यूपीएससी नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेअंतर्गत सामान्य अध्ययन पेपर १ मधील घटकांची चर्चा करताना भूगोल या घटकांचे विश्लेषण आता आपण करणार आहेत. ज्याप्रमाणे पेपर १ मध्ये इतिहास विषयाचा आवाका विस्तारण्यात आलेला आहे, तीच बाब भूगोल या विषयाच्या बाबतीतही पाहायला मिळते. २०१३ पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये केवळ ‘भारताचा प्राकृतिक, सामाजिक आणि आíथक भूगोल’ या घटकांचा समावेश होता. मात्र, आज संपूर्ण जगाच्या भूगोलाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला दिसतो व त्यामुळे या विषयाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात वाढलेली दिसते.
‘जगाच्या प्राकृतिक भूगोलाची प्रमुख वैशिष्टय़े’ हा या अभ्यासक्रमातील पहिला घटक होय. वरकरणी जरी हा घटक छोटा वाटत असला तरी प्रत्यक्षात त्याचा आवाका हा फार मोठा आहे. यामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल तसेच पर्यावरणीय भूगोलाचादेखील समावेश होतो. त्यामुळे बऱ्याच सविस्तरपणे आणि सखोलपणे याचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्राकृतिक भूगोलातील मूळ संकल्पना समजावून घेणे. यामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरते. उदा. पृथ्वीची अंतर्गत संरचना, खडकांचे प्रकार, वातावरणाची संरचना, सागरतळ रचना इ. या घटकांवरील बहुतांश प्रश्न हे संकल्पनात्मक व कार्यकारणभाव तपासणारे असतात.
भारताच्या भूगोलाचा विशेषत्वाने उल्लेख अभ्यासक्रमात केलेला नाही. परंतु, जागतिक भूगोलाअंतर्गतच भारताच्या भूगोलाचा विशेष अभ्यास करणे येथे अभिप्रेत आहे. यामध्ये भारतातील विविध प्राकृतिक भूरूपांची संरचना व त्याचा अभ्यास यांचा समावेश होतो. उदा. हिमालय पर्वताची जडणघडण किंवा अल-निनो व मान्सून वाऱ्यांचा संबंध इ. भारताचे हवामान, मृदा तसेच भारतीय शेतीची वैशिष्टय़े हे त्यातील प्रमुख घटक होत. या घटकांच्या अभ्यासासाठी ‘एनसीईआरटी’ची अकरावी व बारावी स्तरावरील पुस्तके त्याचबरोबर ‘Certificate Physical and Human Geography by G. C. Leong’ हे प्रमुख संदर्भ अभ्यासणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नकाशांचा वापर करणेदेखील महत्त्वाचे आहे.
प्राकृतिक भूगोलनंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आíथक भूगोल. आíथक भूगोलाचा अभ्यासक्रम हा अत्यंत नेमक्या स्वरूपाचा केलेला दिसतो. यामध्ये सर्वप्रथम जगातील (व त्या अनुषंगाने भारतातीलही) प्रमुख नसíगक संसाधने व त्यांचे वितरण हा घटक समाविष्ट केलेला आहे. यामध्ये नसíगक संसाधनांच्या अंतर्गत जैविक व अजैविक संसाधने अभ्यासावी लागतात. जैविक संसाधनांमध्ये वन संसाधने, सागरी संसाधने इ.चा समावेश होतो. त्याचबरोबर अजैविक संसाधनांमध्ये प्रमुख खनिजे व त्यांचे जागतिक वितरण यांचा समावेश होतो. खनिजांमध्ये पुन्हा धातू, अधातू तसेच ऊर्जा संसाधने उदा. कोळसा, युरेनिअम इ.चे महत्त्व व वितरण अभ्यासावे लागते. हा घटक चालू घडामोडींशीही मोठय़ा प्रमाणात निगडित आहे. उदा. सध्या शेल गॅस या संसाधनाची चालू असलेली चर्चा व त्याची एक प्रभावी ऊर्जा स्रोत म्हणून असलेली क्षमता, या सर्व गोष्टींचा भारताच्या ऊर्जा संकटाशी असलेला संबंध यावर प्रश्न अपेक्षित आहेत.
