प्रवीण चौगले
प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्व परीक्षा २०२३ करिता सामान्य अध्ययन पेपर १ मध्ये समाविष्ट कला व संस्कृती या घटकाविषयी चर्चा करणार आहोत. भारतीय कला आणि संस्कृती हा अतिशय व्यापक विषय आहे म्हणून तयारी सुरू करण्यापूर्वी उमेदवारांनी प्रथम अभ्यासक्रमातील सर्व टॉपिक आधी माहीत करून घ्यावेत. गतवर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले असता या विषयासाठी सखोल तयारीची आवश्यकता नसते हे जाणवते. याउलट प्रत्येक घटकाची सर्वसाधारण माहिती असणे गरजेचे आहे, मात्र तयारीदरम्यान संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. कारण UPSC नेहमी अभ्यासक्रमातील दुर्लक्षित भागावरही प्रश्न विचारू शकते. गतवर्षीच्या प्रश्नांचा पॅटर्न आणि प्रकार जाणून घेण्यासाठी प्रथम पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधील मागील प्रश्न पाहावेत. याआधी विचारलेल्या प्रश्नांचे विहंगावलोकन केल्यानंतर तुम्हाला अभ्यासाचा पूर्वनिर्धारित मार्ग सापडेल. आणि तुम्ही परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित करू शकता. पूर्वपरीक्षेसाठी कला आणि संस्कृतीच्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे:
दृश्य कला
भारतीय वास्तुकला :
सिंधू संस्कृती : इमारती आणि त्यांचे वैज्ञानिक स्वरूप.
बौद्ध वास्तुकला
मंदिर वास्तुकला,
इंडो-इस्लामिक वास्तुकला
भारतीय चित्रकला :
हा एक महत्त्वाचा विषय असून गुहा, मुघल, लघुचित्र, राजपूत अशा भारतीय चित्रांच्या विविध शैलींचा अभ्यास करावा. यामध्ये म्युरल पेंटिंगवर भर द्यावा. महत्त्वाचे घटक शोधा आणि एखाद्या पेंटिंगला असे महत्त्व का दिले जाते त्याविषयी जाणून घ्या.
सादरीकरण कला
भारतीय संगीत
भारतीय संगीताचे प्रकार उदा. हिंदूbस्तानी आणि कर्नाटक, विविध वाद्ये आणि त्यांचे उपयोग.
तसेच, महत्त्वाच्या व्यक्तींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
भारतीय नृत्य
८ शास्त्रीय नृत्य (भरतनाटय़म नृत्य, कथकली नृत्य, कथ्थक नृत्य, मणिपुरी नृत्य, ओडिसी नृत्य, कुचीपुडी नृत्य, सत्तरिया नृत्य, मोहिनीअट्टम नृत्य.) आणि लोकनृत्ये.
शास्त्रीय नृत्ये एकमेकांशी तुलना करून वाचावीत. त्यांची उत्पत्ती आणि उत्क्रांतीदेखील शोधा. नृत्यांचे विविध भाग आणि त्यांचे अर्थ. वापरलेले कपडे, मेकअपच्या शैली आणि नृत्य प्रकारांशी संबंधित एखादी विशिष्ट गोष्ट जाणून घ्या. प्रसिद्ध व्यक्तींची माहिती घ्यावी.
कला व हस्तकला
भारताची संस्कृती कलाकुसरीतून दिसून येते. कलाकुसरीच्या वस्तूंचा इतिहास आणि रचनेचा अभ्यास केला पाहिजे. वढरउ मध्ये कलमकारीसारखे विविध प्रकार विचारले गेले आहेत. यावरून भारतातील विविध प्रदेशांत तयार होणाऱ्या वस्तू, त्यांची वैशिष्टय़े महत्त्वाची आहेत.
या विषयाचा अभ्यासक्रम परिभाषित केला असला तरीही भारतातील विविधता लक्षात घेता त्याची व्यापकता अधिक आहे म्हणून संपूर्ण अभ्यासक्रम सखोलपणे करणे फायद्याचे नाही. म्हणून, उजळणीसाठी मर्यादित संसाधने आणि संक्षिप्त नोट तयार करणे खूप महत्वाचे आहे. पूर्वपरीक्षेमध्ये नेहमीच असे प्रश्न विचारले जातात, ज्यांची तयारी करणे काहीवेळा फार कठीण आणि अशक्य असते याचीही नोंद घ्यावी. नागरी सेवा परीक्षेमध्ये चालू घडामोडी नेहमीच महत्त्वाच्या असतात, कारण बरेच प्रश्न थेट चालू घडामोडींशी संबंधित असू शकतात. इतिहास आणि भूगोलसारख्या पारंपरिक विषयांचादेखील चालू घडामोडींशी संबंध असू शकतो. कला व संस्कृतीचे प्रश्न चालू घडामोडींशी कसे संबंधित असू शकतात याचे उदाहरण खालीलप्रमाणे.
द. सोमनाथ मंदिर वेरावळजवळील नवीन सर्किटचे पंतप्रधानांनी नुकतेच उद्घाटन केले. सोमनाथ मंदिराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
१. सोमनाथ मंदिर हे ज्योतिर्लिगांपैकी एक आहे.
२. सोमनाथ मंदिराचे वर्णन अल-बिरुनी यांनी दिले आहे.
३. सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा (सध्याच्या मंदिराची स्थापना) राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आली.
खालील कोड वापरून योग्य उत्तर निवडा:
( a) फक्त १ आणि २
( b) फक्त २ आणि ३
( c) फक्त १ आणि ३
(d) १,२ आणि ३
या घटकावर २०२२ च्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न पुढीलप्रमाणे –
द. अशोकाच्या प्रमुख शिलालेखांचे ठिकाण राज्यातील स्थान
१. धौली – ओडिशा
२. एरागुडी – आंध्र प्रदेश
३. जौगडा – मध्य प्रदेश
४. कलसी – कर्नाटक
वर दिलेल्या किती जोडय़ा बरोबर जुळल्या आहेत?
( a) फक्त एक जोडी
( b) फक्त दोन जोडय़ा
( c) फक्त तीन जोडय़ा
( d) सर्व चार जोडय़ा
द. प्राचीन दक्षिण भारतातील संगम साहित्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
( a) संगम कवितांमध्ये भौतिक संस्कृतीचा कोणताही संदर्भ नाही.
( b) वर्णाचे सामाजिक वर्गीकरण संगम कवींना माहीत होते.
( c) संगम कवितांना योद्धा नीतिमत्तेचा संदर्भ नाही.
( d)संगम साहित्यात जादुई शक्तींचा उल्लेख तर्कहीन आहे.
या घटकाची तयारी भारतीय कलेचा परिचय भाग-१ व २ या एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून करावी. यासोबत सांस्कृतिक संसाधने आणि प्रशिक्षण केंद्र (CCRT) वेबसाइटवरील माहिती वाचली तरी चालेल. यानंतर द वंडर दॅट वॉज इंडिया -ए.एल. बाशम लिखित पुस्तकातील निवडक भाग करावा.