श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये आपण मानवी भूगोल या विषयातील लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत.
२०१३ ते २०२१दरम्यान या घटकावर विचारण्यात आलेले काही प्रश्न व त्यांचे स्वरूप :
२०२१ मध्ये – जगामध्ये खनिज तेलाच्या असमान वितरणाच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना थोडक्यात खनिज तेल जगामध्ये कशा पद्धतीने नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहे तसेच हे कसे असमान वितरण दर्शिविते हे नमूद करावे लागते आणि परिणामांची चर्चा करावी लागते. या प्रश्नामध्ये बहुआयामी परिणामांची चर्चा करताना आर्थिक भूगोल या विषयाच्या अनुषंगाने करणे आवश्यक आहे.
२०२० मध्ये – भारतात सौर ऊर्जेची अपार क्षमता असूनही प्रादेशिक विकासामध्ये फरक दिसून येतो. विस्तृत वर्णन करा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना भारतातील सौर ऊर्जेची जगाच्या तुलनेत असणारी क्षमता, याविषयी थोडक्यात नमूद करून भारतातील प्रदेशनिहाय असणारी सौर ऊर्जेची क्षमता व हा फरक कशामुळे आहे, याविषयी चर्चा करणे अपेक्षित आहे. याच वर्षी भारतातील दशलक्ष शहरे यामध्ये येणारे मोठे महापूर ज्यामध्ये हैदराबाद आणि पुणे या स्मार्ट सिटींचाही समावेश आहे, यासाठीच्या कारणांचा वृत्तांत द्या. चिरस्थायी प्रतिबंधक उपाय सुचवा. या प्रश्नाचे उत्तर लिहिताना भारतातील शहरांचा वेगाने होणारा विस्तार आणि यामुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाहांना होणारा अवरोध इत्यादी अनुषंगाने कारणे नमूद करून चर्चा करणे अपेक्षित आहे.
२०१९ मध्ये – प्रादेशिक संसाधनांवर आधारित उत्पादन उद्योग (manufacturing industries) रणनीती भारतात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते का? हा प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी प्रादेशिक संसाधने, उत्पादन उद्योग व भारतातील रोजगार निर्मिती या तिन्ही बाबींची योग्य समज असणे गरजेचे आहे. प्रादेशिक संसाधनांवर आधारित उत्पादन उद्योग भारतातील रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकतात का, या महत्त्वाच्या मुद्दय़ाविषयी उत्तरात लिहिणे अपेक्षित आहे.
२०१८ मध्ये – मत्स्यपालन व याच्याशी संबंधित समस्या औद्योगिक कॉरिडॉर आणि त्याची वैशिष्टय़े शहरी भाग व पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली, भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (IRNSS) इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
२०१७ मध्ये – भारतातील येणारे पूर जलसिंचनासाठी शाश्वत स्रोत आणि सर्व प्रकारच्या हवामानामध्ये आंतरदेशीय जलवाहतुकीसाठी कशा प्रकारे रूपांतरित करता येऊ शकतील? अशा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी पुरे का येतात, याची माहिती जी विषयाच्या पारंपरिक आनुषंगाने माहीत असणे गरजेचे आहे, तसेच याचा विकासासाठी कसा वापर करता येऊ शकतो हे सोदाहरण स्पष्ट करावे लागते.
२०१६ मध्ये – ‘सिंधू नदी पाणी कराराची (Indus Water Treaty) माहिती द्या आणि बदलत्या द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर याचे पर्यावरणीय, आर्थिक आणि राजकीय परिणामांचे परीक्षण करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे सरळ दोन भाग पडतात. यातील पहिला भाग सिंधू नदी पाणी करार व यातील तरतुदी याची माहिती आणि दुसरा भाग सद्य:स्थितीतील भारत- पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधाबाबत आहे. हा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे. येथे प्रामुख्याने सिंधू नदीशी संबंधित प्राकृतिक माहिती आणि या दोन देशांमधील संबंध या दोन्हींची सांगड घालून जर हा करार मोडीत निघाला अथवा यामध्ये काही एकतर्फी बदल केले गेले तर याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात आणि हा प्रश्न भूगोल या घटकाशी संबंधित असल्यामुळे येथे पर्यावरणीय परिणामांची चर्चा करणे अधिक गरजेचे आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचे आकलन करून उत्तर लिहिणे क्रमप्राप्त ठरते.
२०१५ मध्ये – ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ांशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत’’. या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न भारत सरकारने आखलेल्या स्मार्ट शहरे धोरणाशी संबंधित आहे आणि हा प्रश्न भारतातील नागरीकरण आणि ग्रामीण विकास या प्रक्रियेला अधारभूत मानून विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी स्मार्ट शहरे ही संकल्पना नेमकी काय आहे आणि स्मार्ट शहरे हे नेमकी कशी असणार आहेत आणि याचा संबंध ग्रामीण भारतातील खेडय़ासोबत कशा प्रकारे येणार आहे आणि जर स्मार्ट शहरे हे शाश्वत करावयाची आहेत तर यासाठी स्मार्ट खेडय़ांची आवश्यकता का गरजेची आहे. तसेच भारतातील खेडे स्मार्ट बनविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि यामुळे ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाची प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे, हा मुख्य रोख या प्रश्नाचा होता व या आधारे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.
२०१४ मध्ये – ‘नैसर्गिक संसाधनाने समृद्ध म्हणून नावारूपाला येणाऱ्या आफ्रिकेतील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वत:चे स्थान कशा प्रकारे पाहतो?’ हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचा कल हा भारताच्या आफ्रिकेविषयी एकत्रित आखल्या गेलेल्या धोरणाचा भाग आहे आणि येथे भारताने आफ्रिका खंडातील विविध देशांसोबत स्थापन केलेले संबंध आणि यातून भारताला होणारा फायदा तसेच आफ्रिका खंड हा नैसर्गिक संसाधनाने समृद्ध असलेला खंड आहे इत्यादी महत्त्वाच्या पैलूंचा एकत्रित विचार करून आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वत:चे स्थान कशा प्रकारे पाहतो याची उत्तरामध्ये चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
२०१३ मध्ये – ‘भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचे विश्लेषण करा.’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नांची योग्य उकल होण्यासाठी आपणाला भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे यासाठी भारताची प्राकृतिक रचना आणि भारतातील वेगवेगळय़ा प्रदेशांतील पोषक वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादीविषयी मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे आणि या घटकामुळे भारतातील सुती उद्योग कशा पद्धतीने विकेंद्रित झालेला आहे याचे उदाहरणासह विश्लेषण उत्तरामध्ये देणे अपेक्षित आहे.
या घटकाशी संबंधित बहुतांश प्रश्न हे भारताच्या आर्थिक भूगोलशी संबंधित आहेत. तसेच, यातील काही प्रश्न भारत व जगाचा मानवी भूगोल यांचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. उपरोक्त प्रश्नांवरून आपणाला या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडी इत्यादीची योग्य माहिती असणे गरजेचे आहे, हे लक्षात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा