प्रवीण चौगुले
प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता भूगोल अभ्यासघटकाविषयी माहिती घेणार आहोत. भूगोलाची व्याप्ती व परीक्षेतील वेटेज लक्षात घेता परीक्षार्थीना निश्चितच योग्य रणनीतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. संकल्पना स्पष्ट करून घेतल्यास हा विषय अत्यंत सुलभ बनवता येतो. दरवर्षी भूगोल या विषयावर किमान १५ ते २० प्रश्न विचारले जातात. २०१८ सालच्या पूर्वपरीक्षेत १० प्रश्न विचारण्यात आले होते.
सर्वप्रथम आपण प्राकृतिक भूगोल या अभ्यासघटकांची तयारी कशी करावी याची माहिती घेऊ.
प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जात असल्याने त्यास भूगोल विषयाचा गाभा मानला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादी घटक अभ्यासावे लागतात. प्राकृतिक भूगोल हा घटक संकल्पनात्मक बाबींशी अधिक जवळीक साधणारा आहे. परिणामी या सर्व घटकांचे पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते.
भूरूपशास्त्रामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया अभ्यासाव्या लागतात. यात जगातील ज्वालामुखी व भूकंपप्रवण क्षेत्रे, मुख्य नद्यांची खोरी, इ. महत्त्वपूर्ण घटक आहेत.
सागरशास्त्र (Oceanography) मध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, सागराची क्षारता, सागरी प्रवाह, प्रवाळभित्तिका (Coral Reefs), सागरी प्रदूषण इ.सोबत सागरमाला प्रकल्प, सागरी हद्दीवरून राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारे वाद String of pearls इ. बाबी लक्षात घ्याव्यात.
वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेटप्रवाह, सायक्लोन्स, एल निनो, ला निना. इ. हवामानशास्त्राशी संबंधित मुद्दे महत्त्वाचे आहेत. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटना या चालू घडामोडींशी संबंधित घटना अभ्यासणे आवश्यक आहे.
यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयातील प्राकृतिक भूगोल अभ्यासघटकाची उकल केली. यानंतर या अभ्यासघटकावर आर्जपत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊ.
२०१८ मध्ये खाली दिलेली विधाने लक्षात घ्या, असा प्रश्न विचारला होता. त्यासाठी पुढील विधाने दिली होती.
१. बॅरन आयलँड ज्वालामुखी हा जिवंत ज्वालामुखी असून भारतीय क्षेत्रामध्ये स्थित आहे. २. बॅरन आयलँड ग्रेट निकोबार बेटाच्या १४० किमी. पूर्वेस आहे. ३. मागील वेळेस १९९१मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्या वेळेपासून हा निष्क्रिय आहे.
या प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतातील नदीप्रणालीचा अभ्यास आवश्यक आहे. यामध्ये भारतातील प्रमुख नद्या, त्यांची उगमस्थाने, त्यांच्या उपनद्या आदी बाबींची माहिती असावी. प्राकृतिक भूगोल हा भूगोलाचा गाभा असल्याने या विषयातील संकल्पना स्पष्ट असतील तर त्याचा भूगोलातील इतर घटकांचे आकलन करून घेण्यास फायदा होतो. प्राकृतिक भूगोल या विषयावर पकड मिळवण्यासाठी या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार करा. तसे केल्यास कमीतकमी वेळामध्ये हा घटक अभ्यासता येऊ शकतो.
प्राकृतिक भूगोलाचे मूलभूत आकलन एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांमधून करावे, ज्यामुळे या विषयाला सुलभपणे समजून घेता येते. पुढील वाचनाकरिता Certificate physical and human Geography by Goe Cheng Leang हे पुस्तक वापरावे. नोट्स काढण्यापूर्वी उपरोक्त संदर्भग्रंथ वाचून त्यानंतर या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे आकलन करून घ्यावे.
भूगोलाच्या अध्ययनामध्ये पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात, उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, सदर घटना भौगोलिक किंवा इतर विषयांशी संबंधित असू शकतात. नकाशामध्ये प्रामुख्याने पर्वत, पर्वतरांगांचे दक्षिण उत्तर किंवा पूर्वपश्चिम क्रम, विषुववृत्त ज्या प्रदेशामधून जाते त्यांची नावे, नद्या, शहरे, देशांच्या सीमा, समुद्र, इ. बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
२०१८मध्ये पुढील प्रश्न विचारला होता –
बातम्यांमध्ये उल्लेख असणारे काही प्रदेश देश पुढीलप्रमाणे
१. कॅटॅलोनिया स्पेन
२. क्रिमीया हंगेरी
३. मिंडानाओ फिलिपिन्स
४. ओरोमिया नायजेरिया
वरीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?
यासारखे चालू घडामोडींवर आधारित मात्र भूगोलाचा संदर्भ असणारे प्रश्न विचारले जातात.
२०१७ साली पुढील प्रश्न विचारला होता –
खालीलपैकी कोणता देश भौगोलिकदृष्टय़ा ग्रेट निकोबार बेटाच्या अधिक जवळ आहे?
१. सुमात्रा २. बोर्नियो ३. जावा ४. श्रीलंका.
वरील प्रश्नांवरून नकाशाधारित प्रश्न व नकाशा वाचनाचे महत्व अधोरेखित होते. नकाशा वाचनाकरिता Oxford किंवा ttk ‘चा अॅटलास घ्यावा. भूगोलाचा अभ्यास करताना व वर्तमानपत्र वाचत असताना अॅटलास नेहमी जवळ ठेवला पाहिजे.