त्यानंतर ‘उद्योगांचे स्थानिकीकरण व त्यावर प्रभाव पाडणारे घटक’ हा आíथक भूगोलामधील दुसरा उपघटक अभ्यासक्रमामध्ये पाहायला मिळतो. यामध्ये प्राथमिक, द्वितीय तसेच तृतीय क्षेत्रातील उद्योग व त्यांचे स्थानिकीकरण करण्यास कारणीभूत ठरणारे घटक यांचा अभ्यास करावा लागतो. उदा. कच्च्या मालाची उपलब्धता, बाजारपेठेशी जवळीक, स्वस्त दरात उपलब्ध असणारे मजूर इ. हा घटकदेखील चालू घडामोडींशी निगडित असा आहे. कारण गेल्या काही दशकांत (विशेषत: १९९१ नंतर किंवा २००८ च्या मंदीसदृश वातावरणामुळे) या घटकांमध्ये मोठय़ा प्रमाणात परिवर्तन झालेले दिसते.
भारतातील एलपीजी मॉडेलच्या स्वीकारानंतर झालेले औद्योगिक क्षेत्रातील बदल, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका किंवा किरकोळ बाजारातील परदेशी गुंतवणूक यांवर प्रश्न अपेक्षित असतात. त्यामुळे भूगोलासारख्या विषयातही चालू घडामोडींना असलेले महत्त्व अधोरेखित होते.
वरील दोन आíथक भूगोलाच्या घटकांसाठीदेखील ‘एनसीईआरटी’चा अभ्यास त्याचबरोबर भारताची आíथक पाहणी, नियतकालिकांचे वाचन करणे व त्यातील या घटकांशी संबंधित मुद्दय़ांची नोंद करून ठेवणे महत्त्वाचे आहे.
भूगोलातील शेवटचा घटक म्हणजे विविध भूभौतिकीय घटना व त्यांचा पशू-पक्षी, वनस्पती यांच्यावरील प्रभाव यामध्ये ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळे यांचा अभ्यास करावा लागतो. भौगोलिक रूपे व त्यांचे स्थान त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये होणारे बदल व त्या बदलांचे परिणाम यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. यामध्ये हवामान बदल व त्यांचा प्राणी, वनस्पती तसेच पाणीसाठा व हिमनद्यांवरील परिणाम याचा समावेश होतो. या घटकांशी निगडित देखील विविध अहवाल सातत्याने राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होत असतात. त्यामुळे त्यांची नोंद ठेवणे येथे आवश्यक आहे. अशा प्रकारे सामान्य अध्ययन पेपर १ अंतर्गत भूगोल हा विषय विस्तारलेला व समकालीन घडामोडींशी मोठय़ा प्रमाणात जोडलेला दिसतो. त्यासाठी वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे नियमित वाचन महत्त्वाचे आहे. पारंपरिक संदर्भपुस्तकांमधून संकल्पना समजावून घेऊन त्यावर आधारित प्रश्नांचा सराव करणे महत्त्वाचे आहे. तसेच भूगोल या विषयाच्या अनुषंगाने नकाशाचा वापर करणे देखील आवश्यक आहे.
साधारणपणे पेपर १ च्या प्रश्नपत्रिकेमध्ये ३० टक्के महत्त्व भूगोलाला मिळालेले दिसते. त्या अनुषंगाने २०१३ मधील प्रश्नपत्रिकेत भूगोलावर विचारलेले प्रश्न व त्यांचे विश्लेषण याची चर्चा आपण पुढील लेखांत करणार आहोतच. परंतु अभ्यास करतानाचा दृष्टिकोन कसा असावा व त्यातील विविध घटकांसाठी आवश्यक संदर्भ याचा आढावा घेऊन चालू घडामोडींशी या विषयाची असलेली सांगड कशी घालावी याचे भान राखणे महत्त्वाचे ठरते.
admin@theuniqueacademy.com
सामान्य अध्ययन पेपर १ ची भूगोलाची तयारी
यूपीएससी नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेअंतर्गत सामान्य अध्ययन पेपर १ मधील घटकांची चर्चा करताना भूगोल या घटकांचे विश्लेषण आता आपण करणार आहेत.
First published on: 17-02-2014 at 07:33 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc geogrophy practise