श्रीकांत जाधव

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील जैवविविधता आणि पर्यावरण या घटकाची चर्चा करणार आहोत. या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न.

पर्यावरण संबंधित परिस्थितीकी तंत्रमधील वहन क्षमता (carrying capacity) याची परिभाषा स्पष्ट करा, की कशा प्रकारे ही संकल्पना एखाद्या प्रदेशाच्या शाश्वत विकासाच्या आकलनासाठी महत्त्वाची आहे. (२०१९) भारतात जैवविविधता कशा प्रकारे वेगवेगळी आढळून येते? वनस्पती आणि प्रजाती यांच्या संवर्धनासाठी जैविक विविधता कायदा २००२ कशा प्रकारे साहाय्यकारी आहे? (२०१८)

हवामान बदल ही एक जागतिक समस्या आहे. भारत हवामान बदलामुळे कशा प्रकारे प्रभावित होईल? हवामान बदलामुळे भारतातील हिमालयीन आणि समुद्रकिनारपट्टी असणारी राज्ये कशी प्रभावित होतील? (२०१७)

मोठय़ा प्रकल्पांचे नियोजन करताना मानवी वस्त्यांचे पुनर्वसन हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय परिणाम आहे, ज्यावर नेहमीच वादविवाद होतो. विकासाचे मोठे प्रकल्प प्रस्तावित करताना हे परिणाम सुसह्य़ करण्यासाठी सुचविलेल्या उपायावर चर्चा करा. (२०१६)

नमामी गंगे आणि स्वच्छ गंगासाठीचे राष्ट्रीय मिशन (NMCG) कार्यक्रम आणि यापूर्वीच्या योजनांपासून मिळालेल्या संमिश्र परिणामाच्या कारणांवर चर्चा करा. गंगा नदीच्या संवर्धनासाठी कोणती मोठी झेप ही वाढीव योगदानाच्या अपेक्षेपेक्षा अधिक साहाय्यकारी होऊ शकते? (२०१५)

जरी कार्बन क्रेडिट आणि स्वच्छ विकास प्रणाली यू.एन.एफ.सी.सी.सी.च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या असल्या तरी, यातील कार्बन क्रेडिटच्या मूल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झालेली आहे. अशा स्थितीतही हे चालू ठेवावे का? आर्थिक वृद्धीसाठी भारताला आवश्यक असणारी ऊर्जेची गरज यासंदर्भात चर्चा करा. (२०१४)

अवैधरित्या केलेल्या खाणकामाचे कोणते परिणाम होतात? कोळसा खाण क्षेत्रासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या ‘जा किंवा जाऊ नका’

(GO AND NO GO) या संकल्पनेची चर्चा करा. (२०१३)

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. संपूर्ण पेपर तीनचा विचार केल्यास या घटकावर अधिक प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले नाहीत, असे दिसते. तसेच हे प्रश्न विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा विचार करून विचारण्यात आलेले आहेत. या घटकाची सखोल माहिती असल्याखेरीज हा घटक परीक्षेच्या दृष्टीने तयार करणे अवघड जाते. तसे या घटकाच्या पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत आहे, पण उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास आपणाला या घटकाचा अभ्यास नेमक्या कोणत्या पद्धतीने करावा याची दिशा मिळते.

वरील प्रश्नांमध्ये संकल्पना, तसेच संबंधित कार्यक्रम आणि त्यापासून झालेला फायदा आणि त्यांची जैवविविधता आणि पर्यावरण याचे संवर्धन करण्यासाठीची उपयुक्तता यांसारख्या पलूंचा मुखत्वे विचार केलेला दिसून येतो. तसे या घटकाचे स्वरूप सायंटिफिक पद्धतीचे आहे. त्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

* जैवविविधता आणि पर्यावरण परीक्षेच्या दृष्टीने नियोजन

जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या प्रदेशांपैकी एक म्हणजे भारत देश आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याच्या परिणामस्वरूप भारतातील उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असून याचा भारतातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. याचबरोबर आधुनिकीकरणाच्या युगात नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर संकट येत आहेत. शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या जैविक उत्पादने व साधन-संपत्तीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्या तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात खूप मोठय़ा पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल. याचे जैवविविधता आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या सर्व पलूंचे एकत्रित आकलन करून हा घटक समजून घ्यावा लागतो.  या घटकामध्ये जैवविविधता आणि पर्यावरण याचे संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि होणारा ऱ्हास, पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे आपणाला अभ्यासावे लागणार आहेत. पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, त्यासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या आदीचा अभ्यास करावा लागेल. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पारीत करण्यात आलेले विविध कायदे, त्यांची उपयुक्तता तसेच पर्यावरणसंबंधी करावयाचे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन, ते का अनिवार्य करण्यात आले आहे, याची नेमकी उपयुक्तता काय आदी बाबींचा एकत्रित विचार करावा लागेल. त्यानंतरच या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नियोजन करावे लागणार आहे.

या घटकासाठी  नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी.ची पर्यावरणासंबंधित पुस्तके वाचावीत. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपातील पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. उदाहरणार्थ ळटऌ चे डी.आर. खुल्लर लिखित पर्यावरणाचे पुस्तक. तसेच इंडिया इयर बुकमधील पर्यावरणाचे प्रकरण याचाही अभ्यास करावा. या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ ही इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय, जैवविविधता प्राधिकरण यांच्या संकेतस्थळांचा वापर करावा. त्यासोबतच भारत सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील ‘जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास’ हे प्रकरण अभ्यासावे.

Story img Loader