतृतीयांश (१/३) इतकी आहे, म्हणजे तीन प्रश्न चुकलेत की बरोबर आलेल्या गुणांमधून एका प्रश्नाचे गुण कमी होतात. यामुळे परीक्षा थोडी अवघड झाली आहे. आता हवेत गोळ्या मारण्याची संधी नाही. तुम्हाला उत्तर बरोबर माहीत असेल तरच तुम्ही उत्तर देणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका ही मराठीत नसते. एकतर ती इंग्रजीत असते किंवा िहदीत असते. प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपाची असते.
सी-सॅट पेपर १ – हा  पेपर सामान्य अध्ययनाशी संबंधित आहे. या पेपरमध्ये १०० प्रश्न २०० गुणांसाठी विचारले जातात. जर अभ्यासक्रम पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते, याचा आवाका फारच मोठा आहे. या पेपरचा अभ्यास करताना सर्वप्रथम मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित अभ्यासाव्यात. कोणत्या घटकावर प्रश्न विचारले गेलेत ते समजून घ्यावेत, मला नेहमीच असे वाटते की, वढरउ साठी मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका हेच खऱ्या अर्थाने मार्गदर्शकाचे काम करतात. जर २०११ व २०१२ च्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे आपण त्याची विभागणी करू शकतो.
२०११ मध्ये – इंडिया इअरबुकवर ९ प्रश्न, विज्ञान तंत्रज्ञानावर १८ प्रश्न, अर्थशास्त्रावर १७ प्रश्न, भूगोलावर ११ प्रश्न, पर्यावरणावर २१ प्रश्न, भारतीय राज्यघटनेवर आठ प्रश्न, इतिहासावर १२ प्रश्न विचारले गेले होते.
२०१२ मध्ये – इंडिया इअरबुकवर ९ प्रश्न, विज्ञान तंत्रज्ञानावर ९ प्रश्न, अर्थशास्त्रावर १० प्रश्न, भूगोलावर ११ प्रश्न, पर्यावरणावर २३ प्रश्न, भारतीय राज्यघटनेवर १८ प्रश्न, इतिहासावर २० प्रश्न विचारले गेले होते. जास्तीतजास्त प्रश्न हे वरील विषयातील चालू घडामोडींशी संबंधित होते.
बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी पूर्वपरीक्षा अवघड होऊन बसते. प्रश्नांचे स्वरूपच बऱ्याच काळापर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही. यू.पी.एस.सी.च्या पूर्वपरीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची विभागणी आपण खालील प्रकारे करू शकतो.
१)    काही प्रश्न हे एक स्टेटमेंट व त्याला चार पर्याय दिले असतात व त्यातील एक योग्य पर्याय निवडायचा असतो.
    उदा. १८५७ चा उठाव खालीलपकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत झाला?
अ) लॉर्ड डलहौसी        ब) लॉर्ड कॅिनग
क) लॉर्ड वेलेस्ली        ड) यांपकी नाही
२)    काही प्रश्नांत दोन ते तीन विधाने दिलेली असतात. त्यांपकी कोणते विधान बरोबर आहे, असा प्रश्न विचारला जातो.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या प्रकारचे प्रश्न ही जास्त डोकेदुखी ठरतात, मात्र या प्रश्नांचा योग्य प्रकारे सराव केल्यास, तसेच अभ्यास व्यवस्थित असेल तर हे प्रश्न सोडविणे सोपे जाते.
उदा. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१)     सुभाषचंद्र बोस यांनी हरीपुरा आणि त्रिपुरा या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषविले.
२)     भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.
अ) विधान १ बरोबर  २ चूक ब) विधान २ बरोबर १ चूक
क) विधान १  व २ बरोबर      ड) विधान १ व २ चूक
उत्तर – भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी जे. बी. कृपलानी हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते.
उदा. खालीलपकी कोणते विधान बरोबर आहे?
१)    आझाद िहद सेनेची स्थापना जपान येथे झाली.
२)     भारत-ब्रम्हदेश  सरहद्दीवरील आझाद िहद सेनेच्या तुकडीचे नेतृत्व शहानवास खाँ याने केले.
३)     आझाद िहद सेनेच्या शिपायांना शिक्षामुक्त करण्यासाठी लाल किल्ल्याचा खटला प्रसिद्ध आहे.
अ) विधान १ व २ बरोबर आहे.    
ब) विधान २  व ३ बरोबर आहे.
क) विधान १  व ३ बरोबर आहे.    
ड) विधान १, २ व ३ बरोबर आहे.
उत्तर – आझाद िहद सेनेची स्थापना सिंगापूर येथे झाली.
३) Asseration / Reason या प्रकारचे प्रश्न :
या प्रकारच्या प्रश्नात दोन स्टेटमेंट दिली जातात व त्यावरून प्रश्न विचारला जातो .
उदा. Asseration (अ) : IUCN रेड डाटा बुकद्वारा धोक्याच्या  पातळीवर असलेल्या आणि अतिसंरक्षणाची गरज असलेल्या वन्यजीवांबद्दल माहिती मिळते :
Reason (फ) : पांढरा हत्ती, पाणघोडा, व्हेल, डॉल्फीन हे नामशेष होण्याच्या मार्गावरील प्राणी आहेत.
अ) विधान अ व फ  ही दोन्ही विधाने बरोबर असून फ चे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
ब)    विधान अ व फ  ही दोन्ही विधाने बरोबर असून फ  हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
क)    विधान अ बरोबर फ  चूक आहे.
ड)    विधान अ चूक  फ  बरोबर आहे.
विद्यार्थ्यांनी या प्रकारची उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
४) घटनेचा क्रम लावणे या प्रकारची उदाहरणे (Sequencing Type)
 उदा. १) पंजाबमधील कुका उठाव  २) दिल्ली दरबार
३) पहिला फॅक्टरी अ‍ॅक्ट             ४) इलबर्ट विधेयक
अ) १, २, ४ व ३                    ब) १, २, ३ व ४
क) २, ३, १ व ४         ड) १, ४, ३ व २
उदा. कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात खालील देशाचा योग्य क्रम लावा.
अ) अमेरिका – चीन – रशिया – भारत
ब) अमेरिका – रशिया – चीन – भारत
क) रशिया – अमेरीका – भारत – चीन
ड) चीन – अमेरिका – रशिया – भारत
५) जोडय़ा लावा प्रकारची उदाहरणे
 उदा. स्थानिक वारे व त्यांचे प्रदेश यांच्याबाबत योग्य
जोडय़ा लावा.
अ) फॉन-    १) रॉकी पर्वत
ब) चिनुक    २) आल्प्स पर्वत
क) सॅटा अ‍ॅना    ३) कॅलिफोíनया
ड) झोंडा    ४) अर्जेन्टिना
    A    B    C    D
a)    १    २    ३    ४
b)    २    १    ३    ४
c)    ३    ४    १    २
d)      ४    ३    २    १
उदा. खाली वृत्तपत्र व त्यांचे संस्थापक दिले आहेत. त्यांपकी योग्य जोडी कोणती, ते सांगा.
१) कॉमरेड    – मुहम्मद अली जिन्हा
२) अलहिलाल    – मौलाना अहममुल्ला
३) कॉमनवील    – अ‍ॅनी बेझंट
अ) फक्त १ व २      ब) फक्त ३ व २         क) फक्त १ व ३ ड) वरीलपकी सर्व
उदा. खालीलपकी योग्य जोडी कोणती?
१) महात्मा फुले    – प्रार्थना समाज
२) वि. रा. िशदे    – शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन
३) डॉ. आंबेडकर     – पीपल्स एज्युकेशन सोसायटी
४) एम. पी. रानडे     – डेक्कन सभा
यूपीएससीचा अभ्यास व कोचिंग क्लासची भूमिका
बऱ्याच वेळी हा प्रश्न मला विचारला जातो की, यू.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी कोचिंग क्लासची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे द्यावयाचे म्हटले तर मी म्हणेन की, तुम्ही कोचिंग क्लासशिवाय पास होऊ शकता. तुम्ही केलेल्या अभ्यासामुळे तुम्ही यशस्वी ठरतात. त्यात कोचिंग क्लासची भूमिका फारच थोडी आहे. त्यातही तो क्लास दर्जेदार असावा. कोणताही कोचिंग क्लास तुमच्या अभ्यासासाठी लागणारा
वेळ हा कमी करून देतो. मात्र अभ्यास तुम्हालाच करायचा आहे व पेपरही तुम्हालाच लिहायचा आहे. बऱ्याच वेळी विद्यार्थ्यांकडून एक मोठी चूक होते ती म्हणजे ते ज्या कोचिंग क्लासमध्ये या परीक्षेची तयारी करत असतात त्याच कोचिंग क्लासवर
त्यांनी दिलेल्या पुस्तकांवरच व  अभ्याससाहित्यांवर अवलंबून असतात. ज्यांना या परीक्षेचे ज्ञान आहे तो कोणीही असा
दावा करू शकत नाही की, आम्ही जे शिकवतो तेवढय़ाच अभ्यासावर तुम्ही या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात. असा
दावा कोणी करत असेल तर त्यांना यू.पी.एस.सी. समजली नाही असे मी खात्रीने म्हणतो. म्हणून विद्यार्थ्यांने त्या कोचिंग क्लास व अभ्यास साहित्याबरोबर काही दर्जेदार पुस्तकांचे वाचन, तसेच मागच्या प्रश्नपत्रिकेची वेळोवेळी उजळणी करून प्रश्न कसा विचारला गेला आहे, कोणत्या भागावर विचारला गेला आहे हे समजून अभ्यास केल्यास त्याचा फायदा होतो. स्वत:च्या नोट्स स्वत: तयार कराव्यात. या परीक्षेसाठी निवडलेल्या जाणाऱ्या उमेदवाराकडून बऱ्याच गुणांची अपेक्षा संघ लोकसेवा आयोग करत असते. त्यामुळे कोणत्याही कोचिंग क्लासमध्ये शिकताना अथवा बाजारात उपलब्ध असलेल्या नोट्सचा वापर करताना आपली मते, आपले विचार व्यवस्थित मांडण्याची सवय सुरुवातीपासूनच करावी. जर एखाद्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला असेल तरीही काही प्राथमिक पुस्तके यांचा अभ्यास आवश्यक करावा.
शेवटी यश तुम्हालाच मिळणार आहे, म्हणून प्रयत्नही तुम्हालाच करावे लागणार..!    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा