प्रवीण चौगले

मागील लेखामध्ये यूपीएससी पूर्व परीक्षा २०२३ करिता प्राचीन भारत या घटकावर चर्चा केली. प्रस्तुत लेखांमध्ये आपण ‘मध्ययुगीन भारत’ या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक रणनीतीविषयी जाणून घेणार आहोत. या घटकावर २०११ ते २०२२ मध्ये सुमारे २५ ते ३० प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इतिहासातील इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात. यामुळे हा घटक दुर्लक्षित राहिला आहे.

अभ्यासाच्या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स. ७५० पासून झाली असल्याचे मानले जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स. ७५०-१२०० पर्यंत). या कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े पाहावयास मिळतात. यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे भारतात इस्लाम धर्माचे आगमन होय. या कालखंडामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये प्रादेशिक – राजकीय सत्तांचा उदय झालेला

होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला; पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकूट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादीच्या सत्ता होत्या.

यानंतरचा कालखंड हा दिल्ली सुलतानशाही व समकालीन प्रादेशिक सत्तांचा होता. दिल्ली सल्तनतीस समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतांतील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुख्यत्वे समावेश होता. दिल्ली सल्तनतीनंतर भारतात मुघल साम्राज्याची सत्ता स्थापन झालेली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थानमधील राजपूत सत्ता तसेच दक्खन भागातील आदिलशाही, निजामशाही व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य इत्यादीचा समावेश होतो. मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक राजकीय सत्तांचे अस्तित्व असल्यामुळे हा घटक काहीसा बोजड वाटतो यामुळे याची तयारी नेमकी कशी करावी याबाबत परीक्षार्थीमध्ये संधीग्धता दिसून येते. गतवर्षीय प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास आपल्याला मध्ययुगीन भारत या घटकातील महत्त्वाच्या टॉपिकची माहिती मिळते. केवळ या घटकांवर लक्ष केंद्रित केल्यास तयारीमध्ये नेमकेपणा येईल.

त्रिपक्षीय संघर्ष: पाल, प्रतिहार आणि राष्ट्रकूट राज्ये, महत्त्वाचे शासक व त्यांच्या काळातील घडामोडी.

राजपुतांचा उदय

*  चोल साम्राज्य : महत्त्वाचे शासक आणि त्यांचे योगदान, साहित्य, प्रशासन, आग्नेय आशियाशी असलेले संबंध.

*  इस्लामचे आगमन : अरब मोहिमेचा प्रभाव

*  सल्तनत काळ : महत्त्वाची घराणी, प्रशासन, समाज-संस्कृती, महत्त्वाच्या घडामोडी, पतन.

*  विजयनगर साम्राज्य : स्वरूप, महचे शासक, परदेशी प्रवासी, आर्थिक स्थिती, भाषा, साहित्य यातील विकास

महत्त्वाची युद्धे

(जसे की पानिपतची लढाई, तालिकोटाची लढाई इ. ऐतिहासिक दृष्टिकोनातून).

*  सूर साम्राज्य : प्रशासन, सुधारणा भक्ती आणि सुफी चळवळ झ्र् विकास आणि उत्क्रांती, शिकवण, समाजावरील प्रभाव, महत्त्वाचे संत, तत्त्वज्ञान

*  मुघल साम्राज्य : अकबर आणि महत्त्वाच्या मुघल सम्राटांचे योगदान. मुघल साम्राज्यातील प्रशासन, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था, राजपूत धोरण, मनसबदार पद्धत, मुघल सत्तेचे पतन,

*  मराठा साम्राज्य : प्रशासन, कर व्यवस्था, पानिपतचे युद्ध

युरोपियन कंपन्यांचे आगमन

प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासात संज्ञा विशेष महत्त्वाच्या आहेत. यावर खूप वेळा प्रश्न विचारले गेले आहेत. परिणामी, इतर गोष्टींबरोबरच प्राचीन किंवा मध्ययुगीन प्रशासनातील अधिकारी, प्रथा, वस्तू, साहित्य आणि लेखकांची नावे आठवली पाहिजेत. उपरोक्त घटकांचे एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकातून अध्ययन करणे तसेच वारंवार उजळणी करणे व सूक्ष्म नोट्स बनवणे यामुळे या विषयाची तयारी पूर्ण होईल. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पुढील काही बाबी आपण टाळू शकतो. उदा. किरकोळ युद्धे, राजकीय युद्धे, षडय़ंत्र, उत्तराधिकारी युद्धे इ. लहान प्रदेश, साम्राज्ये आणि त्यांचे तपशील. मध्ययुगीन भारत या घटकावर २०२२ च्या पूर्व परीक्षेमध्ये सुमारे सहा प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी नमुन्या दाखल काही प्रश्न पुढीलप्रमाणे:

* मध्ययुगीन भारतात ‘‘फनाम’’ या शब्दाचा वापर कोणत्या संदर्भात आहे: (२०२२)

(a) कपडे

(b) नाणी

(c) दागिने

(d) शस्त्रे

*   भारतीय इतिहासाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या:

१. भारतावर पहिले मंगोल आक्रमण जलाल-उद्दीन खल्जीच्या काळात झाले.

२. अलाउद्दीन खल्जीच्या कारकीर्दीत, एका मंगोल आक्रमणाने दिल्लीपर्यंत मजल मारली आणि शहराला वेढा घातला.

३ मुहम्मद-बिन-तुघलकने त्याच्या राज्याच्या उत्तर-पश्चिमेकडील भाग तात्पुरता मंगोलांना गमावला.

 वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे/आहेत?

(a) १ आणि २

(b) फक्त २

(c) १ आणि ३

(d) फक्त ३

* भारतीय इतिहासाच्या संदर्भात, खालीलपैकी कोणाला ‘‘कुलाह-दारन’’ म्हणून ओळखले जाते?

 a) अरब व्यापारी

 b) कलंदर

 c) पर्शियन कॅलिग्राफिस्ट

 d) सय्यद

*   निजामुद्दीन पानीपती यांनी ‘‘योगवसिष्ठ’’ चा फारसीमध्ये अनुवाद केला होता:

(a) अकबर

(b) हुमायून

(c) शहाजहान

(d) औरंगजेब

* रामानुजांच्या बसलेल्या स्थितीतील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उंच पुतळय़ाचे उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते हैदराबाद येथे नुकतेच करण्यात आले. खालीलपैकी कोणते विधान रामानुजांच्या शिकवणीचे अचूक प्रतिनिधित्व करते?

(a) मोक्षाचे सर्वोत्तम साधन म्हणजे भक्ती.

(b) वेद हे शाश्वत, स्वयं-अस्तित्वात असलेले आणि पूर्णत: अधिकृत आहेत.

(c) तार्किक युक्तिवाद सर्वोच्च आनंदासाठी होते.

(d) मोक्ष ध्यानाने मिळवायचा होता. या घटकाची तयारी थिमस इन इंडियन हिस्ट्री भाग २, तमिळनाडू स्टेट बोर्डचे पुस्तक, मध्ययुगीन भारत: सतीश चंद्र आणि एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून करावी.