विक्रांत भोसले
लेख क्र. १
भाषेच्या माध्यमातून आपली मते मांडण्याचा आणि एकंदरीतच व्यक्ती म्हणून अभिव्यक्त होण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे निबंध लेखन! यूपीएससीच्या मुख्य परीक्षेमधील निबंधाचा पेपर हा महत्त्वाचा तसेच अतिशय आव्हानात्मक असा घटक आहे. गतवर्षीच्या निकालांनी हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. निबंध विषयाकरिता स्वतंत्र पेपर १९९३ पासून परीक्षेच्या संरचनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सतीशचंद्र समितीच्या अहवालानुसार हा बदल करण्यात आला. आधीच्या संरचनेप्रमाणे दिलेल्या सहा विषयांपैकी एक विषय निवडून त्यावर तीन तासांमध्ये २५०० (कमाल मर्यादा) शब्दांमध्ये एक निबंध लिहिणे अपेक्षित होते. २०१४ पासून २५० गुणांसाठी उमेदवारांनी दोन विषयांवर निबंध लिखाण करणे अपेक्षित आहे. २०१४ पासून अ आणि इ अशा दोन विभागांमध्ये प्रत्येकी चार विषय देण्यात येतात. प्रत्येक विभागातील चारपैकी एक विषय निवडून त्यावर प्रत्येकी १०००-१२०० शब्दांत निबंध लिहिणे अपेक्षित आहे. निबंधाच्या घटकामधून उमेदवाराची तार्किक विचारक्षमता व विश्लेषणात्मक कौशल्ये तपासली जातात.
यूपीएससी परीक्षेतील निबंधाच्या पेपरचे महत्त्व
निबंध विषयामध्ये चांगले गुण मिळवून एकंदरीत गुणांची बेरीज वाढविणे शक्य आहे, तर निबंध विषयामुळे एकंदरीत गुणांवर नकारात्मक परिणाम होणेदेखील शक्य आहे. निबंध विषयात चांगले गुण मिळाल्यास त्याचा फायदा वरच्या गटातील पद मिळण्यास मदत होऊ शकते. निबंधाचा पेपर हा मुख्य परीक्षेतील अनिवार्य घटक आहे आणि म्हणूनच त्याचे गुण अंतिम गुणपत्रिकेत धरले जातात. निबंधांच्या विषयांसंदर्भात कोणीही उमेदवार विशेष प्रभुत्व असल्याचे ठामपणे सांगू शकत नाही. इतर सामान्य अध्ययनाच्या विषयांबाबत अथवा वैकल्पिक विषयांबाबत अशा प्रकारचे प्रभुत्व मिळवणे कष्टसाध्य असते. परंतु निबंधाच्याबाबतीत सर्व उमेदवारांसाठी सारखेच आव्हान निर्माण होते. त्याचबरोबरीने निबंधाच्या विषयासाठीची सर्व माहिती कोणीही साठवून ठेवू शकत नाही. किंबहुना, केवळ साठवलेल्या माहितीतून चांगला निबंध लिहिला जाऊ शकत नाही. म्हणूनच निबंधाच्या पेपरसाठी जाणीवपूर्वक तयारी करणे आवश्यक ठरते. अर्थात, निबंधाच्याबाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, निबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारांचा, मतांचा, मूल्यांचा ठसा असतो. यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दिलेल्या विषयाबद्दल माहितीबरोबरच योग्य विश्लेषण व अनुमानांची आयोग अपेक्षा करते. तसेच आपली मते, वैचारिक कल, संप्रेषण कौशल्ये या सगळय़ाचा परिपाक निबंधात उतरणे अपेक्षित आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व भावी उमेदवारांचे असे मत असते की, सामान्य अध्ययनाच्या इतर तयारीमधूनच निबंधाच्या घटकाचीसुद्धा तयारी होते. मात्र तयारीच्या या टप्प्यावर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, सामान्य अध्ययनाच्या इतर घटकांप्रमाणेच निबंधाच्या घटकाकरिता विशिष्ट तयारी करणे गरजेचे असते. ही तयारी करीत असताना विषयाचे ज्ञान मिळविणे, स्वत:चा वैचारिक कल व मते निश्चित करणे व लिखाणाचा सराव करणे या सगळय़ा टप्प्यांचे क्रमवार नियोजन करावे लागते. याकरिता पुरेसा वेळ द्यावा लागतो. तसेच सामान्य अध्ययनाच्या इतर पेपरप्रमाणे भरपूर सराव करावा लागतो.
निबंध लिखाण करत असताना लेखनाची शैली हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दिलेल्या विषयाशी प्रामाणिक राहून सलग तीन तास गुणवत्तापूर्ण लिखाण करणे, योग्य माहितीचा वापर करणे, मते आणि विश्लेषण यांची सांगड घालणे या सगळय़ाकरिता तयारीच्या नियोजनामध्ये वेगळा वेळ द्यावा लागतो. परीक्षेमध्ये यशस्वीरीत्या निबंधलेखन करण्यासाठी तयारीच्या टप्प्यावर भरपूर सराव केलेला असणे आवश्यक आहे. याकरिता काय व कसे काम करावे हे आपण पाहणार आहोत. एकंदर यूपीएससीच्या तयारीच्या काळात इतके मोठे व सविस्तर निबंध लिहिणे हे अवघड वाटणे साहजिक आहे, परंतु जसेजसे आपल्या वाचनाचा व लिखाणाचा अवकाश (आवाका) विस्तारत जातो, तसेतसे निबंध लिखणासाठीचा पाया मजबूत होतो.
निबंधाच्या पेपरमधील किमान आवश्यक बाबी :
(1) विषयाचा आवाका आणि मर्यादा
(2) विचारातील व मांडणीतील स्पष्टता
(3)वैचारिक प्रक्रिया
(4) उमेदवाराचे स्वत:चे वैचारिक विश्लेषण
वरील अपेक्षांची यादी आयोगाने दिलेली आहे. वरवर पाहता ही यादी साधारण वाटत असली, तरी ती प्रत्यक्षात आणताना लिखाणावर पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. पुढील लेखांमधून आपण या अपेक्षा आणि त्याला अनुसरून आवश्यक लेखन सरावाची चर्चा करणार आहोत.